लालपरी ही राज्यातील सामान्यांसाठी दळणवळणासाठीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ती ज्या दिवशी थांबते त्या दिवशी राज्य थांबलेले असते. राज्यात आंदोलन, संप झाले तर ते जेव्हा एस. टी रस्त्यावर येणे थांबते तेव्हा तो यशस्वी होत असतो असे मानले जाते. त्या एस. टी. तील परिवर्तनाच्या कथे बरोबर इतर विभागातील विविध परिवर्तनाच्या मार्गाचा घेतलेला वेध या पुस्तकात वाचायला मिळतो.
संदीप वाकचौरे
समाजमनाला प्रशासनाबद्दल येणारे अनुभव अनेकदा वाईट असतात आणि मग त्यांना सातत्याने सुधारणा अपेक्षित असतात. समाजात प्रशासन गतीमान नाही म्हणून नाराजीचा सुर असतो. त्यासाठी कडक कायदे करा, शिक्षेची तरतूद करा म्हणजे प्रशासनात सुधारणा होईल असे अनेकाना वाटत असते. सुधारणेचा कायदा, नियम हाच एकमेव मार्ग आहे असे अनेकाना वाटत आले आहे. मात्र सारेच प्रश्न कायद्याने सुटतात असे होत नाही. कायदा हा शेवटचा मार्ग असतो. माणसांत परिवर्तन करायचे असेल तर मानसिक परिवर्तन हवे आहे. कायदयाने माणसं बदलतात पण त्यांच्यामध्ये परिवर्तन होतेच असे घडत नाही. त्यामुळे जोवर मानसिक परिवर्तन घडत नाही तोवर समाज, प्रशासनात परिवर्तनाची वाट अशक्य असते.
लोक चांगल्या वाटेने सहजतेने चालत नाहीत असा विश्वास व्यक्त करणाऱ्यांनी प्रयत्न केले तर ती वाट अशक्य अजिबात नाही असा विश्वास देणारी काही प्रयोग विविध शासन विभागात सातत्याने केले जात असतात. प्रशासनातही चांगली माणसं असतात. ते आपापल्या परीने शक्य तितके प्रयत्न करत समाजासाठी कटिबध्द राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्या प्रयोगाने शासनाच्या विविध विभागात झालेले परीवर्तनाची श्रध्दा बेलसरे यांनी वाजवलेली ‘डबल बेल ’ वाचत गेले की लोकांच्या चांगुलपणावरील विश्वास अधिक दृढ होत जातो.
श्रध्दा बेलसरे यांनी शासनाच्या विविध विभागात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांनी ज्या विभागात जाऊन काम केले आहे. त्या त्या विभागात समाजाभिमुख कामासाठी प्रोत्साहन देत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी विविध विभागात केलेल्या परिवर्तनाची लढाई या पुस्तकात वाचायला मिळते. खरेतर जागतिकीकरणानंतर शासनाच्या विविध विभागावर विपरित परिणाम झाले आहेत. लोक कल्याणकारी असणा-या सरकारी विभागातील अनेक व्यवस्था अडचणीत आल्या आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या लालपरीवर देखील झाला.
लालपरी ही राज्यातील सामान्यांसाठी दळणवळणासाठीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ती ज्या दिवशी थांबते त्या दिवशी राज्य थांबलेले असते. राज्यात आंदोलन, संप झाले तर ते जेव्हा एस. टी रस्त्यावर येणे थांबते तेव्हा तो यशस्वी होत असतो असे मानले जाते. त्या एस. टी. तील परिवर्तनाच्या कथे बरोबर इतर विभागातील विविध परिवर्तनाच्या मार्गाचा घेतलेला वेध या पुस्तकात वाचायला मिळतो. बेलसरे या निवडणूक आयोगातून बढती होऊन एस. टी. महामंडळात उपसंचालक जनसंपर्क म्हणून दाखल झाल्या. तेव्हा एस. टी चित्र अत्यंत वाईटच होते. साडेपाचशे रूपयाचा संचित तोटा. खिळखिळ्या झालेल्या गाडया, गळणारी छत, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, विविध आगारातील गोंधळ त्यामुळे येथे काम करणे मोठे आव्हान होते. मात्र असे असताना एस. टी. चांगले काही घडत होते. 25 वर्षाच्या कालखंडात एकही अपघात न केलेले 450 चालक होते. त्या चिंतनातून एस. टी. चा प्रवास, सुरक्षित प्रवास हे घोषवाक्य तयार झाले. त्याच्या बातम्या करण्यात आल्या. त्याच बरोबर गणपती उत्सवासाठी कोकणात, पंढरपूरच्या वारीनंतरचे एस. टी. ने केलेल नियोजन. त्याच बरोबर एस. टी. चे गुंतलेले चाक बाहेर काढण्यासाठी प्रवासी शतकाचा बिल्ला उपक्रम सुरू झाला.
एकाच दिवशी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदेचा उपक्रम सुरू केला. त्याच बरोबर प्रवाशाचे स्वागत कार्यक्रम सुरू केला. लोकांचे प्रश्न, तक्रारी जाणून घेण्यासाठी एस. टी. च्या प्रवाशांसोबत संवाद सुरू केला. चालक, वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागायचे असा उपक्रमाचा विचार सुरू होता. वाहकाने एस. टी. त प्रवेश करायचा आणि बसचा प्रवास कसा होणार आहे, किती वाजता पोहचेल, कोठे कितीवेळ कोठे थांबेल हे प्रवाशाना सांगायचे. एक प्रकारे रेल्वेसारखा अनुभव प्रवाशाना मिळू लागला होता. या साऱ्या या बदलाचे परिणाम म्हणजे माध्यम दखल घेऊ लागली होते. त्यानंतर तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानसिक परिवर्तनाची वाट चालण्याचा प्रयत्न केला. त्यात मी एक महिन्याचा पगार एस. टी. साठी देते तुम्ही काय देता असा प्रश्न कर्मचाऱ्यांशी संवाद करताना केला. त्यानंतर सहा महिन्यात सहा दिवसाचा पगार देण्याचे कर्मचाऱ्यांनी मान्य केले. सहा दिवसाच्या पगाराचे पंधरा कोटी रूपये जमा झाले. त्यातून सतरा बसेस खरेदी झाल्या. कराड सारख्या आगाराने एक बस महामंडळाला दिली. त्याच बरोबर विना मोबदला अधिक काम करण्याचा संकल्प केला. त्यातून एस. टी. बदलत गेल्याचा अनुभव अत्यंत समर्पक शब्दात नोंदवला गेला आहे. परिवर्तन करता येते आणि व्यवस्था बदलते असा विश्वास हे पुस्तक देत जाते.
लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचे शासकीय मुखपत्र आहे. आरंभी या मासिकाचा खप तसा फारसा नव्हता. अर्थात शासकीय प्रकाशनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असण्याची शक्यता फार कमी असते. शासकीय प्रकाशनाला काही मर्यादा असतात. मात्र त्या मर्यादा सांभाळत असताना देखील लोकांना त्या मासिकासाठी प्रतिक्षा करावी लागेल इतका मोठा बदल करण्याचा झालेला प्रयत्न आणि शासकीय मुखपत्र म्हणून देशात प्रथम क्रमांकावर घेतलेली झेप हे अत्यंत कौतुकास्पद मानायला हवे.
2002 पासून नव्या बदलाचे स्वरूपात अंकाचे प्रकाशन होऊ लागले होते. त्यासाठी विविध स्वरूपाचे सदरांचा नव्याने समावेश करण्यात आला. डॉ. आनंद पाटील यांचा स्पर्धा परीक्षांची तयारी, विधिमंडळातील निवडक भाषणे, शेखर गायकवाड यांचे सातबारा, लक्ष्मण लोंढे यांचा भविष्याचा लक्ष्यवेध, जगतराव सोनवणे यांचे सेवानियम, मनिष हटवार, वासुदेव परब यांची सदरे सुरू केली. तसेच पाव शतकापूर्वी, राज्यातील विविध जिल्ह्यातील कामांचा आढावा घेणारी सदरे सुरू करण्यात आली होती. या बदलांच्या बरोबर 2006 ला सोबत रंगीत आवृत्तीची छपाई सुरू झाली होती. स्टॉलवर विक्री सुरू करण्याचा प्रयत्न झाला. लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. घरोघरी लोकराज्याची कल्पना पुढे आली आणि त्यासाठी विशेष प्रयत्न कसे गेले याची अत्यंत रोचक माहिती वाचकांना वाचनास मिळते. लोकराज्य बदलाचा वेध अत्यंत समग्रपणे घेण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या व्यवस्थेत देखील बदलासाठी प्रयत्न करणारी माणसं असतातच. त्यांना कधी यश मिळते कधी मिळत नाही इतकेच. सारेच काही बिघडलेले आहे असे अजिबात नाही.
लोकराज्याने प्रकाशित केलेल्या विशेषांकाना अधिक पसंती मिळत गेली. निर्मिती, छपाई आणि वितरण असा साराच प्रवास दखलपात्र ठरतो. लेखिका तब्बल दहा वर्ष लोकराज्यात कार्यरत होत्या त्यामुळे तेथील बदलाच्या त्या साक्षिदार आहेत. या बदलाबद्दल शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विशेष पत्र देऊन अभिनंदन केले. ते पत्रही पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहे. लोकराज्याला यश मिळाल्यानंतर ई वर्तमान पत्र काढावे अशा विचार पुढे आला. त्यातून शासन मान्यता घेऊन महान्युजचा जन्म झाला. वेबपोर्टलचा हा प्रवास किती कठीण होता हे वाचताना जाणवत राहते.
अनेकदा वाचकांना केवळ ते पोर्टल वाटत असते. मात्र त्या पलिकडे तो प्रवास अनेकाना माहिती नसतो. पण त्यांनी ते पोर्टल विकसित करताना केलेली धडपड, करावा लागणारा संघर्ष पाहिला की हा सारा प्रवास साधा सुलभ नव्हता हे लक्षात येते. मात्र शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या माणसांनी ठरवले तर काय घडू शकते हे पुस्तक वाचताना सहजतेने जाणवत राहते. अर्थात यासाठी वरिष्ठांनी दिलेला सकारात्मक पाठिंबा अधिक महत्वाचा असतो. अनेकदा सरकारी पोर्टलला तसे किती वाचक मिळणार असे वाटत असताना राज्यातील विविध वर्तमानपत्र देखील पोर्टलचा उपयोग करत होते. अशा प्रकारे सरकारी पोर्टल विकसित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते.
अनेकदा वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी , कर्मचारी यांच्याशी स्नेहबंध ठेऊन असतात. त्यातून चांगले काम उभे राहते. वरिष्ठ अधिकारी पाटणकर यांनी टेबलेवर लाडू पाठवले आहे . त्यांनी काही गोड पाठवले आहे म्हणजे मोठा टास्क असणार असे गृहितक मांडले जाते. वरीष्ठांविषयीच्या अनुभवासंदर्भाने बरंच काही वाचायला मिळतात.
औरंगाबाद सोडून प्रथमच धुळ्याला माहिती अधिकारी म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर तेथील अनुभव डोळ्यात पाणी आणणारे आहेत. पण त्यापेक्षा बेलसरे यांनी अत्यंत धाडसाने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरतात. सरदार सरोवरामध्ये तेहतीस गावे जाणार होती. तेथील प्रगतीच्या बातम्या, विविध गावांना दिलेल्या भेटी हे सारेच वाचताना प्रगतीची दिसणारी वाट इतकी सहज सुलभ नव्हती हे सहजतेने लक्षात येते. आदर्श गावठाण संकल्पनेप्रमाणे गावे उभी राहत होती, पण लोकांपर्यत तसे काही पोहचत नव्हते. त्यामुळे संघर्ष घडत होताच. त्याचवेळी धुळ्यांचे पुनर्वसन अतिरिक्त जिल्ह्याधिकाऱ्यांचे अपहरण झाले होते. तो प्रसंग आणि होणारी धावपळही वाचायला मिळते. त्याकाळी येणाऱ्या पुराची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठीचा प्रयत्न प्रशासन किती कार्यरत असते, त्यासाठीची धावपळ वाचताना हा प्रवास साधा नाही असे वाटून जाते.
गुजरातमधील भडोच जिल्हयात तुफानी पाऊस पडला होता. नर्मदेला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांना निरोप पोहचवणे महत्त्वाचे होते. वर्तमानपत्र, रेडीओ, दूरदर्शनचा तसा फारसा उपयोग होणार नव्हता. ती उपलब्धता सामान्य माणसांकडे नव्हतीच. हेलिकॉप्टर उपलब्ध नव्हते आणि वेळेचे देखील बंधन होते. अखेर आकाशवाणीवर आणीबाणीचा संदेश प्रसारीत करायचा आणि स्थानिक पातळीवर असलेल्या वायरलेसच्या संपर्कात त्या ध्वनीलहरी येतील आणि धोक्याची जाणीव होण्यास मदत होईल. यासाठी केलेली धावपळ जिल्हाधिकारी ते माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी किती तणावात असतात हे सहजतपणे जाणवत राहते. रात्री उशिरा पर्यंत जागे राहून ते कार्यरत होते. लोकांचे काय होईल या भितीने लेखिका झोपू शकली नाही. जेव्हा उपजिल्हाधिकारी यांनी सकाळी सात वाजता फोन केला आणि धोका टळला असे सांगितले तेव्हा चहा घेतला.
हे सारेच वाचताना शासकीय व्यवस्थेतील धावफळ दर्शित करते. त्याचवेळी धुळ्यात एक पोलीस अधिकारी त्रास द्यायचा. धमकी द्यायचा. पोलीस संरक्षण वरीष्ठांनी दिले पण त्याचाही फारसा परिणाम साधला गेला नव्हता. फोनवरील धमक्यांनी घाबरल्यासारखे व्हायचे पण आपण काम केले पाहिजे. असे घाबरून चालणार नाही असे म्हणून त्यांनी सामोरे जाण्याचा निश्चिय केला. त्यातून त्यांनी केलेला संघर्ष डोळ्यात अंजन घालणारा आहे. अखेर कोण फोन करतो याचा स्फोट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोने केला आणि नंतर त्याची बदली झाली. अशी विकृती असणारी माणसं ही पुस्तकात वाचायला मिळतात.
पहिल्या प्रकरणात जडणघडणी विषयी बरेच वाचायला मिळते. लेखिकेचा विशाल दृष्टीकोन , सहानुभूतीचे दर्शनही घडत जाते. एखादी मुलगी स्वतःला घडविताना किती संघर्ष करते तो संघर्ष वाचनीय आहे हे खरेच, पण त्या पलिकडे एखादी व्यक्ती मोठी होते याचा अर्थ तो सहजतेचा प्रवास नाही हे देखील लक्षात येते.
कुमार केतकरांची प्रस्तावना असून पुस्तकात एकूण सात प्रकरणाचा समावेश आहे. त्यात डबल बेल वाजण्यापूर्वी, जडणघडण, नर्मदेच्या काठानं, दहशतीचे दिवस, 80 दिवस, 100 आगारं आणि एक लाख भाऊ, लोकराज्य-जनतेच्या दारापर्यंत. माहिती महाजालाचा साक्षात्कार यांचा समावेश आहे. पुस्तक म्हणजे प्रत्यक्ष जगण्याचे अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुभवाच्या अंगाने केलेली मांडणीतही सहजता आहे . त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. वाचक म्हणून ते हातून सुटू नये असे वाटत जाते.
पुस्तकाचे नाव – डबल बेल
लेखिका – श्रध्दा बेलसरे
प्रकाशक – अमेय इन्स्पायरिंग बुक्स
पाने -160
किंमत – 199
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.