January 19, 2025
prakash-medhekar-article-on-chaturshringi-temple
Home » चार शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेली – चतु:शृंगी
मुक्त संवाद

चार शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेली – चतु:शृंगी

चतु:शृंगी देवी पुणे शहराची आराध्य देवता आहे. चतुर म्हणजे चार आणि शृंगी म्हणजे शिखर. चार शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेली म्हणून चतु:शृंगी. भक्तगण याच देवीला महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती , अंबरेश्वरी म्हणतात. पूर्वाभिमुख असणारे  देवीचे हे मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.

प्रकाश मेढेकर,
 पुणे

सप्तशृंगीची प्रतिमा – चतु:शृंगी माता

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारे पुणे शहर चहुबाजूंनी निसर्गरम्य  टेकड्यांनी वेढले आहे.  या प्रत्येक टेकडीचा इतिहास वेगवेगळा आहे. पुण्याच्या पश्चिमोत्तर असणारी सावित्रीबाई फुले विद्यापीठा जवळील टेकडी साऱ्या पंचक्रोशीत आज चतु:शृंगी देवीची म्हणून ओळखली जाते.  टेकडीवरील देवीचे प्राचिन मंदिर शहराच्या वैभवात भर घालते तसेच येणाऱ्या भक्तांचे आणि पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. चतु:शृंगी देवी पुणे शहराची आराध्य देवता आहे. चतुर म्हणजे चार आणि शृंगी म्हणजे शिखर. चार शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेली म्हणून चतु:शृंगी. भक्तगण याच देवीला महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती , अंबरेश्वरी म्हणतात. पूर्वाभिमुख असणारे  देवीचे हे मंदिर शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. मंदिरापर्यंत पोचण्यास भक्तांना अंदाजे एकशे सत्तर  पायऱ्या चढून वर जावे लागते. या पायऱ्यांची रचना प्रशस्त असून चढाच्या प्रत्येक टप्प्यांवर विश्रांती घेता येते. डावीकडील पहिल्या टप्प्यावर गणेश मंदिर आणि उजवीकडील  शेवटच्या टप्प्यावर दुर्गा मातेचे मंदिर आहे. सर्वात शेवटी चतु:शृंगी मातेच्या मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिरात उजवीकडे नगारखाना, पिण्याचे पाणी आणि प्रसाद वाटपासाठी जागा आहे. देवीचा गाभारा चांदीच्या नक्षीकामाने सजवला असून तिचे मुख वणीच्या सप्तशृंगी देवीची प्रतिमा आहे.

मंदिराचा इतिहास

या मंदिराचा इतिहास  देवीभक्तांची श्रद्धा वृद्धींगत करणारा आहे . १७ व्या शतकात पुणे शहरावर पेशव्यांचे अधिराज्य होते. पेशव्यांच्या अनेक पिढ्यांपैकी नानासाहेब पेशव्यांचा तो काळ . त्या काळात दुल्लभशेठ पितांबरदास महाजन नावाचे श्रीमंत व्यापारी पुण्यात सावकारी करत होते. वणीच्या सप्तशृंगी देवीचे ते परमभक्त होते. दरवर्षी चैत्री पौर्णिमेला सप्तशृंगी गडावर देवी दर्शनासाठी ते जात असत. म्हातारपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अखंडितपणे त्यांचा हा प्रवास चालू होता. शरीर थकल्यावर  त्यांनी देवीला विनवले की आता तुझे दर्शन मला शक्य होणार नाही. आपल्या भक्ताची हाक देवीने एकली आणि एका रात्री स्वप्नात प्रकट होऊन त्यांना दृष्टांत दिला. “ भक्ता तू चिंता करू नकोस , मीच आता तुझ्या जवळ येऊन वास्तव्य करणार आहे ”. देवीने ते ठिकाण त्यांना सूचित केले. ती जागा  म्हणजेच सध्याची चतु:शृंगीची टेकडी. दुल्लभशेठ यांनी टेकडीवर जाऊन त्या जागी खोदकाम केले असता देवीची स्वयंभू मूर्ती त्यांना सापडली . टेकडीवरील याच ठिकाणी देवीचे मंदिर बांधण्याचे त्यांनी ठरवले. आनंदाने हर्षित होऊन चतु:शृंगी देवीची नाणी तयार करून व्यवहारात आणली. त्याकाळात मंदिर परिसर गर्द वनराईने वेढलेला होता. आज याच परिसरात काळानुरूप आमुलाग्र बदल घडला आहे. फक्त मुख्य  रस्त्यावरून मंदिराचा कळस दिसत असे तसाच तो आजही दिसतो.  सुरवातीच्या काळात मंदिराचे व्यवस्थापन दुल्लभशेठ पहात असत. नंतर दस्तगीर गोसावी यांनी काही वर्षे मंदिराची देखभाल पाहिली . पुढील काळात अनगळ कुटुंबियांनी मंदिर आणि परिसराच्या जमीनीची खरेदी केली . सध्या अनगळ कुटुंबाची पाचवी पिढी मंदिर आणि परिसराचे व्यवस्थापन सांभाळत आहे. देवीची रोजची पूजाअर्चा, महापूजा, भक्तांचे अभिषेक ,  आरती , नैवेद्य , होमहवन, ,नवरात्र उत्सव ई. अनेक गोष्टी अनगळ कुटुंबीय आणि चतु:शृंगी देवस्थान ट्रस्ट तर्फे होत असतात.

नवरात्र उत्सव

नवरात्राची महती अतिशय उद्बोधक आहे.  अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी हे  नऊ दिवस देवी आणि महिषासुराचे अखंडित युद्ध सुरु होते. नवमीला महिषासुराचा वध करून दशमीला ती सीमोल्लंघनास निघते. युद्धात दमलेली देवी दसरा ते पोर्णिमा विश्रांती घेऊन कोजागिरीला पुन्हा जागृत होते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घट हे पृथ्वी स्वरूप समजले जाते. घटाच्या बाजूने मातीत धान्य पेरून पुढील वर्षभर धनधान्याची भरभराट व्हावी आणि आरोग्य निरोगी व्हावे अशी प्रार्थना देवीजवळ  केली जाते. नऊ दिवस देवी जागृत असल्यामुळे तीचे रूप अधिक तेजस्वी असते.  नवरात्रात प्रत्येक दिवशी देवी नवदुर्गांच्या विविध रुपात प्रकट होत असते . ही रूपे म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कुश्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी ,कालरात्री,  महागौरी आणि सिद्धीदात्री.  नवरात्रात देवी समोर अखंडित तेलाचा दिवा लाऊन  फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात.  वस्त्र आणि अलंकाराने सजवून तिची महापूजा केली जाते. अष्टमीला महालक्ष्मीपूजन आणि नवमीला देवीमंत्राचे होमहवन केले जाते . नऊ दिवस देवीची पूजा अर्चना करण्यामुळे देवी प्रसन्न होऊन भक्तांना तिची कृपा , आशीर्वाद लाभतो.

  मंदिर परिसर

 देवस्थान ट्रस्टने  मंदिर परिसराचे  केलेले व्यवस्थापन  वाखाणण्याजोगे आहे . मंदिर प्रांगणाच्या सुरवातीला भक्तांच्या स्वागतासाठी भव्य कमान उभारली आहे. प्रांगणात ट्रस्टचे ऑफिस, उपहारगृह, पार्किंग , खुले प्रेक्षागृह, स्वच्छतागृहे , पिण्याचे पाणी , कचराकुंडी,  पूजाअर्चा साहित्यांची दुकाने,भक्त निवास, विश्रामगृह ई. गोष्टींची सुविधा कायमस्वरूपी  केली आहे.  इतर परिसर कारंजे, लॅन्डस्केप , आसन व्यवस्था यांनी सुशोभित केला आहे. पर्यावरण प्रेमींनी टेकडीवर  हजारो वृक्षांची लागवड केली असून त्यांचे संवर्धन केले जाते.  देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व परिसराची नियमितपणे देखभाल होत असते. संपूर्ण परिसरात त्यामुळे चैतन्याची वेगळीच अनुभूती भक्तांना जाणवते. प्रांगणात आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध उपक्रम होत असतात . शारीरिक व्यायाम , योगसाधना , ध्यानधारणा यांचा अनेक साधक लाभ घेतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रांगणातील वातावरण अधिक पवित्र आणि मंगलमय असते. याची अनुभूती प्रत्येकाने एकदातरी घेतली पाहिजे.  यावर्षी  ट्रस्टने भाविकांसाठी दोन कोटी रुपयांचा विमा दुर्घटना संरक्षणासाठी उतरवला आहे . नवरात्र दर्शनासाठी देवस्थानच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पास उपलब्ध होणार आहेत . यावर्षी  मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची सुरवात झाली असून २०२४ पर्यंत  टप्प्याटप्प्याने भविष्यात संपूर्ण काम पूर्ण होणार आहे .


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading