July 1, 2025
Cover or conceptual image of the Marathi autobiography "Gatsmrutichi Gajabaj" by Rashtrapal Sawant showing vivid rural memories
Home » गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेलं गतस्मृतींची गजबज
मुक्त संवाद

गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेलं गतस्मृतींची गजबज

तर असं हे मनाच्या कणगीत लिपान लावून ठेवलेलं आठवणींचं शब्दरुपी धान्य लेखकानं कोरोना महामारीत गमावलेल्या जीवांना समर्पित केलं आहे. सुखदुःखांशी समरस होत गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेल्या ‘गतस्मृतींची गजबज’ या मुलखावेगळ्या धाटणीच्या आत्मकथनपर कादंबरीचं वाचन प्रत्येक वाचकानं करावं, मनात साठवावं असंच आहे.

रवींद्र शिवाजी गुरव,
९८२२२५४०४७.


‘गतस्मृतींची गजबज’ हे आत्मकथन ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य राष्ट्रपाल भा. सावंत या कलंदर वाटसरूच्या लेखणीतून साकारलं आहे ते आठवणींचे तुकडे साठवतच. संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी आत्मकथनाची रूढ अशी मळलेली चाकोरी मोडत चाकोरी बाहेर जाऊन दमदार स्वरूपात प्रकाशित केलेली ही गजबज वाचकाच्या मनात घर करणारी आहे. भोळ्याभाबड्या स्वभावातून प्रांजळपणे हे सारं कथन त्यांनी केलं आहे. त्याला लेखणीची साक्ष लाभली आहे. अक्करमाशीकार शरणकुमार लिंबाळे या ज्येष्ठ साहित्यिकांची दमदार प्रस्तावना लाभलेला २०८ पृष्ठांमधील चार पिढ्यांच्या आठवणींचा हा ऐवज आहे.

माझा आडवाटेचा गावमधून गावपण जपत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळमुंडी या त्यांच्या गावापासून सुरू झालेला हा प्रवास लहानपणापासूनच्या जीवनातील आठवणी कवटाळत सत्वपरीक्षा पाहणाऱ्या कोरोना महामारी पर्यंत येऊन ठेपतो तो व्हाया गुराखी ते डॉक्टर, येडा गोविंद, बाप कंपाऊंडर मुलगा डॉक्टर, अडीच रुपयांच्या पुस्तकांसाठी, आगोटा, कामगत, खलाटा, हरकाचा भात आणि बरीचशी आठवणींची शिदोरी बारीक सारीक प्रसंगांमधून पुस्तकात सांडत, जीवापाड लाडक्या सफारीत काखेची शबनम सांभाळत आणि लोटिस्मा वाचनालयाचा सहवास गंध दशदिशी दरवळतच…..

सुनील मांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेलं लेखकाची लेखन मग्न छबी घेऊन मिरवणारं मुखपृष्ठ बोलकं आहे. भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांचा मलपृष्ठावरील ब्लर्ब या जीवन चरित्राचा सार सांगणारा आहे. कृषिभूषण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ कवी ज. वि.पवार, अपरांत साहित्यकला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर, इतिहास संशोधक आणि अभ्यासक प्रकाश देशपांडे या मान्यवरांचे समाविष्ट झालेले दीर्घ अभिप्राय या आत्मकथनाची खोली वाढवणारे आहेत.
तर असं हे मनाच्या कणगीत लिपान लावून ठेवलेलं आठवणींचं शब्दरुपी धान्य लेखकानं कोरोना महामारीत गमावलेल्या जीवांना समर्पित केलं आहे. सुखदुःखांशी समरस होत गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेल्या ‘गतस्मृतींची गजबज’ या मुलखावेगळ्या धाटणीच्या आत्मकथनपर कादंबरीचं वाचन प्रत्येक वाचकानं करावं, मनात साठवावं असंच आहे.

अंतर्बाह्य निर्मळ असणाऱ्या माणसाचे हे आत्मकथन आहे. अनेकविध वैयक्तिक, सामाजिक आणि काळाचे संदर्भ घेऊन हे कथन पुढे सरकत राहाते. आठवणींच्या अनेक रूपखूणा वाचकाला भुरळ घालून वाचकाच्या हृदयाशी संवाद साधतात. या आठवणींचा हेतू शुद्ध सात्त्विक आहे. म्हणूनच वाचकांशी निखळ संवाद साधण्यापलीकडे कोणताही वावगा हेतू न ठेवता गुजगोष्टी करण्याची किमया या आठवणी करतात. लेखकाच्या गप्पीष्ट स्वभावामुळे त्या त्या प्रसंगाच्या परिघातला भवताल वाचकांसमोर सजीव होऊन आठवणींची ही गजबज चित्रदर्शी होते. गावागावातल्या म्हणी, वाक्प्रचार, लोकबोलीतले शब्द, चालीरिती, रुढी-परंपरा, लोकरहाटी यांचे प्रभावी दर्शन या कथनातून होते. टिपकागदाच्या निष्ठेने लेखकाने अनेक गोष्टींची नोंद सजगपणे केली आहे. केवळ स्मृतीवर विसंबून प्रभावी आत्मकथन करता येत नाही, त्यासाठी समरसून जगावे लागते. अन्यथा आठवणींचे ठिपके जोडून त्याची रांगोळी सजवता येत नाही.

पुरोगामी, विवेकी, बुद्धीवादी, सर्वधर्मसमभावी वृत्तीने जगणाऱ्या प्रत्येकाच्या नशिबी ‘ना घरका, ना घाटका' अशी अवस्था येते. बाबासाहेबांच्या विचार वाटेवर चालणाऱ्या लेखकाच्या वाट्यालाही असे विचलीत करणारे अनेक आघात आले. चरित्र नायकाच्या संयमी, सोशिक स्वभाववृत्तीचे अनेक पैलूं या आठवणीरमधून दृगोचर होतात.

मराठीमधील बहुसंख्य आत्मकथनात्मक लिखाण चरित्रनायकाच्या स्वभाववृत्तीचे नेमके आणि सम्यक दर्शन घडवण्यात तोकडे पडते. मात्र राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज' या पैवर अधिक सरस ठरते.

अरुण इंगवले,

कवी, भाषा अभ्यासक

पुस्तकाचे नाव- गतस्मृतींची गजबज(आत्मचरित्र)
लेखक – राष्ट्रपाल भा. सावंत.
प्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे.
मूल्य- ३२०₹.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading