हे विश्व माझे घर आहे अशा विचार या भारतीय संस्कृतीत पाहायला मिळतो. भारतातील विविध प्रमुख भाषांना जोडणारी एक भाषा आहे. ती म्हणजे संस्कृत. संस्कृतमधील भगवतगीतेचा विचार, रामायणाचा विचार भारतातील विविध भाषात पाहायला मिळतो. यात जगण्याचे तत्वज्ञान, आचारसंहिता आपणास घालून दिलेली आहे. ही आचारसंहिता, हे तत्वज्ञान सर्वच भारतीय प्रमुख भाषांना एकत्र आणते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।। २१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढनिश्चय झालेला असतो, फार काय सांगावें ! सर्व स्थावरजंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगानें आपणच बनला आहे.
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध प्रांत, विविध राज्ये, त्यांच्या विविध भाषा, विविध लिपी, पोशाखातील विविधता, बोलीतील विविधता या सर्वातून निर्माण झालेले विविध सांस्कृतिक विचार अशी एक ना अनेक प्रकारची विविधता येथे पाहायला मिळते. इतके असूनही येथे ऐक्य पाहायला मिळते. कारण या मातीतील अध्यात्मिक विचार या सर्वांना एकत्रिच बांधून ठेवतो आहे. सर्व विश्वालाच एक कुटुंब, एक घर, एक परिवार समजण्याचा विचार या संस्कृतीत रुजलेला आहे. अनेक राजवटी या देशात झालेल्या पाहायला मिळतात. कारण जगा व जगू द्या या विचाराने इतरांनाही मुक्तपणे राज्य करण्याचा अधिकार येथे देण्यात आला. राजे घराण्यांच्या वंशावळी पाहिल्यास त्यामध्येही विविधता पाहायला मिळते. कोठे ते राजस्थानी वाटतात तर कोठे महाराष्ट्रीयन मराठे वाटतात. विविध भाषांचा अभ्यास करून त्यांना एकत्रित बांधून राज्य करण्याचा, स्वराज्य उभा करण्याचा मनसुबा त्यांच्या विचारात असल्याचेही पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांची राजवट ही दक्षिणेतही दिसते अन् उत्तरेतही पाहायला मिळते. विविध जाती, धर्माचे, पंथाचे लोकही त्यांच्या राज्यकारभारात असल्याचे पाहायला मिळते. म्हणजेच या राजवटींनी इतरांनाही आपल्यात सामावून घेऊन राज्य विस्ताराचा विचार केलेला पाहायला मिळतो. इतिहासात सत्ता संघर्ष ही पाहायला मिळतो. पण सत्याचा रक्षणार्थ, धर्माच्या रक्षणार्थ हा संघर्ष पाहायला मिळतो.
हे विश्व माझे घर आहे अशा विचार या भारतीय संस्कृतीत पाहायला मिळतो. भारतातील विविध प्रमुख भाषांना जोडणारी एक भाषा आहे. ती म्हणजे संस्कृत. संस्कृतमधील भगवतगीतेचा विचार, रामायणाचा विचार भारतातील विविध भाषात पाहायला मिळतो. यात जगण्याचे तत्वज्ञान, आचारसंहिता आपणास घालून दिलेली आहे. ही आचारसंहिता, हे तत्वज्ञान सर्वच भारतीय प्रमुख भाषांना एकत्र आणते. मी ब्रह्म आहे. मी आत्मा आहे. हे मानवतेचे सर्वज्ञाकडे नेणारे तत्वज्ञान या सर्वच भाषेत पाहायला मिळत असल्याने व हा विश्वाचा विचार असल्याने या संस्कृतीला अमरत्व प्राप्त झाले आहे. अनेक राजवटी येतील अन् जातील पण येथील विश्व कल्याणाचा विचार, अध्यात्मिक विचार मात्र कायम राहाणारा आहे. कारण तोच या सास्कृतिक विविधतेला एकत्र जोडून ठेवतो आहे.
रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी यांनी मांडलेला विश्वभारती, आंतरभारतीचा विचार हा यावरच आधारित असल्यासारखे वाटते. कारण भारतातील विविध भाषा, बोलींमध्ये सरमिसळ झाल्याची पाहायला मिळते. बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरीचा विचार केल्यास यामध्ये वऱ्हाडी भाषेतील अनेक शब्द आहेत. तर कन्नड भाषेचाही प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. विविध भाषेतील शब्द यांची सरमिसळ पाहायला मिळते. आता तर इंग्रजी भाषेचा सर्वत्र प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. मराठीमध्येही सरसकट इंग्रजी भाषेचा वापर होऊ लागला आहे. काही वर्षांनतर हे काही शब्द हे इंग्रजीतून मराठीत आल्याचे पाहायला मिळेल. म्हणजेच भाषांमध्ये होणारी शब्दांची मिसळ यातून त्या भाषेचा ऱ्हास होईल असे मानने योग्य वाटत नाही. हो कदाचित ती भाषा शुद्धतेच्या पातळीवर योग्य राहणार नाही पण त्यातील साहित्यातून, त्यातील विचारातून त्या भाषेचा विकास हा नियमित होतच राहाणार आहे. यासाठी भाषेचा विस्तार अन् प्रसार होण्यासाठी भाषेत चांगल्या विचारांच्या साहित्याची निर्मिती ही होत राहीली पाहीजे म्हणजे ती भाषा शाश्वत होत राहाते.
विश्वालाच घर मानणारी भाषा सर्व विश्वभर पसरू शकते. हा विचार सर्वत्र अमलात आणू शकते. यातून त्या भाषेचा विकासही होऊ शकेल. संपूर्ण विश्वात ती भाषा विस्तारू शकते. यासाठी या विचाराचे स्वराज्य उभे राहायला हवे. असा हा एकसंघतेचा विचार अनेक भारतीय भाषात पाहायला मिळतो. यामुळेच स्वराज्य उभारणीच्या कामात या मुद्द्यावरच भर देऊन सर्व विश्वात हा विचार रुजवायला हवा. मानवतेचा संदेश देणारी ही संस्कृती, विश्वाला कवेत घेणारी ही संस्कृती जोपासण्यासाठी तशा विचारांचे स्वराज्य आज उभे राहील्यास देश निश्चितच जगात महासत्ताक होईल यात तिळमात्र शंका नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.