October 18, 2024
Mukta kadam youtuber special article
Home » Privacy Policy » मुक्ता कदम:धाडसी बेधडक तरीही संवेदनशील
मुक्त संवाद

मुक्ता कदम:धाडसी बेधडक तरीही संवेदनशील

2021 मधे शेतकरी आंदोलनादरम्यान ती रागात येऊन तिने एक मिनिटाचा व्हीडीओ बनवला, तर तिच्या संस्थेच्या डायरेक्टरने तो व्हीडीओ डीलीट करायला सांगितला.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत.९४०४३९५१५५

मुक्ता कदम धाडसी – बेधडक तरीही संवेदनशील युट्यूबर आहे. ती म्हणते, आपण जे बोलतोय ते या समाजाच्या हिताचं असेल, शोषणाविरूद्ध असेल, हा समाज अधिकाधिक समंजस अन समृद्ध होण्याविषयी असेल तर हळूहळू लोकांना पटायला लागतं म्हणून आपण बोलत रहायला हवे आणि कितीही ट्रोलधाड पडली तरी मी बोलतच रहाणार आहे!

आपली जगण्याची समृध्दी कशात असते? असं युट्यूबर मुक्ता कदमला विचारलं, तर कदाचित तिचं उत्तर असेल समाजावरचा अन्याय सहन न करण्यात. अवघ्या चार महिन्यात ६६ हजार लोकांना जोडली गेलेली मुक्ता युट्यूबर म्हणून लोकप्रिय आहेच; पण ती अभिनेत्री आहे, चित्रकार आहे आणि कार्यकर्तीही आहे. पण अलिकडल्या काही दिवसात तिचे  एपिसोड पाहताना तिने सत्ताधारी व्यवस्थेवर जे आसूड ओढले ते सगळ समजून घेताना असं लक्षात येते ती धाडसी, बेधडक तरीही संवेदनशील आहे. अर्थात याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

मुक्ता युट्यूबर म्हणून ती जे काही मांडते ते आजचे कळीचे मुद्दे असतात. त्या त्या वेळी जे जे बोलणं महत्वाचं वाटतं, त्यावर ती अभ्यासपूर्ण बेधडक बोलते. प्रामुख्याने त्यात आज देशात-  राज्यात जे वातावरण प्रदूषित करणारे राजकारणी आहेत, त्यांच्या करनाम्यांविरोधात ती धाडसाने बोलत असते. माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो म्हणून मी बोलते असं ती सांगते.

सच्चा पत्रकार जे काम करत असतो ते काम ती करते अशा दृष्टीने लोकं तिच्याकडे पाहतात. पण पत्रकार म्हणून स्वातंत्र्य घेण्यापेक्षा माणूस म्हणून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याकडे पाहणं मला आवडते अस ती म्हणते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर संविधान लागू झाल्यापासूनच आपल्याला मिळालं पण 2014 पासून ते उलट्या दिशेने जात आहे असा अनुभव आहे. म्हणजे आपण सत्तेतलं जे जे खटकते ते बोलणं हे स्वाभाविक आहे. पूर्वीही लोकं बोलायची; पण आता मात्र लोकं खूप घाबरतात.

नोकरदार मग ते सरकारी असो, की खासगी.बोलायला घाबरतात. लोक तिला कधी खासगीत सांगतात की आम्हाला भीती वाटते. अनेकांना नोकरी करताना व्यक्त होताना दबाव येतो. तिला सुद्धा जोपर्यंत ती एका आस्थापनेशी जोडलेली होती तोपर्यंत तिला बोलायला मोकळीक नव्हती. 2021 मधे शेतकरी आंदोलनादरम्यान ती रागात येऊन तिने एक मिनिटाचा व्हीडीओ बनवला, तर तिच्या संस्थेच्या डायरेक्टरने तो व्हीडीओ डीलीट करायला सांगितला.

मात्र व्यवस्थेला शरण जाणं तिला कधीच पटत नाही. मुक्ता सांगते, मी चित्रं काढली त्यात खासकरून माझ्या अंतर्मनातली अवस्था त्यात आली असेल; पण त्या व्यतिरिक्त मी नाटकात काम करते त्यातलं स्त्री पात्र तर या पुरूषसत्तेला खेचत प्रश्न विचारत मोडीत काढते-  बायकांसाठीच्या मुक्त अवकाशाच नवं शास्त्र लिहिण्याची भाषा महिला व्यक्त करतेआणि माणूस म्हणून व्यवस्थेतलं जे जे म्हणून शोषण करणारं कुजकट आहे ते ते टाकून देण्याची भाषा ठामपणे मांडणे हे मला आज जास्त महत्वाचं वाटतं .

मुक्ता म्हणते, कला संस्कृती क्षेत्रातील बहुसंख्य लोक राजकीय दबावाला बळी पडतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्या विषयी बोलायची वेळ येते तेव्हा बोटचेपी भूमिका घेतात. पण आपल्या कलाकारांनी चार्ली चापलीनचे आदर्श घ्यावेत .इतक्या महान कलाकाराने हिटलरच्या हुकुमशाहीवर टीका केली होती. पण आज, जाऊ दे मला काय करायचं आपले काम भले अशी मानसिकता कलाकारांची दिसते.  सिनेमातले हिरो जेव्हा गप्प बसतात तेव्हा समजून घ्यावं की ते खरे हिरो नाहीच. त्यांची मर्दूमकी फक्त त्या चित्रपट/ नाटकापूरतीच आहे. वाईटाला वाईट म्हणायला घाबरत असतील अन घाबरून सत्तेच्या सोईचं बोलत असतील तर अशांना आपण कधीच फार मान देऊ नये. कारण असे लोकं खूप मोठं नुकसान करत असतात. उलट सत्याच्या बाजूनं बोललं तर खूप मोठी आंतरिक ताकद आपल्याला मिळते म्हणून तरी बोललं पाहिजे.

हा समाज अधिकाधिक समंजस होण्यासाठी कलाकारांनी मोकळं बोललं पाहिजे.अन राजकारण म्हणजे काही वेगळा धंदा नाही की आपण त्यांच्याविषयी का बोलायचं असं म्हणून गप्प रहावं. तेच तर या देशाचे नियम बनवणारे असतील तर  त्यांच्याविषयी आपण सजग असलेच पाहिजे. मुक्ताला चुकलं तर चूक म्हणताना भीती वाटत नाही.  खास करून सत्तेतले आजचे लोकं जे स्वतःच घर भरून घेतात त्यांना तर बोललंच पाहिजे. तरच या देशाची लुट थांबेल. असे तिला वाटत. तिच्या अशा पोटतिडकीने व्यक्त होण्यामुळे तिला शेकडो भक्तांच्या ट्रोल धाडीला सामोरे जावे लागले.पण मुक्ता म्हणते, असे लोक डरपोक असतात.त्यांनी डोळे उघडे ठेवून सगळ बघावं.मात्र अनेक ट्रोलर्स नंतर तिचे फॅन झालेत.आपण जे बोलतोय ते या समाजाच्या हिताचं असेल, शोषणाविरूद्ध असेल, हा समाज अधिकाधिक समंजस अन समृद्ध होण्याविषयी असेल तर हळूहळू लोकांना पटायला लागतं,म्हणून मला बोलत रहायचं आहे आणि बोलतच रहाणार आहे! 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading