झाडीबोली साहित्य मंडळाचे सन २०२२ चे वार्षिक साहित्य पुरस्कार जाहिर
गडचिरोली – झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ट साहित्य निर्मिती तसेच एका झाडीपट्टी लोककलावंतास पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी इच्छूक साहित्यिकांना व लोककलावंताना मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. या आलेल्या प्रवेशिका मधून निवड समितीने विजेत्यांची निवड केली आहे.
उत्कृष्ट झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कार दादा अंताराम पारधी (मालडोंगरी) यांना घोषित केला आहे. तर उत्कृष्ट प्रमाण मराठी काव्य निर्मितीसाठी अरूण झगडकर यांच्या ‘भुभरी’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट झाडीबोली साहित्य निर्मितीसाठी जुनासुर्लाचे लक्ष्मण खोब्रागडे यांच्या ‘मोरगाड’ या संग्रहाची निवड करण्यात आली आहे. संकीर्ण गटात उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रा. रघुनाथ कडवे व बंडोपंत बोढेकर लिखीत ‘संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व (जीवनकला)’ या पुस्तकाची मंडळाकडून निवड केलेली आहे.
गडचिरोली येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय खुल्या कवीसंमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मंडळाची सभा लेनगुरे भवनात ज्येष्ठ साहित्यिक तथा जिल्हा प्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, प्रसिद्ध गायक पुरूषोत्तम ठाकरे, उपेंद्र रोहणकर, सहसचिव संजीव बोरकर, सौ. लेनगुरे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी संजीव बोरकर यांनी केले .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.