April 20, 2024
Meditation for spiritual Growth rajendra ghorpade article on dnyneshwari
Home » उचला साधनेचे गांडिव
विश्वाचे आर्त

उचला साधनेचे गांडिव

मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर तो शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।।197।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ – सर्वांगावर काटा उभा राहीला आहे. माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत. आणि गांडिव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.

साधनेतील मंत्र हे गांडिव आहे. याचा प्रहार करायला हवा. साधनेला आपण बसलेला असतो. पण आपण हे गांडिव उचललेले नसते. साधना सुरू असते. मंत्रोच्चार सुरू असतो. पण मन मात्र कोठेतरी भरकटलेले असते. गांडिव चालवण्याची इच्छा मनात नसेल तर बाण योग्य ठिकाणी लागणार नाही. त्याची जागा चुकणार. त्याचा वार वाया जाणार. यासाठी गांडिव चालविण्याचा दृढ निश्चिय हवा.

मोहामुळे हा धनुष्य उचलण्याची इच्छा नसते. मंत्र म्हणण्यात आपण आपला वेळ फुकट का घालवत आहोत. त्यावेळात आपण अन्य काही तरी कार्य करू शकलो असतो. असे म्हणून आपण तो वेळ दवडतो. साधना करण्याचे विसरूनच जातो. आपण साधना मुळात करतोच किती वेळ. दहा ते पंधरा मिनटे त्यात वेळ घालवला तर तो वाया कसा जातो ? दहा मिनिटे मोलाची आहेत. मग ही दहा मिनिटे साधनेत योग्य प्रकारे घालवली तर वेळ वाया कसा जाईल. पण तसे घडत नाही.

दहा मिनिटे आपण साधनेला बसतो. पण या दहा मिनिटात मनात कोणते विचार करतो यावर लक्ष द्यायला हवे. लक्ष दिल्यानंतर असे लक्षात येते की आपण सोऽहम साधना करतच नाही. साधनेला तर बसलेले असतो. पण मनात दररोजच्या घडामोडी सुरू असतात. मनात अनेक विचार घोळत असतात. त्यातच आपली दहा मिनिटे जातात. मग साधना झालीच नाही. वेळ वायाच गेला ना ? यासाठी साधनेत मन रमवायला हवे. येणारे विचार थांबवायला हवेत. मनात विविध मोहाचे विचार येतात. अशाने साधना होतच नाही. हे विचार आपली पाठच सोडत नाहीत.

साधनेत मंत्राचा गांडिव काही उचललाच जात नाही. उचलला तरी त्यातून सुटलेला बाण योग्य ठिकाणी लागत नाही. तो चुकतो. मनाची एकाग्रता वाढवायला हवी. वेळेचे महत्त्व आपणास पटते ना ? मग वेळ वाया का घालवता ? साधनेत मनाची एकाग्रता हवी. मन एकाग्र झाले नाही तर वेळ फुकट जाणार. हा नफा-तोटा विचारात घ्यायलाच हवा. तरच लाभ होणार आहे. कोणताही धंदा करताना नफा-तोटा पाहावाच लागतो. तरच तो धंदा यशस्वी होतो. अन्यथा कधी तरी तो व्यवसाय गुंडाळावा लागतो.

मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर तो शत्रू आहे. आपण त्याला मारले नाही तर तो आपणावर विजय संपादन करेल. हे लक्षात घ्यायला हवे. मनाला सुटलेला मोह आपणास खाणार आहे. आपला वेळ फुकट घालवणार आहे. हे लक्षात घेऊन साधना जागरूकतेने करायला हवी. सोऽहम मध्ये मन रमवायला हवे. तसा प्रयत्न करायला हवा. तरच त्यातून सुटणारे बाण हे आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतील.

Related posts

लोकगीत – भेट

नादब्रह्मच्या बासरीधुनची गुरुवंदना…

गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी

Leave a Comment