January 24, 2025
Natural Beauty of Gagangad
Home » गगनगडाचं विलोभनीय दर्शन
पर्यटन

गगनगडाचं विलोभनीय दर्शन

गगनबावडा येथून कोकणात उतरण्यासाठी करूळ व भुईबावडा घाट असे दोन घाट आहेत. करुळ घाटातून सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे जाता येते तर रत्नागिरीतील पाचलकडे जाण्यासाठी भुईबावडा घाटाचा वापर केला जातो. कोल्हापूरहून कणकवलीला जाणाऱ्या करूळ घाटातील रस्ते हे वेड्यावाकड्या वळणांचे असले तरी अफाट निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे घाटरस्ते आहेत. या दोन्ही घाटांच्या प्रारंभीच गगनगिरी महाराजांचा आश्रम असलेल्या गगनगडकडे जाण्यासाठी मार्ग आहे. गगनगड हे अतिशय प्रेक्षणीय असे ठिकाण आहे. या गगनबावड्यातल्या हिरव्या ऋतूची सैर…

गगनगड हा कोल्हापूरहून जवळ आणि कोकणाच्या मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे तो संरक्षण आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. शिवाजी महाराजांनी १६५९ ते १६६६ दरम्यान हा किल्ला ताब्यात घेऊन त्याची डागडुजी केली. नंतरच्या काळात राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी रामचंद्रपंत अमात्य यांना बहाल केली. १८१८ सालापासून मराठ्यांचं साम्राज्य संपुष्टात आलं आणि महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला. १८४४ ला गगनगड, सामानगड या किल्ल्यांच्या सुभेदारांनी इंग्रजांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंग्रजांनी तोफगोळ्यांचा मारा करून तटबंदीची बरीच पाडापाड केली. त्यामुळे गडावर आता तटबंदीचे काही अवशेष शिल्लक आहेत.

समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर असलेल्या या गडावर कायमच सोसाट्याचा वारा आणि गार वातावरण अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात तर निसर्गाचा हा खेळ आणखी रंजक झालेला असतो. गडावर जायला आता पक्का घाटरस्ता असला, तरी पूर्वी तिथं डोंगरदऱ्यांतून जाणारी अरुंद वाट होती.

घाटातूनच गगनगडाचं होणारं दर्शन विलोभनीय असतं. गडापर्यंत जाण्याचा मार्गही तेवढाच आनंददायी. पावसाळ्यात इथलं वातावरण आल्हाददायक असलं, तरी रस्तेही तेवढेच खराब असल्यामुळे स्वतःचं वाहन असेल तर जास्त काळजी घ्यावी लागते. पायथ्याशी गाडी लावून वर पायऱ्या चढून जावं लागतं. गड सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंतच ये-जा करण्यासाठी खुला असतो. गडावरच्या मूळ दरवाज्याचे आता फक्त अवशेष उरले आहेत. मठाच्या व्यवस्थापनानं इथं नवीन प्रवेशद्वार उभारलं आहे. तिथून आत प्रवेश केल्यानंतर महिषासुराचं मंदिर दृष्टीला पडतं. पायऱ्या चढून वर गेल्यावर एक मोठी गुहा दिसते. इथेच बसून गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती.

इथे पुढेच गगनगिरी महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. तिथं दर्शन घेऊन पुढे गडावर भटकंतीसाठी बाहेर पडता येतं. गगनगिरी महाराजांनी बांधलेलं दत्त मंदिर आणि महाराजांचा अश्वारूढ पुतळाही पाहण्यासारखा आहे. गडावर असणारी एक भली मोठी तोफ, काही कोरीव शिल्पं जुन्या काळच्या वैभवाची आठवण करून देतात. बुरुजावर जाताना वाटेत शिवमंदिर दिसते. याच मंदिराच्या खालच्या बाजूनं एक अरुंद वाट जाते. त्या वाटेनं पुढे गेल्यावर गडाच्या पोटात असणारे तुडुंब पाण्यानं भरलेले तलाव पाहायला मिळतील. गडावरून खोल दरीत दिसणारा भुईबावडा गाव, डाव्या बाजूला करूळ गाव आणि सूर्यास्ताचं दृश्य अप्रतिम दिसतं. तळकोकणावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला आणि गडाचं संरक्षण करणारा बुरुज अवश्य पाहावा.

निसर्गसौंदर्य आणि इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवण्यासाठी गगनगडाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. कुठल्याही मोसमात तो तेवढाच आकर्षक वाटतो.

कसं जायचं?

कोल्हापूरहून अंतर : सुमारे ५५ किलोमीटर. पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कोल्हापूर, गगनबावडा येथून एसटी बसची सोय.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading