📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 19, 2026
मुक्त संवाद

वंचितांच्या न्यायासाठी संघर्षाची मशाल पेटवणारी पंचशीला कुंभारकर !

पंचशीला कुंभारकर गेली अनेक वर्षे दलित, आदिवासी, महिला आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढत आहेत. सामाजिक न्याय, कायदेविषयक जनजागृती आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे.

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..९

संघर्ष माणसाला खचवतोच असे नाही, तर त्याच संघर्षातून स्वतःची ओळख घडवण्याचे बळही मिळते. बारावीपर्यंतचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि संसाराचा गाडा सांभाळत पंचशीला कुंभारकर यांनी सामाजिक कार्याची वाट निवडली. गेली अनेक वर्षे दलित, आदिवासी, महिला आणि वंचित घटकांवरील अन्यायाविरुद्ध लढत, संविधानिक हक्कांसाठी त्यांची धडपड सुरू आहे. पीडितांना न्याय मिळवून देणे, महिलांना स्वावलंबनाची जाणीव करून देणे आणि अन्यायग्रस्तांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देणे, हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे. स्वतःच्या संघर्षाचे सामर्थ्यात रूपांतर करून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या पंचशीला कुंभारकर म्हणजे एक कर्तृत्ववान नवदुर्गा!

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

काही महिला संधीचे सोने करतात, आपले कर्तृत्व सिध्द करतात म्हणूनच त्या समाजात लक्षणीय ठरतात. त्यासाठी शिक्षण कमी असले तरीही स्वानुभव, स्वावलंबन, आत्मविश्वास, समाजाप्रती तळमळ, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यातील समस्या, प्रश्न याचे ज्ञान या बळावर १२ वी झालेल्या पंचशीलाताई आज समाजात सन्माननीय ठरल्या. त्या आज राज्य समन्वयक व संघटक – NCDHR (National Dalit Movement for Justice – NDMJ) महाराष्ट्र, ओजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष, राज्य समन्वयक व संघटक – NDMJ महाराष्ट्रात गेली २७ वर्षे कार्यरत आहेत. अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा),घरगुती हिंसाचार कायदा,दलित महिलांवरील हिंसा (VADW) व विविध लिंगांवरील हिंसा याविषयातील अनेक प्रश्न त्या हाताळतात.

‘वडील PWD मध्ये नोकरीला होते. दोन भावात एकुलती एक बहीण असल्याने अतिशय लाडात वाढल्याने संघर्ष म्हणजे काय, परिस्थितीशी दोन हात करणे म्हणजे काय, याची खरी जाणीव माहेरी झाली नाही. मात्र लग्नानंतर संघर्षाचे अनेक अर्थ समजले आणि त्यातूनच व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा मिळाली’ असे त्या सांगत होत्या.

त्यांचा आंतरजातीय विवाह झाल्याने मनात भीती होती; परंतु सासूबाईंचाही आंतरजातीय विवाह झालेला असल्याने अत्यंत सन्मानाचे आणि मोकळे वातावरण त्यांना मिळाले. सासरच्या कुटुंबात पुरुषप्रधानता, पितृसत्ताक मानसिकता फारशी प्रबळ नव्हती. त्यामुळे ताईंना स्वयंनिर्णयासाठी, शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी कायम प्रोत्साहन मिळाले. पती राजेश यांनीही परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण मध्येच थांबल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली आणि एलएल.बी. पूर्ण करून आज ते वकील म्हणून कार्यरत आहेत. मुलगी सध्या एलएल.बी.करत आहे, तर मुलगा ११ वीत शिकत आहे. मुलांना पाळणाघरात ठेवून कामासाठी बाहेर पडावे लागत असे. एका बाजूला लहान मुलं, दुसऱ्या बाजूला पतीचे शिक्षण, घरची जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि सामाजिक काम करण्याची असलेली तळमळ या सगळ्यांची सांगड घालणे हे रोजचे आव्हान होते.

कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून ताई नोकरी करत होत्या. परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जे शक्य होते ते केले. मात्र या सगळ्या प्रवासात सामाजिक काम करण्याची इच्छा ताईंनी कायम जिवंत ठेवली.बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये काम करत असताना सामाजिक कार्याची खरी दिशा मिळाली. २००० साली ॲड. असुंता पारधे यांनी त्यांच्या संस्थेत सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर ताईंनी त्याचसाली ‘चेतना महिला विकास केंद्र’ या संस्थेच्या स्वयंसहाय्यता गटातून सामाजिक कार्याची सुरुवात केली.

२००४ पासून त्यांनी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत वंचित महिला व पुरुषांच्या हक्कांसाठी काम केले. असंघटित कामगार क्षेत्रात क्षमता विकास व कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. २००६ ते २०१४ दरम्यान त्यांनी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) मध्ये समुदाय सल्लागार म्हणून काम केले आणि HIV/AIDS जनजागृतीसाठी योगदान दिले. २००४ पासून त्यांनी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत वंचित महिला व पुरुषांच्या हक्कांसाठी काम केले आहे.

असंघटित कामगार क्षेत्रात क्षमता विकास व कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. २००६ ते २०१४ दरम्यान त्यांनी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) मध्ये समुदाय सल्लागार म्हणून काम केले आणि HIV/AIDS जनजागृतीसाठी योगदान दिले.

२०११ मध्ये ताईंनी व त्यांची मैत्रीण वंदना सोनावणे या दोघींनी माणिक रत्न मल्टीपर्पज सोशल सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड, आळंदी, पुणे शहर व ग्रामीण भाग व खेड परिसरात सामाजिक काम उभे करण्याचा प्रयत्न केला. महिलांशी, वंचित घटकांशी आणि समाजातील गरजू लोकांशी जोडल्या गेल्या.

२०१४ पासून ताईंनी स्वतंत्रपणे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या संघटनेचे काम सुरू केले. सामाजिक न्याय, दलित आणि वंचित समुदायांचे हक्क, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे समाजात परिवर्तन घडवून आणणे हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू बनला.

२०१६ पासून त्यांनी NDMJ सोबत कार्य सुरू केले. गेली २६ वर्षे त्या दलित व आदिवासींवरील अत्याचारांविरोधात लढत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या तथ्य शोध मोहीम राबवून न्यायासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, POCSO कायदा, POSH कायदा याविषयी समुदाय शिक्षण केले आहे. तसेच दलित मानवाधिकार रक्षक, बालहक्क, लिंग-संवेदनशील कार्यशाळा आणि युवकांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्या राज्य यंत्रणा, आयोग, जिल्हा दक्षता समित्या, विधी सेवा प्राधिकरण, पोलीस ठाणे इत्यादींशी समन्वय साधून पीडितांना नुकसानभरपाई, पुनर्वसन, रोजगार व शासकीय योजना मिळवून देतात.

‘माझ्यासाठी सामाजिक कार्य हे केवळ एक काम नाही; ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कधी एखाद्या पीडित कुटुंबासोबत उभे राहणे, कधी महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, कधी कायद्याबाबत जनजागृती करणे, तर कधी प्रशासनासमोर सामान्य माणसाचा आवाज मांडणे या प्रत्येक अनुभवाने मला अधिक सक्षम केले.’ असे ताई सांगतात.

आई, पत्नी, नोकरी करणारी महिला आणि सामाजिक कार्यकर्ती या सगळ्या भूमिका एकाच वेळी समर्थपणे निभवायचा प्रयत्न त्या करत होत्या. प्रत्येकवेळी कुटुंबाची साथ मिळाली. विशेषतः त्यांच्या पतीने त्यांच्या सामाजिक कार्याला दिलेले सहकार्य अनमोल आहे. त्यामुळे ताईंच्या स्वप्नांना बळ मिळालं. परिस्थितीसमोर हार न मानता स्वतःची ओळख ताईंनी निर्माण केली.

‘आर्थिक परिस्थिती कठीण असताना नोकरी करणे, मुलांना सांभाळत काम करणे, पतीच्या शिक्षणाला साथ देणे, स्वतःचे सामाजिक कार्य सुरू ठेवणे आणि नंतर स्वतंत्रपणे सामाजिक क्षेत्रात काम उभे करणे हे सर्व निर्णय माझ्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेली पावले होती. स्वावलंबन म्हणजे केवळ स्वतः कमावणे नाही. स्वतः निर्णय घेणे, त्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणे, अन्यायासमोर न झुकणे आणि आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवणे म्हणजे स्वावलंबन.’ अशी साधी सोपी व्याख्या ताई करतात व ते कृतीत अवलंबतात.

आज ताई सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, दलित व वंचित समुदायांचे हक्क, संविधानिक मूल्ये आणि कायद्याची जनजागृती या क्षेत्रात काम करतात. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पडाव्यात यासाठी काम करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देणे आणि संविधानाने दिलेले अधिकार प्रत्यक्ष जीवनात पोहोचवणे हा ताईंच्या कामाचा केंद्रबिंदू आहे.

परिस्थिती कठीण असली तरी स्वप्नं सोडायची नसतात. आजही मला वाटते की माझ्या आयुष्यातील संघर्ष हा माझा कमकुवतपणा नसून माझी ताकद आहे. त्या संघर्षाने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले, निर्णय घ्यायला शिकवले आणि इतरांच्या संघर्षात त्यांच्यासोबत उभे राहण्याची ताकद दिली. माझ्यासाठी यश म्हणजे केवळ स्वतः पुढे जाणे नाही; तर माझ्यासोबत इतर महिलांनी, वंचितांनी आणि अन्यायग्रस्तांनीही पुढे यावे, हीच माझ्या आयुष्याची खरी दिशा आहे.’ असा संदेश त्या समाजातील सर्व महिलांना देतात.

ताईंना आंतरराष्ट्रीय स्तरावर UK-स्थित “Sisters for Change” संस्थेसोबत दलित महिलांवरील हिंसा (VADW) प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे अनेक वंचितांसाठी ताई आशेचा किरण ठरल्या आहेत. ताईंना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल सन्मान, राष्ट्रीय समाज सेवा पुरस्कार, अखंड मराठी न्यूजचा महात्मा ज्योतिबा फुले समता पुरस्कार, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस महाराष्ट्र, सातारा सम्राट समाज रत्न पुरस्कार, Present to Our DHRD, त्यागमूर्ती रमाबाई पुरस्कार, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साठे जयंती महोत्सव सन्मान चिन्ह, भारतरत्न सी.सुब्रमण्यम समाजसेवा पुरस्कार दिल्ली असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अशा गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजासाठी जनजागृती करत त्यांचे हक्कांची जाणीव करून देणाऱ्या, पायाला भिंगरी लावून समाजासाठी तळमळीने कार्यरत असणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा पंचशीला ताईंना मानाचा मुजरा..!!

पंचशीला कुंभारकर- 93733 65309

Related posts

आनंदभान (अभंगसंग्रह ) : एक सामाजिक जाणिवेचा अमृत कुंभ

महाराष्ट्राच्या बालसाहित्याचा समग्र ज्ञानकोष – ‘चांदा ते बांदा’ समीक्षा ग्रंथ Marathi Children’s Literature : Chanda Te Banda

Navratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406