July 27, 2024
Tathawade fort Santoshgad near Phaltan article by Arun Borhade
Home » फलटणजवळील ताथवड्याचा संतोषगड
पर्यटन

फलटणजवळील ताथवड्याचा संतोषगड

महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भूगोलातही गडकिल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गिरीभ्रमंती करणाऱ्यांना तर आयुष्यभर भटकंती करुनही या किल्ल्यांचे, दुर्गांचे वेड कमी होत नाही. प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य वेगळे असते. त्याचा इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्वही वेगळे असते. ते अभ्यासणे त्या किल्ल्यांचे संवर्धन करणे आता युवापिढीचे कर्तव्य आहे.

अरुण तुकाराम बोऱ्हाडे

मोशी, ता. हवेली, जि. पुणे

फलटणजवळील ताथवड येथील संतोषगडावर जाण्याचा योग आला. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, पांडुरंग शिंदे आणि लखन घाडगे हे “सागरमाथा” संस्थेचे गिर्यारोहक बरोबर होते. तसा हा मध्यम श्रेणीतील साधारणपणे २९०० फूट उंचीवरील किल्ला. मात्र इतिहासकाळात दक्षिण -पूर्व भागावर लक्ष ठेवण्यासाठी याची कामगिरी महत्त्वाची होती. हा किल्ला म्हसोबा डोंगररांगेत वसलेला. सिताबाईचा डोंगर, वारूगड, वर्धनगड, महिमानगड हे येथून नजरेच्या टापूत आहेत.

गडावर जाताना वाटेत थोडाफार झाडोरा असल्याने उन्हाचा त्रास होत नाही, तशी चढणही सोपी आहे. पण डोईला टोपी असलेली चांगली. किल्लाबाहेरील टप्प्यात तटबंदी दिसते. जागोजागी भुयारे खोदलेली दिसतात. महाद्वार मोडकळीस आलेले, अर्थात अर्धेबहूत अस्तित्वात आहे. येथील दगड संपूर्ण काळा खडक नाही, अन् पूर्ण जांभाही नाही. साधारणपणे तांबूस पिवळसर असा दिसतो.

आमच्या बरोबर स्थानिक उत्साही गडप्रेमी कार्यकर्ता कपिल शिंदे हाही होता. तो सांगत होता. ‘ या किल्ल्याचे दरवाजासह सर्व अवशेष मातीत गाडले गेले होते. पुण्यातील दुर्गसंवर्धन संस्थेने पुढाकार घेऊन, स्थानिक युवकांच्या मदतीने व पुरातत्व खात्याच्या सहकार्याने माती दगड काढून सर्व स्वच्छ व नजरेस येतील असे केले. हे काम जवळपास तीन-चार वर्षे चालू होते.’ गडावर गेल्यावर धान्य कोठारांचे बांधकाम, राजसदर, वाड्यांचे पडलेले अवशेष आदी दिसतात. इमारतींची जोति मात्र भक्कम दिसतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक भली मोठी चौकोनी आकाराची विहिर किंवा बारव पाहण्यासारखी आहे. तीही गाडली गेली होती. आता त्याचे उत्खनन करून तिला पुन्हा उर्जीतावस्था आणलेली आहे. तिला आता भरपूर पाणी आहे. गडावरील विविध पक्षी, वानरे आदी वन्य जीवांसाठी आणि झाडाझुडपांसाठी ती मोठी संजीवनी ठरली आहे.

विहिरीत खालीपर्यंत पायऱ्या खोदलेल्या आहेत, त्या विहिरीत शंकराचे लहानसे देऊळ बांधलेले आहे. विहिरीच्या पाठीमागील बाजूस मोठा चिलखती बुरुज आहे. त्याच्या पोटातून बाहेरील कोटात जाण्याचे दरवाजेही आता खुले केले आहेत. तेथूनच एक छोटीशी चोरवाट किंवा गुप्तवाट दिसते. पुन्हा वरती येवून पुर्वेकडील बुरूजातून खाली उतरताना खूप सावधानतेने उतरावे लागते. उभ्या सरळसोट निमूळत्या कातळातील खोबणीत पाय देऊन उतरले तर धोका नाही. यावाटेत पुढे महालक्ष्मीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच पश्चिमेकडे सरकत गेले की एक आश्रम आहे. तिथे डोंगराच्या पोटात खोदलेली गुहा आणि पाण्याचे टाके दिसून येते.

गडाच्या पायथ्याला वसलेला लहानसा ताथवडा गाव येथून छान नजरेत भरतो. गावातील बालसिद्धनाथाचे, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, त्यावरील आकर्षक रंगरंगोटी, गावाभोवतालची हिरवीगार शेती आणि दूरवर दिसणारा मोकळा प्रदेश पाहून मन हरपून जाते. गावाला लागूनच काळोजी शिंदे या योद्ध्याची समाधी आहे. परत येताना गावातच कपिल शिंदेच्या घरी मैद्याच्या कानोळ्या (करंज्या) खाऊन तृप्त झालो. सहजपणे सहकुटूंब हसतखेळत पाहता येण्याजोगा हा किल्ला फलटणपासून अठरा वीस किलोमीटर अंतरावर आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुटुंबाच्या आरोग्यासाठी हवे देशी गायींचे संगोपन

मनातच अहिंसा असेल तर…

अमृताच्या समुद्रात बुडण्याची भिती कसली ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading