📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 20, 2026
फोटो फिचर

महिलांच्या न्यायासाठी पेटली संघर्षाची मशाल; सत्यभामा सौंदरमल यांची धगधगती कहाणी

दारूबंदीचा लढा, महिला अत्याचारांविरोधात संघर्ष आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास! सत्यभामा सौंदरमल यांनी ग्रामीण महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनासाठी उभारलेली प्रेरणादायी चळवळ जाणून घ्या.

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..१०

अन्यायाची झळ स्वतः सोसली, पोलिस कोठडीचा धाक अनुभवला; पण त्या अनुभवांनी खचून जाण्याऐवजी सत्यभामा सौंदरमल यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द उराशी बाळगली. ग्रामीण भागातील महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि दारूच्या विळख्यात उद्ध्वस्त होणारे संसार यांविरोधात त्यांनी संघर्षाची मशाल पेटवली. महिलांना एकत्र आणून गावोगावी दारूबंदीची चळवळ उभी केली, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचे रूपांतर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात करणाऱ्या, रूढी-परंपरांना धाडसाने प्रश्न विचारणाऱ्या आणि संकटांपुढे न झुकणाऱ्या सत्यभामा सौंदरमल म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीचा बुलंद आवाज!

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

मानवी स्वभावाप्रमाणे कोणीही कोणाच्या प्रेमात पडू शकते त्याप्रमाणे सत्यभामाताईंची ती ग्रामीण ढंगाची बोली भाषा व सहजतेने मांडलेला एक सामाजिक प्रश्न त्यावरील भाष्य ऐकले व मी त्यांच्या प्रेमात पडले. त्यांचे स्त्रीवादी विचार, कामाची पध्दत, गोरगरीब, उपेक्षित, वंचितांसाठी त्या विविध प्रश्नांवर उठवत असलेला आवाज व त्याची सरकार दरबारीसुध्दा घेतली जाणारी दखल हे सारं कौतुकास्पद होतं.

माजलगाव तालुक्यातील सादोळा इथल्या सत्यभामाताई चार बहिणी, एक भाऊ अशा कुटुंबात वाढल्या. वडिल मुंबईत मजुरीला होते. बायको-मुलांना वाऱ्यावर सोडून त्यांनी तिथंच दुसरं लग्न केलं. १९८३-८४ साली आई मुलांसह माहेरी परतली. मुली अडाणी राहू नयेत, त्यांच्यावर आपल्यासारखी वेळ येऊ नये, म्हणून आई-आजीनं शिक्षणाचं महत्व ओळखून मुलांना शाळेत घातलं. १९९९ साली ताईंनी दहावीची परीक्षा दिली. सुट्टीत आई, आजीसोबत शेतात मोलमजुरीचं काम करू लागली. पण वयात आलेल्या सत्यभामावर गावातल्या टवाळखोरांची नजर पडली. या धनदांडग्यांना तिनं कडाडून विरोध केला. परिणाम म्हणून चोरीचा आळ घेऊन मायलेकीला त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. सत्यभामा तीन दिवस कोठडीत राहिली.

बालमनावर दहशत पसरली. दलित–सवर्ण वादाला तोंड फुटलं. तिथं मानवी हक्क अभियानाचे ॲड. एकनाथराव आवाड, बाबूराव पोटभरे त्यांच्यासोबत आल्याने थोडं पाठबळ मिळालं. सुटका झाल्यानंतर सत्यभामा पेटून उठली. ॲड. आवाड यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तिनं काम सुरू केलं. त्यांना विरोध झाला पण यातूनच सावरत, धीट होत त्यांनी आपले काम सुरुच ठेवले. समाजकार्याची प्रेरणा ताईंना आजीकडूनही मिळाली होतीच. आजी गावात आलेल्या वेड्या महिलांची मदत करत असे. बीड जिल्ह्यातील एक मुलगी मुंबईत वेड्या व्यवसायात विकली होती, तिला सोडवण्यासाठी आजीने मुंबई बसस्थानकावर चंदा मागून तिकीटाचे पैसे गोळा करून तिच्या आई वडीलांचा पत्ता शोधत तिच्या घरच्यांची समजूत काढत तिला आईवडीलांच्या सुपुर्द केलं होतं. ही इमानदारी आणि नैतिकता ताईंना आजीकडून शिकायला मिळाल्याचे ताई सांगत होत्या.

सत्यभामा सांगतात, ‘‘लहानपणापासूनच आई, आजी यांचं एकाकी जीवन पाहत होते. कर्त्या पुरूषाचा आधार नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन फौजदार व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यामुळे अगोदर लहान बहिणीचं लग्न केलं. दहावीनंतर पाच वर्षे माजलगावला समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं. लहानपणीच आघात झाल्यानं धीटपणा वाढला, परंतु बाहेर पडण्याला बंधनं आली. यातच आई, आजीने लग्न उरकून टाकण्याची घाई केली.’’ नात्यातीलच स्थळ बघितलं. पहिलं लग्न झालेल्या, वयाने मोठ्या पुरुषाशी लग्न ठरलं. ठामपणानं सत्यभामानं या लग्नाला नकार दिला आणि लहान बहिणीचा दीर नारायण डावरे याच्याशी त्यांनी २००४ साली लग्न केलं. मात्र अन्याय, अत्याचाराविरूद्ध लढण्याची वृत्ती तिला गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे सासरी भाऊबंदांच्या दडपणाखाली येऊन नवऱ्यानं विरोध केला.

सन २००६ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीनं गोदावरीला महापूर आला. गावागावांत पाणी शिरलं. सरकारनं सोय केली आणि गाव स्थलांतरीत झाला. तिथंही सत्यभामा मदतीला पुढं झाली. भावकीतील लोकांनी साथ दिली. या कामामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. इथूनच तिनं ॲड. एकनाथ आवाड यांच्या मानवी हक्क अभियानाचं पूर्णवेळ काम सुरू केलं. स्त्री-पुरूष समानता प्रकल्पावर काम केलं. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरोधात लढा सुरू केला. पती-पत्नींमधील वादाची कारणं ती शोधू लागली. सत्यभामा सांगतात, ‘‘घरगुती हिंसाचारात दारू मुख्य कारण असल्याचं जाणवलं. म्हणून दारूबंदीचा लढा सुरू केला. २०१६ मध्ये माजलगावला दारूबंदीसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं. पोलिस विभागाच्या महिला दक्षता समितीचं सदस्यत्व मिळालं. त्यामुळे अधिक अभ्यास करता आला. लऊळ गावातील महिला दारूबंदीसाठी पुढे झाल्या. गावभर पाटीलकी करत फिरणारे ‘नवरोबा’ काबाडकष्ट करणाऱ्या बायकोला कशी मारझोड करतात’’ हे इथं प्रत्यक्ष पाहिलं.

हा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी त्या महिलांचीच मोट बांधली. दारू जमिनीत गाडलेली, ती काढण्यासाठी हातपंप बसवलेले. संसाराची राखरांगोळी होत असलेल्या महिलांनी साथ दिली. त्यामुळे पोलिसांना सोबत घेऊन आठ ते दहा वेळा लऊळला हातभट्टी, दारूचे हातपंप उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ किट्टीआडगाव, वारोळा, पुरचुंडी, कवडगाव घोडा, कवडगाव हुडा या ठिकाणी दारूबंदी करण्यात यश मिळवलं. दारूवर महिलांनी वचक निर्माण केला. तेव्हा दारूबंदी समित्या नव्हत्या. यासाठी देशी, हातभट्टी दारूचे बॅरल घेऊन महिलांसह ताईंनी उपोषण केलं. परंतु परिणाम झाला नाही. पोलिस ठाण्यासमोर दारूविक्रीची दुकानं थाटली. तत्कालिन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली.

त्यांनी तालुकास्तरावर अवैध देशी, हातभट्टी दारूबंदी समित्या नियुक्त केल्या. कौटुंबिक छळाच्या सुमारे ७०-८० केसेस समुपदेशनाने मिटवल्या. त्यांनी विविध प्रश्नांवर लोकचळवळ उभारली. ताईंचा कामाचा झपाटा पाहून पती नारायण यांची मदत त्यांना मिळू लागली. निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेचं कार्यालय माजलगावच्या केसापुरी वसाहतीत सुरू केले. त्या स्त्रीवादी विचारसरणीच्या असल्याने लग्नानंतरही त्यांनी आपले नाव बदलले नाही व सौभाग्यालंकारही गावात असूनही घातले नाही. त्या सतत रूढी परंपरा विषयी विद्रोही विचार मांडत राहिल्या. आपल्या दोन मुलींना त्या अशाच धाडसी व नीडर बनवत आहेत.

ताई आज बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या असून त्या विशेषतः महिला अत्याचार, सामाजिक अन्याय आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे कार्य मुख्यतः ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नांवर केंद्रित आहे. ग्रामीण भागात काम करणे किती अवघड आहे हे पाहाता त्यांनी ती अनवट वाट आपल्या प्रामाणिकपणा, संघर्ष व कृतीतून सोपी केली.

महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गट, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे. गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी मदत, शाळेत जाण्याबाबत जागृती. गावातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याविरोधात भूमिका घेऊन प्रशासनापर्यंत प्रश्न पोहोचवणे. ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे, स्वच्छतेबाबत जनजागृती अशा विविध पातळीवर त्या कार्यरत आहेत. सन २०२३ साली त्यांच्या घरावर हल्ला होऊनही त्या नीडरपणे व धाडसाने अन्याय, अत्याचार व विविध प्रश्नांवर गप्प न बसता सतत आवाज उठवत असतात. चळवळ त्यांच्या रक्तात नव्हे तर अनुभवाने वृत्तीत भिनलीय असेच म्हणावे लागेल. आज बीड भागात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा तर उमटवलाच आहे पण एक प्रकारची दहशत सुध्दा निर्माण केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्या अनेकदा महाराष्ट्र व इतर राज्यात अनेक ठिकाणी व्याख्याने, पेपरवाचन व पुरस्कार स्वीकारण्यासाठी जातात. या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आजवरच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना संघर्ष योध्दा, समाजगौरव, महिला गौरव, अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. अशा धाडसी, नीडर, बीड व गेवराई जिल्ह्यातील बुलंद तोफ समजल्या जाणाऱ्या, आपले कर्तृत्व सिध्द करून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या आधुनिक दुर्गा सत्यभामा ताईंना मानाचा मुजरा..!!

सत्यभामा सौंदरमल
9527463565

Related posts

खोकला विरोधी औषधी वनस्पती…

जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन निर्माण करणारा कवितासंग्रह म्हणजे…..प्रतिबिंब !!!

फाल्गुनातील बंजारा होळी उत्सव !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406