सागरी चित्रपट महोत्सव अर्थात ओशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2025 च्या आयोजनातून सागरी वारसा आणि पर्यावरणीय कथात्मक मांडणीचा सोहळा साजरा
मुंबई – इकोलफोक्सने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (National Film Development Corporation – NFDC) सहकार्याने आयोजित केलेल्या तिसऱ्या सागरी चित्रपट महोत्सव अर्थात ओशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2025 ची यशस्वी सांगता झाली. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या (मुंबई प्राणीसंग्रहालय) आवारात रविवार, दि. 6 एप्रिल 2025 रोजी या महोत्सवाचे आयोजन केले गेले होते.
हा महोत्सव म्हणजे भारताच्या सागरी वारशाचा आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी चित्रपटातील कथात्मक मांडणीच्या प्रभावात्मक क्षमतेचा सोहळाच होता. या महोत्सवाच्या आयोजन आणि चित्रपट निवडीत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली. या महोत्सवाअंतर्गत चित्तवेधक चित्रपटांचे खेळ, चर्चा आणि विलक्षण स्वरुपाच्या मास्टरक्लास यांसारखे उपक्रम राबवले गेले. या महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात इकोलफोक्सने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने, केरळच्या पारंपरिक खलाशी समुदायाचे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या खलासीज ऑफ मालाबार या हृदयस्पर्शी माहितीपटाचा खेळ दाखवला गेला. महामंडळाने खास आपल्या संग्रहातील चित्रपटांमधून उद्घाटनीय सिनेमा म्हणून या चित्रपटाची निवड केली होती. या उद्घाटनीय सिनेमाला प्रक्षेकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, या खेळासाठी प्रेक्षागृह खचाखच भरले होते, तब्बल 200 पेक्षा जास्त चित्रपट रसिकांनी हा खेळ पाहिला. या चित्रपटाच्या खेळातून भारताच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणाशी घट्टपणे जोडलेल्या विषयांवरच्या भारतीय चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करण्याचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे प्रयत्न ठळकपणे अधोरेखित झाले.
आपल्या चित्रपटांतील धाडसी आणि प्रभावी कथात्मक मांडणीसाठी नावाजलेल्या आणि समुद्रासोबतच्या आपल्या गहिऱ्या नात्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शिका, कलाकार आणि डिझायनर धान्या पिलो यांचा मास्टरक्लास या महोत्सवाचे सर्वात खास आकर्षण ठरले. धान्या पिलो या स्वतः एक अनुभवी खलाशी आहेत, त्या 2023-24 मध्ये झालेल्या महिलांच्या जागतिक महासागरीय स्पर्धेत अर्थात ओशन ग्लोब रेस मध्ये सहभागी झालेल्या पहिल्या संघाच्या सदस्यही होत्या. आपल्या मास्टरक्लासमधील संवादाच्या दरम्यान धान्या पिलो यांनी चित्रपट दिग्दर्शन, साहस आणि वकिली अर्थात अॅडव्होकसी असे विविध टप्पे पार केलेल्या आपल्या वाटचालीचे अनुभव उपस्थितांसोबत सामायिक केले. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या मास्टरक्लासला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. महत्वाचे म्हणजे इकोलफोक्ससोबतच्या सहकार्याअंतर्गत महामंडळाने आयोजित केलेला हा मास्टरक्लास, महामंडळाच्या स्वतःच्या आवाराबाहेर सार्वजनिक ठिकाणी आयोजित होणारा ज्ञानवर्धक उपक्रम ठरला आहे.
या महोत्सवाला अनेक प्रतिष्ठित आणि दिग्गज व्यक्तिमत्वे उपस्थित होती. इकोलफोक्सचे महोत्सव संचालक आणि संस्थापक परेश पिंपळे; ॲक्वा सेलिंगच्या संस्थापिका झिया हाजीभॉय, जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आणि सागरी संवर्धनासाठी काम करणारे प्रल्हाद कक्कर तसेच महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग आणि प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाचे वरिष्ठ प्रतिनिधी असे असंख्य प्रतिष्ठित मान्यवर या महोत्सवासाठी उपस्थित होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राअंर्गतही चित्रपटाचा खेळ आणि निमंत्रितांसोबतच्या चर्चा सत्रांसारखे उपक्रम आयोजित केले होते. या उपक्रमांनी या महोत्सवाला गहिरा अर्थ मिळवून दिला. त्यानंतर महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या सहभागींकरता गेटवे ऑफ इंडिया इथून अविस्मरणीय सागरी सफारीचेही आयोजन केले होते. या सागरी सफारीच्या प्रत्यक्ष अनुभवाने सहभागींच्या मनावर “समुद्र म्हणजे काही उपभोगण्यासाठीचे एक प्रचंड संसाधन नाही, तर समुद्र म्हणजे आपण जतन करायला हवे असे अखेरचे संसाधन आहे.” हा महोत्सवाने दिलेला संदेश ठाशीवपणे कोरला.
सागरी चित्रपट महोत्सव अर्थात ओशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2025 च्या यशस्वी आयोजनातून भारताच्या सागरी परंपरांचा सोहळा तर साजरा झालाच, पण त्याच बरोबरीने या महोत्सवाने चित्रपट हे पर्यावरणीय संरक्षणाच्या प्रक्रियेतले एक प्रभावी माध्यम असल्याची बाबही ठळकपणे अधोरेखित केली. माध्यम जगतानेही या महोत्सवाची मोठी दखल घेतली. त्याचबरोबरीने यंदाच्या आयोजनताून या महोत्सवाच्या वाढत्या लोकप्रियतेचीही प्रचिती आली. या प्रतिसादातून या महोत्सवाने कथात्मक मांडणी आणि शाश्वततेचे परस्परांसोबत असलेले महत्त्वाचे नातेही अधोरेखित केले.
या महोत्सवाचे आयोजन म्हणजे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्यपूर्ण भागीदारीअंतर्गतचा एक प्रभावशाली उपक्रम ठरला. या सहकार्यपूर्ण आयोजनातून महामंडळाने अर्थपूर्ण सिनेमांना पाठबळ देण्याची आपली भूमिका अधिक दृढ केली आहे, कथात्मक मांडणी आणि अॅडव्होकसीसोबत तसेच सर्जनशीलतेचा संवर्धनासोबत एक दुवा साधला आहे. या महोत्सवाचे आयोजन म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सक्षम मार्गदर्शन आणि पाठबळाच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण संकल्पनांअंतर्गतचे आयोजन आणि सहकार्यपूर्ण भागिदारीतील व्यासपीठांच्या माध्यमातून मोठ्या प्रेक्षकवर्गाला आकर्षित करण्याच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या दृष्टीकोनाचीच साक्ष ठरला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.