October 6, 2024
One Pome in 28 Marathi boli Language
Home » Privacy Policy » एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !
व्हायरल

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये!

हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार

  • मकरंद करंदीकर ( आभार..राजेंद्र बापट, वॉशिंग्टन आणि अवंती कुलकर्णी )

विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी) मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे.

🙏🏻 विठ्ठल 🙏🏻
(मूळ कविता)
पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥

✍️ ©️विंदा करंदीकर

🎯 *इट्टल*

(नगरी बोली)
पंडरपुरच्या येसिपासी
हाये येक छुटी साळा
सर्वी पोरं हायेत गुरी
योक मुल्गा कुट्ट काळा
दंगा कर्तो मस्ती कर्तो
खोड्या कर्ण्यात बी आट्टल !
मास्तर म्हंती करनार काय ?
न जानू ह्यो आसन इट्टल !!!
🖊 काकासाहेब वाळुंजकर, अहमदनगर

🎯 *इट्टल*

(मराठवाडी बोली)
पंडरपूरच्या येशीपशी
हाय बारकी साळा एक
सगळी पोरं हायत गोरी
कुट्ट काळं त्येच्यात एक
आगावपणा करतंय पोराटगी करतंय
आवचिंदपणाबी करण्यात हाय
आट्टल…
गुरजी मनत्यात करावं काय?
एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!
🖊 डॉ.बालाजी मदन इंगळे, उमरगा

🎯 इठ्ठल

(लेवा गणबोली)
पंढरीच्या येशीपाशी
आहे एक छोटुशी शाया
सर्वे पोऱ्हय गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यात आहे अट्टल
मास्तर म्हने करे काय
न जानो अशीन इठ्ठल
🖊 प्रशांत धांडे, फैजपूर

🎯 ईठ्ठल

(अहिराणी रुपांतर)
पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम्दा पोरे शेतस गोरा
एक पोर्‍या किट्ट काया ||
दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो ?
ना जानो हुई ईठ्ठल ||
✍️ नितीन खंडाळे, चाळीसगाव

🎯 इठ्ठल

(तावडी अनुवाद)
पंढरपूरच्या येसजोय
आहे एक छोटी शाया
सम्दे पोरं आहेती गोरे
एक पो-या कुट्ट काया ll
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या क-यामधी आहे अट्टल
मास्तर म्हनता करनार काय?
ना जानो असीन इठ्ठल ll
✍️ प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे, जळगाव

🎯 *इठ्ठल*

(बागलाणी अहिराणी)
पंढरपूर नी येसपन
शे एक उलशी शाळा
सर्वा पोऱ्या गोरापान
येकच पोरगा कुट्ट काळा!
दंगा करस मस्ती करस
खोड्या काढा मा शे अट्टल
मास्तर म्हणतस करवा काय
न जाणो व्हयी इठ्ठल!
🖊 वैभव तुपे, इगतपुरी

🎯 इठ्ठल


(आदिवासी तडवीभिल बोली)
पंढरपूरची शिवंजवळं
ह एक लहानी शायी
सबन पोऱ्हा हती गोऱ्या
एक पोऱ्या ह कायाकुच
गोंदय करतो मस्ती करतो
खोळ्या करवात ह अट्टल
मास्तर म्हणतंहती करशान काय ?
कोणाल माहित हुईन इठ्ठल
🖊 रमजान गुलाब तडवी

– बोरखेडा खुर्द ता. यावल

🎯 विठ्ठल

( वऱ्हाडी बोली )
पंढरपूरच्या येशीजोळ
लहानचुकली शाळा हाये;
सबन लेकरं हायेत उजय
यक पोरगं कायंशार॥
दांगळो करते, मस्त्या करते
खोळ्या कर्‍याले अट्टल.
गुर्जी म्हंतात कराव काय?
न जानो अशीन विठ्ठल ॥
✍️ अरविंद शिंगाडे, खामगाव

🎯 इठ्ठल

(वऱ्हाडी अनुवाद)
पंढरपूरच्या वेसीजोळ
आहे एक लायनी शाळा
सारी पोर आहेत गोरी
एकच पोरगा डोमळा ॥
दंगा करते, दांगळो करते
खोळ्या करण्यात आहेत
पटाईत…
मास्तर म्हणते कराव काय
न जाणो अशीन इठ्ठल ।।
✍️ लोकमित्र संजय, नागपूर

🎯 *इठ्ठल* (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी
यक हाय बारकीशी शाला
सगली पोरा हायीत गोरी
यक पोऱ्या कुट काला।।
दंगा करतंय मस्ती करतंय
खोऱ्या करन्यान हाय
अट्टल…
मास्तर बोलतान कराचा काय?
नायतं तो हासाचा इठ्ठल!
✍️ तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)

🎯 *इट्टल*

(मालवणी अनुवाद)
पंडरपूराच्या येशीर
एक शाळा आसा बारकी।
एकच पोरगो लय काळो:
बाकीची पोरां पिटासारकी।।
दंगो करता धुमशान घालता;
खोड्ये काडण्यात लय अट्टल।
मास्तर म्हणतंत करतंलास काय?
हयतोच निगाक शकता इट्टल।।
✍️ मेघना जोशी, मालवण

🎯 इठ्ठल

(पारधी अनुवाद)
पंढरपूरना आगंमांग
छ येक धाकली शाया ;
आख्खा छोकरा छं गोरा
यकजच छोकरो कुट्ट कायो!!
वचक्यो छं मस्त्या करस
खोड करामं छं अट्टल
मास्तर कवस करानू काय ?
कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल !!
✍️ प्रविण पवार, धुळे

🎯 इठ्ठल

(बंजारा अनुवाद)
पंढरपूरेर सिमेकन,
एक हालकी शाळा छ!
सारी पोरपोऱ्या गोरे,
एक छोरा कालोभुर छ!
दंगो करचं मस्ती करचं!
खोडी करेम छ अट्टल!!
मास्तर कचं कांयी करू?
काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!
✍️ दिनेश राठोड, चाळीसगाव

🎯 *विठ्ठल*

(वंजारी अनुवाद)
पंढरपुरना हुदफर
हे एक बारकुली शाळ
हंदा पाेयरा हे गाेरा
एक पाेयराे निववळ काळाे
केकाटत ,मसती करत
खाेडयाे करवामा हे अटट्ल
मासतर केत करवानाे काय
न जाणाे हिवानाे विठठ्ल
✍️ सायली पिंपळे, पालघर

🎯 विठ्ठल

(हिंदी अनुवाद)
पंढरपूर नगरमें द्वारसमीप
है एक अनोखी पाठशाला
सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के
एक बच्चा भी हैं काला…।
उधम मचाये मस्तीमे मगन
है थोड़ा सा नटखटपन
गुरुजन कहे क्या करे जो
हो सकता हैं विट्ठल…।
✍️ सुनिल खंडेलवाल, पिंपरी चिंचवड़, पुणे

🎯 विट्टल

(कोळी अनुवाद)
पंढरपूरश्या वेहीवर ,
एक हाय बारकी शाळा।
जखली पोरा गोरी गोरी।
त्या मनी एक हाय जाम काळा।
दन्गो करता न मस्तीव करता
खोडी करनार अट्टल।
न मास्तर हानता काय करु
न जाणो यो हयेन विट्टल।
✍️ सुनंदा मेहेर, माहीम कोळीवाडा मुंबई

🎯 इठ्ठल

(आगरी अनुवाद)
पंढरपुरचे हाद्दीव,
हाय येक बारकीच शाला.
सगली पोरा हान गोरी,
येक पोर जामुच काला.
उन्नार मस्ती करतय जाम,
खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.
गुरूजी सांगतान करनार काय,
नयत त आसल तो इठ्ठल.

✍️ निलम पाटील बिलालपाडा,नालासोपारा

🎯 *विट्टल*

(झाडीबोली)
पंढरपूराच्या सीवेपासी
आहे एक नआनसी स्याळा
सर्वी पोरे आहेत भुरे
एक पोरगा भलता कारा
दंगा करतो मस्ती करतो
गदुल्या करण्यात अव्वल
मास्तर म्हणत्ये करणार काय ?
न जानो असल विट्टल !
✍️ रणदीप बिसने, नागपूर

🎯 *इठ्ठल*

(परदेशी बोली)
पंढरपुरका येशीपास
हय एक छोटी शाळा
सब पोर्ह्यान हय गोरा
एक पोऱ्यो कुट्ट काळो
दंगा करं मस्ती करं
खोड्या करबामं हय अट्टल
मास्तर कहे कई करू ?
कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल
🖊 विजयराज सातगावकर, पाचोरा

🎯 विठ्ठल

(पोवारी बोली )
पंढरपूरक् सिवजवर
से एक नहानसी शाळा
सप्पाई टुरा सेती गोरा
एक टुरा से भलतो कारा
दिंगा करसे मस्ती करसे
चेंगडी करनो मा से अव्वल
मास्तर कव्हसे का आब् करू?
नही त् रहे वु विठ्ठल !!
✍️ रणदीप बिसने, नागपूर

🎯 विठ्ठल

(कोकणी सामवेदी बोली)
पंढरपूरश्या वेहीपा
एक बारकी शाळा हाय
आख्ये पोरे गोरेपान
पान एकूस काळोमस
खूप दंगोमस्ती करत्ये
खोडयो काडण्यात अट्टल
मास्तर हांगात्ये,
का कऱ्यासा,
कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??
🖊 जोसेफ तुस्कानो, वसई

(झाडीपट्टी)
पंढरपूरच्या शिवं जवडं
यक छोटी शाडा
सर्वे पोट्टे हायेत भुरे
यक पोट्टा कुट्ट काडा
धिंगाने करते,मस्ती करते
खोड्या कराले हाये अट्टल
मास्तर म्हनतेत का करू बाप्पा
कोन जानं असन विट्टल।।
-माधवी
≠===================
पंढरपुराच्यें बाहांर आहें
बारकी एकुस साला
आखुटच पोयरें पांडरे-गोरे
एकुस होता काला
भरां करं मस्ती हों तों
भरां करं दंगल
गुर्ज्या म्हन् करांस काय?
आसंल जर्का विठ्ठल
(वारली)

…मुग्धा कर्णिक

विठ्ठल (चित्पावनी)

पंढरपुराचे शीमालागी
से एक इवळीशी शाळा
सगळीं भुरगीं सत गोरीं
एक बोड्यो काळीकुद्र कळा

बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे
किजबिट्यो काढसे हो अव्वल
मास्तर म्हणसे कितां करनार?
देव जाणे, सएल विठ्ठल

– स्मिता मोने अय्या (गोवा)

-वाडवळी बोली
-केळवे माहीम

पंढरपुरश्या येहीवर
हाय एक बारकी हाळा
तटे हात जकली पोरं गोरी
एक पोरं घणा काळा
दंगा करते मस्तीव करते
खोड्या करव्या हाय अट्टल
मास्तर बोलते करव्याह का?
कोणला माहीत अहेल इठ्ठल।।

– गौरव राऊत,

ही दखनीत : (जिला बागवानी म्हणूनही ओळखतात इथे.)

पंढरपूरके हदकने
हय एक न्हन्नी इस्कूल
सब छोरदा हय गोरे
एक हय काला ठिक्कर
दंगा कर्ता मस्ती कर्ता
खोड्या कर्नेमें हय आट्टल
मास्तर बोल्ता कर्ना क्या
भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल

— इर्शाद बागवान
आदिलनिजामकुतुबशहा जेथे होते तेथे ही भाषा तेथील मुस्लिम समाजात बोलली जाते.

यातील पेठी वर्जन म्हणजे हैदराबादेतले मुसलमान आपसात बोलतात ती भाषा (धर्माचा उल्लेख केवळ भाषा कुणाच्यात बोलली जाते याकरता) असं म्हणतात. दखनीभाषेत साहित्यनिर्मितीही झालेय.

आदिवासी पावरी बोली..
(नंदूरबार जिल्हा, धड़गाव तालुका

आदिवासी पावरी बोली)
पंढरपूरन हिवारोपर,
एक आयतली शाला से
अख्खा पुऱ्या
काकडा से
एक सुरू से
जास्ती (जारखो) काल्लो
कपाली करतलो,
मस्ती करतलो
चाड्या करण्याम
से आगाडी पे !
काय करजे ?,
मास्तर कोयतलो,
काय मूंदु ,
ओहे इटलो ? (विठ्ठल)

  • योगिनी खानोलकर
    ≠=======================
    आऊटसाइड पंढरपुर
    देर इजे स्मॉल स्कूल
    ऑल द किड्स आर व्हेरी फेअर
    एक्सेप्ट फॉर वन ब्लॕक डुड
    फनी अँड ट्रबल मेकर
    ही इजे ब्रॕट ऑफ हायेस्ट ऑर्डर
    टीचर सेज व्हॉट टु डु?
    माइट बी अवर ओन विठु
    (भाषांतरकार समीर आठल्ये)

संकलन– सचिन कुळकर्णी


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading