December 21, 2024
The past future and present of sorghum in the story of sorghum
Home » ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान

॥ ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान ॥

साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेला धनंजय सानप यांचा ‘ज्वारीची कहाणी’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्याचं वाचलं तेव्हापासून मला प्रचंड उत्सुकता होती की, कधी एकदाचा हा ग्रंथ मिळवतो आणि वाचतो. अशी माझी उत्सुकता ताणलेली होती. आता पुणे ग्रंथ महोत्सवात जाणारच होतो, तेव्हा आठवणीने हा ग्रंथ मी घेणार होतो. पण कालच हा ग्रंथ साधना प्रकाशनाने अभिप्रायासाठी पाठवला आणि मला सुखद धक्का बसला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या माध्यमातून दरवर्षी काही तरुणांना चांगल्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यातून धनंजय सानप यांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे.

इंद्रजीत भालेराव

नव्या पिढीचे तरुण लेखक वेगळे विषय घेऊन वेगळ्या प्रकारची हाताळणी करताना पाहिलं की खूप आनंद वाटतो. ग्रामीण साहित्य म्हणजे फक्त कथा, कादंबऱ्या, कविताच नव्हे तर ‘ज्वारीची कहाणी’ सारखी पुस्तकं देखील ग्रामीण साहित्यासाठी पूरकच आहेत. एखादं पीक घेऊन त्याविषयी असं समग्र विवेचन करणारा ग्रंथ मराठीत दुर्मिळच आहे. पिकांविषयी ग्रंथ प्रकाशित होतात, पण ते प्रामुख्याने कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी लिहिलेले असतात. ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात. पण इतरांनी ते वाचण्याचे कारणही नसते. इतर जी पुस्तकं प्रकाशित होतात त्यात पिकांचा शक्यतो इतिहास असतो किंवा साहित्यातल्या प्रतिबिंबाचा अभ्यास असतो. पण ज्वारीची कहाणी हे पुस्तक ज्वारीचे भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही काळाचे समग्र आकलन वाचकांसमोर मांडणारा आहे. म्हणूनच मला हा ग्रंथ वाचण्याची उत्सुकता होती. सध्या आमचे कार्यक्रमाचे तुफान दौरे सुरू आहेत. अशा काळात शक्यतो वाचन होतच नाही. पण हा ग्रंथ हातात आला, एक दिवस रिकामा होता, न राहवून मी आवेगात हा ग्रंथ वाचला. त्याविषयीच्या या काही नोंदी.

या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर जरी नजर टाकली तरी आपणाला या ग्रंथाचा आवाका कळतो. ज्वारीच्या मुळाचा शोध, समाज, साहित्य आणि ज्वारी, वाळीत टाकलेली खाद्यसंस्कृती, फूड नव्हे सुपरफुड, ज्वारी उत्पादकांचे वास्तव, ज्वारीच्या काढणीसाठी तंत्रज्ञान विकसित नाही, ज्वारी – पेरणी ते काढणी, ज्वारी प्रक्रिया उद्योग, हवामान बदलाचा ज्वारीला मोठा फटका, जैव इंधनापासून ज्वारी उपेक्षित, ज्वारीचं अर्थकारण, कडबा चारा की चिपाड, ज्वारी संशोधन संस्थांची धडपड, ज्वारी प्रश्नात शेतकरी संघटनांना स्वारस्य नाही, ज्वारीपासून मद्य निर्मिती : वास्तव आणि भविष्य, ओडिशा मिलेट मिशनचा पॅटर्न, मुलाखत : डाॅ. राजाराम देशमुख अशा १८ प्रकरणांमध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे. या अनुक्रमणकेतून आपणाला या ग्रंथाचा आवाकाही कळतो.

ज्वारी या पिकाभोवती आपली अख्खी संस्कृती उभी असते. पेरणी, निंदणी, सोंगणी, खळे, रास, गाड्या भरून घरी आणणे या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची एक संस्कृती दिसून येते. यातली कुठलीच गोष्ट सहज यांत्रिकपणे केली जात नाही. या प्रत्येक कृतीला काहीतरी संस्कृतिक संदर्भ जोडलेले असतात. त्यातून शेतकरी उदात्त आनंद घेत असतो. त्यामुळे लेखकाने ज्वारीचा साहित्यातून घेतलेला शोध तसा फारच त्रोटक आहे. या ग्रंथाचा एकूण आवाका पाहता ते स्वाभाविकही आहे. महानोरांची एक सुप्रसिद्ध कविता ज्वारीच्या रूपकावर आधारित आहे. ती एकेकाळी फार लोकप्रिय होती,

ज्वार उभार गर्भार
हिरव्या पदराला जर
निऱ्या चाळताना वारा
घुसमटे अंगभर

जात्यावरची एक ओवी तर फारच तुफान आहे. त्या एका ओवीतून ज्वारीचं सगळं क्रॉपसायन्स येऊन जातं. जात्यावर माझी आई म्हणायची,

तिफने गं बाई
तुझं चालणं चंचळ
झाली पेरणी पातळ
कंस पडले कंबळ

लेखकाने चांगला आढावा घेतला आहे तरी काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. काही संदर्भही चुकीचे आलेले आहेत. त्याची नोंदही इथेच करून ठेवतो. चरकसंहिता हा ग्रंथ बौद्ध धर्माचा नव्हे, तो आयुर्वेदाचा आहे. त्याचा निर्माता चरक हा जरी बौद्ध राजाच्या पदरी होता तरी ग्रंथ बौद्ध धर्माचा समजला जात नाही. लीळाचरित्र हा ग्रंथ चक्रधरांनी नव्हे म्हाईमभट्टानी लिहिलेला आहे. चक्रधर हा या ग्रंथाचा विषय आहे. अशा काही ढोबळ चुका राहून गेलेल्या आहेत. हा मजकूर कुणाही साहित्याच्या माणसाला दाखवला असता तर त्या चुका दुरुस्त झाल्या असत्या.

ज्वारी जगभर पिकते. ती कुठे कुठे कशी कशी पिकते, तिची सुरुवात कुठून झाली आणि ती जगभर कशी पसरत गेली, ते लेखकाने सविस्तर सांगितलेले आहे. त्याचा शोध ग्रंथातून घेतलेला आहे. म्हणजे हा ज्वारीचा भौतीक इतिहासही लेखक सांगतो. ज्वारी जगभर पिकते पण ज्वारीची भाकरी आणि काही उपपदार्थ फक्त महाराष्ट्रातच केले जातात. हे वैशिष्ट्य मात्र लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही. ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जोंधळा, दगडी, मालदांडी, डुकरी, उभा धिंगाणा, शाळू असे काही ज्वारीचे प्रकार समजले जातात. नंतर त्यात हायब्रीड या संकरित ज्वारीच्या वाणाचा समावेश झाला. त्यानंतर नऊ नंबर हाही एक ज्वारीचा वाण बाजारात आला. पण एकेकाळी ज्वारीला पर्यायी आणखी तीन प्रकार होते. ते म्हणजे वराडा, पिवळा, आणि गुंजावळी. ज्वारीचे हे तिन्ही प्रकार रंगाने विलक्षण वेगळे होते. वराडा हा चमकदार शुभ्र पांढरा असायचा. पिवळा हा रंगाने पिवळा असल्यामुळे त्याचं नाव पिवळा पडलं होतं. ही कडवट चवीची ज्वारी खायला खूपच चवदार लागायची. पण काही लोकांना ती आवडत नसे. आणि गुंजावळी ही रंगानं लाल ज्वारी आहे आणि खायला ती गुळचट असते. हे ज्वारीचे तीनही प्रकार संकरित नाहीत. ही आपल्या मातीतून निर्माण झालेली पारंपारिक पीके आहेत. हे सगळे संदर्भ पुस्तकात येत नाहीत. लेखकानं तपशिलवार घेण्याचं काही कारणही नाही. पण हे वाचताना मला हे सगळं आठवत गेलं. लेखक नंतरच्या पिढीचे दिसतात. त्यामुळे त्यांना जुन्या लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागलेल्या आहेत. माझ्या पिढीला ज्वारीविषयी सगळेच तपशील माहीत आहेत. त्यामुळे माझ्या पिढीतल्या कुणी असं पुस्तक लिहिलं असतं तर ते फारच वेगळं झालं असतं. आम्ही जिवंत तपशीला सोबतच स्मृतिरंजनात जास्त अडकलो असतो. पण लेखक नंतरच्या पिढीतले असूनही त्यांना या पिकाविषयी एवढी आस्था वाटते ही कौतुकाचीच गोष्ट आहे.

पूर्वीचे ज्वारीचे जे वाण होते ते स्निग्ध होते. अलीकडचे जे संकरीत वाण आहेत ते रूक्ष आहेत. त्यामुळे काही जणांना भाकरी गिळत नाही. ती घशाखाली उतरत नाही. त्याचं कारण ज्वारीमध्ये झालेला संकर. पण पारंपारिक स्निग्ध ज्वारी तुम्ही खाल्ली तर ती घशाखाली न उतरण्याचा प्रश्नच येत नाही. चवीला गुळमट आणि स्निग्ध अशी ही ज्वारी महुर असते. त्यामुळे माणूस चार घास जास्तच खातो. पण आता ही पारंपारिक ज्वारी खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या ज्वारीची भाकरी लवकर सुकत नसे. शिवाय जुन्या बाया ती करताना खूप जाड करून खमंग भाजीत असत. नव्या बाया ती पातळ करतात. त्यामुळे लगेच वाळून जाते. म्हणून ती खायला नको वाटते. गिळतही नाही. गरम खाल्ली तरच बरी वाटते. पण जुन्या काळातले लोक ज्वारीची भाकरी शेताला नेली तर झाडाला बांधून ठेवायचे. दिवसभर ऊन्हात हडकायची. पण तरीही खाताना लोकांच्या तोंडाला पाणी सुटायचं. परवा दूरदर्शनवरच्या ‘माझा कट्टा’ मधील मुलाखतीमध्ये नेमाडे सरांनी हे जुने ओरिजनल वाण खायला मिळत नाहीत, पूर्वीचा सकस विविधांगी आहार मिळत नाही, म्हणून माणसांची डोकी चालत नाहीत, असं उत्तर मुलाखत घेणाऱ्याला दिलं होतं. ते अगदी खरं आहे. या पार्श्वभूमीवर लेखक म्हणतो, ज्वारी हे सुपर फूड आहे, हे खरं आहे. लेखकानं सूक्ष्म आकडेवारीसह आपलं म्हणणं मांडलेलं आहे.

बैठा आणि क्षत्रिय अशा दोन्ही स्वरूपाचा अभ्यास लेखकाने मन लावून केलेला आहे. पुष्कळ संदर्भग्रंथाचे वाचन करून तपशील मिळवलेले आहेत. विविध भागातील शेतकऱ्यांना भेटून तिथल्या ज्वारीची परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तसेच कृषी विद्यापीठातील तज्ञ लोकांना भेटूनही ज्वारीचे भूत, भविष्य, वर्तमान समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तपशील अधिकृत वाटतात.

या पुस्तकात ज्वारीची भाकरी आणि पापडांचा उल्लेख आहे. एका ठिकाणी ज्वारीच्या कण्यांचाही उल्लेख आहे. पण ज्वारीच्या घुगऱ्यांचा उल्लेख कुठेही येत नाही. शेंगुळे हाही एक महत्त्वाचा पदार्थ आहे. निवगे, चिपटे, धपाटे, लाह्या, चीक, आंबील हे ज्वारीचे आणखी काही महत्त्वाचे उपपदार्थ. ज्वारीच्या लाह्या पंचमीला केल्या जातात. पंचमीला या लाह्यांचा मानच असतो. त्या मक्यांच्या पॉपकॉर्न पेक्षा कितीतरी चवदार लागतात. पॉपकॉर्नचा शोध अगदी अलीकडचा. पण ह्या दाण्याच्या पंचमीसाठी केल्या जाणाऱ्या लाह्या ह्या आपल्या परंपरेचा भाग आहेत. त्या लाह्या पॉपकॉर्नसारख्या चवदार फोडणी देऊन पॅक केल्या तर पॉपकॉर्नच्या कितीतरी पुढे जातील. हे संदर्भ पुस्तकात पाहायला मिळत नाहीत.

यातलं ज्वारीपासून जैवइंधन हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे. लेखकानं या विषयाचा सखोल अभ्यास करून शासनासमोर आरसा धरलेला आहे. शासनाने सानप यांच्या या संशोधनाचा उपयोग करून काही उपाय योजिले तर ज्वारीला, शेतकऱ्याला आणि पर्यायाने देशाला चांगले दिवस येतील. पण राजकारणाच्या धबडग्यात याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही आणि कुठल्या कंपन्यांचा किंवा राजकारण्यांचा फायदा असल्याशिवाय कोणी ते लक्षातही घेणार.

‘शेतकरी संघटनांना ज्वारीच्या पिकात स्वारस्य नाही’ या प्रकरणात शेतकरी संघटना असं म्हणायला हवं, लेखक शेतकरी संस्था असं म्हणतो. शरद जोशी त्या संघटनेचे अध्यक्ष नव्हते, प्रवर्तक होते. वेळोवेळी अध्यक्ष निराळे होते. शेतकरी संघटना ह्या पिकाच्या वाढीसाठी संशोधनात्मक काम करत नसतात. तर त्या पिकाच्या संदर्भात आर्थिक आणि सामाजिक चळवळी उभ्या करून न्याय मिळवून देण्यासाठी असतात. पण लेखकांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. संघटना ही शेतकऱ्यांना सरकारी जाचातून सोडवण्यासाठी होती. लेखक म्हणतो तसं या संघटनेचे नंतरचे नेते स्वार्थी निघाले, राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून स्वतःचे खिसे भरू लागले, हा भाग निराळा. एकूणच सानप यांचा शेतकरी संघटनेवर भयंकर राग दिसतोय. त्याला काही तसेच कारणही असावे. ते समजून घ्यायला हवे. त्यासाठी ‘ज्वारीत शेतकरी संघटनांना स्वाराश्य नाही’ हे प्रकरण आजच्या सगळ्या शेतकरी नेत्यांना वाचायला द्यायला हवे. त्यांचं म्हणणं काय तेही समजून घ्यायला हवं. प्रतिनिधीक रुपात अनंत देशपांडे यांची मुलाखत लेखकानं घेतलेली दिसते.

इतरत्र सर्वत्र निरपेक्ष राहिलेला लेखक या प्रकरणात भलताच सापेक्ष झालेला दिसतोय. हे संशोधन शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यामुळे कदाचित असं झालय का ? असा एक प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झाला. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन शरद जोशींचे श्रेय मान्य केलेले आहे, हे कदाचित सानप यांना माहीत नसावं. लेखकाच्या तोंडी सरकार विरोधी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना जी भाषा येते ती प्रामुख्याने शेतकरी संघटनेचीच भाषा आहे. हे लेखकाच्या कदाचित लक्षात आलेलं नसावं. शेतकरी संघटनेविषयीच्या प्रकरणानंतर लगेच ज्वारीपासून मद्यनिर्मिती कशी आवश्यक आहे हे प्रकरण येतं. ही दोन्ही प्रकरणे आमने-सामने वाचताना मला तरी खूप मजा आली.

‘वास्तव आणि भविष्य’ या प्रकरणात लेखकानं ज्वारीला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. काही संशोधने सुचवली आहेत तीही तितकीच महत्त्वाची आहेत. ‘ओडिशा मिलेट मिशनचा पॅटर्न’ या प्रकरणामध्ये ओडिसा सरकारने तिथलं भरडधान्य संकटाच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी काय उपाय योजिले आहेत, त्याचा तपशील दिलेला आहे. ज्वारीला संकटाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी त्याचा अवलंब महाराष्ट्र सरकारने करायला हवा अशी अपेक्षा केलेली आहे. म्हणून हे प्रकरणही महत्त्वाचंच आहे. शेवटी डॉ. राजाराम देशमुख या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू राहिलेल्या तज्ज्ञाची मुलाखत देण्यात आलेली आहे. एखाद्या अधिकृत माणसाची मुलाखत हा संशोधनाचा एक शिरस्ताच असतो. तो या मुलाखतीतून पूर्ण झालेला आहे. अर्थातच मुलाखतही महत्त्वाचीच आहे.

असा प्रत्येक पिकाचा अभ्यास करणारे तरुण पुढे आले आणि त्यांनी एकेका पिकाची अशी पुस्तकनिर्मिती केली तर मराठी साहित्यात विलक्षण वेगळ्या लेखनाची भर पडेल, याची मला खात्री वाटते. ग्रामीण साहित्य म्हणजे केवळ कथा, कादंबरी, कविता नव्हे हे मी नेहमीच मानत आलेलो आहे. त्यामुळे शेतीविषयक पूरक चळवळी, संघटना, शेतीचा इतिहास, शेतीच्या भौतिक विकासाविषयीचे ग्रंथ हे सगळंच मी वाचत असतो. त्यामुळेच हे पुस्तक आल्याचे समजतात मला खूप उत्सुकता होती. त्या उत्सुकतेपोटी मी हे पुस्तक वाचलं. या पुस्तकाविषयी माझी काही वेगळी मते मी जरी मांडली असली तरी या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व मला मान्य आहे. आणि लेखकानं हा विषय निवडून त्याचा सर्वांगीन असा अभ्यास केला, त्याविषयी मी लेखकाचं खूप खूप अभिनंदन करतो. त्याच्या या पुस्तकाला साधना प्रकाशनासारखी प्रकाशन संस्था मिळाली त्याविषयी देखील मी त्यांचे अभिनंदन करतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading