उंडल वनस्पतीबद्दल…
- कोकणात उंडीला उंडल, उंडिल असेही म्हणतात. काही ठिकाणी याला ‘सुरंगी’ व ‘उंडण’ अशीही नावे आहेत.
- उंडीचे शास्त्रीय नाव कॅलोफायलम इनोफायलम – Calophyllum inophyllum
- क्लुसिएसी कुलातील शोभिवंत व सदापर्णी वृक्ष
- हा वृक्ष मूळचा भारतातील पूर्व व पश्चिम समुद्रकिनार्यांच्या प्रदेशांतील असून म्यानमार, श्रीलंका, अंदमान बेटे, वेस्ट इंडिज बेटे, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणीही आढळतो
- मध्यम आकाराचा वृक्ष १५-१८ मी. उंच वाढतो. वृक्षाचे खोड तपकिरी काळ्या रंगाचे असते. साल काळी. खवलेदार व भेगाळ असते.
- फुले पांढरी व सुगंधी असतात. फळे गोल, पिवळसर रंगाची व आठळीयुक्त असतात. बिया अंडाकार असतात.
पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक बहुपयोगी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कोकण किनारपट्टीवरील कांदळवनेही धोक्यात आहेत. या वनस्पतीच्या प्रजातींचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. पूर्वीच्याकाळी या वनस्पतीचे उपयोग माहीत होते. त्याचा वापरही होत होता. औषधी गुणधर्मामुळे काही वनस्पतींचे संवर्धन, जतनही केले जात होते. पण काळ बदलला तसा या वनस्पतींचा वापर कमी झाला. अर्थात या वनस्पती दुर्लक्षित झाल्या. वाढत्या नागरीवस्तांमुळे या वनस्पतींची तोड होऊ लागली अन् आता या वनस्पती फारश्या दिसेनाशाही झाल्या आहेत.
या बहुपयोगी वनस्पतींच्या संवर्धनाचा वसा हा स्थानिकांनीच घ्यायला हवा. याचाच विचार करून राजापूर पंचक्रोशीतील मिठगवाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर ( मोबाईल – 99698 31503 ) यांनी उंडल ( उंडी ) या वनस्पतीचे जतन अन् संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. सागरी किनारपट्टीच्या भागात धूप थांबविण्याच्या उद्देशाने उंडीची लागवड तर सागरी महामार्गावरील चिरेखाणफाटा ते जैतापूरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा देशी वनस्पतीचे रोपण करण्याचा निर्णय ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला असून त्यादृष्टिकोनातून तसे कार्यही त्यांनी सुरू केले आहे. मिठगवाणे येथील एकनाथ आडिवरेकर, मिठगवाणे सरपंच साक्षी जैतापकर, साखर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आनंदा मोरे, श्रीधर पावसकर, रमेश राणे, पोलिसपाटील गजानन भोगले यांनी एकत्र येत वड, पिंपळ अशा देशी वनस्पतींची लागवड केली आहे.
मिठगवाणे परिसरात पूर्वी उंडलही वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळत होती. या भागातील तेली समाज या वनस्पतीच्या फळापासून तेल काढत असे. हे कडूतेल होड्या खराब होऊ नयेत म्हणून बाहेरून लावले जात असे. कोकणातल्या स्थानिक भाषेत याला ‘चोपडाण’ म्हणतात. याच कारणामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात या झाडाची लागवड होत होती. पण सध्या आधुनिक होड्यांमुळे याचा वापर कमी झाला तसा हा उद्योगही दुर्लक्षित झाला.
तसे कोकणात प्रत्येक गावात कडूतेलाचा घाणा असायचा. उंडल वनस्पतीच्या फळातून तेल काढले जात असे. हे दुर्गंधीयुक्त तेल कडूतेल म्हणून ओळखले जायचे. पूर्वी वीजेची सोय नव्हती. रॉकेलही कोकणात उपलब्ध होत नसे. त्यामुळे या कडूतेलाचा वापर दिव्यांमध्ये केला जात असे. पण हे तेल बहुउपयोगी आहे. जनावरांच्या त्वचारोगांवर औषध म्हणून वापरलं जातं. गुरांच्या अंगावर गोचिड झाली असल्यास हे कडूतेल अंगाला फासलं की गोचिड तात्काळ निघून जाते. गोचिड लागू नये आणि उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून गुरांना अधूनमधून भादरतात. (केस कापतात) गुरांना भादरल्यानंतर थंडाव्यासाठी या उंडीचे कडूतेल लावतात. डास चावू नयेत किंवा अंगावर माशा बसू नयेत म्हणून कोकणातील लोक हे तेल अंगाला लावतात. विशेषतः गवत कापायला जाताना किंवा गोठ्यात दूध काढायला जाताना हातापायाला हे कडूतेल लावतात.
उंडीच्या तेलाचा वापर वंगण म्हणून होतो. रहाट, बैलगाडी, मोट अशी लाकडी चाकं जिथे वापरली जातात तिथे वंगण म्हणून उंडीचे तेल वापरले जाते. फळातून तेल काढल्यानंतर जी पेंड (साका) उरतो यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार केले जाते. उंडिलाच्या लाकडातही तेलाचा भरपूर अंश असतो. ओलं लाकूडही सहज जळतं. त्यामुळे किनारी भागांत स्मशानात मृतदेहाला अग्नी देण्यासाठी खास करून उंडिलाची लाकडं वापरतात. उंडिलाची फळं गळवावर उत्तम औषध आहे. उंडिलाचं फळ उगाळून लावल्यास गळू फुटायला मदत होते. शिवाय उंडिलाची फळं हे वटवाघळांचं आवडतं खाणं आहे. उंडीचे लाकूड कठीण, मजबूत असल्यामुळे ते घरबांधणी, रेल्वे-स्लीपर्ससाठीही वापरतात. या बियांचे तेल जर्मनी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) या देशांत जैवइंधन म्हणून वापरले जात आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.