October 18, 2024
Shivsena Verses Shivsena article by Sukrut Khandekar
Home » Privacy Policy » शिवसेना विरुद्ध शिवसेना
सत्ता संघर्ष

शिवसेना विरुद्ध शिवसेना

येत्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीला उधाण येणार हे निश्चित. कारण कोणी पुढील पाच वर्षे थांबायला तयार नाही. महत्त्वाचे म्हणजे पक्षाचे निवडून येणारे आमदारही नंतर सत्तेसाठी उद्या कोणाबरोबर जातील याची शाश्वती नाही. पक्ष फुटीनंतर कोणी कोर्टात गेले तरी कधी निकाल लागेल हे कोणी सांगू शकणार नाही. चला जय श्रीराम…

डॉ. सुकृत खांडेकर,
sukritforyou@gmail.com

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी साडेपाच दशकांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाची एकजूट व्हावी, मराठी माणसाचा आवाज बुलंद व्हावा आणि मुंबई व महाराष्ट्रावर मराठी माणसांचे वर्चस्व असावे या हेतूने त्यांनी शिवसेना स्थापन केली. दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचे होणारे भाषण मराठी माणसांना विचारांची मेजवानी असायची. त्यांच्या भाषणातून मराठी माणसाला नवीन ऊर्जा मिळायची, संघर्षासाठी नवीन दिशा मिळायची.

शिवसेनाप्रमुखांचा शब्द म्हणजे लाखो शिवसैनिकांना तो आदेश असायचा. बहुरंगी मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानने उभे केले ते शिवसेना प्रमुखांनीच. शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांचे दैवत होते, त्यांनी आयुष्यभर स्वत:साठी काही मागितले नाही, कोणत्याही सरकारी पदाचा स्वीकार केला नाही. त्यांनी मनोहर जोशी, नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. राज्यात व केंद्रात दोन-तीन डझन शिवसैनिकांना मंत्री केले. चार-पाच डझन शिवसैनिकांना सत्तेच्या परिघात अधिकाराची पदे दिली. राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री होणे हे त्यांना मुळीच कठीण नव्हते. पण त्यांनी सत्तेच्या खुर्चीला कधी स्पर्शही केला नाही.

महाराष्ट्रात मराठी व देशात हिंदू हा त्यांचा मंत्र होता. दरवर्षी विजयादशमीला विचारांचे सोने लुटायला लाखो शिवसैनिक मुंबईत शिवतीर्थावर येत असत. वाजत-गाजत, गुलाल उधळत पण शिस्तीने यायचे यावर त्यांचा कटाक्ष असायचा. शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत झालेले दसरा मेळावे आता फक्त आठवणी उरल्या आहेत. त्यांची विजेप्रमाणे कडाडणारी भाषणे व राज्यकर्त्यांना दिले जाणारे इशारे सरकारला कापरे भरवत असत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित एवढाच त्यांचा अजेंडा होता.

शिवसेनेतून अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले. राज ठाकरेंपासून गणेश नाईक, छगन भुजबळांपर्यंत अनेक जण बाहेर पडले. कोणी दुसऱ्या पक्षात गेले तर राज यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. पण शिवसेनाप्रमुखांची शिवसेना कधी संपली नाही. शिवसेना आणि शिवसेना ब असे कधी घडले नव्हते. नारायण राणे भाजपमध्ये आहेत, मोदी-शहांनी त्यांना केंद्रीच मंत्रीपद देऊन सन्मान केला. त्यांनीही कोकणात प्रथमच कमळ फुलवून चमत्कार घडवला. ते भाजपचे खासदार आहेत पण त्यांचे आजही दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्यांचे संस्कार आपल्यावर आहेत हे आजही ते अभिमानाने सांगत असतात.

महाआघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले. एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात मौल्यवान असे नगर विकासखाते होते. पण त्यांना स्वातंत्र्य नव्हते. नगरविकास खाते व महापालिकांचा कारभार ठाकरे पिता- पुत्र व त्यांचा परिवारच बघत होता, अशी उघड चर्चा होत असे. ठाकरेंनी केलेली काँग्रेसशी जवळीक आणि सरकारमध्ये असून अधिकार नाहीत, अशी शिंदे यांची दुहेरी कोंडी होत होती.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि विधिमंडळ पक्षातच मोठी फूट पडली. पक्षाचे चाळीस आणि समर्थक दहा असे पन्नास आमदार, डझनभर खासदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली उद्धव यांची साथ सोडून भाजपबरोबर गेले. निवडणूक आयोगानेही आमदार-खासदारांच्या संख्येच्या आधारावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी ठरवली. पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह आयोगाने शिंदे यांना बहाल केले. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने पक्ष चालवायला अनुमती दिली व निवडणूक चिन्ह मशाल देण्यात आले. शिंदे गटाने पक्ष चोरला – वडील चोरले म्हणून ठाकरे यांनी क्रोध प्रकट केला.

शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून हटविण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. त्याची किंमत भाजपने त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. शिवसेनेची सत्ता गेली, ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले. भाजपच्या आशीर्वादाने पुन्हा शिवसेनेची सत्ता आली व शिंदे मुख्यमंत्री झाले. ठाकरेंची शिवसेना खच्ची करणे, हा भाजपचा राजकीय अजेंडा होता, तो शिंदे यांच्या बंडाने साध्य झाला. येत्या विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना, ठाकरे विरुद्ध शिंदे, मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुखांचा पुत्र विरुद्ध शिवसैनिकांचा कडवट शिवसैनिक असा इरेला पेटलेला संघर्ष बघायला मिळणार आहे.

विधानसभा निवडणूक म्हणजे ठाकरे व शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे. शिवसैनिक आणि मतदार कोणाच्या पाठीशी आहे याचा कौल या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यापासून शिवसेना या बॅनरखाली दरवर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवतीर्थावर कोणी मेळावा घ्यायचा हा पहिल्या वर्षी वाद जरूर झाला. कोर्टातही प्रकरण गेले होते. ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावर व शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा बीकेसीवर झाला.

गेल्या वर्षीपासून ठाकरेंचा दसरा मेळावा दादरला शिवतीर्थावर व शिंदेंच्या शिवसेनेचा आझाद मैदानावर होतो आहे. इकडे ठाकरे व तिकडे शिंदे. दोन्हीकडे भगवे झेंडे फडकत असतात. इकडे मशाल, तर तिकडे धनुष्यबाण दिसतो. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून वाढलेले नेते दोन्ही मेळाव्यांतून मंचावर दिसतात. दोन्हीकडे जय भवानी – जय शिवाजी, आवाज कुणाचा, शिवसेनेचा… अशा घोषणा ऐकू येतात. दोन्हीकडे रणशिंगे फुंकली जातात. पाऊस – चिखल आणि तीच तीच भाषणे यामुळे शिवसैनिकांचा जोश दोन्हीकडे यंदा कमी जाणावला.

यंदा विचारांचे सोने कुठे लुटले गेले, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. सामोपचाराचा मार्ग गांडूंनी सांगावा असे शिवसेनाप्रमुख दसरा मेळाव्याच्या मंचावरून कडाडायचे तेव्हा समोरून शिवसैनिकांच्या शिट्या नि टाळ्यांचा महाप्रचंड कडकडाट व्हायचा. मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी शिवसेना उभारली. आता दोन शिवसेना, दोन पक्षप्रमुख, दोन दसरा मेळावे. आम्हीच खरे, दुसरा खोटा, असे दोन्हीकडून मुठी आवळून, हात उंचावून सांगितले जाते.

एकनाथ शिंदेंच्या भाषणाला मुख्यमंत्रीपदाची धार असते. ठाकरेंवर वार करताना ती तीक्ष्ण होते. कोराेना काळात घरात बसलात, लोक मरत होते तेव्हा तुम्ही मढ्यावरचे लोणी खात होता… पीएमने उद्घाटन केलेल्या मुंबई मेट्रो-३ ला मुख्यमंत्री असताना विरोध केलात. १७ हजार कोटींचा खर्च वाढला. ते जनतेचे पैसे, वाचले असते तर आम्ही ते महिलांना आणखी दिले असते… सत्तेवर असताना घरी बसलात, आता गल्लोगल्ली फिरताय… लाडक्या बहिणी तर तुम्हाला निवडणुकीत जोडे मारतील… त्यांचे फेक नॅरेटिव्ह आम्ही पॉझिटिव्ह… तुम्ही भगव्याचा रंग बदललात, बॉम्बस्फोटातील आरोपी तुमच्या प्रचारात फिरत होता, पाकिस्तानचे झेंडे तुमच्या प्रचारात फडकवले गेले… एमआयएम व उबाठा सेनेत आता काही फरक राहिला नाही… हा २४ बाय ७ काम करणारा कार्यकर्ता आहे, मला समृद्ध समर्थ विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर पळवून लावणारा बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचा शिवसैनिक आहे…होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाआघाडी… अशा शब्दांत ठाकरेंच्या दिशेने आझाद मैदानावरून तोफा धडाडल्या.

आझाद मैदानावरून आक्रमक व जबरदस्त भाषण झाले ते पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे. त्यांनी मेळाव्यातील शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना शाबासकी दिली. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार विरोधात संताप आणि संतापच प्रकट केला. त्यांचा उल्लेख सातत्याने मिंधे असाच केला. अदानी आमची शान, आम्ही शेटजींचे श्वान अशा खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. केंद्रात गेली दहा वर्षे भाजप सत्तेत आहे, मग हिंदू खतरे में आहे, असे म्हणण्याची पाळी का येते असा प्रश्न विचारला. १०५ हुताम्यांनी रक्त सांडून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली ती काही एका उद्योगपतीला विकण्यासाठी नाही… महिनाभराने आम्ही सत्तेवर आल्यावर प्रथम धारावीचे टेंडर रद्द करू अशीही त्यांनी घोषणा केली… शिवसेनाप्रमुख हयात असताना जे आक्रमक हिंदुत्व दिसायचे ते आता लोपले आहे.

काँग्रेसशी साथ-संगत केल्यापासून तमाम माझ्या हिंदू बांधवांनो व भगिनींनो व मातांनो हे शब्द विरले आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे सरकार टिकणार नाही, पन्नास खोके व एकदम ओके अशा घोषणा देऊन ठाकरे आणि मंडळींनी शिंदे गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण सव्वादोन वर्षे झाली, विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला आले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनाला कोणीही धक्का लावू शकलेले नाही. त्यांच्या कारभारावर मोदी-शहा एकदम खूश आहेत, याची प्रचिती वारंवार येते.

मला हलक्यात घेऊ नका, मी महाआघाडी उद्ध्वस्त केली आहे, हा शिंदेंचा इशारा समझने वालों को काफी हैं… दोन कोटी लाभार्थी बहिणी हेच महायुती सरकारचे मोठे आधारकार्ड आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दांत लाडक्या बहिणीच महायुतीच्या ब्रँड अॅम्बॅसिडर आहेत. शेवटी शेवटी मुंबईच्या प्रवेश द्वारावरील मुलुंड, ऐरोली, वाशी, दहिसर येथील पाच टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोल रद्द करण्याचा घेतलेला निर्णय महामुंबईतील जनतेला व मुंबईत मोटारींने येणाऱ्या लोकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

राजकीय संघर्षाच्या ठिणग्या आता वेगाने उडू लागल्यात तरी महायुती व महाआघाडी या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे जाहीर केलेले नाही, इथेच खरी गोम आहे… मराठी मतदार भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार), तसेच काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) अशा सहा पक्षांत विभागलेला आहे. शिवाय मनोज जरांगे, लक्ष्मण हाके, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी अशी नेते मंडळी मराठी मते खेचून घेणार आहेतच. या निवडणुकीत बंडखोरीला उधाण येणार हे निश्चित. कारण कोणी पुढील पाच वर्षे थांबायला तयार नाही. महत्त्वाचे म्हणजे पक्षाचे निवडून येणारे आमदारही नंतर सत्तेसाठी उद्या कोणाबरोबर जातील याची शाश्वती नाही. पक्ष फुटीनंतर कोणी कोर्टात गेले तरी कधी निकाल लागेल हे कोणी सांगू शकणार नाही. चला जय श्रीराम…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading