December 18, 2024
Education in mother tongue is the fourth basic need
Home » मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज
विशेष संपादकीय

मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज

माणसांचं, निसर्गाचं, जंगलांचं, पशु-पक्षी-प्राणी यांचं निरिक्षण करणं पर्यायाने आपल्या भवतालाचं वाचन करणं हेही एक प्रकारचं जीवनोपयोगी असं वाचन असतं आणि अशा प्रकारचं वाचन आपल्या जीवनजाणिवा प्रगल्ग करीत असतं. पण या अशा वाचनाकडेही आपलं कमीलीचं दुर्लक्ष होत चाललं आहे. आपल्या बहुतांश जणांच्या संवेदना दिसागणिक बोथट बनत चालल्या आहेत.

रमेश साळुंखे.
प्रमुख, मराठी विभाग, देवचंद काॅलेज, अर्जुननगर
जि. काेल्हापूर. माेबा. 9403572527

वाचन चळवळ वृद्धींगत होण्यासाठी लेखमाला – भाग ३

आपल्या प्राथमिक गरजा एकदा नीट बसून ठरवूनच टाकल्या पाहिजेत आपण. तसे आपल्या मनाशी काही पक्के केले आहे का आपण; हे एकदा नीट पाहिले पाहिजे. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांनंतर कोणत्या गोष्टीचा विचार करतो आपण. वाचन, छंद, प्रवास या गोष्टींना मग लगेच स्थान देतो का आपण? नीट पाहिलं तर कितीतरी अनावश्यक गोष्टींनी आपलं अवघं जगणं झाकोळून गेलेलं आहे. खऱ्या, सहज, साध्या आणि सात्त्विक आनंदाला पारखे झालेलो आहोत आपण. अनावश्यक गोष्टी त्या मिळाल्या काय आणि नाही मिळाल्या काय तसा काहीच फरक पडत नाही. खरंतर पुस्तकांच्या वाचनामुळं आपला कुटुंबकबिला स्थिरस्थावर होत असतो. घरं होत असतात आपली. पोटं भरत असतात. मग ज्या गोष्टींवर सारी मदार आहे; त्या गोष्टीला आपल्या घरात स्थान किती असावं? आपल्या घरात अभ्यासिकेला जागा किती? पुस्तकांना कपाटं किती? कितीही मोठं घर असलं तरी ते वन-टू-थ्री-फोर अशा ‘बीएचके’च्या पलिकडं जात नाही. बहुतांश ठिकाणी हे असंच दिसतं आहे. याला चांगलं लक्षण म्हणता येईल का? अशी देखणी चकचकीत घरं पाहून बाहेर पडताना त्यात राहणाऱ्या माणसांना असं म्हणावसं वाटतं की, ‘बाबारे, कसा आणि कधी होशील तू शहाणा; कशी होतील मग तुझी मुलं संस्कारित? कशामुळं झालास तू इतका मोठा?’ एकांत आणि एकांतातलं वाचन ही एक मूल्ययु्क्त शिदोरी आहे; आणि तीच या अशा घरादारांमधून कळत-नकळत हद्दपार होते आहे.रसिक वाचकांच्या संदर्भात खूप सारे लेखक लोक म्हणतील, ‘डोक्याला प्रंचड मनस्ताप देणारं हे जग आहे; ते विलक्षण गुंतागुंतीचं ठरू लागलं आहे; ते आमच्या आयुष्याचा भाग बनलं आहे. आणि म्हणून आमचे लिखाण तशाच प्रकारचे अवतरणार. तर वाचकही म्हणतील आधीच नसत्या कटकटी खूप झाल्या आहेत; तर हे दुर्बोध साहित्य वाचून आणखी कटकटी कशाला वाढवून घ्या. त्यापेक्षा कुठेही आणि कधीही उपलब्ध होणारे हास्ययात्रा-हास्यजत्रा असे कार्यक्रम पाहिलेले काय वाईट? लेखकानं काय आणि कसे लिहावं? हा जसा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. आणि तो रास्तही मानला पाहिजे. वाचकाने आपली वाचनाची आवड जोपासली की आपसूकच तो लेखकाने जे आणि जसे लिहून ठेवलेले आहे? त्या पातळीपर्यंत निश्चितच येऊ शकतो. आपली अभिरूची टप्याटप्याने घडवत जाणे; यासारखा दुसरा कोणता पर्याय असू शकेल असेही वाटत नाही. त्यामुळे आजकालचे चांगले कथात्म साहित्य वाचताना वाचकांची दमछाक होते हे मान्य. तथापि असे साहित्य आपल्याला आपल्या भवतालाची उत्तम जाण करून देत असते. इतकेच नव्हे तर सत्वयु्क्त जगण्याची वाट ते प्रशस्त करत असते; हे खरेच आहे. कोणत्याही प्रकारच्या साहित्याकडून केवळ मनोरंजनाची अपेक्षा ठेवणे यात तसे पाहिले तर काहीच गैर नाही. मर्ढेकर, चित्रे, ग्रेस, जी. ए. असे बरेच लेखक पहिल्या अथवा दुसऱ्या वाचनातही समजत नाहीत; हे खरेच. पण यांच्या लेखनाशी एकदा का मैत्र जुळले; की मग त्यातून मिळणाऱ्या आनंदाला पारावार रहात नाही. अशा लेखकांच्या लेखनातून व्यापक जीवनानुभूतीचे दर्शन घडते. मानवी मन, त्यांच्या जगण्याच्या-सुखदु:खाच्या नानापरि पाहता येतात. नवी भाषा, नवे प्रांत, नवा आशय, विषय, नानाविध प्रदेश, दुर्लक्षित माणसं सारं काही साहित्यात येत असतं. आजही ते भरभरून येते आहे; ते वाचलं पाहिजे. भवतालाशी या जीवनातल्या बऱ्यावाईटाशी जोडून घेणं यातच माणसाचे माणूसपण आहे न? मग वाचनाला पर्याय कसा काय असू शकतो? अन्यथा निराशेचं, अस्वस्थतेचं आणि दिसागणिक वाढणाऱ्या मनोविकारांचं वाळवंट दबा धरून बसलेलं आहेच की बाहेर.

बर्ट्रेड रसेल यांनी लिहिलेला एक लेख वाचत होतो परवा. त्यांच्याही एका विधानाचा उल्लेख या संदर्भात करायला हरकत नाही. ‘मानवी जीवनातील परमोच्य गोष्ट कोणती असेल तर ती स्वांतत्र्य. स्वातंत्र्याशिवाय चांगलं व्यक्तिमत्त्व अशक्य असतं.’ असं म्हणतात ते. खरंच आहे नाही का हे? आहोत का आपण तळामुळातून स्वतंत्र? आपण दिवसेंदिवस अधिकच परतंत्र बनत चाललो आहोत; हे एकदा मान्यच केलं पाहिजे नाही का आपण? न दिसणाऱ्या शेकडो व्यक्तींनी आपल्याला परतंत्र करून सोडलं आहे. किती लोकांची किती पाळत आपल्यावर? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा, रहनसहन असे कितीतरी प्रश्न हरघडी निर्माण होतच आहेत. सर्वसामान्य माणसाला अज्ञानात ठेवून त्याच्यावर वैचारिक, मानसिक, बौद्धिक… अशी गुलामगिरी लादणं; हा विचार केंद्रस्थानी ठरतो आहे. सत्ता, मत्ता या ऐवजी कुणाला कशाशी काहीच घेणंदेणं उरलेलं नाही का? असा प्रश्न पुन:पुन्हा विचार करणाऱ्या माणसाला भेडसावत नाही का? तर या सर्वांपासून स्वत:ला, कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला स्वतंत्र करणं कमालीचं अवघड ठरू लागलं आहे. आणि आपण हे सत्य पचवण्याच्या तयारीतच नाही आहोत. हे असं काही आपल्या अवतीभवती चाललं आहे, या विचारापासूनही शेकडो लोक कमालीची दूर आहेत. सत्य पचवायचं आणि त्याबरहुकूम काही कृती करायची तर सत्याचं आकलन नको का करून घ्यायला? आणि ते आकलन करून घ्यायचा साधा-सोपा मार्ग म्हणजे अर्थातच वाचन नव्हे का? विद्येविण मती गेली… आणि किती अनर्थ आपल्या समाजाचे झाले; हे महात्मा फुले यांनी पोटतिडिकेने कधीचेच सांगून ठेवले आहे. कधी विचार होणार हा? जुने ते सारेच बिनकामाचे असते का?

वाचनाचा अर्थ केवळ शब्द वाचन, असा मर्यादित अर्थानेही घेता उपयोगाचं नाही. यासंदर्भात आपल्या संवेदनांना तीव्र टोकदार करणं महत्त्वाचं आहे. खूप सारी माध्यमं आणि इच्छा असो अथवा नसो; आपल्या कानांडोळ्यांवर त्या माध्यमांमधील बरं वाईट असं काही ना काही सतत आघात करत असतं. एखादी गोष्ट आपण पाहिली, ऐकली, अनुभवली; तर त्याचा काहीएक बरा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. काही एक संस्कार आपल्यावर होत असतो. तो संस्कार पचवून काहीएक विचार करणं, काहीएक निर्णय घेणं; असं सारं होत असतं. तेही आजकाल नीट असं होईनासं झालं आहे. समाजातली पयार्यानं व्यक्तीच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट जुनी होणं, रद्दी होणं याचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळं पंचेंद्रियांची कामंही आपण विसरत चाललो आहोत. असेही अनुभव घ्यायचे असतात, हेही आपल्या गावी नसल्यागत आपले वागणे-बोलणे होऊन बसले आहे. माणसांचं, निसर्गाचं, जंगलांचं, पशु-पक्षी-प्राणी यांचं निरिक्षण करणं पर्यायाने आपल्या भवतालाचं वाचन करणं हेही एक प्रकारचं जीवनोपयोगी असं वाचन असतं आणि अशा प्रकारचं वाचन आपल्या जीवनजाणिवा प्रगल्ग करीत असतं. पण या अशा वाचनाकडेही आपलं कमीलीचं दुर्लक्ष होत चाललं आहे. आपल्या बहुतांश जणांच्या संवेदना दिसागणिक बोथट बनत चालल्या आहेत.

संवेदनांनी जग पाहून ते तनामनात रिचवून त्याचा आविष्कार करणारे अनेक लोक आपल्या इतिहासात होऊन गेलेले आहेत. अगदी अलिकडची नावं सांगायची तर बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे अशी शाळेशी अत्यल्प किंवा तसा संबंधच प्रस्तापित न झालेल्यांची खूप नावं देता येतील. हे सारे जगाच्या उघड्या विश्वात-जगाच्या शाळेत शिकलेले लोक होते. त्यांचे स्वत:चेच असे विद्यापीठ होते. त्यामुळे त्यांची स्वत:विषयी आणि समष्टीविषयीची करूणा कमालीची तीव्र होती. बहुश्रृतेशी अशा माणसांचा जवळचा संबंध होता. ‘केल्याने देशाटन पंडित सभेत मैत्री मनुजा चातुर्य येतसे फार…’ असे आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले आहेच की. देशविदेशातील अनेक विचारवंतांनी देश विदेशात खूप भ्रमंती केली होती. त्यामुळे त्यांच्या विचाराला अनुभूतीची जोड होती. शब्दाला वजन प्राप्त झाले होते त्यांच्या.



वाचनातून आलेली अनुभूती आणि केल्याने देशाटन यामुळे आलेली अनुभूती अशाप्रकारचं आपलं दोनही प्रकारचं वाचन आजकाल आक्रसत चालल्यामुळे मुळातच अत्यंत कमी असलेलं आपलं अनुभवविश्वही अत्यंत तोकडं होऊ लागलं आहे. आणि ते आपल्या लिखाणात, चालण्या-बोलण्यात, कृती कृतीतही बटबटीतपणानं दिसू लागलं आहे. माध्यमांची प्रचंड भाऊगर्दी असून, सारे जग एका क्लिकवर आले असूनही आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जगणे अधिकाधिक संकुचित होत चालले आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे याचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. समुद्र सफारीवर जाणं, प्रचंड प्रवास करणं, मुष्टीयुद्धात भाग घेणं इत्यादी अनेक प्रकारच्या गोष्टी हा लेखक करीत असे. हे सारं अनुभवविश्व त्याच्या लेखनातही सच्चेपणानं उतरलं आहे. ‘द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही त्याची समुद्रावरील एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे. हे असे काही समरसून जगणारे कवी-लेखक इत्यादी आपल्या समाजात आढळत नाहीत.

अनुभव विश्वासोबतच विज्ञानवादी होतो. आपण वाचनामुळे स्वातंत्र्योत्तरकाळात विविध क्षेत्रात आपण नेत्रदीपक प्रगती केली हे सत्य आहे. 1990 नंतर तर या प्रगतीची झेप आणि विस्तार कमालीचा वाढला हेही खरेच आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे सारे शक्य होते आहे; हे मान्य केले तरी वैज्ञानिकदृष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारात कितपत आली, हा देखील विचार करण्याजोगा प्रश्न आहे. बुवा, बाबा, महाराज इत्यादींच्या भजनी आपला समाज मोठ्या प्रमाणात लागला आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही. त्यामुळे खरा धर्म, देव, अध्यात्म यापासूनही आपण कमालीचे दूर चाललो आहोत. प्राचीन आध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांचे आपले वाचन किती ? हा प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. आणि याचा गैरफायदा घेऊन अध्यात्म कशाशी खातात याचा मागमूस नसलेले शेकडो लोक अमाप माया जोडून बसले आहेत. तेव्हा सत्य, वस्तुनिष्ठता तर्क यांची बूज राखली जाते वाचनामुळे. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा, प्रसंगांचा समग्रतेने कसा विचार करावा, याचीही जाणीव वाचनामुळे होत असते.

या सर्वांसोबत आणखी एका गोष्टीचा विचार निश्चितच करायलाच पाहिजे, आणि तो म्हणजे सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये इंग्रजीचा अनाठायी वापर वाढू लागला आहे. प्रादेशिक भाषेतून अथवा मातृभाषेतून घेतलेले शिक्षण माणसाच्या आकलनासंदर्भात आणि एकूणच त्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे असते; हे जगभरच्या महत्त्वाच्या लेखक कवींनी, विचारवंतांनी मान्य केले आहे. मातृभाषेचा अत्यंत हिहीरीने पुरस्कार या लोकांनी केला आहे. आजही मातृभाषेच्या महत्त्वाविषयी बोलले-लिहिले जाते. आपण ते ऐकतही असतो. पण त्याबरहुकूम कृती मात्र करत नाही. इतरांच्या अंध अनुकरणामुळे आणि आपल्या भाषेच्या दुराभिमानामुळे इंग्रजीचे बळी ठरतो आहोत आपण. भरमसाठ खर्चिक असलेल्या शाळांमध्ये प्रसंगी कर्ज काढून आपल्या मुलांना भरती करून आपले साहित्य आणि संस्कृतीपासून त्यांना तोडतो आहोत. मुलांचे भावविश्व यंत्रवत करतो आहोत. ‘‘भावीकाळात जर संपूर्ण महाराष्ट्रात बालवर्गापासूनच इंग्रजी माध्यम राहिले आणि शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय आजिबातच काढून टाकला तर मराठी वाङ्मय आणि त्याचा वाचकवर्ग या गोष्टी भूतकाळात जमा होतील.’’ असा इशारा सुधीर रसाळ यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी दिला आहे.

इंग्रजी भाषेचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही, त्या भाषेचे महत्त्व टाळताही येणार नाही. ती जगाकडे पाहण्याची, ते समजून घेण्याची एक खिडकी आहे हे मान्यच केले पाहिजे. तथापि केवळ खिडकी म्हणजे घर नसते; हेही समजून घेतले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज सुसंस्कृत माणसाची असायला हवी-अन्यथा आपण इतरांच्या हातातील एक यंत्रमानव म्हणून राहणार आहोत का? याचाही विचार गांभिर्याने करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. शिवाय ‘‘आपली भाषा आणि संस्कृती याबद्दलची अभिमानाची भावना आणि भाषेच्या अस्तित्वावर आपली सांस्कृतिक ओळख अवलंबून असल्याची जाणीव जोपर्यंत मराठी समाजात जागृत होणार नाही; तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणार नाही.’’ असेही एक महत्त्वाचे मत सुधीर रसाळ यांनी नोंदवून ठेवले आहे. आपल्या भाषेबद्दलच्या अभिमानासाठी केवळ भाषादिन, भाषा सप्ताह अथवा भाषा पंधरवडा साजरा करून नंतर विसरून जाणे इतकेच भाषिक कर्तव्य करीत राहणे हे उपकारक नाही, तर भाषा ही आपल्या एकूणच जगण्याची जीवनरीत नको का व्हायला?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading