सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि दुःखात करपून गेलं आहे. तथापि कुटुंबियांच्या या जीवघेण्या कष्टाच्या जगण्याला घरातूनच शिक्षणाचा एखादा रसरशीत अंकुर फुटावा ! हे उमेदीचं, आशेचं रोपटं वाढताना अनेक संकटे यावीत, हालअपेष्टा वाट्याला याव्यात; परंतु त्यात स्वतःचे आईवडील, एखादा मोठा भाऊ, बहिणी, नात्यातली काही माणसं शिवाय समाजातील काही चांगल्या माणसांच्या सोबतीने हा प्रवास सुखकर व्हावा ! आणि अपरिमित कष्ट, वेदना आणि अपमानांचं हे जीवन हळूहळू मार्गी लागावं ! असा ‘हेलपाटा’ या कादंबरीचा मुख्य गाभा सांगता येईल.
विवेक उगलमुगले, नाशिक
चलभाष : ९४२२९४६१०६
मुक्काम पोस्ट आंबळे (आनोसेवाडी ) ता. शिरूर, जिल्हा पुणे येथील तानाजी धरणे या कधीकाळी परिस्थितीने गांजलेल्या मुलाचं भावविश्व यात आपल्याला वाचायला मिळतं. ‘हेलपाटा’ ही कादंबरी खरंतर तानाजी धरणे यांच्या शिक्षण आणि नोकरी लागेपर्यंतच्या कालखंडातील जगण्याचं एक खंडीत वास्तव आहे. असं म्हणता येईल. त्यात गुरंढोरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, मांजरी आहेत. शेतीमातीतले अपरिमित कष्ट आहेत. निसर्गाचे मनोहरी विभ्रम आहेत. कुटुंबातील लग्नकार्य, जन्म-मृत्यू आहेत. पोटाची दोन वेळची खळगी भरण्यासाठी केलेली भ्रमंती, म्हणण्यापेक्षा फिरफिर आहे. जगण्याच्या या हेलपाट्यात लेखकाच्या शाळेत जाण्याच्या परिपाठात येणारी खंडता आहे. परिस्थितीच्या रगाड्यामुळे येणारी मनाची व शरीराची झालेली विलक्षण पायपोळ आहे. आईवडील, भाऊबहीण यांच्या नात्यांचा मनोहारी गोफ आहे. तत्कालीन समाजजीवन आणि परिस्थितीचे नेमके चित्रण यात वाचावयास मिळते.
शेतीकामात एक सालगडी असलेले आपले निरक्षर वडील आणि मोलमजुरी करणारी आई यांच्या अनुषंगाने ही कादंबरी सुरू होते. हळूहळू लेखकाचे कुटुंब, कुटुंबातील आणि परिसरातील वातावरण, घरची कौटुंबिक परिस्थिती, जगण्याची होरपळ आपल्या परिचयाची होते. आईवडील, भाऊ यांचं दुसऱ्याच्या, कधी स्वतःच्या शेतातलं राबणं, पुढे आणखी राहू येथील माधवनगरच्या वाण्याच्या गुऱ्हाळावरचे दिवस यात फार सविस्तरपणे वाचावयास मिळतात. गुऱ्हाळावरचे ते दिवस वाचताना तो सर्व काळ आणि तेथील वातावरण लेखकाने आपल्या संवेदनशील लेखणीने कमालीचं जिवंत आणि रसरशीतपणे उभं केलेलं आहे.
यादरम्यान लेखकाच्या बहिणीचे लग्न होताना त्यावेळी आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी विकलेले बैल किंवा खोंड, प्रसंगी कोंबड्या विकणे, हात उसने कर्ज काढणं, नातेवाईकांच्या खोडीनाडी, समाजातील चालीरीती, दुष्काळ, नापिकी यामुळे आपला स्वतःचा उघड्यावर आलेला संसार इथपासून ते पुढे स्वतःचं हक्काचं घर स्वतः बांधून घेण्यापर्यंतचा संघर्ष यात बारकाईने वाचावयास मिळतो. शेतीकामातील काही अनुभव या पुस्तकाला एक वेगळीच उंची देतात. आपण एखादी सुंदर ग्रामीण कादंबरीच वाचतो आहे, असा अनुभव या दरम्यान आल्याशिवाय राहत नाही.
या सर्वांमध्ये स्वतः लेखक म्हणजे कादंबरीचा नायक तानाजी यास आपल्याला प्राथमिक शाळेची सुरुवातीला वाटलेली भीती, दडपण यापासून ते पुढे शाळेची गोडी लागणं, काही महत्वाच्या परीक्षेत वर्गात पहिला येणं किंवा शाळेच्या खर्चाची नड भागवण्यासाठी कधी सुट्टीत तर कधी शाळेला दांडी मारून मुंबईला बहिणीकडे जाऊन डोक्यावर पाटी घेऊन उंचाच उंच इमारतीत दारोदार भाजीपाला, फळं किंवा काहीबाही वस्तू विकून पैसे कमवून, पुन्हा आपली शाळा सुरू ठेवणे, हा भाग मुळातून वाचण्यासारखा किंवा समजून घेण्यासारखा झालेला आहे. आपल्या कुटुंबाचा फाटलेला संसार जोडण्याची कसरत करताना लेखक कमालीच्या ताकदीने उभा राहतो. संघर्ष करतो. परिस्थिती उत्तमपणे सांधणं किंवा आपली माणसं जोडण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती लेखकाच्या ठायी दिसून येते. ती फार महत्वाची अशी बाब आहे.
दरम्यान याकामी कुटुंबियांचे प्रामाणिक प्रयत्न, त्यांच्या ठायी असलेलं चांगुलपण, विशेषतः लेखकाची आजी- लक्ष्मीबाई ही तिच्या लोककथा सांगण्यातून वाचकांच्या लक्षात राहावी. तशीच लेखकाची एक हळव्या स्वभावाची बहीण विमलआक्का, कुसूम, मंगलताई यांच्या छोट्या मोठ्या भावविभोर आठवणींमुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाचा ठाव घेते. काळजात रुतून बसते.
या सर्व परिस्थितीतही लेखकाची शाळा सुरू राहते. त्यासाठी कुटुंबियांची भरभक्कम साथ, वडिलांची सोशिकता, आईचा मायाळू परंतु धोरणी स्वभाव, भावाचे निमूट कष्टं, प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत उत्तम शिक्षक व मित्र लाभणं, त्यांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य याशिवाय स्वतः लेखकाची मेहनत, चिकाटी, अभ्यास, पशुपक्षांविषयी दाखवलेला आदरभाव, विशेषत: खिल्लारी गाईविषयी दाखवलेली कृतज्ञता, यामुळे एकूणच कष्टमय संघर्षमय जीवनप्रवासात ही कादंबरी लेखकाच्या माणूसपणाचीही साक्ष देते. ‘हेलपाटा’ या कादंबरीला एक वेगळा आयाम प्राप्त करून देते.
शेवटी शेवटी काही मोजके अपवाद वगळले, तर लेखकाचे या कादंबरीतील जवळपास सर्वच अनुभव हे संघर्षमय आणि वेदनादायी खरेच; परंतु या धगधगीत वास्तवात लेखकाची सुरू असलेली शाळा, महाविद्यालयातील शिक्षण आणि त्यास कुटुंबीय आणि काही चांगल्या माणसांची साथ यामुळे ही संघर्षगाथा शेवटी एका सुंदर यशोगाथेत परावर्तित होते. हे या कादंबरीचे यश सांगता येईल.
हा सर्व एकूणच कालखंड ‘हेलपाटा’ या कादंबरीने अतिशय प्रभावीपणे, ओघवत्या शैलीत चित्रित केलेला आहे. कादंबरीत एकच एक ध्येय निश्चित करून ही कादंबरी पुढे सरकत राहते; त्यामुळे उपकथानकं यात येत नाहीत. आवश्यक तेवढाच, आवश्यक तितकाच मजकूर यात येतो. कुठेही ही कादंबरी रटाळ होत नाही किंवा रेंगाळत नाही. अपेक्षित आणि परिपूर्णतेचा परिणाम साधताना दिसते.
कादंबरी प्रथमपुरुषी एकवचनी कथन शैलीतील असली, तरीही आईवडील, बहिणभाऊ, आजी, मामा या नात्यांसोबतचे आपापसातील किंवा लेखकाशी काही महत्वाचे संवाद यात ‘आहे तसे आले असते’ तर ही कादंबरी अधिक परिणामकारक झाली असती. याशिवाय आण्णा ही लेखकाच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा या कादंबरीत फार संवाद न साधताही फार प्रभावी अशी झालेली आहे. या कादंबरीत ही व्यक्तिरेखा अतिशय निमूट व सोशिकपणे वावरते. रामलक्ष्मणाच्या नात्यातील व नात्याने लेखकाचे वडीलबंधू असूनही लक्ष्मणासारखी खंबीर साथ ते लेखकाला देतात. नात्यांची एक घट्ट वीण या कादंबरीत अनेक ठिकाणी वाचायला मिळते.
जीवनाचे सूक्ष्मदर्शी चित्रण या कादंबरीत आलेले आहे. त्या सर्व अनुभव आणि प्रसंगांनी वाचक या कादंबरीत मनाने गुंतून जातो. काही प्रसंग तर मनाला थेट स्पर्शून जातात. मंगलताईच्या बाळाचा मृत्यू, आजीचा पैसे कमावण्याविषयी दिलेला लाखमोलाचा उपदेश, भाऊंच्या पायातील कुरूपं… ‘हेलपाटा’ कादंबरीमधील असे अनेक प्रसंग काळजात रुतून बसतात. अस्वस्थ करतात. अंतर्मुख करतात; कारण ही सर्व परिस्थिती सत्य म्हणजे वास्तव आहे. ‘हेलपाटा’ कादंबरी वाचून समाजातील अनेक उपेक्षित, वंचित मुले भविष्यात उभे राहावेत ! असे हृद्य, प्रेरणादायी अनुभव यात जागोजागी वाचावयास मिळतात.
या कादंबरीत कमालीचा साधेपणा व सोपेपणा आहे; परंतु त्यात प्रामाणिकता आणि अस्सल अनुभव आहेत. यात कुठेही परिस्थितीमुळे आलेलं रडगाणे नाही. आक्रस्ताळेपणा तर औषधालाही नाही. आहे ते सर्व खरं खरं, नितळ व प्रामाणिक अनुभवांचं!त्यामुळे ही कादंबरी वाचकांचं मन हेलावून टाकते. कादंबरीच्या शेवटी लेखकाला नोकरीचा आदेश प्राप्त होतो आणि लेखक नोकरीच्या गावी रुजू होण्यासाठी प्रस्थान ठेवतो. आपल्या या मुलाच्या यशाने लेखकाचे वडील म्हणजे शांत, संयमी स्वभावाच्या भाऊंना आपण जग जिंकल्याचा आनंद होणं ! या ठिकाणी ही कादंबरी संपते.
कादंबरीचा साचा वापरून लेखकाला आपल्याच मनातील महत्वाचे काही सांगायचे आहे. जसे की, यशाला पर्याय नसतो. उत्तम यश ही कोणत्या एका वर्गाची मक्तेदारी नाहीच मुळी. आपण विपरीत परिस्थितीतही संघर्ष करून, मेहनत करून अपेक्षित यश मिळवू शकतो ! आयुष्य कधीच थांबत नाही. भलेही त्यात कितीही ‘हेलपाटे’ घालण्याची वेळ येऊ देत. ‘हेलपाटा घालणं’ ही एक आपत्ती न समजता इष्टापत्ती समजून यापुढेही अनेक मुलं प्रेरणा घेऊन उभे राहतील ! असा आशावाद ही कादंबरी पेरते; म्हणून ‘हेलपाटा’ कादंबरी फार महत्त्वाची आहे. लेखक तानाजी धरणे यांनी नव्या उमेदीने सकारात्मक, प्रेरणादायी लेखन करत रहावं ! अशा शुभकामना व्यक्त करतो. एक उत्तम, सकस कादंबरी वाचल्याचा अभिप्राय येथे नोंदवून ठेवतो. जीवघेण्या वास्तवाला सामोरी जाताना अशी कादंबरी युवा व होतकरू पिढीने आवर्जून वाचावी. त्यावर चिंतन, मनन करावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
