जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपलं जगणं शोधत असतो. मी ही माझं जगणं शोधत होतो. माझ्या वाट्याला आलेलं जगणं, भोगणं आणि अनुभवणं यातूनच ‘ताराबंळ’ या आत्मकथनाची निर्मिती झाली. वास्तविक ही माझ्या जीवनाची कथा आहे. आजपर्यंतच्या काळातील बारीक सारीक गोष्ठी लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तसा माझा पिंड कथालेखनाचा, परंतु मला जे सांगायचं, मला जे मांडायचं ते कथेतून मांडणं शक्य नव्हतं. म्हणून मी आत्मकथन लेखनाकडे वळलो.
अंबादास केदार
महाविद्यालयीन जीवनापासून ते आजपर्यंत अनेकांची आत्मचरित्र वाचून झाली. दया पवारांचे ‘बलुतं’ प्र. ई. सोनकांबळे यांचं ‘आठवणीचे पक्षी’, लक्ष्मण माने यांचं ‘उपरा’, उत्तम बंडू तुपे यांचं ‘काट्यावरची पोटं’, बेबी कांबळे यांचं ‘जीणं आमचं’, शंकरराव खरातांचे ‘तराळ-अंतराळ’, ‘हंसा वाडकरांचं’, ‘सांगते ऐका’, किशोर काळेचं ‘कोल्हाट्याची पोर’ ही आत्मकथने वाचून माझ्याही मनान विचार शिरला. म्या विचार कराय लागलो. त्यांच्या वाट्याला आलेलं जगणं माझ्याही वाट्याला थोड्याफार फरकानं आलेलं आहे. मग आपणही लिहितं झालं पाहिजे. यातूनच मी लिहता झालो.
माझ्या वाट्याला आलेलं जगणं. हे माझं एकट्याचं जगणं नसून माझ्यासारख्या असंख्य जनाचं हे जगणं आहे. सोसावे लागलेले हाल, अपेष्ठा आणि पाचविला पुजलेले अठरा विश्व दारिद्र्य माझ्या नशिबी आले. त्यामुळे मी भांबाहून गेलो. अनेक संकटाचा सामना करीत मी भरकटूनही गेलो. अस्वस्थ झालो. आणि माझ्या अस्वस्थ मनाला शब्दांचा बांध फुटला. अन् म्या आत्मकथनाच्या रूपाने बोलका झालो. जे जगलो, जे भोगलो, जे अनुभवलो तेच लिहित गेलो. पोटाची खळगी भरण्याबरोबरच जीवन जगण्यासाठी कोणत्या थराला जावं लागतं याचा अनुभव म्या घेतलेला होता. म्हणूनच आत्मकथन लिहिण्याचं बळ मिळालं असावं असं मला वाटतं.
जीवनात घडलेल्या घटना, प्रसंग, आलेला संघर्ष जसच्या तसं लिहिण्याचा हा माझा प्रयत्न. पोटासाठी होणारी आबाळ अन् माझ्या शिक्षणासाठी माय-बापांची तळमळ मला विसरता येत नाही. भूक आणि अठरा विश्व दारिद्र्यात पछाडलेली माणसे आजही अवती-भवती वावरताना दिसतात. पोटासाठी आभाळ पांघरणारी माणसे आणि दिव्याच्या तेलासाठी अंधारातून उजेड शोधणारी माणसे हाच माझ्या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे. माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं चित्र, अन् अनुभवलेलं, भोगलेलं जीवन प्रत्यक्षात वास्तवात आणावे आणि आत्मकथनाच्या माध्यमातून वाचकांच्या समोर यावे हा माझ्या मनोमन हेतू होता. म्हणूनच हे आत्मकथन साकार झाल्याचे दिसते. माणसांच्या व्यथा मांडताना जीवन जगण्याच्या तळाचाही शोध यात घेतलेला आहे.
तारांबळ आत्मकथन ही 'संघर्षशाली झुंज' - बाबाराव मुसळे अंबादास केदार हे मुळात ग्रामीण कथा लेखक. गावाकडचं जगणं आपल्या कथेतून परिणामकारकपणे मांडणारे अंबादास केदार यांचे 'तारांबळ' हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. एका खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा आपले भविष्य यशस्वीपणे घडविता यावे यासाठी अपरिमित कष्ट उपसतो. तीव्र अडचणींचा समर्थपणे सामना करतो. जीवनातील सारे चढ-उतार भोगत सुखनैवपणे आपल्या कुटुंबाच्या पोटाला निवांतपणे चार घास मिळतील या सात्विक समाधान देणाऱ्या स्थितीत पोहोचतो. अंबादास केदार यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी केलेला खटाटोप नाही, तर त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांचे जीवन जगण्यासाठी, खऱ्या अर्थाने दिलेली एक 'संघर्षशाली झुंज' या आत्मकथनातून दिसून येते. त्यात त्यांना सोनेपे सुहागा म्हणून लेखणीचे बळ मिळावे ही केदार यांच्यासाठी आत्यंतिक आनंददायी बाब. त्यांना जीवन व्यथा मांडावीशी का वाटली याचे कारण देताना ते म्हणतात, 'पोटासाठी आभाळ पांघरणारी माणसे आणि दिव्याच्या तेलासाठी अंधारातून उजेड शोधणारी माणसे हाच माझ्या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे', अर्थातच ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. बाबाराव मुसळे
पुस्तकाचे नाव – तारांबळ
लेखक – अंबादास केदार, मोबाईल – 9604354856
प्रकाशन – गणगोत प्रकाशन, देगलुर, जि. नांदेड मोबाईल – 9665682528
मूल्य ₹450
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.