April 25, 2025
Symbolic depiction of Ram Rajya beginning within the human body, inspired by Sri Sri Ravi Shankar’s teachings
Home » सुरुवात रामराज्याची….
मुक्त संवाद

सुरुवात रामराज्याची….

संपूर्ण रामायण कथा वाचली. ऐकली. टीव्हीवर बघितली. पण “शरीर म्हणजे अयोध्या, त्याही पुढे जाऊन शरीरामध्ये संपूर्ण रामायण घडत असतं” हे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपेनं कळलं. रामकथा ही भक्तीकथा आहे. ती भक्तीभावानं ऐकली तरच त्याची अनुभूती येते. ती आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

यशवंत जोशी (बंगळूर ) मोबाईल ९४२२६१३१२१

दहा रथावर स्वार म्हणून दशरथ. पाच कर्मेंद्रियं, पाच ज्ञानेंद्रियं यांच्यावर जो नियंत्रण ठेवू शकतो तो दशरथ. शरीरात कुशलता असते, म्हणजेच कौसल्या. असा दशरथ आणि कौसल्या असल्यानं रामाचा जन्म होतो. राम म्हणजे प्रकाश. रामाचा जन्म म्हणजे हृदय प्रकाशमान होणं. अर्थात “ज्यानं दहा इंद्रियावर नियंत्रण ठेवलं आहे, जो कुशल आहे, त्याचं हृदय प्रकाशमान असतं. त्यामुळं त्याचं जीवन आनंदमय होऊन जातं. “

लक्ष्मण शेषनागाचा अवतार. साप नाग सदैव जागृत असतात. ज्याच्या जवळ सदैव सावधानता असते, त्याच्या अंतरात लक्ष्मण असतो. राग, रोष, इर्षा, मोह यापासून सावधान राहण्यासाठी आणि त्यांच्याशी मैत्री करण्यास शिकवणारी, सुमित्रा म्हणजे चांगला मित्र. ती सुमित्रा पण शरीरात वास करत असते. म्हणूनच लक्ष्मण म्हणजे विवेक.

विवेक ओलांडला की, अहंकार येतो. म्हणजेच लक्ष्मणरेषा ओलांडली की, अहंकाररुपी रावण सीतेवर ताबा मिळवतो. बाह्यमन म्हणजेच मायावी सीता. अशा मायारूपी सीतेला तो रावण दूर दूर लंकेत घेऊन जातो आणि नजर कैदेत ठेवतो. तिथून परत आणणं अवघड असतं.

आत्मा म्हणजे राम. तर मन म्हणजे सीता. आत्मा आणि मन वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष एकत्र. त्यांच्यात द्वंद्व नाही. राम सीता एकत्र म्हणूनच, रामाचे श्रीराम झाले. श्री म्हणजे सीता.

शरीरातलं जडत्व म्हणजे अहिल्या. इंद्रियसुखामुळं जडत्व येतं. म्हणजे मन दगडासारखं, शीळेसारखं होतं. रामाचा स्पर्श झाला की जडत्व निघून जातं. आणि चेतना निर्माण होते. सन्मान केल्यानं ऊर्जा निर्माण होते. चेतना जागृत होते. जडत्व निघून जातं. म्हणूनच रामाचा स्पर्श होताच, “अहिल्या शीळा राघवे मुक्त केली. “

धनुष्य म्हणजे वासनेचं प्रतीक. रामानं ते धनुष्य हातात घेऊन, प्रत्यंचा लावायला लागल्याबरोबर मोडून गेलं. रामाचा स्पर्श झाल्याबरोबर वासना निघून जाते. आणि ज्ञान प्राप्त होतं. म्हणूनच वासनारुपी धनुष्य मोडलं पाहिजे. म्हणजेच वासना नाहीशा झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान म्हणजे सर्व समान आहेत. सगळ्यातला राम एकच आहे याची जाणीव होणं. सत्व रज-तम हे तृणवत मानणं म्हणजे ज्ञान.

शरीरात मंथरा असते. मंथरा म्हणजे मंदबुद्धी. बुद्धी जेव्हा नीट काम करेनाशी झाली की, ती मंथरा होते. कलह निर्माण करते. मी मी, माझं माझं ही मंदबुद्धी. म्हणजेच मंथरा.

शबरी-सब्र म्हणजे प्रतीक्षा अपेक्षापूर्तीसाठी तयारीनिशी वाट पाहणे म्हणजेच प्रतीक्षा. अंतःकरण शुद्ध ठेवून, माझी इच्छा लवकरच पूर्ण होईल ही भावना ठेवून तयारी करणं म्हणजे प्रतीक्षा. कर्मापेक्षा भाव श्रेष्ठ. अंतःकरण पवित्र असेल तरच रामाचं दर्शन घडतं. तेव्हा मी आणि परमेश्वर वेगळा नाही याची जाणीव होते. अशी अपेक्षापूर्तीची प्रतीक्षा, ती पूर्ण होण्यासाठी कशी तयारी करायची ते शिकवणारी शबरी.

कैकयीनं तर देवतांचं काम केलं. तिच्यामुळंच राक्षसांचा वध झाला. कधीतरी कटू बोललं जातं. त्यामुळं बऱ्याच जणांची मनं दुखावली जातात. पण शेवट चांगला होतो. अशी कटू बोलून, स्वतःला वाईटपणा घेऊनही चांगलं काम करुन घेणारी ‘कैकयी प्रत्येकात असते.

हनुमंत म्हणजे द्वैत आणि अद्वैत दोन्ही रुपं. सदैव तो रामाचा भक्त असतो म्हणून द्वैत. तर भक्ती करत तो रामरुप होतो, म्हणून अद्वैत. आपल्या शरीरातली प्राणऊर्जा म्हणजेच हनुमंत. राम आणि हनुमंत एकमेका पासून दूर राहू शकत नाहीत. प्राणऊर्जेमुळंच शरीरात आत्मा राहतो.

अहंकार म्हणजेच रावण. रावणाची नगरी हनुमंतामुळे जळून गेली. प्राणायामामुळे, तपामुळं अहंकार नष्ट होतो. अहंकार जळून गेला की, मन मोठं होतं. रामानं सीतेला देण्यासाठी दिलेली अंगठी, हनुमंतानं तोंडात ठेवली. ती घेऊन सागर पार केला होता. म्हणजेच मुखात राम, रामनाम असेल तर भवसागर सहजपणानं पार करता येतो. ध्येयप्राप्तीमध्ये येणाऱ्या अडचणी राक्षसीच्या रुपात येतात. जशी सुरता म्हणजे स्तुती, ही एक राक्षसी असते. ती मोठी मोठी होत जाते. ध्येयापासून दूर घेऊन जाते. अशावेळी हनुमंत लहान होऊन राक्षसीच्या तोंडात गेले. तसं लहान होण्यासाठी नम्र होऊन, शत्रूला जिंकता आलं पाहिजे.

अंतरात क्षमता असते पण, तिचं स्मरण नसतं. आपण परमेश्वराचे अंश आहोत याची जाणीव होणं फार महत्त्वाचं. ती जाणीव करुन देणारा जांबुवंत. तोही आपल्या शरीरात असतो. आपल्या क्षमतेची जाणीव झाली की, कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवता येते. रामानी हनुमंताला मिठी मारली, “तू मला भरतासारखाच आहे”, असं म्हटल्यामुळे, त्याचं मनोबल वाढलं. त्यामुळंच हनुमंतानं अशक्य ते शक्य करुन दाखवलं.

अंगद भीतीमुळं मनानं खचला होता. त्याच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यातून रामानं बाहेर काढलं. तो निर्भय झाला. निर्भय होऊन रावणासमोर गेला. रावणाला सगळी शक्ती लावून सुद्धा, त्याचा पाय उचलता आला नाही. शरीरातली निर्भयता ही अंगदासारखी असते, म्हणूनच अहंकाररुपी रावणासारखा राक्षस सुद्धा हतबल होतो.

नल-नील या दोघांनी वानरसेनेच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधला. दगड पाण्यावर तरले. लंकेचा मार्ग दाखवला. म्हणजे श्रद्धा असेल तर मार्ग दिसतो. अडचणीतून मार्ग निघतो. अडचणीच्या वेळी मार्ग दाखवणारे नल- नील शरीरात असतात.

नाश होणार त्यावेळी विवेक नष्ट होतो. पण अशावेळी बिभीषण जागं करतो. असा वेळीच सावध करणारा बिभीषण प्रत्येकाच्या शरीरात वास करत असतो. पण त्याचं नाही ऐकलं म्हणूनच मेघनाद, रावण यांचा अंत झाला. मेघनादनं न जेवता, न झोपता चौदा वर्षे तप करून शक्ती मिळवली. पण ती असुरी शक्ती! रावण खूप ज्ञानी होता. त्याची बुद्धी दहा दिशात चालत होती. म्हणूनच दशानन. पण ज्ञान ज्यावेळी उलट्या दिशेनं जातं, त्यावेळी बुद्धी भ्रष्ट होते आणि पतन होते. ज्यावेळी ज्ञानी माणसाचं ज्ञान उलट दिशेनं जातं, त्यावेळी विनाशाच्या दिशेनं जातं. शेवटी त्या ज्ञानी माणसाचा अंत होतो. पण अंतिम समयी त्याला ते सगळं ज्ञान आठवतं. रावणाचंही तसंच झालं. म्हणूनच त्यानं मरताना शेवटी लक्ष्मणाला जान दिलं. जसं कविवर्य बा. भ. बोरकर यांनी कवितेत लिहिल्याप्रमाणे,
“मीपण माझे पक्व फळापरी, सहजपणे गळले हो!”

फळ पिकल्यावर ते झाडाला नको असतं, ते झाडापासून दूर जातं. झाडाला जरी ते नको असलं तरी, ते पिकलेलं असल्यानं इतरांना हवं असतं. रावणाचा अंत जवळ आल्यानं, त्याचा मीपणा, अहंकार निघून गेला. म्हणून त्याच्याकडं असलेलं ज्ञान है, पिकलेल्या फळासारखं सहजपणानं लक्ष्मणाला मिळालं.

भरत म्हणजे जो भक्तीमध्ये रत असतो. म्हणूनच भरताचं चरित्र हे राजहंसासारखं. चांगलं, वाईट या दोहोंची चांगली जाणीव असल्यानं, सदैव सत्याच्या मार्गानं जाणारा. राम वनवासात गेले त्यावेळी, भरत त्यांच्या पादुका डोक्यावर ठेवून घेऊन आला. रामाच्या पादुका गुरुपादुका समजून डोक्यावर घेतल्या. हा सर्वोच्च सन्मान दिला. गुरुपादुका ही ऊर्जा आहे. ती ऊर्जा भरतानं मिळवली. प्रत्येकाच्या शरीरात असलेला सेवाभाव आणि भक्तीच्या रुपानं भरत अंतरात वास करत असतो. तो शंकराच्या शंखापासून तयार झाला, संतपदी विराजमान झाला असं मानतात.

शत्रुघ्न मनातल्या शत्रूंचा नाश करतो. तो विष्णूच्या चक्रापासून तयार झाला. मनातल्या शत्रूंचा नाश करण्याची शरीरातली शक्ती म्हणजे शत्रुघ्न.

शरीरातला आत्मा म्हणजे राम. मन म्हणजे सीता. माणसाला दोन मनं असतात. अंतर्मन म्हणजे सीता. बाह्यमन म्हणजे मायावी सीता. असं हे बाह्यमन विवेकाची लक्ष्मणरेषा ओलांडून बाहेर पडते, त्यावेळी अहंकाररुपी रावण मायावी सीतेचं हरण करतो. दूर दूर घेऊन जातो. त्या सीतेला परत आणण्यासाठी चौदा वर्षे लागली. म्हणजे पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेन्द्रिये, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या चौदांच्यावर मात करणे म्हणजेच, रावणासारख्या सर्व असुरांचा नाश तो झाल्यानंतर मग राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत अयोध्येत परत येतात. त्यावेळी बाह्यमन अंतर्मुख होतं. ती सीता आणि आत्मारामाची भेट होते. त्यावेळी शरीरात दीप उजळतात, अर्थात चेतना आली की ज्ञानाच्या प्रकाशानं अंतरंग उजळून जातं आणि रामराज्य सुरु होतं. सर्वत्र आनंदी आनंद होतो. ज्ञानाची गुढी उभारली जाते. आनंदाचं तोरण बांधलं जातं.

शरीर म्हणजे अयोध्या. त्या शरीरातील वाईट विचारांच्या राक्षसांचा नाश होऊन, सतर्कतेच्या रुपातला लक्ष्मण, भक्तीच्या रुपात असलेला भरत, प्राणऊर्जेच्या रुपातला हनुमंत प्रसन्न झाला की, “आंतरमनरुपी सीता आणि आत्माराम यांच्या पूजेचा अधिकार प्राप्त होतो.” त्या गाण्याप्रमाणं,
“श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली “

आणि तो दिवस म्हणजे आपल्या जीवनातला गुढीपाडवा ! चला तर मग, शरीरातल्या अयोध्येत रामराज्य आणण्यासाठी आत्तापासून तयारीला लागू या. कारण त्यांच्या स्वागतासाठी आपल्या अंतरात गुढी उभी करायची आहे. ती अयोध्या, ते रामराज्य येऊन, ती गुढी सर्वांच्या अंतरात उभी राहावी अशी, सद्गुरु चरणी प्रार्थना.

जय गुरुदेव.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading