April 15, 2025
Political contrast image showing Sardar Patel’s statue in Gujarat with Congress and BJP flags symbolizing the legacy battle in Indian politics
Home » काँग्रेसचे दिवास्वप्न…
सत्ता संघर्ष

काँग्रेसचे दिवास्वप्न…

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभा, तसेच दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन होईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. आपण कुठे नेमके कमी पडतोय हे कुणी सांगितले नाही.

डॉ. सुकृत खांडेकर

काँग्रेसचे दिवास्वप्न…

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ८४ वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे ८ आणि ९ एप्रिलला पार पडले. गेली दहा-अकरा वर्षे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसला संजीवनी कशी मिळणार यावर अधिवेशनात चर्चा झाली. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि अन्य बड्या नेत्यांची भाषणे झाली. या अधिवेशनाने काय दिले याचा शोध घेतला तर ठोस असे काही सांगता येत नाही. सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे.

ज्या राज्यात काँग्रेसचे अ. भा. अधिवेशन झाले, त्या गुजरातमध्ये गेली तीस वर्षे काँग्रेस सत्तेबाहेर आहे. तब्बल ६४ वर्षांच्या कालावधीनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले हेच विशेष म्हणावे लागेल. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसला, सध्याच्या विधानसभेत १८२ पैकी १५६ आमदार भाजपचे आहेत, याचा विसर पडला असावा.

सन १९६० मध्ये गुजरात राज्याची निर्मिती झाल्यावर १९६१ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भावनगरमध्ये झाले होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, उच्छंगराय ढेबर यांच्या उपस्थितीत ते पार पडले. १९६१ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या ६६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष नीलम संजीव रेड्डी होते. स्वागताध्यक्ष ठाकोरभाई देसाई होते. सरचिटणीस जी. राजगोपालन, सादिक अली व कोषाध्यक्ष महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. भावनगर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हावे यासाठी बलवंतराय मेहता हे स्वत: आग्रही होते. तेव्हा पंडित नेहरूंची लोकप्रियता उत्तुंग होती. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी हजारो लोक भावनगरला आले होते. भावनगरच्या अधिवेशनात काँग्रेसने राष्ट्रीय एकात्मता समिती स्थापन केल्याचे जाहीर केले व समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी इंदिरा गांधींकडे सोपविण्यात आली.

तेव्हा नीलम संजीव रेड्डी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, काँग्रेस पक्षात शिस्त राखली पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ध्येयाची भावना जोपासली पाहिजे. पुढील वर्षी (१९६२) निवडणुका होतील, आपण का उभे आहोत, आपण निवडणुका कशासाठी लढवत आहोत, हे लोकांना सहजपणे समजवता आले पाहिजे.

जे ६४ वर्षांपूर्वी अध्यक्षपदावरून भाषण करताना नीलम संजीव रेड्डी यांनी सांगितले, तेच बोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अहमदाबादमधील अधिवेशनात सांगण्याची पाळी आली. स्वातंत्र्यांपासून देशाची व बहुतेक सर्व राज्यांची सत्ता वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाकडेच होती. काँग्रेसला आव्हान देईल असा राष्ट्रीय पातळीवर खंबीर व भक्कम पर्याय या काळात उभा राहू शकला नाही. नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाल्यापासून म्हणजे सन २०१३ पासून काँग्रेसची घसरण सुरू झाली.

गेले तीन टर्म काँग्रेस केंद्रात सत्तेवर नाही. त्यातली दोन टर्म म्हणजे २०१४ ते २०२४ काँग्रेसला लोकसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्ष नेतेपदही मिळवता आले नाही. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १०० खासदार निवडून आल्याने दहा वर्षांच्या पोकळीनंतर काँग्रेसच्या वाट्याला विरोधी पक्ष नेतेपद आले. लोकसभा व राज्यसभा या संसदेतील दोन्ही सदनातील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे आहे. तरीही काँग्रेसला निवडणुकीच्या राजकारणात पाठोपाठ अपयश का येत आहे ?

अहमदाबादच्या काँग्रेस अधिवेशनात व्यासपीठावर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी असे हायकमांड उपस्थित असताना त्यांच्यासमोर देशातील काही पदाधिकाऱ्यांनी विशेषत: महिलांनी सडेतोड भूमिका मांडून पक्षाला वारंवार येत असलेल्या अपयशाला पक्षाचेच काही नेते जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशा दोन पदयात्रा काढून सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्याबरोबर हजारो लोक चालत होते. त्यांचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना दिसले. मग काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये यश का लाभले नाही?

पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व पक्षासाठी मेहनत घेतात, निवडणूक काळात अहोरात्र प्रयत्न करतात पण पक्षातील काही गद्दार पक्षाचा पराभव कसा होईल असे वागतात असेही आरोप अधिवेशनात केले गेले. राहुल गांधी हेच काँग्रेस कार्यकर्त्यांना एकमेव आशास्थान वाटते. ते पक्षात कार्यरत किंवा सक्रिय असतात तेव्हा पक्षात थोडी जान येते पण मधेच ते गायब होतात, कुठे तरी सुट्टीवर किंवा विदेशात निघून जातात, मग भरंवसा कोणावर ठेवायचा ? असा प्रश्न कार्यकर्ते विचारतात. कार्यकर्त्यांना ऊर्जा देईल, राज्या-राज्यात कार्यकर्ते सक्रिय राहतील असे देशपातळीवर व राज्य पातळीवर नेतृत्व काँग्रेसकडे नाही. तरुणाईला काँग्रेसकडे आकर्षित करील असा पक्षाकडे नेता नाही. मग पक्ष कसा वाढणार ?

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा एक मुलगा भाजपमध्ये व दुसरा प्रादेशिक पक्षात असेल तर त्या जिल्हाध्यक्षांवर विश्वास कोण ठेवणार ? प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्षांनी निवडणूक लढवता कामा नये, असा दंडक पक्षाने घातला पाहिजे. अशा पदांवर बसलेले नेते पक्षाची उमेदवारी मिळवतात व स्वत: लढतात, त्यामुळे पक्षाच्या अन्य उमदेवारांच्या प्रचाराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. प्रदेशाध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष स्वत:च्या मतदारसंघात अडकून बसले तर पक्षाचे अन्य उमेदवार कसे निवडून येतील ? त्यांना निवडणुकीची रसद कोण पुरवील ?

अहमदाबाद येथे झालेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांचे जे भाषण झाले त्यात तेच तेच मुद्दे होते. संसदेत झालेल्या वक्फ विधेयकावरील चर्चेत त्यांनी भागच घेतला नाही. जर संवेदनशील विषयावर विरोधी पक्ष नेताच बोलणार नसेल तर विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये काय संदेश जाणार ? या विषयावर चर्चा होत असताना प्रियंका गांधी वड्रा या संसदेत फिरकल्याही नाहीत मग पक्षाने काय बोध घ्यायचा ?

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात लोकसभा, तसेच दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन होईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. आपण कुठे नेमके कमी पडतोय हे कुणी सांगितले नाही. राहुल गांधींचे भाषण म्हणजे तेच तेच सांगत असतात. त्यांच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका असते. भाजप व संघाला केवळ काँग्रेसच रोखू शकते असे ते सांगतात मग गेली अकरा वर्षे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष सपाटून मार का खात आहे ?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, जम्मू- काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांनी भाजपपुढे आव्हान उभे केले तसे काँग्रेसला कोणत्या राज्यात भाजपला नमवता आले ? आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू व बिहारमध्ये नितीश कुमार यांना बरोबर घेणे भाजपला भाग पडते पण त्या राज्यातही काँग्रेसला तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर आहे. बांगला देशाचे राष्ट्रपती उलट उत्तर देतात आणि त्यांच्यासोबत बसलेले मोदीजी गप्प बसतात, अशी बालिश टीका करणे मुळात औचित्याला धरून नाही.

आपले पंतप्रधान थेट झुकतात असे बोलणे, राहुल यांना शोभले नाही. रामलीला मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्य घटना जाळली किंवा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे मोठा घोटाळा, असे आरोप राहुल करतात पण त्याला देशात कुठेच प्रतिसाद मिळत नाही, मग वारंवार तेच तेच बोलून काय साध्य करतात ? भाजप, संघ व सावरकर हे राहुल यांचे टीका करण्याचे आवडीचे विषय आहेत पण त्याचा लाभ पक्षाला निवडणुकीत मिळत नाही.

वारंवार येणाऱ्या अपयशाने मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ आहेत. पराजयाची मालिका संपत नाही आणि कोंडी फुटत नाही. भाजपसारखे निवडणूक व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची संघटित फौज, संघाची निष्ठावान केडर आणि मोदी- शहांसारखे दणकट नेतृत्व काँग्रेसकडे नाही. काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावा म्हणून पक्षाचे ताकदवान नेते भाजपा खेचून घेत आहे, असे म्हणणे म्हणजे आपले पक्षावर नियंत्रण राहिलेले नाही, हे मान्य करण्यासारखे आहे. ज्यांना काम करायचे नाही त्यांनी घरी बसावे असा इशारा खरगे यांनी अधिवेशनात दिला आहे.

निवडणूक काळात भाजपप्रमाणे मतदार यादीसाठी पन्ना प्रमुख नेमण्याचे काँग्रेस योजत आहे. यापुढे एक कुटुंब एकच उमेदवारी मिळेल. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पद मिळणार नाही, ५० टक्के पदे ५० वर्षांखालील वयाच्या कार्यकर्त्यांना मिळतील असे खरगे यांनी जाहीर केले. काँग्रेस कमकुवक राहावी हीच भाजपची रणनिती आहे असे खरगे सांगतात. मग काँग्रेस शक्तिशाली यासाठी भाजपचे काम करावे असे त्यांना वाटते काय ? पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोदींनी गुजरातमध्ये उत्तुंग पुतळा उभारून सात वर्षे झाली, आज काँग्रेसला वल्लभभाई पटेल हे आमचे नेते आहेत, असे सांगण्याची पाळी आली. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या तीनच राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. पण मोदी-शहांच्या गुजरातमध्ये सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading