April 16, 2024
Lakhansingh Katre movement of Zhadiboli Marathi Language
Home » झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती
मुक्त संवाद

झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती

आमची झाडीबोली साहित्य चळवळ ही प्रमाण मराठीला सवतासुभा म्हणून कार्यान्वित नसून आमची ही चळवळ प्रमाण मराठीला अमृतसिंचन करून तिला अमरत्व प्रदान करणारी चळवळ आहे. मराठीला मुमुर्षू भाषा संबोधणारे काही स्वनामधन्य शतकवीर, दशकवीर, वर्षवीर कधीच खरे ठरू शकणार नाहीत, यासाठी आमचा हा सकारात्मक व सक्रीय सहभागी-प्रयत्न आहे.

ॲड.लखनसिंह कटरे

बोरकन्हार, जि.गोंदिया

मी अगदी 1975 पासून झाडीबोली आणि झाडीसंस्कृतीचा पाठीराखा व पुरस्कर्ता असलो तरी मी या भागातील ग्रामीण बोलीला झाडीबोली असे नाव दिले नव्हते. मला अशी कल्पना सुद्धा सुचली नाही. 1968 पासून ‘ललित’ मासिकाचा वर्गणीदार-वाचक असल्याने त्यातूनच कधीतरी आनंद यादव यांच्या ‘गोतावळा’ बद्दल कळले आणि माझा सखा मिळाला असेच वाटले. आमच्या विद्यालयाच्या तुटपुंज्या वाचनालयातून ‘गोतावळा’ आणून वाचून काढली. तेव्हा कुठे “आमचे आपले साहित्य” वाचल्याचे समाधान झाले. त्यापूर्वी ‘माणूस मोठा जिद्दीचा’ ही एकमेव कादंबरी वाचली होती, आणि तिच्यातील कथानक, वर्णनादि वाचून आपण एखादी परीकथाच वाचतोय असे वाटले होते. त्या कथानक व वर्णनाशी मी समरस होऊ शकलो नव्हतो.

याच दरम्यान 1972 च्या माझ्या माजी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे पाहूणे म्हणून आलेल्या गो.नी. दांडेकर यांचे ओघवते व मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान ऐकता आले. त्यानंतर गोनीदा यांच्या कितीतरी कादंबऱ्या वाचून काढल्या. सुरुवातीची काही बोजड वाटणारी पृष्ठे वाचून झाल्यावर नंतरची पृष्ठे (कथानक, वर्णन) अगदी जादूचेच काम करायची. एका दिवसात कादंबरी वाचून काढण्याची किमया मला त्यामुळेच साधू लागली. अशातच ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या काही कादंबऱ्या वाचण्यात आल्या. त्यातील गोंदिया, दवनीवाडा या आमच्या झाडीपट्टीतील गावांचा ओझरता उल्लेख वाचून अक्षरशः रोमांचित व्हायला झाले. आणि अखेर आनंद यादव, गोनीदा आणि ग. त्र्यं. माडखोलकर या त्रयींच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुकरणातूनच कदाचित मी माझ्या ओबडधोबड मराठी लिखाणात झाडीपट्टीची संस्कृती व या भागातील ग्रामीण बोलीची, विरळ का असेना, पेरणी करू लागलो. पण तत्कालीन तथाकथित “साहित्यसम्राटां”ना माझे असे लिखाण कच्चे, ओढाताणीचे, अप्रस्तुत, गावठी, ….वगैरे वाटू लागले. साभार परत करताना असे शेरे पत्रात उमटू लागले. पण मी निराश न होता आपला “हा हेका” सोडला नाही.

अशातच सुमारे 1980 दरम्यान ‘ललित’ मासिकात चकवा या शब्दाबद्दल अनभिज्ञता प्रकट करणारी काही तथाकथित साहित्यसम्राटांची विधाने वाचून मी त्यावर एक छोटेसे टिपण लिहून ‘ललित’कडे पाठवले. आदरणीय केशवराव कोठावळे या खऱ्याखुऱ्या पारखी व्यक्तीने माझे ते ओबडधोबड टिपण ‘ललित’ च्या ‘गंभीर आणि गंमतीदार’ या सदरातून प्रकाशित केले. त्यामुळे प्रोत्साहीत होऊन मी माझ्या वनमॅन आर्मी पद्धतीने आमच्या झाडीपट्टीतील ग्रामीण बोलीचा व येथील सांस्कृतिक सापेक्षतेचा जमून व जमेल तसा पुरस्कार करू लागलो. त्यामुळे माझे लिखाण वारंवार असंबद्ध शे-यांसहीत साभार परत येऊ लागले. तरी मी माझ्या प्रयासाला ऋणत्व येऊ न देता माझे प्रयत्न सुरूच ठेवले.

माझ्या शासकीय नोकरी निमित्ताने मी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 1990 मध्ये तालुका सहकार निबंधक म्हणून बदलून आलो असता याच तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) या गावातील रहिवासी व कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाधिकारी असलेले हरिश्चंद्र बोरकर यांची ओळख व भेट झाली. आणि कळले की, मी जिल्हा ग्रामीण बोली म्हणतो तिचे यथायोग्य नामकरण झाडीबोली असे झाले असून हे महत्त्वाचे कार्य हरिश्चंद्र बोरकर यांचेच आहे. शिवाय त्यांनी झाडीबोलीची एक छोटीशी साहित्य चळवळ सुद्धा आरंभली आहे. अर्थातच 1991 मध्ये मी माझी याविषयीची वनमॅन आर्मी विसर्जित करून स्वतःला हरिश्चंद्र बोरकर यांच्या झाडीबोली साहित्य चळवळीशी जोडून घेतले/वाहून घेतले. आणि या चळवळीद्वारे आयोजित आजवरच्या सत्तावीस वार्षिक साहित्य संमेलनांपैकी सुमारे पाच-सहा आयोजनात माझी सर्वार्थाने प्रमुख भूमिका मला निभावता आली. अर्थातच माझी ही भूमिका सार्वजनिक सहकार्याने घटित झालेली आहे.

आमच्या झाडीपट्टीचा इतिहास, संस्कृतिविचार, समाजविज्ञान, मानसविज्ञान, जीवनपद्धती, निसर्ग, … आदि घटकांची विशेषता जाणून घेणे सुद्धा कोणत्याही सुविद्य मराठी साहित्यिकांना, एक मराठी साहित्यिक म्हणून, अत्यावश्यक ठरते; त्याशिवाय त्यांना आमची अभिव्यक्ती “परकी” वाटण्याचीच शक्यता अधिक. परंतु अशाप्रकारे “जाणून” घेण्यासाठी कोणतेही, कसेही क्षुल्लक सुद्धा प्रयास न करता जेव्हा या भागातील अभिव्यक्तीकारांची अभिव्यक्ती अन्य भागाच्या अभिव्यक्तीव्यवहारात बळजबरीने कोंबण्यासाठी रानटी व खुनशी असे आकसलक्ष्यी (काही छुपे, काही प्रकट) प्रयत्न केले जातात, तेव्हा आम्हा भवभूतिच्या साहित्य-वंशजांना “अशा” तथाकथित नावाजलेल्या, प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, प्रकाशक, संपादकांच्या कोतेपणाची कीव करावीशी वाटते.

वस्तूतः सुप्रसिद्ध व मराठीतही मान्य केला गेलेला भाषावैज्ञानिक सोस्यूर (Saussure) द्वारे पुरस्कृत/प्रणित भाषिक व्यवस्था आणि भाषाव्यवहार या संज्ञांच्या प्रकाशात झाडीपट्टीतील संबंधित बाबी (अभिव्यक्तीच्या पूर्ण पद्धती व प्रकार/तऱ्हा) तपासल्या तर मराठीतील बहुतेक तथाकथित साहित्यमार्तण्ड, समीक्षामार्तण्ड, संपादनमार्तण्ड अगदी नंगधडंग होऊन जातील, असे माझे आकलन आहे.

आम्ही झाडीपट्टीतील अभिव्यक्तीकार वारंवार सांगत आलोय की, आमची झाडीबोली साहित्य चळवळ ही प्रमाण मराठीला सवतासुभा म्हणून कार्यान्वित नसून आमची ही चळवळ प्रमाण मराठीला अमृतसिंचन करून तिला अमरत्व प्रदान करणारी चळवळ आहे. मराठीला मुमुर्षू भाषा संबोधणारे काही स्वनामधन्य शतकवीर, दशकवीर, वर्षवीर कधीच खरे ठरू शकणार नाहीत, यासाठी आमचा हा सकारात्मक व सक्रीय सहभागी-प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही विचलित न होता आपले मराठी-भाषा-तगवण्याचे व तिला नवनवीन फुटवे फुटण्यासाठी नानाविध अभिव्यक्ती प्रकटीकरणाचे कार्य अविरत करत राहणार. “मुर्खाणां उपदेशोहि कोपाय न शांतये” या संस्कृत सुभाषिताचे अनुसरण करून आम्ही “काहीं”कडे दुर्लक्ष करून आमची ही चळवळ अव्याहत सुरूच ठेवणार आहोत. आणि ही चळवळ सतत कार्यान्वित राहील असेच आमचे प्रयत्न आहेत व यापुढेही राहतील.

Related posts

सुपारीची फुले…

करटोली (ओळख औषधी वनस्पतीची)

दीर्घकालीन कमी उत्सर्जन विकास धोरण यूएनएफसीसीसीमध्ये भारताकडून सादर

1 comment

Bandopant Bodhekar February 10, 2022 at 6:26 AM

खूप छान लेख….कटरे सर यांना धन्यवाद

Reply

Leave a Comment