November 21, 2024
The solution is to get organized in political social pollution
Home » राजकीय सामाजिक प्रदूषणात संघटित होणे हाच उपाय
काय चाललयं अवतीभवती

राजकीय सामाजिक प्रदूषणात संघटित होणे हाच उपाय

‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून’ ग्रंथाच्या चर्चासत्रात अभ्यासकांचे मत
अंकुश कदम लिखित ग्रंथावरील चर्चासत्रात हुमायून मुरसल,अजय कांडर,नारायण खराडे यांचा सहभाग

सावंतवाडी – एखादा सामाजिक कार्यकर्ता समाज स्तरावर जाऊन काम करतो आणि ते अनुभव शब्दातून मांडतो तरी मात्र मूळ समस्या सुटत नाही. या प्रत्येक गोष्टी मागे राजकारणच कारणीभूत असतं. त्यामुळे सामाजिक राजकीय प्रदूषणात निखळ माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभारणे हाच यामागील उपाय आहे, असे मत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंकुश कदम लिखित ‘हस्तक्षेपाच्या कणखर भूमितून ‘ या ग्रंथावरील चर्चासत्रात विविध अभ्यासकांनी व्यक्त केले.

सत्यशोधक समता प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या सदर चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत – सामाजिक कार्यकर्ते हुमायून मुरसल ( कोल्हापूर) कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर (कणकवली), नाटककार नारायण खराडे (गोवा) आदी सहभागी झाले होते. समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगेश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे संयोजक महेश पेडणेकर, लेखक अंकुश कदम, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, सामाजिक कार्यकर्ते – लेखक संपत देसाई, कवी प्राचार्य गोविंद काजरेकर, कवी मधुकर मातोंडकर, कवी डॉ.चंद्रकांत पुरळकर, डॉ.सतीश पवार, प्रा. आवटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपण प्रत्येक गोष्टीचे गट पाडले आहोत. आज मी इथे येतो म्हणून मला मानणारे लोक आले. पण या गटाच्या पलीकडे एका विचाराने आपण कधी एकत्र येणार आहोत. आज जे काही चाललं आहे ते भयानक आहे. त्याची चिकित्सा अंकुश कदम यांनी या ग्रंथात केली आहे. परंतु त्यावर उत्तर काय ? असा प्रश्न आपल्याला पडायला हवा. त्या उत्तरासाठी जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत हे लेखन यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही.

हुमायून मुरसल

अजय कांडर म्हणाले, अंकुश कदम हे फक्त कार्यकर्ते नाहीत ते कार्यकर्ते लेखक आहेत. कार्यकर्ता लेखक अधिक डोळस भान घेऊन लिहितो आणि वाचकांनाच दृष्टी देतो.या ग्रंथ लेखनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे जातीची, धर्माची किंवा अन्य तसस्म गोष्टिची टोकदार अस्मिता दिसत नाही.त्यामुळे संग्रम मानवी कल्याणाचा विचार अंकुश यांच्या या लेखनात येतो.शोषणमुक्त चळवळीला शिवाजी महाराजांचे प्रतीक जोडले गेले असते तर दुसऱ्यासाठी आज दांडे हातात घेणारे बहुजन स्वतःच्या हक्कावरच स्वार झाले असते. पण ही संधी त्यांच्या वारसदारानी गमावलीच आहे. यासंदर्भातली मांडणी या ग्रंथात अंकुश यांनी उत्तम केली आहे.

खराडे म्हणाले, आज जे काय आजूबाजूला चालले आहे त्यामुळे आपण फार गोंधळून गेलो आहोत. अशावेळी तेच प्रश्न उपस्थित करणाऱ्या हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून या ग्रंथावर काय बोलावे असा प्रश्न पडत राहतो. पण आपण बोललं पाहिजे. या दमणकारी व्यवस्थेत हस्तक्षेप करत राहिला पाहिजे. या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांनी प्रश्न लेखनाच्या स्वरूपात मांडले की ते लेखन वास्तवाला भिडते. मात्र समाजाने वाचक म्हणून अशा लेखनाला चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे. नाहीतर ते प्रश्न त्या ग्रंथापुरतेच मर्यादित राहतील. याचेही भान आपण ठेवायला हवे.

यावेळी अंकुश कदम, योगेश सपकाळ यांनीही विचार व्यक्त केले. महेश पेडणेकर यांनी प्रस्तावना केली तर संतोष पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading