January 14, 2025
Rupali who is active in the fields of literature, education and journalism
Home » साहित्य, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात लीलया वावरणारी रुपाली
मुक्त संवाद

साहित्य, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात लीलया वावरणारी रुपाली

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ८
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज प्रा. रूपाली अवचरे यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

प्रा. रूपाली अवचरे

पत्रकार, प्राध्यापक, प्रकाशक, संपादक, कवयित्री, सूत्रसंचालक या सर्व भूमिका यशस्वीपणे न थकता पार पाडणारी प्रा. रूपाली अवचरे आज शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रात सर्वपरिचित असे व्यक्तिमत्व..!

प्रा. रूपाली सध्या प्राध्यापक म्हणून पुणे येथील एस. पी. कॉलेजमध्ये मराठी विषयाचे अध्यापन, यशोदीप पब्लिकेशन्सची प्रकाशक असून पत्रकार म्हणून सकाळमध्ये सन २०१२ पासून कार्यरत आहे. भूमिका दिवाळी अंकाची सन २०११ पासून व गेली ४ वर्षे धमालनगरी या बालदिवाळी अंकाचेही संपादन करीत आहे.

रूपालीला लहानपणापासून गाण्याची तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. आठवीत असल्यापासून तिला कविता सुचू लागली पण तेव्हा ती कविता आहे, हेही समजत नव्हते. तिचे बालपण भोरसारख्या ग्रामीण भागात गेलेले असल्याने भाषा ग्रामीण होती. पण नंतर तिने प्रयत्नपूर्वक भाषा सुधारली. आज तिला मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे ओळखले जाते, हे अभिमानास्पद आहे. दहावीनंतर तिने डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. २ वर्षे नोकरीही केली पण तिचा ओढा साहित्याकडे असल्याने ती तेथे रमली नाही.

लग्न झाल्यावर घर व मुलगी सांभाळत पुणे विद्यापीठातून बहिःस्थ पद्धतीने तिने बी.ए., एम.ए. व एम.फिल.ही केले. तिची आई व बहीण शिक्षिका असल्याने आपणही नेटचा अभ्यास करून प्राध्यापक व्हावे असे तिच्या मनात आले. त्याच काळात एस.एन.डी.टी. महाविद्यालयात सहायक संशोधक म्हणून तिला ३ वर्षांसाठी नोकरी मिळाली. नोकरी करतानाच ती नेट पास झाली. त्यानंतर पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून तिला १ वर्षाची नोकरी मिळाली. वरिष्ठ प्राध्यापक म्हणून तळेगाव ढमढेरे, चंदननगर, एस.पी. कॉलेजमध्ये तसेच टी.जे. कॉलेजमध्ये ६ वर्षे काम केले. सध्या एस.पी.कॅालेज पुणे येथे तासिका तत्वावर ती कार्यरत आहे. मराठी विषयातील अध्यापनाचा तिला १५ वर्षांचा अनुभव आहे.

हे सर्व करीत असताना पत्रकारितेतील बी.जे. ही पदवी तिने मिळवली. आकाशवाणीवर कॅज्युअल अनाउन्सर म्हणून निवड झाली पण प्राध्यापक म्हणून नोकरी करताना ते काम करणे जमणार नव्हते. दै. सकाळ या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने हे आव्हानात्मक काम तिने ते स्वीकारले. गेली १२ वर्षे वृत्तपत्रात काम करताना अनेक वेगवेगळे अनुभव आले.

वडील समाजसेवक असल्याने सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड होतीच. त्याच काळात शासनाचा मराठी शब्दकोश प्रकल्प सुरू होता. रूपालीचे शुद्धलेखन आधीपासून चांगले असल्याने त्यात सहसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने या प्रकल्पाच्या ५ खंडांमध्ये तिने काम केले आहे. बालभारती या शासनाच्या संस्थेमध्ये भाषा समितीत निमंत्रित म्हणून तिला बोलावले जाते तसेच शासनाच्या निरंतर शिक्षणधारा या त्रैमासिकाच्या संपादक मंडळात काम करण्याची संधी मिळाली पण प्राध्यापक म्हणून कायमस्वरूपी नोकरी कुठे मिळत नव्हती. त्यामुळे निराश होऊन तिने स्वतःचे प्रकाशन सुरू करण्याचे ठरविले. वेगळी वाट चोखाळत असताना चांगलं काम करण्याची ऊर्मी, घरच्यांनी दिलेला पाठिंबा आणि सहकार्‍यांचे मिळणारे सहकार्य यामुळे हे सारं शक्य झालं. कौटुंबिक, मानसिक, आर्थिक आधारासोबत पती निलेश अवचरे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि त्यांनी दाखवलेला विश्‍वास यामुळेच ती या क्षेत्रात आज विविध जबाबदार्‍या पार पाडू शकत आहे. भाऊ निखिल लंभाते याचे सहकार्याने आज पुण्यात प्रकाशन व्यवसायात जम बसू शकला. घरी सासूबाई आणि मुली ऐश्वर्या आणि मयूरी यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले त्यामुळेच सतत कार्यरत राहता येते असे ती नम्रपणे सांगते.

साहित्य क्षेत्रातील तिची कामगिरी पाहाता १९९३ पासून कविता, सूत्रसंचालन, कार्यक्रमांचे आयोजन अशा विविध माध्यमांतून ती कार्यरत आहे. प्रेरणा साहित्य कला प्रतिष्ठान, ऋतुगंध प्रतिष्ठान, रंगतसंगत प्रतिष्ठान, साहित्यप्रेमी भगिनी, आम्ही एकपात्री अशा संस्थांमधून ती सहभागी होते. सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रम करताना मिळणारे समाधान वेगळेच असते. ‘थोडे आसू थोडे हासू’ या तिच्या कार्यक्रमाचे ७० च्यावर कार्यक्रम झाले आहेत. तसेच २००९ पासून पुणे विद्यापीठाची बहिःशाल व्याख्याता म्हणून अनेक ठिकाणी ती जाते. आकाशवाणीवरून अनेकदा काव्यवाचन झाले असून ‘शांतिसंदेश- प्रजापिता सम्राट अशोक’ या ध्वनिमुद्रिकेत तिच्या एका गीताचा समावेश आहे. प्रभाताई सोनवणे व मीनलताई बाठे यांच्यासमवेत ‘सृजनरंग’ हा कार्यक्रम ती करते.

विश्रांतवाडी-येरवडा परिसरात इतर कवींच्या सहकार्याने साहित्यिक कार्यक्रम, साहित्यसंमेलन अनेक वेळा आयोजित केले. साहित्यिकांना एकत्र करून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा या भागात सुरू केली. सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या सहकार्याने पुणे मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने ‘लुंबिनी साहित्यिक कट्टा’ सुरू केला. यामुळे अनेक नवोदित कवींना, साहित्यिकांना या भागात व्यासपीठ मिळू शकले. सामाजिक कार्यासाठी यशोदीप सोशल फाउंडेशनची स्थापना केली. दहावी उत्तीर्णांचा सत्कार, आदर्श माता पुरस्कार असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

‘अल्पावधीत यशोदीप पब्लिकेशनने आजपर्यंत ४७५ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. आज अनेक कार्यक्रमात अध्यक्ष, निमंत्रित वा प्रमुख पाहुणे, व्याख्याता म्हणून बोलवतात. या सगळ्या गोष्टींचे समाधान शब्दातीत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक चांगली व्यक्ती म्हणून ओळख राहावी असा माझा प्रयत्न असतो.’ असे रूपाली म्हणते.

तिच्या साहित्यिक प्रवासाबाबत ती सांगते, ‘प्रतिभा ही प्रत्येकाला मिळालेली दैवी देणगी असते. जीवनातील अनुभवांना शब्दांत व्यक्त करत जाते. कारण शेवटी –
‘कविता म्हणजे नव्हेत नुसत्या शब्दांच्या ओळी
अंतरीच्या वेदनांची तिथे असते होळी’
त्यामुळे जगताना डोळस भान असेल आणि आपण आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लिहित राहिल्यास नक्कीच सकस निर्मिती होते, असे मला वाटते. सामाजिक अनुभवातून आलेले माझे लेखन सर्वांना आवडते, हे मला प्रेरक आहे. कवितेपेक्षाही कथा जास्त समाधान देऊन जातात असे वाटते.’ रूपालीच्या कविता, गझल व कथा आशयपूर्ण असतात. तिचे लेखन प्रवाही व सर्वांना आनंद देणारे असेच असते. तिचे आजवर दर्पण, वामन निंबाळकरांची कविताः स्वरूप आणि आकलन, स्पंदन(चारोळीसंग्रह) प्रकाशित असून मराठी कवितेतील सामाजिक अभंग, धनगर समाज : आधुनिक संदर्भ, अळीमिळी गुपचिळी (बालकवितासंग्रह), फुलबाग (बालकवितासंग्रह) याशिवाय अनेक पुस्तकांचे सहसंपादन केले आहे. तसेच अनेक संशोधनपर लेख विविध पुस्तके, मासिके व नियतकालिकांत समाविष्ट झाले आहेत.

अशा सर्व कार्याची दखल घेऊन बंधुता प्रतिष्ठान, शिवांजली प्रतिष्ठान, स्मिता पाटील समाजगौरव पुरस्कार, मराठवाडा विकास प्रतिष्ठान आणि वीर शैव समाज सेवा संघ यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार, धनगर प्रबोधन मंच, सोलापूर तर्फे आदर्श पत्रकारिता पुरस्कार, अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, पुणेतर्फे आदर्श माता कमल आई पुरस्कार, कै. इंदूताई बवरे कार्यगौरव पुरस्कार तसेच हुजुरपागा महाविद्यालयात यशस्वी उद्योजिका म्हणून सत्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे पुस्तकदिनाच्या निमित्ताने मुद्रितशोधक म्हणून विशेष सत्कार करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे मिळालेला मुद्रितशोधनासाठीचा पुरस्कार, तसेच वामन निंबाळकर यांच्यावरील पुस्तकाला मिळालेले महाराष्ट्र साहित्य परिषद, अ.भा. मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे मिळालेला लोकशाही अण्णा भाऊ साठे पुरस्कार हे मानाचे पुरस्कार प्राप्त होणे, म्हणजे आजवर घेतलेल्या तिच्या सर्व मेहनतीचे फलित आहे. १२-१२ तास काम करूनही तिला वेळ कमी पडतो.

रूपालीच्या कामाचा हा चढता आलेख पाहाता, ती सांगते, ‘काहीही अशक्य नाही आणि काम करणार्‍यासाठी Sky is limit असते. त्यामुळे अजूनही खूप काही करण्याची जिद्द मनात आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रातिनिधिक संग्रह, संशोधन करायचे आहे. पीएच.डी. पूर्ण करायची आहे. संपादनाच्या क्षेत्रात खूप काम करण्यासारखे आहे. त्यामुळे जमेल तोवर कार्यरत रहायचे आहे.’
मराठीची सेवा करणाऱ्या, साहित्य, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या, प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा ..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading