July 27, 2024
Sarita Patil article on violence on Women
Home » भय इथले संपत नाही !..
विशेष संपादकीय

भय इथले संपत नाही !..

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे याचीही राजकारण्यांनी व पोलीस प्रशासनाने नोंद घेणे महत्वाचे आहे. हे कमी म्हणून कि काय आज एक महाराष्ट्रात, डोंबिवलीत काळजाचा थरकाप उडणारी, अतिशय संतापजनक सामुहिक बलात्काराची घटनां घडते. एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी बलात्कार करुन तिला धमक्या देवून तक्रार करण्यास मज्जाव करणे हे ऐकून मुंबई सारख्या महानगरीत कायदा व सुव्यवस्थेचे राज आहे कि गुंडाराज आहे ? हा प्रश्न पडतो.

सरीता पाटील

वेदांत कॉम्प्लेक्स, ठाणे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपतीचा उत्सव सुरु असताना, सगळीकडे आनंदी आनंद असताना मन सुन्न करणारी, हृदयद्रावक घटना मुंबई मधील अंधेरी इथे घडते. अंधेरी, साकीनाका इथे शुक्रवारी पहाटे एका ३० वर्षाच्या परिचय असलेल्या महिलेवर ४५ वर्षाच्या आरोपीने बलात्कार करुन तिला एका टेम्पोमध्ये फेकून देवून निघून जाणे ही माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत क्रूर घटना आहे. मुंबई शहर महिलांना खूप सुरक्षित मानले जाते पण शहर कितीही आधुनिक असो पुरुषांच्या मानसिक वृतीत जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत आपण कितीही स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या तरी अजूनही एकविसाव्या शतकात स्त्रिया सुरक्षित नाहीत हेच अधोरेखीत होते. तिच्यावर बलात्कार करुन तिच्या अंतर्गत भागात लोखंडी गज घालणे हे हैवानी कृत्य दुसरा एक माणूसच पण एक पुरुष करतो, हे काळे कृत्य समस्त स्त्री जातीला नव्हे समस्त समाजाला भयानक चीड, संताप आणणारी आहे.

एकट्या, असहाय्य व अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन तिच्यावर निर्घुणपणे अत्याचार करणे यात कुठला आला आहे पुरुषार्थ ? ही भयंकर घटना २०१२ साली १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत घडलेल्या काळ्या कृत्याची, निर्भयाच्या घटनेची आठवण करुन देणारी आहे. संपूर्ण देशात खळबळ माजणारी ही घटना विसरत नाहीत तोपर्यंत तशीच दुसरी घटना मुंबई मध्ये घडते यावरुन या देशातील आरोपींना कायद्याचे काहीच भय वाटत नाही हेच दिसून येते.

निर्भया प्रकरणानंतर आपल्या देशात बरेच कठोर कायदे करून सुद्धा आरोपींना वचक बसत नाही. त्याच्यानंतर हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने तिला दूर नेऊन सामुहिक बलात्कार करुन पुरावे नष्ट करुन तिला जिवंत जाळणे, उत्तरप्रदेश मधील हाथरसमध्ये पण अशीच घटना घडणे अश्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या नराधमाना कायद्याची किंवा पोलीसांची अजिबातच भिती राहिली नाही नव्हे आपल्या अमानुष कृत्याची शरम पण वाटत नाही आणि त्यांच्यात पिडीतेला मारून टाकून पुरावा नष्ट करण्याची दुष्ट प्रवृत्ती वाढीस लागली आहे.

महाराष्ट्र तर गेल्या कांही दिवसांत महिलावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराने हादरून गेला आहे. मुंबई, पुणे, कल्याण, उल्हासनगर, अमरावती, वसई, पिंपरी-चिंचवड ह्या सर्व ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार झाल्याच्या घटनांनी पुनः एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई हे शहर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. मुंबई पोलिसांची कीर्ती साऱ्या जगभर आहे. पण १० सप्टेंबरच्या पहाटे अतिशय घृणास्पद घटना घडते आणि पुन्हा अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा होतो. त्या पिडीतेवर अमानवी अत्याचार करुन, तिला एका निर्जीव वस्तुसारखी फेकून देऊन तो नराधम अतिशय थंड डोक्याने कसा काय निघून जातो ही घटनाच अत्यंत चीड, संताप आणणारी आहे.

ज्या स्त्रीच्या कुशीतून जन्म घेतो तशाच एका दुसऱ्या स्त्रिच्या कुशीची विटंबना नव्हे तर क्रूरपणे चिरफाड करणे असे कृत्य मुके प्राणीसुद्धा करत नाहीत पण असे राक्षशी कृत्य एक पुरुष करतो ही गोष्ट समस्त पुरुष वर्गाला शरमेने मन खाली घालायला लावणारी आहे. त्या महिलेच्या शरीरातून एवढा रक्तस्त्राव होतो की तिच्यावर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांचा सुद्धा काही उपयोग होत नाही, तिचा दुर्दैवी मृत्यू होतो म्हणजे सबळ पुराव्या अभावी पोलीस प्रशासनाची बाजू अशक्त होऊ शकते. अश्या घटना वारंवार होतात आणि पुन्हा बलात्कारित नराधम उजळ माथ्याने समाजात फिरतात त्या कथित नराधमाला मुंबई पोलिसांनी सी.सी.टीवी फुटेजच्या आधारे लगेच पकडून पोलीस कोठडीत ठेवले आहे खरे. त्याला भारतीय दंड संविधान १८६० कायद्यानुसार कलम ३७६(बलात्कार), कलम ३०२ ( हत्या), कलम ५०४ (एखाद्या व्यक्तीला अपमान करुन सामाजिक शान्ततेचा भंग), कलम ३२३( हत्याराने जखमी करणे व मृत्यू होणे ) नुसार लवकर आरोपपत्र दाखल होऊन शीघ्रगती न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय तिच्या कुटुंबियांना २० लाखांची तात्काळ मदत जाहीर केली आहे ही सकारात्मक बाजू आहे पण अशा घटनांना प्रथम काहीतरी ठोस उपाय योजना करुन प्रतिबंध केला पाहिजे. आणखी काही आरोपींचा लवकर शोध घेवून त्यांचा पण छडI लावला पाहिजे.

समाजाकडून व विरोधी पक्षाकडून त्याला फाशीच्या शिक्षेची कडाडून मागणी होईल, सरकार, पोलीस प्रशासन यांच्यावर समाज, विरोधी पक्ष दबाव आणेल. काही दिवस वातावरण तापून त्याच्यावर चर्चा होतील, वेगळी चौकशी समिती नेमली जाईल. पण काही वर्षांनी पुराव्या अभावी जमीन मिळून ते नराधम सुटतात आणि म्हणूनच पुन्हा अशा घटना घडतात हे नेहमीचेच झाले आहे. कायद्यातील सर्व तरतुदींचा आरोपी वापर करतात त्यामुळे आपल्याकडे फाशीची शिक्षा अमलात आणण्यास खूपच विलंब होतो. त्यामुळे जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना जबर शिक्षा झाली पाहिजे आणि पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तिच्या कुटुंबावर आपल्या मुलगीचा असा अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो याचा मानसिक आघात होतो शिवाय पिडीतेच्या मुलींना पण किती तीव्र मानसिक धक्का बसत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

मुळात स्त्री ही एक भोगवस्तू आहे ही पुरुषी वृत्ती समूळ नष्ट झाली पाहिजे. अजूनही खेडयातून मुलगा- मुलगी भेदभाव होतोच आहे. पालन पोषण करताना आई-वडिलच मुलाने काही केले तरी चालते असेच संस्कार मुलांवर करतात. पुरुष प्रधान संस्कृती २१ व्या शतकात सुद्धा शिक्षित, उच्चशिक्षित समाजात घट्ट पाय रोवून उभी आहे. पुरुषांच्या अत्याचारातून उच्चशिक्षित महिला सुद्धा सुटल्या नाहीत हे अगदी दोन तीन महिन्यापूर्वी वन अधिकारी यांच्या आत्महत्येने अधोरेखीत केले आहे.

अहमदनगरच्या एका तहसिलदार महिलेने पण आपल्याला पुरुष अधिकाऱ्यांच्या कडून होणाऱ्या छळ असह्य होतोय असे म्हटले आहे. अगदी १० – १५ दिवसापूर्वी मानपाडा- माजिवडा ठाणे, प्रभागच्या सहाय्यक आयुक्त कर्त्यव्य करताना त्यांच्यावर फेरीवाल्याने केलेला भ्याड हल्ला याच विकृतीतीतून केला जातो. म्हणजे पुरुष्यांच्या विकृत मनोवृतीतून कुठलीही स्त्री गरीब असो वा श्रीमंत, उच्चशिक्षित, अशिक्षित, निराधार, बालिका, अधिकारी महिला कोणीच सुटलेले नाही. मुळात ही विकृती समूळ नष्ट होण्यासाठी पहिले म्हणजे प्रत्येक आई-वडिलांनी मुलाना बालपणापासून घरातील आई, बहिण किवा कोणी इतर मुलगी असो त्यांच्याशी आदराने वागायला शिकवले पाहिजे.

आजही कित्येक खेड्यापाड्यात घराघरात घरगुती हिंसाचार होत असतात. वडील आईला मारत असतात. हे मुले लहानपणापासून बघत असतात, बऱ्याच ठिकाणी नवरा बायकोचे पटत नाही पण स्त्री मुलांसाठी नवऱ्याची शिवीगाळ असो कि मार असो सगळे सहन करत असते. घर, संसार यासाठी स्त्रीयाच त्याग करत असतात. कांही मुलाचे आई-वडील शक्यतो आई (अपवाद वगळता) कायम मुलाच्या चुका पाठीशी घालत असते त्यामुळे मुलाला म्हणजेच नवऱ्याला आपली चूक वाटतच नसते, मग त्याची मुजोरी चालूच राहते. मग ती गरीब आणि कमी शिकलेली असेल तर अजूनच सासरच्या लोकांना जोर येतो. ती कमवत नसेल तर मग ती काडीमोड पण घेऊ शकत नाही कारण तिला त्यासाठी तेवढे धाडस पण नसते. शिवाय तिचे आई वडील पण तिला तसे करू देत नाहीत कारण तेही गरीब असतात. अजूनही खेड्यात आई किवा बायको आजारी असतील तर घरात झाडू मारणे, जेवण करणे , मुलांना सांभाळने हि कामे करणे पुरुष कमीपणाचे मानतात. चुकून कोण नाईलाजासाठी करत असेल तर त्याला बाईलवेडा म्हणून चिडवले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त समाज शिक्षित झाला पाहिजे. स्त्रियांनी पण अन्याया विरोधात तंटा मुक्ती समिती, महिला आयोग किवा पोलिसांत तक्रार केली पाहिजे.

अजूनही खेड्यात पोलिसांत तक्रार करणे म्हणजे घरची प्रतिष्ठा जाते असेच मानतात. कुठे ना कुठे तक्रार नोंदवली तर आणि तरच त्यांच्यावरील अत्याचाराला आळI बसेल. अजूनही २१ व्या शतकात जवळजवळ ५० ते ६० टक्के स्त्रिया तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात हे समाजातील खरे वास्तव आहे. ज्या स्त्रिया याच्या विरोधात बोलतात त्यांना फटकळ वा बंडखोर बोलले जाते. बर्याचजणी सासर- माहेर च्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे या वर्षी महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, विनयभंग इ. तक्रारी आहेत. शहरात त्यामानाने परिस्थिती खूपच चांगली आहे. समाजात बरेच पुरुष त्यांच्या घरच्या किवा बाहेरच्या स्त्रीयांना खूप चांगली वागणूक देतात त्या सर्वांची मी माफी मागूनच हा लेख लिहिते आहे. पण खेड्यातून आणि काही अल्पसंख्यांकांच्या समाजात सर्रास अश्या घटना घडत असतात. दिवसेंदिवस स्त्रीयावरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे.

त्यासाठी माता- भगिनी व बालकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ‘शक्ती फौजदारी कायद्याचे’ विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवून त्याचा अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दिले आहे. त्यानंतर शक्ती कायदयाच्या प्रारूपाचे कायद्यात रुपांतर होऊन त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे. शिवाय मुंबईतील प्रचंड लोक संख्येच्या मानाने सध्याचे पोलीस बळ खूप अपुरे पडते आहे. मुंबई किवा पूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलात अजून भरती केली पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी लागणारा पोलिसांचा ताफा थोडा कमी करावा.

गेल्या वर्षी करोनाच्या महामारीत बरेच पोलीस मरण पावले आहेत त्यांच्या जागी सुद्धा तात्काळ नेमणुका कराव्यात. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी, औद्योगिक पट्टयात तसेच जीथे तुरळक वस्ती आहे तिथे गस्त वाढवली पाहिजे. पोलिसांनी पण तक्रार आल्यानंतर विनाकारण अधिकार क्षेत्राचे कारण पुढे करुन वेळ दवडू नये नेहमी कार्यक्षम राहून प्रकरणे हाताळली पाहिजेत. स्त्रियांनी सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे घेऊन सावध राहून प्रतिकार करुन तक्रार करण्याचे धाडस केले पाहिजे शिवाय महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे याचीही राजकारण्यांनी व पोलीस प्रशासनाने नोंद घेणे महत्वाचे आहे. हे कमी म्हणून कि काय आज एक महाराष्ट्रात, डोंबिवलीत काळजाचा थरकाप उडणारी, अतिशय संतापजनक सामुहिक बलात्काराची घटनां घडते. एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी बलात्कार करुन तिला धमक्या देवून तक्रार करण्यास मज्जाव करणे हे ऐकून मुंबई सारख्या महानगरीत कायदा व सुव्यवस्थेचे राज आहे कि गुंडाराज आहे ? हा प्रश्न पडतो. या सर्व प्रकरणांची राजकारणविरहीत चौकशी होऊन कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसली पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुळा लागवड तंत्र

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्ली, मुंबई, इचलकरंजी या तीन जागांची पाहाणी करण्यात येणार आहे. आपणास हे संमेलन कोठे व्हावे असे वाटते ?

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading