December 18, 2024
25th Hornbill Festival paves the way for sustainability
Home » हॉर्नबिल महोत्सवाने शाश्वततेचा मार्ग केला सुकर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हॉर्नबिल महोत्सवाने शाश्वततेचा मार्ग केला सुकर

नासाडी नको, सुजाणतेने वापर करा : 25 व्या हॉर्नबिल महोत्सवाने शाश्वततेचा मार्ग केला सुकर

नवी दिल्‍ली – “उत्सवांचा महोत्सव” म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या  25 व्या हॉर्नबिल महोत्सवाने, यावर्षी शून्य-कचरा आणि एकल-वापर प्लास्टिक -मुक्त करून शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागालँडची समृद्ध संस्कृती, संगीत आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पर्यावरणपूरक कार्यक्रम व्यवस्थापनात  एक ठोस उदाहरण घालून देत आहे. दररोज भेट देणाऱ्यांची  संख्या 2 लाखांहून अधिक असल्यामुळे हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.

यावर्षी हॉर्नबिल महोत्सवाचे  उद्घाटन नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव जागतिक शाश्वतता उद्दिष्टांना अनुरूप असून याचा उद्देश भारतात पर्यावरण- स्नेही  कार्यक्रमांसाठी मापदंड बनणे हा  आहे. कचरा व्यवस्थापनाच्या कठोर पद्धतीची अंमलबजावणी करून आणि समुदायाला सहभागी करून घेऊन पर्यावरण संवर्धनाशी  सुसंगत  सांस्कृतिक उत्सव  कसा साजरा केला जाऊ शकतो याच वस्तुपाठ या महोत्सवाने घालून दिला आहे. महोत्सवाला शून्य-कचरा आणि एकल-वापर प्लास्टिक -मुक्त कार्यक्रम बनवण्यासाठी, अनेक प्रभावी उपायांचा अवलंब करण्यात आला.

पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नाच्या दिशेने स्ट्रॉ, डिस्पोजेबल प्लेट्स, कप आणि प्लास्टिक पिशव्यांसह एकदा वापरण्याच्या सर्व प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, विक्रेत्यांनी बांबूचे स्ट्रॉ, जैव-विघटन होण्यास सक्षम  कटलरी, पानांचा वापर केलेल्या  प्लेट्स आणि कागदी पिशव्या यांसारखे शाश्वत  पर्याय वापरणे आवश्यक होते, जे पर्यवर्ण-स्नेही  आणि विघटन होणारे  दोन्ही आहेत. या पर्यायांमुळे कचरा कमी करण्यात मदत झाली आणि हरित, स्वच्छ पर्यावरणाला चालना मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समर्पित अंमलबजावणी चमू  आणि स्वयंसेवकांनी या अनुपालनासाठी या ठिकाणी  देखरेखीत सक्रियपणे सहभागी झाले. त्यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला, त्यांना  मार्गदर्शन केले आणि मान्यताप्राप्त सामग्री वापरली जात आहे याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी केली.  अभ्यागतांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकतेला  प्रोत्साहित करण्यासाठी शैक्षणिक माहिती फलक लावण्यात आले तसेच जागरुकता मोहिम देखील राबवण्यात आली, ज्यामुळे शाश्वततेप्रति बांधिलकी  अधिक मजबूत झाली.

एक सर्वसमावेशक कचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापन करण्यात आली, ज्याची सुरुवात उगमस्थानी कचरा वर्गीकरणापासून झाली. ओल्या, सुक्या आणि पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्यासाठी लेबल लावलेले  डबे प्रत्येक  ठिकाणी ठेवण्यात आले होते, प्रशिक्षित स्वयंसेवक अभ्यागतांना योग्य विल्हेवाट लावण्यास आणि वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करत आहेत . एक समर्पित सुका कचरा वर्गीकरण केंद्र गोळा केलेल्या सामग्रीवर प्लॅस्टिक, कागद, काच आणि धातू यांसारख्या वर्गवारीत प्रक्रिया करते आणि  पुनर्वापरयोग्य वस्तू अधिकृत केंद्रांना पाठवतात. कंपोस्टिंग युनिट्स वापरून ओल्या कचऱ्यावर  तिथल्या तिथे  प्रक्रिया केली गेली, ज्यामुळे कंपोस्ट तयार झाले ज्याचा लाभ स्थानिक शेतजमीन  आणि समुदाय बागांना होईल, परिणामी एक चक्राकार  कचरा व्यवस्थापन मॉडेल तयार झाले.

कचरा आणखी कमी करण्यासाठी, खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये पुन्हा वापरता येण्याजोगी तसेच विघटन होऊ शकणाऱ्या घटकांपासून बनवलेली भांडी वापरली जातात उदाहरणार्थ केळीची पाने आणि उसाच्या मळीपासून बनवलेल्या प्लेट्सचा वापर केला जातो तर अभ्यागतांना त्यांची स्वतःची भांडी आणण्यासाठी किंवा पुन्हा वापरण्यायोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी उत्सवाच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी सोय केली असून अभ्यागतांना त्यांच्या स्वत:च्या पुन्हा वापरता येण्याजोग्या बाटल्या आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, तसेच त्यांना बाटल्या रिफिल करता येण्याजोगे पर्याय देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, हॉर्नबिल महोत्सवाच्या ठिकाणी 42 शौचालये बसवण्यात आली, त्यातील 36 मोरुंग (खाद्य क्षेत्र) आणि 6 सार्वजनिक ठिकाणी होती. संपूर्ण कार्यक्रमात या स्वच्छतागृहांची नियमितपणे स्वच्छता आणि देखभाल करण्यात आली. महोत्सवात शाश्वत वर्तनाला चालना देण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संप्रेषण मोहिमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संपूर्ण कार्यक्रम स्थळी माहितीपर संदेश लावण्यात आले होते, त्यामुळे इथे भेट देणाऱ्यांना पर्यावरणपूरक पद्धती अंगिकारण्याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले आणि व्यावहारिक माहिती मिळाली. याव्यतिरिक्त, शून्य-कचरा प्रोटोकॉल म्हणजे काय याबाबतचे ज्ञान उपस्थितांना झाले आहे का आणि ते त्यांचे पालन करतात का याची खात्री करण्यासाठी स्वयंसेवकांनी तिथल्या तिथेच जागरुकता सत्रे आयोजित केली.

हॉर्नबिल महोत्सवाच्या शून्य-कचरा दृष्टिकोनामुळे पर्यावरणावर महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम झाले आहेत, विशेषत: एकल वापर  प्लास्टिक (SUP) कचरा कमी करण्याच्या दृष्टीने याचा अतिशय उपयोग झाला. दररोज सुमारे एक लाख एकल वापर प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर रोखण्यात आला आणि या दहा दिवसांच्या महोत्सवात अशा सुमारे एक दशलक्ष वस्तूंचा वापर होण्यापासून थांबवण्यात यश आले, त्यामुळे या परिसरातील प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यात हातभार लागला. याव्यतिरिक्त, एकल वापर प्लॅस्टिकवर बंदी आणल्याने उत्सवात सुमारे 50 मेट्रिक टन पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन होण्याचे टाळण्यात आले. ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास हातभार लागला. तसेच लागणाऱ्या सर्व पर्यावरण स्नेही वस्तूंची खरेदी  स्थानिक बाजारपेठेतून केल्याने वाहतूक-संबंधित उत्सर्जन आणखी कमी झाले. शिवाय, प्लॅस्टिक कचरा रोखून, या महोत्सवाने मिथेन आणि इथिलीन, या शक्तिशाली हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यात मदत केली, अशा प्रकारे जागतिक हवामान उद्दिष्टांशी ताळमेळ राखत नागालँडमधील हवेची गुणवत्ताही सुधारली. या महोत्सवात  वर्गीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली होती तसेच पुनर्वापराला प्रोत्साहन देऊन, कागद, काच आणि धातू यांसारखे पुनर्वापरयोग्य साहित्य अधिकृत केंद्रांकडे पाठवून, संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले आणि ऊर्जेचा  वापर कमी करून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यात आले.

नागालँडमधील हॉर्नबिल महोत्सवातील शून्य-कचरा उपक्रमाचे यश जगभरात मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी एक आदर्श म्हणून काम करू शकते. सण, मैफिली आणि सार्वजनिक मेळाव्यात अशा प्रकारच्या उपायांचा अवलंब करून, आपण पर्यावरणीय पाऊलखुणा लक्षणीयरित्या कमी करू शकतो, परिसंस्थांचे संरक्षण करू शकतो आणि हवामान बदलाचा मुकाबला करू शकतो. हा उपक्रम म्हणजे केवळ नागालँडसाठी एक मोठे यश नाही तर हवामान बदल आणि प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात जागतिक समुदायासाठी घालून दिलेला हा एक उज्ज्वल वस्तुपाठ आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading