February 29, 2024
Production considering the importance of jaggery
Home » गुळाचे महत्त्व विचारात घेऊन उत्पादनाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळाचे महत्त्व विचारात घेऊन उत्पादनाची गरज

साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी उसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन कृषीतज्ज्ञ प्रा. अरूण मराठे यांनी व्यापारी गुळ उत्पादनासंदर्भात आपले विचार मांडले आहेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

गेल्या काही वर्षात साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सहकारी साखर कारखान्याबरोबरच खासगी साखर कारखानेही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. काही आजारी सहकारी साखर कारखाने खासगी तत्त्वावरही चालवण्यास देण्यात येत आहेत. अशाने ऊसाची लागवडही झपाट्याने वाढत आहे. २०१९-२० मध्ये ८.२२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. तर २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली. सुमारे ४० टक्क्यांनी हे क्षेत्र वाढले आहे. २०२० मध्ये राज्यात नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने १७५ आहेत पण त्यातील केवळ ८० ते १०० कारखानेच सुरु होते.

गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढणारा साखर उद्योग विचारात घेता गुऱ्हाळघरांची संख्या मात्र झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे. यामागची कारणेही अनेक आहेत. काही वर्षापूर्वी राज्यात सुमारे चार हजार गुऱ्हाळघरे होती. यातील सुमारे ११०० गुऱ्हाळघरे ही कोल्हापूर जिल्ह्यात होती. पण आता कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम १३० ते २०० गुऱ्हाळ घरेच राहीलेली आहेत. सांगली जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. शिराळा तालुक्यात शंभरावर गुऱ्हाळघरे होती. पण २०१९ च्या पुरानंतर मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. पुरामुळे गुऱ्हाळ घरांचे मोठे नुकसान होते. दुरुस्तीसाठी किमान तीन चार लाख रुपये खर्च करावे लागतात. त्यातच मजूरांची टंचाई यामुळे हा व्यवसाय यंदाही उभारी घेणार का याबाबत मात्र शंकाच आहे.

गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहीले जाते. वर्षाला सुमारे ३० लाख गुळ रव्यांचे सौदे होतात. अंदाजे २७० कोटींची उलाढाल होते. यातून सुमारे १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. असा हा व्यवसाय गेल्या काही वर्षात मात्र अडचणीत सापडला आहे. याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण देशातील गुळ पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इराण, अरब देश, श्रीलंकेसह जगभरातील सुमारे ४४ देशात निर्यात केला जातो. गुळ उत्पादन खर्च कमी करून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी उसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन कृषीतज्ज्ञ प्रा. अरूण मराठे यांनी व्यापारी गुळ उत्पादनासंदर्भात आपले विचार मांडले आहेत. प्रा. मराठे यांच्या मते, गुळाला असणाऱ्या जगभरातून मागणीचा विचार करून गुळाच्या उत्पादनात अनेक मोठे फेरबदल करणे गरजेचे आहे. नवेतंत्रज्ञान त्यामध्ये आणणे गरजेचे आहे. गुळाचा दर्जा राखण्यात आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रसायनांचा अती वापर, गुळ उत्पादनात साखरेचा वापर या अशा आरोग्यासाठी घातक असणाऱ्या अनेक कारणांनी गुळ उद्योगासमोर आव्हाने उभी राहीली आहेत. या सर्वाचा विचार करून दर्जेदार गुळ निर्मितीवर भर देण्याची गरज आहे.

प्रा. मराठे यांच्या मते, गुळ उत्पादकांनी आधुनिक तंज्ञाने उत्पादन करणे गरजेचे आहे. उसाचा रस काढण्यासाठी वापरण्यात येणारे चरके हे लाकडी व लोखंडी असतात. त्यामधून ५२ ते ६२ टक्केच रस गाळला जातो. पण आता नव्या पद्धतीच्या चरक्यातून ७० ते ७५ टक्क्यांपर्यत रसाचे गाळप करता येते. चरके आणि आतील लाटा या लोखंडी असल्याने रसामध्ये हे लोखंड उतरते व यामुळे गुळ काळा पडतो. यासाठी आता क्रोमियमचे वेस्टन असणाऱ्या चरक्याचा वापर केला जात आहे. उसाच्या रसांची गाळणी सुद्धा स्टेनलेसस्टीलची वापरणे गरजेचे आहे. अशा या बारीकसारीक गोष्टी विचारात घेऊन उत्तम प्रतीच्या गुळाचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे.

गुळाचे आरोग्यदायी उपयोग विचार घेता गुळाचे आहारातील महत्त्व हे कायम राहणार आहे. गुळामुळे रक्ताची शुद्धी होते. उत्तम पचन क्रियेसाठी, थकवा दूर करण्यासाठी ऊर्जा स्त्रोत म्हणून तसेच सांधेदुखीवर आरामदायी म्हणून गुळाचा वापर केला जातो. गुळामुळे अर्धशिशी थांबते, सर्दी-खोकल्यावरही गुणकारी आहे. वजन कमी करण्यासाठीही गुळाचा वापर केला जातो. गुळाने रक्तक्षय टळतो. लोहाची कमतरता असणाऱ्या स्त्रियांसाठी गुळाचा आहारात वापर उपयुक्त ठरतो. त्वचा व केसाच्या आरोग्यासाठीही गुळाचे सेवन केले जाते. यामुळे गुळाची बाजारपेठ ही न संपणारी आहे. हे लक्षात घेऊन गुळाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहायला हवे.

Related posts

Photos : गडहिंग्लज पुरस्थिती…

अहंकार असावा, पण कशाचा ?

प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More