आठवडी पिक सल्ला (टोमॅटो व कोबीवर्गीय पिके )🍅🥦🍅🥬
टोमॅटो पिक सल्ला
झाडांना आधार व मातीची भर देणे
लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात. त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबांवर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
कोबीवर्गीय पिके सल्ला
मावा नियंत्रण
सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.
🛡व्यवस्थापन
👉🏾मावा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीला पोहचल्यास, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबावर आधारित कीडनाशक अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे मावा किडीचे प्रमाण कमी होते व मित्र किटकांचे संवर्धन होते.
👉🏾जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलीअम लेकॅनी किंवा मेटॅऱ्हायझीयम ॲनिसोप्लीची २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
👉🏾गरज पडल्यास व जैविक नियंत्रण केले नसल्यास आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास, रासायनिक कीटकनाशक मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( सौजन्य – कृषक अॅप)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.