शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती हा हवामान अनुकूलतेचा सर्वांगीण दृष्टिकोन मानला जातो. माती, पाणी, ऊर्जा, जैवविविधता, कार्बन उर्त्सजन कमी करणे यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.
प्रा. डॉ. एम. एस. देशमुख
प्राध्यापक व विभागप्रमुख अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
डॉ नितीन बाबर,
सेंद्रीय शेती अभ्यासक सांगोला.
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि संसाधनांचा कमी होत असलेला पुरवठा लक्षात घेता अन्नसुरक्षा आणि अन्नसुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे होतेय., म्हणूनच उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. उत्पादन उपभोग वितरण याबरोबरच पर्यावरणीय शाश्वतता आणि पौष्टीक अन्न उपलब्ध करणे किंवा पर्यावरणीय परीस्थितीचा समतोल, राखणे या अनूषंगाने सेंद्रिय शेतीचे महत्व अधिका अधिक अधोरेखित होतेय.
सेंद्रीय अन्नपदार्थाचा वाढता जागतिक उपभोग :
सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. या अंतर्गत विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेतली जात आहेत. आफओएएमच्या उपलब्ध २०२४च्या अहवालानुसार जगभरातील सुमारे १९० देशांमध्ये सेंद्रिय शेती केली जाते आणि जवळजवळ ९९ दशलक्ष हेक्टर शेती जमीनीवर सुमारे ४.५ दशलक्ष शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र असुन त्यानंतर भारत आणि अर्जेंटिनाचा क्रम असल्याचे दिसते. सन २०२४ मध्ये सेंद्रिय अन्न आणि पेय पदार्थांची जागतिक विक्री १४२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, जर्मनी चीन, या सेंद्रीय अन्नपदार्थांच्या सर्वाधिक मोठ्या बाजारपेठा आहेत. अर्थात जगभरातच आरोग्य जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांची सेंद्रीय अन्नपदार्थाची मागणी वाढते आहे.
भारताचे जागतिक बाजारपेठेतील वर्चस्व :
भारतातीय शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता वाढत आहे. देशातील सेंद्रिय शेती क्षेत्र २०१५ ते २०२४ या काळात ४.७२ ते १०.१ ७ दशलक्ष हेक्टर वाढले आहे. जो देशाच्या एकूण शेती क्षेत्राच्या २.६ टक्के आहे. त्याचप्रमाणे, उत्पादन ३.६ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे. तर निर्यात २.६१ लाख मेट्रीक टन झाली आहे. भारत हा तेलबिया, ऊस, डाळी, बाजरी, तृणधान्य, कापूस, औषधी वनस्पती, चहा, कॉफी, फळे-भाज्या, मसाले, ड्राय फ्रुट यासारख्या सेंद्रिय उत्पादनांचा प्रमुख उत्पादक आहे. भारत मोठ्या प्रमाणात या वस्तूंचे उत्पादन करतो आणि त्यांची निर्यातही करतो. सेंद्रिय शेतीमध्ये सिक्कीम, उत्तराखंड, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र ही आघाडीची राज्ये आहेत. याव्यतिरिक्त डोंगराळ, आदिवासी आणि पावसावर अवलंबून असलेल्या प्रदेशांत पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. ही बाब जमेची आहे.
शासणाकडूनही सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), ईशान्य क्षेत्रासाठी मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आदी महत्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर दहा हजार जैव-इनपुट संसाधन केंद्रे स्थापन करणे.,. प्रमाणीकरण आणि ब्रँडिंगद्वारे समर्थित, पुढील दोन वर्षांत नैसर्गिक शेतीमध्ये १० दशलक्ष शेतकऱ्यांचा समावेशासह, पुढील वर्षात सेंद्रिय उत्पादनांची निर्यात दुप्पट करून १ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे आणि जागतिक सेंद्रिय निर्यातीला चालना देण्याचे अभिप्रेत आहे. अर्थातच जगात भारत सेंद्रीय शेतीखालील क्षेत्रात दुसरा तर उत्पादकांच्या बाबतीत पहिल्या स्थांनी आहे. म्हणूनच, शाश्वत विकास सुनिश्चित करून भारतासारख्या राष्ट्राला सेंद्रीय बाजारपेठेत वर्चस्व निर्मान करण्याची संधी निश्चितपणे असणार आहे.
सेंद्रीय की रासायनिक ?
आज रोजी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती हा हवामान अनुकूलतेचा सर्वांगीण दृष्टिकोन मानला जातो. माती, पाणी, ऊर्जा, जैवविविधता, कार्बन उर्त्सजन कमी करणे आणि हवामान बदलाशी जुळवून घेणे यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य आणि पर्यावरणीय सेवांचा एकत्रित खर्च विचारात घेतला तर ही शेती प्रणाली अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर ठरते. किंबहुना हेच निरीक्षण वेगवेगळ्या अभ्यासातून दिसुन आले आहे. सेंटर ऑफ सायन्स अॅड इन्व्हायरमेंट (CSE )चा अहवाल देखील देशातील सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचे होलिस्टिक फायद्यांचे पुरावे सादर करतो. रासायनिक किंवा अजैविक शेतीपेक्षा सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचे अनेक सर्वांगीण फायदे असल्याचे निरीक्षण नोंदवितो.
तथापि सेंद्रीय शेतीचे क्षेत्र आणि एकंदर पायाभूत सुविधा अभाव, अपुरी अर्थसंकल्पिय तरतुद, दर्जेदार निविष्ठांची अपुरी उपलब्धता आणि सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचे श्रम-केंद्रित , वेळखाऊ स्वरूप, संक्रमणातील आव्हानांमुळे प्रगती मंद आहे. देशभरातील वेगवेगळ्या भू-स्तरीय प्रदेशामध्ये शिफारस केलेल्या पद्धतींच्या पॅकेजची अप्रभावीता आणि शेतकऱ्यांना पुरेशा तांत्रिक माहिती अभावी सेंद्रिय आणि जैव-निविष्ठा तयार करणे कठीण जातेय. याखेरीज सेंद्रीय बी- बियाणे, जैवनाशक कीटकनाशके आणि प्रशिक्षण यासारख्या साधनांची अल्प उपलब्धता वाढती निविष्ठा (इनपुट ) खर्च , पुरवठा साखळीतील अनियमितता,आणि सेंद्रिय उत्पादनाना देशांतर्गत बाजारपेठेतील अल्प प्रतिसाद आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्पर्धा ही भारतातील सेंद्रिय शेतीसमोरील मोठी आव्हाने आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय आणि रासायनिक शेती उत्पादनांना वाजवी आणि फायदेशीर किमती मिळविण्यासाठी बाजाराशी संबंधित आव्हाने आहेत. सेंद्रिय शेतीला बरे दिवस यायचे असतील तर ग्राहकांचीही या मालासाठी अधिक पैसे मोजायची मानसिकता असायला हवी. पण बहुतांश लोकांना शेतमाल स्वस्तच हवा असतो., ग्राहकांची ही मानसिकता कशी बदलायची, याचाही विचार गांर्भियाने व्हायला हवा.
निरोगी विकसित भारताकडे :
देशाला लाभलेल्या वैविध्यपूर्ण कृषी हवामानामुळे व पीक विविधतेमुळे शेतीची उपजत परंपरा असुन या क्षेत्रात फार मोठी संधी आहे. विकसित भारत -२०४७ हा दृष्टीकोन आर्थिक समृद्धी, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि प्रभावी शासन यासारख्या सर्वांगीन विकासाच्या महत्त्वाकांक्षी निकषावर भर देतो. विशेषता कोविडनंतर जगभरातच आरोग्य जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांची सेंद्रीय पौष्टिक अन्नाची वाढती मागणी, सरकारचे धोरणात्मक पाठबळ आणि कुत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (AI ) उपयोजित नवतंत्राच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला आशादायक भवितव्य दिसते. किंबहुना सेंद्रिय शेती भारताच्या शेतीतील छुपा खर्च कमी करून एकूण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सामाजिक कल्याण वृध्दीगत करणारी ठरेल. सेंद्रीय आणि पर्यावरणस्नेही शेती असा बदल अन्न सुरक्षा, ग्रामीण विकासासह पर्यावरणीय समतोलाच्या रूपात लाभांश देईल. याखेरीज बदलते हवामान विचारात घेता जमिन, हवा, आणि पाणी या जैविक संसाधनाचे प्रदूषण टाळून अपारंपारिक उर्जा साधने, जैविक संसाधनांचा पर्याप्त वापर आणि पर्यावरस्नेही शाश्वत शेती पध्दतीचा अंगिकार करणे., समग्र कृषी व्यवस्थेसाठी हितावह ठरेल. ज्यायोगे देशातील ग्राहकांचे, पर्यावरणाचे किंबहुना अखंड कृषी उपजीवीकेचे आरोग्य सुस्थितीत राहून भविष्यात, पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या निरोगी विकसित भारत निर्मितीचा मार्ग सुकर होईल !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.