April 24, 2024
painful reality of rural life in Pakalya
Home » पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव
मुक्त संवाद

पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव

जे जे भोगले आणि जगले ते अनुभव म्हणजे आत्मकथन. माझ्या मते डॉ. खंडेराव शिंदे यांचे पकाल्या हे आत्मकथन म्हणजे वास्तविक जीवनाचे खरेखुरे उदाहरण आहे. कारण हे पुस्तक वाचताना जणू माझेच अनुभव आहेत असेच मला वाटत होते, माझ्या जीवनातील अनेक प्रसंग मला खुणावत होते.

शहाजी ज्ञानेश्वर वाघमारे
जवाहर नवोदय विद्यालय, पुणे
मु पो तुळशी, ता. माढा (सोलापूर )
9552975242

पकाल्या हे आत्मकथन वाचताना काही वेळेला तर आपोआपच मन भरून आले, डोळ्यांत पाणी आले. मग तो तीन भावंडामधील एका भाकरीचा प्रसंग असो, भाकरी नाही म्हणून नुसतीच खाल्लेली भाजी असो किवा फक्त मिरचीच्या ठेच्याचा खाल्लेला गोळा असो. किंवा खाऊच्या आशेने आडवे गेल्यानंतर निंबाच्या झाडाला टांगलेले, हे प्रसंग मनाची कालवाकालव करून सोडतात.

मुळातच तुळशी हे गाव पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे, त्यामुळे पाऊस पडला तरच पिकते. परंतु या गावातील मागासवर्गीय समाजाची अवस्था तशी फार वाईटच म्हणावे लागेल. त्यामुळे अर्थातच आपणाला याच्या बऱ्याच झळा बसल्या हे आत्मकथनाच्या पानोपानी जाणवत आहे.
परंतु परिस्थितीपुढे नमते न घेता आपण तिच्यावर स्वार झालात आणि ध्येयापर्यंत पोहचलात. आणि आई वडिलांनी ही पडेल ते काम केले आणि आपणाला शिकवले.

परंतु, काहीवेळला घरात भाकरीला पीठ नसायचं, दादा किंवा आप्पाच्या घरून उसनं पीठ आणावं लागायच, पण उसणंपासन किती करायचं म्हणून फक्त मीठ लावून भाजी खाण्याची वेळ आली आणि एकदा तर मशीत शहा गुरुजी शिकवत असताना लेखकाची झालेली वांती किंवा अंजना आणि भगवानचे भाकरी भाकरी म्हणून रडणे असे अनेक प्रसंग मन पिळवटून टाकतात.

तुळशीतील मोरे गुरुजींचा लाकडाचा अड्डा असेल, चौथी व सातवीची मोडनिंब केंद्रावरील परीक्षा, म्हसोबा व त्याची निघणारी पालखी , बाषू भय आणि इतरांचे ढोल वाजवणे , दत्तू गुरुजींच्या मुलीचे लग्न , तेथील शेती, मातंग समाजातील भांडण, पोपट डॉक्टरांचा दवाखाना, विशिष्ट समाजातील लोकांचे केस न कापण्याची गावातील न्हाव्यांची वाईट पद्धत, दिवाळी सण, नळा कामावर जाणे व अडचणी, नानांचं आजारी पडणे असे अनेक प्रसंग आपण जीवंतपणे रेखाटले आहेत. ते मनाला अंतर्मुख करतात, खूप भावतात.

तुळशीत आरज्या चांभाराचं पोरगं म्हणून ओळख असणारे लेखक तुळशीचा निरोप घेवून पकाल्या जेव्हा पुढील शिक्षणासाठी माळशिरसला जातो, तेव्हा तेथे ही त्याची दारिद्र्याने पाठ सोडली नाही म्हणून तेथेही लेखकाला कधी मावशीच्या शेतावर किंवा इतर शेतावर काम करावे लागले. प्रसंगी विहिरीवर कामाला जावे लागले, हॉटेलात ही वेटर ते पातेले घासण्यापर्यंत काम करावे लागले परंतु कॉलेजला गेल्यानंतर तेथे मानेसर व इतर प्राध्यापकांचे मिळालेले मार्गदर्शन लेखकाच्या जीवनाला पुरुन उरेल. एवढी शिदोरी मिळाली आणि त्यातूनच विद्यापीठात एम ए करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

कोल्हापूरला हाल अपेष्टांत दिवस काढत व मित्रांच्या सहवासात मदत घेत भरपूर अभ्यास करून ‘ तुला येथून माघार घेवून चालणार नाही, जर माघार घेतली तर तू जीवनात यशस्वी होणार नाही ‘ अशी मनाशी खूणगाठ बांधून मोठ्या आत्मविश्वासाने लेखक प्राध्यापक होतो. आणि वाचकालाही जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा देतो यात तीळमात्र शंका नाही.

१९६० नंतर मराठी साहित्यामध्ये दोन प्रभावी प्रवाह निर्माण झाले, ते म्हणजे ग्रामीण साहित्य आणि आंबेडकरी साहित्य ( दलित साहित्य ). पकाल्या हे आत्मकथन झालेल्या अन्यायाबद्दल बंड किंवा विद्रोह करत नाही तर जे वाट्याला आले ते स्वीकारत आहे, हे लेखकाने ही सांगितले आहे.
परंतु , लेखकाच्या वाट्याला जे जीवन आले ते त्यांनी जसेच्या तसे मांडून ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव येथे मांडले आहे. त्यामुळे हे आत्मकथन ग्रामीण साहित्याचा अविभाज्य भाग वाटते.

पुस्तकाचे नावः पकाल्या
लेखकः डॉ. खंडेराव शिंदे
प्रकाशकः निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – 9822472109, 9890554340
किंमतः ३५० रुपये

Related posts

शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन कसा हवा ?

भोगवटा : सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी अनुभव मांडणारा कथासंग्रह

अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर

Leave a Comment