September 8, 2024
The side of non-violence should be understood while presenting history
Home » इतिहास मांडताना अहिंसेची बाजू समजून घ्यावी – उपिंदर सिंग
काय चाललयं अवतीभवती

इतिहास मांडताना अहिंसेची बाजू समजून घ्यावी – उपिंदर सिंग

सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणाऱ्या १९ वा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने उपिंदर सिंग यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

पुणे – इतिहास सांगताना त्यात युद्ध येतात, हिंसा येते, बळावर प्रस्थापित केलेलं राज्य येतं. हिंसेचा आधार घेतल्याशिवाय इतिहास सांगताच येत नाही, हा दृष्टीकोन तयार झाला आहे. प्राचीन भारतापासूनचा इतिहास तपासला तर अहिंसा हीच आपली परंपरा आहे, असं लक्षात येतं. त्यामुळं अहिंसेची बाजूही इतिहास मांडताना अभ्यासली पाहिजे, समजून घेतली पाहिजे, असं मत ज्येष्ठ इतिहासकार आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या उपिंदर सिंग यांनी व्यक्त केलं.

सरहद संस्थेच्या वतीने दिला जाणाऱ्या १९ वा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, संतसिंग मोखा, चरणजितसिंग सहानी, सुरिंदरसिंग धुपड, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपिंदर सिंग म्हणाल्या, ‘‘सध्याच्या काळात इतिहासाचे दाखले देऊन खूप काही चुकीचे पसरविले जात आहे. ग्लोरिफिकेशनच्या जमान्यात भूतकाळ समजून घेणं महत्त्वाचं झालं आहे. हिंसेच्या बाजूनं केलेली इतिहासाची रचना धर्म, जाती, वर्ण यातल्या भेदालाही खतपाणी घालते. सध्याच्या भारताच्या लोकशाही व्यवस्थेत नैसर्गिक समानता या तत्त्वाची संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना प्राचीन भारताच्या इतिहासात असलेल्या ‘आयडिया ऑफ नॉन-व्हायोलन्स एन्शियंट इंडिया’ या संकल्पनेला पूरक अशीच आहे. भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्यासारख्या अनेकांचं त्यात योगदान आहे. भारताची संस्कृती, धर्म, भाषा यात वैविध्य आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात या वैविध्याचं एकमेकांशी असलेलं सांस्कृतिक सख्याचं नातं दिसून येतं. त्यामुळंच इतिहासाचे दाखले देऊन पसरविल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल तरुणाईने भीती न बाळगता प्रश्न विचारले पाहिजेत. चांगला इतिहास आणि वाईट इतिहास या पलीकडे जाऊन कोणाच्याही प्रभावाखाली न येता नवं शोधलं पाहिजे.’’

‘‘आजच्या राजकीय प्रश्नाची, गुंतागुंतीची उत्तरं प्राचीन भारताच्या इतिहासात शोधली पाहिजेत. इतिहासाचे दाखले देऊन धर्म, जात या गोष्टीत अडकवण्याचा सातत्यानं प्रयत्न अलीकडच्या काळात केला जातो आहे. त्यातून या देशाची सुटका होणे गरजेचे आहे. आधुनिक भारताला काय हवंय, हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राचीन भारताचा अभ्यास करण्याची गरज आहे.’’

सुशीलकुमार शिंदे

रामदास फुटाणे म्हणाले, ‘‘परमेश्वरानं माणसाला जन्म दिला आणि माणसाने धर्माला, पंथाला आणि जातीला जन्म दिला. आज धर्म आणि जाती माणुसकी तोडण्याचं काम करत आहेत.’’

महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं दृढ करण्यासाठी संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार १९९३ मध्ये सुरू करण्यात असं सांगून संजय नहार यांनी पुरस्कारामागची भूमिका विषद केली.

यावेळी संतसिंग मोखा, अनुज नहार यांनी मनोगत व्यक्त केलं. निवेदन सांची मोरे यांनी केलं. आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आतून सोलून निघणार्‍या सामान्य माणसाचा हंबर : ब्लाटेंटिया

देव तारी त्याला कोण मारी…

नवरा-बायको विनोद…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading