उद्योजकता किंवा स्वयंरोजगार ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या त्यागाची गरज लागते. जोखींमही घ्यावी लागते, प्रचंड मेहनतही करावी लागते. उद्योजक म्हणून अस्तित्व निर्माण करणे हे खूपच मोठे कार्य आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत या महिलांनी मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे.
कोल्हापूरातील 14 महिलांच्या प्रेरणादायक कथा डाॅ. अपर्णा पाटील यांनी लहान स्वप्ने आणि उंच भरारी या पुस्तकात मांडल्या आहेत. महिलांनी खडतर प्रसंगात न खचता आलेल्या अडचणीवर मात करत स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे हे या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. प्रतिकुल परिस्थितीत स्वतः कसा उद्योग उभा केला, या महिला कशा उद्योजक झाल्या यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. या महिलांच्या गुणांचा अभ्यासही या पुस्तकात करण्यात आला आहे. या फक्त उद्योग आणि उद्योजकांच्या कथाच नाही तर धैर्य आणि धाडसाने मिळवलेल्या असमान्य यशाच्या कथा आहेत. कठीण परिस्थितीमध्ये अशक्य कामगिरी शक्य केल्याच्या कथा आहेत.
कोल्हापुरातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील या सर्व स्त्रिया आहेत. स्त्रियांनी केलेले व्यक्तिगत धाडस, जोखीमीचे काम आणि उद्योजक होण्याचा दृढनिश्चय हा यातील प्रत्येक कथेत पाहायला मिळतो. हे यातील वेगळेपण आहे. स्वतःला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल किंवा कठीण आर्थिक परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी या महिला पुढे आल्या. काहींना या कामात कौटुंबिक पाठींबा मिळाला तर काहींनी कुटुंबाचा विरोध असूनही त्या पुढे गेल्या आहेत.
अलका पवार यांनी दागिने तयार करण्याची आवड होती. ही आवड त्यांना त्याच्या कठीण प्रसंगात कशी उपयोगी पडली आणि त्यांनी यामध्येच कसा उद्योग उभा केला याबद्दलचे अनुभव कथन पहिल्या प्रकरणात केले आहे. महिला आणि स्वयंपाक हे समिकरणच आहे, पण चवदार खाद्य पदार्थ त्यांना करता आले तर त्यांची स्तुती निश्चित होते. यातूनच मग वैशाली सुतार आणि मुनीरा मुजावर यांनी कसा उद्योग उभा केला याचा अनुभव दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात दिला आहे. सीमा घोरपडे आणि सारिका घोरपडे यांनी धाडसाने बेकरी उद्योग कसा उभा केला यावर चौथ्या प्रकरणात प्रकाश टाकला आहे. एक दिवस आपल्याकडे बहुउद्देशीय दुकान असेल हे स्वप्न साधना सावंत यांनी पाहिले आणि त्याची स्वप्नपूर्तीही त्यांनी केली. यावर पाचवे प्रकरण आहे. महिलांना पेंटीग क्षेत्रात आणणाऱ्या एशियन पेंट्सच्या जाहीरातून राधिका बहिरशेठ यांनी प्रेरणा घेतली व होडा शो रुम व सर्व्हिसिंग सेंटरमध्ये फक्त महिला कर्मचारी असव्यात असे स्वप्न पाहीले. महिलांही पुरषांप्रमाणे कामे करू शकतात. हे त्यांनी दाखवून देण्यासाठी परिश्रम घेऊन स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवले. आज त्यांच्या होंडा शोरूममधील सर्व तांत्रिक काम आणि व्यवस्थापनही महिला करतात. पुरूषांची मक्तेदारी असणारे क्षेत्र मोडीत काढण्यासाठी राधिका यांनी मांडलेली कल्पना आणि केलेला दृढनिश्चय ही कथा वाचनिय आणि प्रेरणादायी निश्चितच आहे.
उद्योजकता किंवा स्वयंरोजगार ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या त्यागाची गरज लागते. जोखींमही घ्यावी लागते, प्रचंड मेहनतही करावी लागते. उद्योजक म्हणून अस्तित्व निर्माण करणे हे खूपच मोठे कार्य आहे. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत या महिलांनी मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. खानावळ चालवणाऱ्या कविता सौदलगेकर, स्वेटर उद्योग उभारणाऱ्या मालती बेडेकर, बिस्किट तयार करणाऱ्या पद्मश्री तारदाळे, मशरूम शेती करणाऱ्या माधुरी पोतदार, माती भांडी, आकर्षक वस्तू तयार करणाऱ्या सुमन बारामतीकर, पल्पची पॅक्टरी उभारणाऱ्या मीनल भोसले, बांबूपासून विविध वस्तू तयार करणाऱ्या नाझनिन मकानदार यांच्या कथा मनाला उद्योजक होण्याची प्रेरणा निश्चितच देतात. या पुस्तकातील यशोगाथा स्त्रियांच्या धैर्याची साक्ष देतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कशी मात करायची याची प्रेरणा देतात. ज्या महिला स्वतःचा उद्योग उभारू इच्छितात त्यांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे. या कथातून त्यांना निश्चितच प्रेरणा मिळू शकेल.
डाॅ अपर्णा पाटील यांचे मुळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीप्रमाणे मराठीमध्ये अनुवादीत पुस्तकही सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात आहे.
पुस्तकाचे नाव – लहान स्वप्ने आणि उंच भरारी
लेखिका – डाॅ. अपर्णा पाटील
मराठी अनुवाद – राजेंद्र घोरपडे, सारिका लोंढे
प्रकाशक – ग्रंथ पब्लिकेशन्स, राजारामपुरी पाचवी गल्ली, कोल्हापूर मोबाईल – 9922295522
किंमत – 150 रुपये
पृष्ठे – 140
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.