July 27, 2024
Environmental status Nagpur City article by Dr V N Shinde
Home » नागपूरचा इशारा गांभिर्याने घेण्याची गरज
विशेष संपादकीय

नागपूरचा इशारा गांभिर्याने घेण्याची गरज

मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. त्यामुळे २०२५-२६ पर्यंत नागपूरमध्ये प्रचंड तापमान वाढ होईल. त्यामुळे कधीही मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

जागतिक तापमान वाढीचे परिणाम भयानक असतील, हे संशोधक सांगत आहेत. मात्र त्यावर ‘मी एकट्याने हे करून काय होणार?’ असा प्रत्येकजन विचार करतो. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. असे वाटते की, स्टीव्हन हॉकिंग यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरण्याचे दिवस जवळ आले आहेत, असे दिसते. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत, निसर्गात केलेल्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे, वातावरणात अनिष्ट बदल होऊन होऊ शकेल, असे त्यांनी भाकीत केले होते. मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप वाढत आहे. हा हस्तक्षेप अनेक प्रकारे होत आहे.

दैनंदिन राहणीमानापासून, पर्यटनापर्यंत मानवाला सुखासीन, कमी कष्टाचे आयुष्य हवे आहे. त्यासाठी ऊर्जेचा वापर आवश्यक बनला. ही ऊर्जेची गरज वाढतच चालली आहे. दरडोई ऊर्जेचा वापर जितका जास्त असेल, तितके ते राष्ट्र प्रगत मानले जाते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र जास्तीत जास्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी दगडी कोळसा, डिझेल यांचा वापर अनिवार्य ठरला. त्यातून होणारे प्रदूषण भयानक आहे. दगडी कोळसा जाळताना उडणारी राख आजूबाजूच्या परिसरात पसरते. त्यामूळे जमिनीच्या सुपीकपणापासून अडचणी वाढत जातात. पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम आजूबाजूच्या रहिवाशांवर होतो. मात्र अनेक लोकांचे जीवन सुखासीन बनवण्यासाठी काही लोकांना त्रास झाला तरी त्याचा विचार कोणी करत नाही.

अनेक उद्योग, कारखाने, व्यवसाय पाण्याचा बेसुमार वापर करतात. वापरलेल्या पाण्यामध्ये धूळ, रसायने, जैविक घटक मिसळतात. असे वापरलेले पाणी प्रक्रिया करून पुढे सोडायला हवे. मात्र अनेक उद्योग कोणतीही प्रक्रिया न करता ते पाणी बाहेर सोडतात. पाणी जमिनीत मुरते. ते पाणी हळूहळू जमिनीतील कोणतेही जैविक घटक नसलेल्या पाण्यामध्ये मिसळतात. परिणामी जमिनीतील पाण्याचे साठे प्रदूषीत होतात. असे जमिनीतील प्रदूषीत पाणी वापरणाऱ्या त्या भागातील लोकांना काही दिवसानंतर याचा त्रास सुरू होतो. याचा विचार उद्योगातून बेसूमार नफा मिळवणारे उद्योजक करत नाहीत. कोकण किनारपट्टीवर बेसुमार पाण्याच्या उपशामुळे समुद्रातील पाणी विहिरीमध्ये मिसळून विहिरीतील पाणी खारट बनत आहे. एकूणच पाण्याचे प्रदूषण अतिशय वाईट पद्धतीने घडत आहे.

हवेचे प्रदूषण तर आणखी घातक आहे. मानवाच्या ऊर्जा वापरामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते, किटकनाशके, कृमीनाशके यांचा वापरही हवेचे प्रदूषण वाढवते. सर्वात महत्त्वाचे कोळसा आणि इंधन तेलाच्या वापरामुळे वातावरणात सोडले जाणारे कर्बवायू तापमान वाढीचे कारण बनतात. त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होतो. पावसाचे अवेळी येणे. मुसळधार पाऊस पडणे. अचानक वादळ, पूरपरिस्थिती उद्भवणे हे वारंवार जग अनुभवत आहे.

याचा मोठा धोका नागपूरला असल्याचा अंदाज केंद्रिय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केला आहे. मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. त्यामुळे २०२५-२६ पर्यंत नागपूरमध्ये प्रचंड तापमान वाढ होईल. त्यामुळे कधीही मुसळधार पाऊस पडण्याची आणि पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

या अहवालानुसार भारतातील स्मार्ट शहरांपैकी १५ शहरे अशा मोठ्या पर्यावरणीय समस्यांच्या जाळ्यात येणार आहेत. रसायन, सिमेंट, विद्युत उपकरणांचे कारखाने, कापड, सिरॅमिक्स उद्योग, औषध निर्म‍िती, अन्नप्रक्रिया, लाकूड आणि कागद उद्योग असणाऱ्या शहराच्या परिसरात तापमान वाढ करणारे हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात सोडले जातात. या शहरांनी असे वायू वातावरणात सोडण्याच्या कारणांवर नियंत्रण आणणे आणि हे प्रमाण २० टक्केपेक्षा जास्त घटवणे आवश्यक आहे.

नागपूरमध्ये दरवर्षी १९.०४ दशलक्ष गिगाज्यूल ऊर्जेचा वापर होतो. दरवर्षी १८२२ किलोवॅट विद्युत ऊर्जेचा वापर होतो. या ऊर्जेतील ४३ टक्के ऊर्जा नागरी वस्त्यांमधून वापरण्यात येते. या वापरामुळे होणारे हरितगृह वायूचे उत्सर्जन ३८ टक्के इतके आहे. प्रशासन जी ऊर्जा वापरते त्यातील ५५ टक्के ऊर्जा पाणी पुरवठा विभागाकडून वापरली जाते. एकूणच मानवाचे जीवन सुखासीन होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करायला हवा. तो कमी केल्याशिवाय नागपूरचा धोका टळणार नाही.

यासाठी याच अहवालामध्ये काही उपाय सूचविण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे शहरांमध्ये विद्युत वाहनांचा वापर करायला हवा. ई-वाहतूक, शक्य त्या सर्व ठिकाणी सायकलचा वापर करायला हवा. कचऱ्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने खत निर्मिती प्रकल्प उभारायला हवेत. कचऱ्यातून हरितगृह वायू बाहेर पडणे पूर्णत: थांबायला हवे. कचराभूमी पूर्णत: बंद करायला हव्यात. रस्त्यावरील दिव्यांचे पूर्णत: नुतनीकरण करून एलईडी दिवे बसवायला हवेत. पर्यावरणपूरक इमारतींच्या बांधकामास प्रोत्साहन द्यायला हवे.

यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो, इ-वाहतुक वाढवणे आवश्यक असल्याचा. इ-वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, असे हा अहवाल सांगतो. मात्र या वाहनांच्या बॅटरीज पुनर्प्रभारीत करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा ही कोणत्या ना कोणत्या औष्णीक विद्युत केंद्रात तयार होते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या कोळशातून हरितगृह वायू वातावरणात सोडला जातो. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा प्रदूषणमुक्त ऊर्जा कशी देणार? हा प्रश्न निरूत्तरीत राहतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करून ऊर्जा निर्मिती व्हायला हवी. यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा आधिकाधिक वापर झाल्यास इ-वाहतूकीस अर्थ प्राप्त होईल.

कोणत्याही ठिकाणी होणारे वायू प्रदूषण विशिष्ट जागेवर झाले तरी, ते वातावरणात पसरत राहते. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्याचा परिणाम दूरवर होत जातो आणि त्याला जागतिक स्वरूप प्राप्त होते. मात्र ज्या ठिकाणी प्रदूषणाची केंद्रे असतात, त्या ठिकाणी त्याची तिव्रता अधिक असते. अशा केंद्राच्या ठिकाणी तीव्र परिणाम अनुभवण्यास मिळणे स्वाभाविक आहे. नागपूरचे नेमके तेच झाले आहे. नागपूरजवळच्या कोराडी येथे सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. त्याचबरोबर खपरखेडा येथेही दुसरा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. नजीकच्या काळात नागपूरजवळ बेला येथे दोन, खुर्सापार, बुटीबोरी आणि बेरी खुर्द या ठिकाणी नवे औष्णिक विद्युत प्रकल्प येत आहेत. म्हणजे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार आहे. नागपूर आणि इतर शहरांनी या इशाऱ्यातून धडा शिकायला हवा. आपल्या शहरातील प्रदूषण कमी करायला हवे, नाहीतर आपले शहरही नागपूरच्या मागे जाणार आहे, हे निश्चित!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

धुंदी वॉटरफॉल रॅपलिंगची !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading