October 18, 2024
Dipali Tambe who owns a petrol pump
Home » Privacy Policy » पेट्रोल पंपाची मालकिन असणारी दिपाली
मुक्त संवाद

पेट्रोल पंपाची मालकिन असणारी दिपाली

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..

आज महिलांनी सर्वच क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती, कंपनी सीईओ, शिक्षक, डॅाक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, शास्त्रज्ञ, पायलट, रेल्वेचालक पासून ते ड्रायव्हर, कंडक्टर, रिक्षा, ट्रक चालवणे इथपर्यंत. अशीच आमची एक मैत्रीण पुणे जिल्ह्यात तुळापूर येथे एका पेट्रोल पंपाची मालक आहे. ‘जीप कंपास’ या भल्या मोठ्या गाडीतून ही छोटीशी मूर्ती जेव्हा खाली उतरते व चढते ते पाहून फार भारी वाटलं मला. शिवाय गप्पा मारताना लाख व कोटीशिवाय बोलत नाही याचाही अभिमान वाटला. महिलांनी एवढं सक्षम व स्वावलंबी व्हायलाच हवं.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे. मो. 9823627244

दिपाली तांबे, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या वाघोलीस्थित भाडळे परिवारातील दोन भावात एक असलेली लाडकी कन्या. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे लहानपणापासून अतिशय धीट व बिनधास्त असलेली दिपाली १० वी नापास झाली व शिक्षण थांबले. इयत्ता सातवीत असताना चुलत्यांनी ड्रायव्हिंग शिकवले. लग्नाआधीच ट्रॅक्टर, जीप, झेन सारख्या घरी असलेल्या सर्व गाड्या दिपाली चालवत होती. त्यामुळे तिची गाडी चालवायची भिती कधीच संपली होती. यामुळे आज स्वतः ड्राईव्ह करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ती सगळीकडे सहलीनिमित्ताने प्रवास करते. तिचा तो छंद व आवड बनली. एकत्र कुटुंबात वाढलेली दिपाली वयाच्या २२ व्या वर्षी वाघोलीस्थित तांबे परिवाराची सून झाली.

लग्नानंतर तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. व इंटेरिअर डिझायनरचा कोर्स केला. पण लहानपणापासून वडीलांची विटभट्टी, फरशी व सिमेंटचे दुकान, मंगल कार्यालय, जमीन खरेदी विक्री व्यवसाय हे सारं पहात ती मोठी झाली. या सर्व व्यवसायात तिने वडीलांना मदत केली. त्यामुळे लग्नानंतरही पतीच्या व्यवसायात ती जातीने लक्ष घालू लागली. आधी वडील व चुलते यांचा तिला पाठिंबा होता व लग्नानंतर तिला पतीचा पाठिंबा मिळाला. लग्न झाले तेव्हा तिच्या पतीचा दुधाचा व्यवसाय होता. एकत्र कुटुंबातून विभक्त झाल्यावर खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्यवसाय व संघर्षाला सुरूवात झाली. परंतु भावाच्या मदतीने तिने प्लॅाट खरेदी विक्री, वाघोली येथे मुलांचे वसतिगृह सुरु केले. हळूहळू दुधाचा व्यवसाय कमी करून कर्ज काढून जेसीबी खरेदी करून जेसीबी,पोकलंड, डंपर घेऊन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातील सर्व माहिती घेतली व पतीला मदत करू लागली, इतकेच नव्हे तर प्रसंगी साईटवरही जाऊ लागली.

गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी तिने इंडियन ॲाईलचा पेट्रोल पंप वडील व भावाच्या मदतीने मिळवला. त्याचे सर्व काम ती स्वतः एकटी पहाते. लोणी काळभोर येथे दर दोन दिवसाला पेट्रोल/ डिझेलची गाडी भरून आणायला ती स्वतः जाते. आपण स्वतः का जावे लागते ? हा प्रश्न मला पडल्यावर ती म्हणाली,’यात गाडी घेऊन येणारे लोक पेट्रोलची चोरीमारी करतात यासाठी त्या गाडीमागे मला यावे लागते. कधी कधी रात्री अपरात्रीही प्रवास होतो’ असे ती म्हणाली.

दिपालीशी गप्पा मारताना तिचे कष्ट, संघर्ष, जिद्द, बिनधास्तपणा, धाडस, बोलण्यातील आत्मविश्वास पाहून मी तिचे कौतुक करत होते. तिचे सासू सासरे शेती करतात. कोरडवाहू धान्य व भाजीपाला घरचा येतो. दोघी नणंदा, पै पाहुणे, लग्नकार्य, घरचे सारे पाहून दिपाली बाहेर जे सारं काम पुरूषांच्या बरोबरीने करते ते अभिमानास्पद आहे. पेट्रोल पंप चालवणे असो की जे सी बी, पोकलंड या व्यवसायाची माहिती बहुधा महिलांना नसते. पण दिपाली सारख्या काही धाडसी महिला हे सारं जाणून घेऊन आज या व्यवसायात यशस्वी होत आहेत याचा आनंद आहे. आज त्यांच्याकडे ३ जेसीबी, ३ पोकलंड, ३ डंपर आहेत. वर्षभराची सर्व व्यावसायिक हिशोब, ॲाडिटची सारी कामे दिपाली स्वतः पहाते. लवकरच ती स्वतःचा पेट्रोल टॅंकर घेणार आहे. तसेच वाघोली इथे मुलांसाठी अभ्यासिका करायचा मनोदयही तिने व्यक्त केला.

पूर्ण महाराष्ट्रात तिला भटकंतीसाठी स्वतः गाडी चालवत जायला आवडते. ती नात्यातील सर्व मुलांना वर्षात दोनदा फिरायला घेऊन जाते. तसेच ५००/१००० महिलांच्या तीर्थक्षेत्र सहलींचे नियोजन ती अनेकदा करते. तिचे जवळपास भारतभ्रमण झाले आहे. तसेच परदेशातही तिने सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, बॅंकॅाक, पटाया, फुकेत, अंदमान, श्रीलंका, मालदीव अशा अनेक ठिकाणी प्रवास केला आहे.

बोलताना तिने एक आठवण सांगितली. एक वर्ष तिने देहू ते पंढरपूर वारी केली. वारीत चालताना रोटी घाटात जेवणाची वेळ टळून गेल्याने तिला जेवण मिळाले नाही. प्रचंड भूक लागली होती. एका वारकऱ्याने तिला दोन ठेपले खायला दिले. तिने ते हातावर घेऊन खाल्ले. पण याची आठवण म्हणून ज्या रोटी घाटात आपल्याला जेवण मिळाले नाही तेथे आपण वारकऱ्यांना ठेपले वाटप करू असा विचार तिच्या मनात आला व तिने प्रथम स्वतः एक वर्ष काही ठेपल्यांचे वाटप केले त्यानंतर आता काही मित्रमैत्रिणी व नातेवाईक मिळून दरवर्षी २२००० ठेपल्यांचे वाटप दरवर्षी करतात.

दिपालीला तिच्या सर्व कामात १२ वी झालेला मुलगा, सासू सासरे, पतीसह पाठिंबा असतो. दिपालीची स्वप्न फार मोठी आहेत. ती कायम त्या दिशेने आपली पावलं आत्मविश्वासाने टाकते. ती जे काम हाती घेते त्याला १०० टक्के न्याय देते. म्हणूनच आज ती यशस्वी आहे. तिला सतत आपण टॅापवर असावे असे वाटते. अशा मोठी स्वप्न पहाणाऱ्या व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, विश्वास, जिद्द, कष्ट, सातत्य, संघर्ष, अडचणी आल्या तरीही त्यातून वाट काढत यशस्वीतेच्या दृष्टीने पावलं टाकणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा दिपालीला मानाचा मुजरा..!!

दिपाली तांबे – 98236 04949


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading