मृत्यूचा सोनेरी सापळा !
२०५० पर्यंत खनिज तेलापैकी २० टक्के तेल प्लास्टिक निर्मितीसाठी वापरले जाईल असा संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये ११ जूनला हवामान बदलासंदर्भात जागतिक परिषद होत आहे. यात प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालावी यासाठी तज्ज्ञ आग्रही आहेत.
डॉ. व्ही.एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जागतिक पर्यावरण दिन पाच जून रोजी साजरा झाला. या वर्षीच्या पर्यावरण दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्ती (Beat the Plastic Pollution) ही मध्यवर्ती संकल्पना दिली. प्लास्टिकने जगाला विळखा घातला आहे. हा विळखा हळहळू घट्ट आवळत आहे. संपूर्ण जीवसृष्टी विनाशाकडे वाटचाल करत आहे. आजही जगातील बहुतांश नेत्यांना याचे महत्त्व पटले तरी त्यांना हा विळखा सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. तसे केले तर निवडणुकांत त्यांना पराभव पत्करावा लागेल, असे वाटत असावे. प्लास्टिकने आपले जीवन सुखकर झाले, असे वाटते. मात्र आपण विषाला हाताळत आहोत, याची जाणीव सामान्यांना नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने सर्वच राष्ट्रांना प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन केले आहे.
आपण बिनधास्तपणे प्लास्टिक वस्तू, पिशव्या हाताळतो. प्लास्टिक वरदान असल्याच्या भ्रमात आपण आहोत. पेट्रोलजन्य पदार्थांपासून प्लास्टिकचे उत्पादन करतात. खनिज तेलाचे साठे संपत आहेत. ते संपल्यावर प्लास्टिकचे उत्पादन थांबणार आहेच. मात्र तोपर्यंत प्लास्टिक उत्पादनात मानवाने जी आघाडी घेतली आहे, ती पाहता, केवळ मानवच नव्हे तर, संपूर्ण जीवसृष्टीच संकटात आली आहे.
मानवाने स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी प्लास्टिक वापरण्यास सुरूवात केली. मात्र प्लास्टिकने सर्वांनाच आजाराच्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली. याचे गांभिर्य समजून घेण्यासाठी काही आकडेवारी पाहायला हवी. प्लास्टिकच्या शोधानंतर काही वर्षांतच त्याचा प्रसार झाला. या तंत्रज्ञानाचे केवळ फायदेच सांगण्यात आले. प्लास्टिक हाताळणे सोईचे असल्याने लवकरच लोकप्रिय झाले. प्लास्टिकचा वापर इतका वाढला की गत ७५ वर्षांत ८.५ अब्ज टन प्लास्टिकचे उत्पादन झाले. प्लास्टिक उत्पादनात अर्थातच अमेरिका आघाडीवर आहे. जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे. म्हणजेच आजवर प्रतिमाणशी एक टन प्लास्टिकचे उत्पादन झालेले आहे. एक मिलीमीटर प्लास्टिकचे विघटन होण्यास ४००० वर्षे लागतात. म्हणजे आजवर उत्पादित करण्यात आलेल्या प्लास्टिकचे निसर्गत: विघटन झालेले नाही. यापैकी केवळ ९ टक्के प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवण्यात आले किंवा पुनर्वापर झाला. संशोधकांच्या मते १२ टक्के प्लास्टिक जाळण्यात आले.
जाळल्यानंतर जमिनीवरील प्लास्टिक नष्ट झाले तरी त्यातून बाहेर पडलेले विषारी वायू आपल्याभोवती पिंगा घालत, वातावरणात फिरताहेत. तीन टक्के प्लास्टिक समुद्राच्या पाण्यात मिसळले आहे. ते मिठाच्या रूपातून पुन्हा आपल्या पोटात यायला सज्ज असते. उर्वरित ७६ टक्के प्लास्टिक जगभर कचऱ्याच्या ढिगाच्या रूपात साठलेले आहे. ते अन्न पाणी आणि हवा या सजीवांसाठीच्या मूलभूत घटकांमध्ये मिसळून सर्व सजीवांच्या शरीरात शिरत आहे. माणसाची आकडेवारी उपलब्ध नसली तरी, दरवर्षी सुमारे दहा लाख जलचर प्लास्टिकमुळे जीव गमावत आहेत. संशोधकांच्या मते अन्न, पाणी आणि हवेतून दर आठवड्याला पाच ग्रॅम मायक्रोप्लास्टिक मानवाच्या शरीरात जाते. यातून अनेक आजार उद्भवतात. हे संकट दारात नसून पोटात शिरले आहे. हे हळूहळू भिनत जाणारे विष आहे. त्याचे परिणाम तत्काळ दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा हल्ला झाल्यावर जग जसे एकवटले तसे प्लास्टिकच्या वापराविरोधात एकवटत नाही.
प्लास्टिक स्वस्त, हाताळण्यास सोपे, कमी वजनाचे, टिकाऊ असल्याने त्याचे तोटे लक्षात आले तरी, कोणी उत्पादन थांबवत नाही. अनेक देशांनी प्लास्टिक बंदी केली, तरी, त्या देशातही प्लास्टिकचा वापर १०० टक्के थांबलेला नाही. ते समुद्राच्या पाण्यासह सर्वत्र मुक्त संचार करू लागल्याने त्याचा त्रास थांबवण्यासाठी कोणा एका सरकारने नव्हे; तर, समग्र मानव जातीने स्वत:च प्रयत्न करायला हवेत. तसे होताना दिसत नाही. उलट आजही दर मिनिटाला एक ट्रक प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा संपूर्ण जीवसृष्टीसाठी घातक आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्षात प्लास्टिक नावाचे विष हाताळत आहोत; आपल्या मरणाशी खेळत आहोत. या सोनेरी मृत्यूच्या सापळ्याचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने या वर्षीच्या पर्यावरण दिनासाठी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव’ संकल्पना निवडली. या संकल्पनेला अनुसरून देश विदेशात मोठे कार्यक्रम होतील. मात्र अनेक कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरलेले असेल. निदान पाणी तरी प्लास्टिकच्या बाटल्यांतील असेल.
भारतात आजमितीला सुमारे ५० लाख टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा तयार झालेला आहे. दररोज १६,००० टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा सर्वत्र पसरलेला आहे. महाराष्ट्रात तयार होणारा कचरा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त म्हणजे दरवर्षी चार लाख टनांपेक्षा जास्त कचरा तयार होतो.
भारतासह जगातील सर्वच राष्ट्रांनी प्लास्टिक बंदीसाठी कठोर उपाय योजायला हवेत. आज पुनर्वापर न करता येणाऱ्या एकल वापराच्या प्लास्टिकवर न्यूझीलंड, चीन, युरोपियन देश आणि अमेरिका खंडातील काही देशांनी बंदी घातली आहे. भारतातही १ जुलै २०२२ पासून बंदी लागू झाली. अमेरिका आणि युरोपमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक एकल वापराचे मानले जाते. भारतात मात्र एकदा वापरून फेकून दिले जाणारे सर्व प्रकारचे प्लास्टिक एकल वापराचे मानले जाते. भारतातील एकल वापर प्लास्टिकची व्याख्या पाहता आज एकल वापराच्या प्लास्टिक बंदीचे काय होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
२०५० पर्यंत खनिज तेलापैकी २० टक्के तेल प्लास्टिक निर्मितीसाठी वापरले जाईल असा संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये ११ जूनला हवामान बदलासंदर्भात जागतिक परिषद होत आहे. यात प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालावी यासाठी तज्ज्ञ आग्रही आहेत. प्लास्टिकचे उत्पादन थांबवावे, अशी अनेक राष्ट्रांची, पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे. तर केवळ आजवरचा प्लास्टिक कचरा नष्ट करण्याचा ठराव करावा, असे दुसऱ्या गटाचे मत आहे. म्हणजे जुना कचरा संपवताना नव्या कचऱ्याची निर्मिती होऊ द्या, असेच म्हणायचे आहे. यावर सर्व राष्ट्रांमध्ये एकमत होण्याची चिन्हे नाहीत. याही पुढे जात विनी लाऊ यांनी समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या टायरच्या धुळीचाही विचार करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भातही ठराव करण्याची मागणी केली आहे. आज टायरपासून निघणारी धूळ कोणीच विचारात घेत नाही. मात्र त्यामुळे होणारे प्रदूषणही मोठे घातक असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. पूर्ण प्लास्टिक बंदीला अमेरिकेचा विरोध आहे. अमेरिकेने प्लास्टिक निर्मितीत मोठी गुंतवणूक केलेली आहे कारण आज प्लास्टिकचे सर्वाधिक उत्पादन अमेरिकेतच होते. एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यास अनेक राष्ट्रे तयार आहेत. मात्र संपूर्ण बंदीचा प्रस्ताव एकमताने स्विकारला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्पादन थांबत नसेल; तर आपणच प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.