‘दुर्गांच्या देशातून… ‘ चा हा तेरावा अंक आपल्या हातात देताना मनस्वी आनंद होत आहे. नेहमीप्रमाणेच पहिल्या बारा अंकांमध्ये समाविष्ट असलेल्या लेखकांव्यतिरिक्त अन्य २९ लेखकांचे लेख आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहेत. सह्याद्री, हिमालयाबरोबरच जगातील सहा वेगवेगळी शिखरे, तसेच काही संस्थांच्या संवर्धन व बचावाच्या कार्यासंदर्भातील लेख यात समाविष्ट आहेत. वैविध्यपूर्ण लेखांचा समावेश असलेला हा अंक आपल्याला निश्चितच आवडेल, याची खात्री आहे.
संदीप भानुदास तापकीर
संपादक, दुर्गाच्या देशातून….
‘श्रीनंदनंदन’ निवास, विठ्ठल मंदिरामागे वाघेश्वरवाडी,
मु. पो. चहोली बुद्रुक (आळंदी देवाचीजवळ), ता. हवेली, जि. पुणे ४१२१०५.
९८५०१७९४२१ / ९९२१९४८५४१ sandeeptapkir@rediffmail.com
आग्रा ते राजगड पायी प्रवासाचा चित्तथरारक वेध
अंकातील पहिला लेख ज्येष्ठ गिर्यारोहक असणाऱ्या कुलदीप तथा के. एन. देसाई यांचा आहे. १९७४पासून ते सह्याद्रीत भटकताहेत. त्यांनी ३८७ किल्ले पाहिले आहेत. ३७ वर्षे कराडच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये गणित व विज्ञान या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. गेली २५ वर्षे ते वारकरी संप्रदाय व व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्याचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना किल्ले दाखवणे, बाल संस्कार शिबिरांचे आयोजन करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, दुर्ग संमेलन आयोजन करण्यात पुढाकार घेणे अशा वैविध्यपूर्ण कारकिर्दीमुळे त्यांना आदर्श शिक्षक, पर्यावरण मित्र, समाजरत्न, छत्रपती संभाजी महाराज इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवचरित्र, शंभूचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर हजारो व्याख्याने दिली आहेत. आग्रा ते राजगड, आळंदी ते पंढरपूर, बहादूरगड ते वढू तुळापूर, पुरंदर ते वढू तुळापूर, संगमेश्वर ते वढू तुळापूर अशा अनेक यात्रा त्यांनी केल्या आहेत. दोन पुस्तकांचे लेखक असणाऱ्या देसाई यांनी आग्रा ते राजगड हा १६०० किलोमीटरचा सर्वप्रथम पायी प्रवास ३३ दिवसांत केलेल्या मोहिमेचा अत्यंत चित्तथरारक वेध आपल्या दीर्घ लेखामध्ये घेतला आहे. डायरी स्वरूपातील या लेखाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज अधिक सखोल तर समजतातच; परंतु भारतातील काही राज्यांची परिस्थितीही समजते.
पाच हिमशिखरांची यशस्वी चढाई
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊनही २०१० मध्ये पी. एस. आय. झालेले संभाजी गुरव हे २०१७मध्ये गिर्यारोहणाकडे वळले. गडचिरोलीत तीन वर्षे कार्यरत असताना सात नक्षलवादी चकमकीमध्ये ६० कमांडो पथकाचे नेतृत्व केल्यामुळे २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला. १४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक अशी अनेक पदके मिळाली आहेत. सह्याद्रीत भरपूर भटकंती केल्यामुळे हिमालयातल्या मोहिमा त्यांनी यशस्वीपणे पार केल्या आहेत. जगातील पाच खंडातील पाच यशस्वी शिखर मोहिमांबरोबरच एका शिखर मोहिमेत आलेल्या अपयशाचा आल्या त्यांनी साद घालती हिमशिखरे’ या लेखामध्ये घेतला आहे. आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेल्या या सहा मोहिमा आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. ही शिखरे सर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारा आहे.
राजस्थानातील मेहरानगडाची ओळख
सातपुड्याच्या चिखलदरा, मेळघाट, अमरावती विभागात मेकनिकल इंजिनीयरपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रा. भरत खैरकरांनी १९९४मध्ये पुण्यात येऊन पाच-सहा वर्षे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विभागांत काम केले. त्यांना शालेय जीवनापासूनच किल्ले ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची आवड निर्माण झाली. निगोच्या सिटी प्राईड स्कूल येथे कॅड, कॅम व एरो मॉडेलिंग लेक्चरर असलेल्या खैरकर यांनी सह्याद्रीतले अनेक किल्ले सहकुटुंब पाहिले आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीर इत्यादी राज्यांतीलही अनेक किल्ले त्यांनी पाहिले आहेत. राजस्थानातील किल्ल्यांचा मुकुटमणी शोभणाऱ्या मेहरानगडाची ओळख त्यांनी आपल्या लेखातून करून दिली आहे.
खडतर परिस्थितीतही यशस्वी होण्याची प्रेरणा
खानापूरच्या महात्मा गांधी विद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रीशियनचा आयटीआय केलेल्या लहू उघडे यांनी जम्मू काश्मीर येथून माउंटेनिअरिंगचा बेसिक, तर अरुणाचल प्रदेश येथून अॅडव्हान्स, तर लेह लडाखमधून हाय अल्टिट्यूड ट्रेनिंगचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यांना जम्मू काश्मीरमध्ये टेक्निकमध्ये तर अरुणाचल प्रदेशमध्ये मोटिव्हेशनमध्ये सर्वोत्तम पुरस्काराने गौरविण्यात आले. आजपर्यंत त्यांना ५०पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी मध्ये २०००पेक्षा अधिक तर हिमालयामध्ये ३०पेक्षा अधिक ट्रेक केले आहेत. ५०पेक्षा जास्त साहसी चढायांबरोबरच सहा हिमशिखरांची चढाईदेखील त्यांनी यशस्वीरीत्या केली आहे. एसएल या अँडव्हेंचर स्पोट्र्स कंपनीची त्यांनी स्थापना करून ७०पेक्षा जास्त युवक-युवतींना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले आहे. जगातील सर्वात उंचीचे शिखर अर्थात माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मीटर उंच) त्यांनी २३ मे २०२३ रोजी सर केले. कितीही खडतर परिस्थिती असली, तरी जीवनात यशस्वी होता येते, हे त्यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून आलेले विचार लेखातून मांडले आहेत. या लेखातून अनेकांना प्रेरणा मिळेल याची खात्री वाटते.
झपाटलेला किल्ला भानगढ
बीई इलेक्ट्रीकल असलेल्या अमित सामंत यांनी आर्किओलॉजी व जिऑलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला आहे. मागील ३० वर्षांपासून ट्रेकिंग करत असताना त्यांनी महाराष्ट्रातील भारताबाहेरील ५५० पेक्षा जास्त किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. डोंगर भाऊ या ब्लॉगचे त्यांनी लेखन केले आहे. दैनिक लोकसत्ता व साप्ताहिक लोकप्रभा यांमध्ये किल्ल्यांसंदर्भात सदर लिहिणाऱ्या सामंत यांनी ट्रेक क्षितिज’ या संस्थेमध्ये अनेक पदे भूषविली आहेत. संस्थेच्या माध्यमातून ते गेली २४ वर्षे सुधागड किल्ल्यावर संवर्धन तर करतातच पण किल्ल्याच्या पायथ्याच्या पाश्चापूर गावातील शालेय विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवतात. किल्ल्यांवरील जल व्यवस्थापन आणि दगडांच्या देशा या विषयांवर व्याख्याने देणाऱ्या सामंतांना नकाशातील दुर्गभ्रमंती या पुस्तकाबरोबरच शोधनिबंध लेखनासह इतर अनेक कार्यासाठी रावबहादूर बांबर्डेकर इतिहास संशोधन पुरस्काराबरोबरच इतरही पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ व २०२२च्या गिरीमित्र संमेलनात त्यांना ट्रेकर्स लॉगर पुरस्कार मिळाला आहे. भारतातील सर्वात जास्त झपाटलेला किल्ला असलेल्या भानगढावर त्यांनी आपल्या लेखाद्वारे प्रकाश टाकला आहे. हा लेख वाचून भानगढ पाहण्याची इच्छा आपल्याला निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही.
पिंडारी ग्लेशिअर ट्रेकचा अनुभव
डॉ. लिली जोशी यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.डी.चे शिक्षण घेतलेले असतानाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत साहित्यातून पीएच.डी. केली आहे. १९७६पासून कन्सल्टंट फिजिशियन म्हणून त्या कार्यरत आहेत. सामान्य लोकांमध्ये आरोग्य शिक्षणाच्या जागरुकतेसाठी त्यांनी अनेक दैनिके, नियतकालिके व मालिकांमधून विपुल लेखन केले आहे. रेडिओ, टीव्हीवर मुलाखतीही दिल्या आहेत. १२ पुस्तकांच्या लेखिका असलेल्या जोशींनी देश-विदेशांत भरपूर प्रवास केला आहे. ५० वेळा सिंहगड पाहिलेल्या जोशींनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांबरोबरच हिमालयातही भरपूर ट्रेक केले आहेत. अशाच एका पिंडारी ग्लेशिअर ट्रेकचा अनुभव त्यांनी आपल्या लेखात मांडला आहे.
गोवळकोंडा किल्ल्याची सफर
पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये ३६ वर्षे शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या सुनंदा जोशी १५ वर्षांपूर्वी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एम.एड. पंडित, साहित्य विशारद असलेल्या जोशी यांने शैक्षणिक पुस्तकांच्या लेखनाबरोबरच अनेक दैनिकांमधून सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक या विषयांवर विपुल लेखन केले आहे. काव्यलेखन व भ्रमंती हे त्यांचे छंद आहेत. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांसोबत भारतातील काही किल्ले व धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच त्यांनी चीन, इजिप्त, जपान, रोम, भूतान, व्हेनिस, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये प्रवास केला आहे. सावित्रीबाई फुले पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या जोशी यांनी आपल्याला गोवळकोंडा किल्ल्याची सफर घडवून आणली आहे.
व्यावसायिक गिर्यारोहण करणे कसे अत्यावश्यक ?
सुरेंद्र चहाण हे महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर आहेत. ऋषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी १९ मे १९९८ रोजी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. त्यांच्या या यशापासून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात ५०पेक्षा अधिक एव्हरेस्टवीर झाले आहेत. अनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराबरोबरच वेगवेगळ्या संस्थांचे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. ट्रेकिंगच्या खालावलेल्या स्तरावर भाष्य करताना व्यावसायिक गिर्यारोहण करणे कसे अत्यावश्यक आहे, हे आपल्या छोटेखानी लेखात त्यांनी अनुभवाच्या आधारे पटवून दिले आहे. त्यांचा लेख सर्वच डोंगरभटक्यांना व संस्थांना मूलभूत मार्गदर्शन करणारा आहे.
विजयदुर्गची सफर
गडभ्रमंती बरोबरच गडसंवर्धनाची विशेष आवड असलेल्या अमित निंबाळकर यांनी अभियांत्रिकीच्या पदवीसोबतच इतिहासाचीही पदवी घेतलेली आहे. आपल्या भटकण्याच्या आवडीमुळे विद्यार्थीदशेतच त्यांचे ‘माणदेशाच्या वाटेवर’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. माणदेशातील किल्ल्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या निंबाळकरांनी विविध दुर्गसंवर्धन संस्थांच्या माध्यमातून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. किल्ल्यांचे अचूक व आकर्षक नकाशे बनवणे यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. संजीवनी आर्ट्स हे त्यांचे ऐतिहासिक कलाकृतींचे दालन प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या लेखात विजयदुर्गची व सभोवतालच्या परिसराची सविस्तर माहिती दिली आहे.
रतनगडासह जैवसंपदेचीही ओळख
डॉ. मोहन वामन यांनी वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवली आहे. सध्या ते आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. पीएच.डी. करत असतानाच सर रतनवाडी- कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाशी समरस झाले. या अभयारण्यातील ६१२ वनस्पतींची व सात देवरायांची त्यांनी नोंद केली. ही निसर्गसंपदा जगभरात पोहोचावी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनही केले. विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाबरोबरच धाडसी वृत्ती निर्माण म्हणून १९९७पासून ते या परिसरात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर आयोजित करतात. ५०००पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत या शिबिरात सहभागी झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २००१ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, २०१८मध्ये बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार, २०१९मध्ये उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेले आहे. किल्ल्यांच्या भटकंतीची आ असणाऱ्या वामन सरांनी आपल्यासमोर केवळ रतनगडच नव्हे तर सभोवतालचे अभयारण्य उलगडून दाखवले आहे.
उदगीरच्या भुईकोटाचा आढावा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कोषाध्यक्ष असलेले संजय ऐलवाड हे गेल्या १४ वर्षापासून दैनिक केसरीमध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी लिहिलेल्या जागतिक तापमानवाढीवरच्या कादंबरीबरोबरच १२ पुस्तकांचे लेखन करणारे ऐलवाड बालसाहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या विविध पुस्तकांना १२ राज्यस्तरीय पुरस्कारांबरोबरच तीन शोधनिबंधालाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. मुलांसाठी कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून अनेक संमेलनांमध्ये निमंत्रित वक्ते असतात. सह्याद्रीतल्या अनेक किल्ल्यांची भटकंती केलेल्या ऐलवाड यांनी उदगीरच्या भुईकोटाचा सविस्तर आढावा आपल्या लेखात घेतलेला आहे.
किल्ल्यावर आढळणारे पक्षी अन् प्राणी
उमेश वाघेला यांनी सिव्हिल इंजिनीअर, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इंडियन वाइल्ड लाईफ, इंडॉलॉजी या विषयांतील शिक्षण घेतले असले, तरी ते पक्षी आणि वन्यजीव अभ्यासक म्हणूनच ते परिचित आहेत. ओम श्री असोसिएट्सचे संचालक, नामांकित आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर असलेल्या वाघेला यांनी निसर्गसंवर्धनासाठी ‘अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. अनेक वर्तमानपत्रांतून मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषेतून त्यांनी ४००पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. पक्ष्यांचे घरकुल ही दैनिक लोकसत्तामध्ये पाच वर्षे चाललेली त्यांची लेखमाला गाजली आहे. ते वन्यजीव प्रकाशचित्रकारदेखील आहेत. त्यांनी काढलेले फोटो आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध राज्यांमध्ये भटकंती केली आहे. पक्ष्यांची घरटी हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे. त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी ३००पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. सर्पविश्व कार्यशाळेद्वारे त्यांनी शेकडो सर्पमित्रांना प्रशिक्षण दिले आहे. अनेक चॅनेलवरच्या त्यांच्या मुलाखती गाजलेल्या आहेत. अशा अत्यंत सुप्रसिद्ध असलेल्या वाघेला यांनी आपल्या लेखात किल्ल्यांवर आढळणारेपक्षी आणि प्राणी यांची आपल्याला ओळख करून दिली आहे.
हरिश्चंद्रगडावरील पावसाळी भटकंतीचा अनुभव
ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी., बी.एड., सेट, पीएच.डी. असे उच्च शिक्षण घेतलेले डॉ. जयसिंग गाडेकर आळे येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे २८ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, सध्या ते रसायनशास्त्राचे विभागप्रमुख आहेत. मूळचे कवी असलेल्या गाडेकर सरांचे काव्य व गझल संग्रहाबरोबरच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये पाच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले गेलेले आहे. विश्वकोश शृंखला शब्दकोशाचे ते मुख्य संपादक होते. आकाशवाणीवरील भाषणांबरोबरच अनेक संमेलनांमध्ये ते निमंत्रित वक्ते असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या गाडेकर सरांनी स्वतः तर असंख्य किल्ले पाहिले आहेतच; पण आपल्या विद्यार्थ्यांनाही किल्ल्यांवर नेऊन त्यांच्याद्वारे संवर्धनाचे कार्यदेखील केले आहे. हरिश्चंद्रगडावरील पावसाळी भटकंतीचा ताजा अनुभव त्यांनी आपल्यासाठी शब्दबद्ध केला आहे.
अलंग व मदन या किल्ल्यांच्या ट्रेकची आठवण
संगमनेरचे विनायक वाडेकर यांनी बी.एस्सी.चे शिक्षण घेतले असून गेल्या ३० वर्षापासून ते सह्याद्रीमध्ये अनेक मान्यवरांसोबत भटकंती करत आहेत. हरिश्चंद्रगडाच्या १६ गडवाटा व ९ घाटवाटा अशा २५ वाटांची त्यांनी यशस्वी चढाई व उतराई केली आहे. आपल्या भटकंतीचा कोणताही गर्व नसलेल्या वाडेकरांनी काही दिवसांतच ८१व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ गिर्यारोहिका, गिरिप्रेमीच्या संस्थापिका उषः प्रभा पागे यांच्यासोबत केलेल्या अलंग व मदन या किल्ल्यांच्या ट्रेकची आठवण आपल्या लेखात जागवली आहे. पागे यांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा कसा पोहोचवला हे आपल्याला या लेखातून समजते. आजच्या ट्रेकर्सने हाच आदर्श घेऊन पुढची पिढी घडवावी यासाठी हा लेख अत्यंत मोलाचा आहे.
कंधार किल्ल्याची भटकंती
वेंगुल्यांचे डॉ. संजीव लिंगवत हे जनसेवा प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत, अमली पदार्थ विरोधी समिती, राष्ट्रवादी डॉक्टर सेल, वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन या संस्थांचे अध्यक्ष असून, कोकण इतिहास परिषदेचे संचालक आहेत. २५-३० संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी असणारे डॉ. लिंगवत महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या महावारसा समिती, सिंधुदुर्गचे सदस्य आहेत. असंख्य किल्ले भटकलेल्या डॉक्टरांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. द्रौपदीचा विवाह झालेला कंधारचा किल्ला त्यांनी आपल्याला फिरवून आणला आहे.
पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगडचा ट्रेक
इयत्ता आठवीपासून आपल्या काकांसोबत किल्ले भटकणाऱ्या डोंबिवलीच्या वर्षा सुळे यांनी ३५ वर्षापूर्वी पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड हा ट्रेक केला होता. तेंव्हाची परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा किती वेगळी होती, हे आपल्याला त्यांच्या लेखातून समजते. बी. कॉम. असल्या मुळे यांने अकाऊंटसंदर्भात अनेक कोर्सेस केले आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांचे ट्रेकिंग थांबले मात्र मुलाला डॉक्टर केल्यानंतर पुन्हा त्यांनी ट्रेकिंग सुरू करून लेह, लडाख, काश्मीरमधील खडतर ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
सिंधुदुर्गवरील भटकंती
पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका अशा विविध पदांवर ३८ वर्षे कार्यरत असणाऱ्या जयश्री जगदाळे या एम.ए., एम.एड. असून, त्यांचे सातवीचे ८५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांना गायन, पेटीवादन, नृत्य, काव्यलेखन, चित्रकला, बाहुली नाट्याची आवड आहे. त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये समाविष्ट झाले आहेत. बालचित्रवाणीच्या शालेय परिपाठाच्या ऑडिओ कॅसेटमध्ये त्यांचा निर्णायक सहभाग होता. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवून त्या थांबल्या नाहीत, तर शालेय सहलींबरोबरच त्यांनी स्वतःही अनेक किल्ल्यांची भटकंती केली आहे. अशाच एका सिंधुदुर्ग भटकंतीचा त्यांनी आपल्या लेखात घेतला आहे.
बुधभूषणम् ग्रंथाची ओळख
सोलापूर येथे सोशल महाविद्यालयात २० वर्षे इतिहासाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. नभा काकडे यांनी १९९३मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामावर पीएच.डी. केली आहे. स्वातंत्र्यसैनिक वडिलांचा वारसा लाभलेल्या काकडे यांने छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे, बुधभूषणम्, अलमगीर अशा १४ पुस्तकांचे लेखन केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराबरोबरच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. निवृत्तीनंतर सध्या त्या विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत असून त्यांनी ‘बुधभूषणम् या छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाची आपल्याला ओळख करून दिली आहे.
कोथळीगड किल्ल्याशी नाते
३७ वर्षे लोटे औद्योगिक वसाहतीत विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या विनायक वैद्य यांनी २५ वर्षे सह्याद्री व हिमालयात भरपूर भटकंती केल्यानंतर अगदी ठरवून वयाच्या पन्नाशीमध्ये सायकलिंग सुरू केले. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातल्या सर्व ठिकाणांना त्यांनी सायकलवर भेटी दिल्या आहेत. सायकलचा प्रचार प्रसार करण्याचे ध्येय बाळगलेल्या वैद्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. युथ हॉस्टेलचे कॅम्प लीडर म्हणून ते अनेक ट्रेकर्सला शिस्त लावण्याचे मूलभूत काम करतात. भटक्या खेडवाला’ या नावाने सोशल माध्यमावरचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. किल्ल्याशी आपले नाते कसे जुळले जाते, हे त्यांनी कोथळीगडावरच्या लेखातून स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांसोबत किल्ले भटकंती
लेखक, कवी, नाट्यलेखक, आकाशवाणी अभिवाचक, पत्रकार, उतन वक्ते निवेदक, मुलाखतकार जलतरण योगासने सूर्यनमस्काराचे तज्ज्ञ मार्गदर्शक, शारीरिक शिक्षण संक्रमण’चे संपादक असणारे भरत सुरसे नूमविमध्ये उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत होते. पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालेल्या सुरसे सरांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यासाठी त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सहकार्यवाह म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. अक्षय पेंडसे, सुबोध भावे हे अभिनेते चेतन केतकर, विवेक शिवदे, सचिन डेंगे हे एव्हरेस्टवीर, जलतरणपटू रोहन मोरे यांसारखे अनेक यशस्वी विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. लता मंगेशकर, अमृता प्रीतम, जगदीश खेबुडकर, व्ही. पी. सिंग, आर. व्यंकटरमण, सिंधुताई सपकाळ यांसारखा अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरसे सरांनी आपल्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या किल्ल्यावर नेले आहे. याच उपक्रमाचा आढावा त्यांनी आपल्या लेखातून घेतला आहे.
तुंगी किल्ल्याचा परिचय
श्री राज एज्युकेशनल सेंटर येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले मंदार लेले सध्या रसायनशास्त्रामधून पीएच.डी. करत आहेत. वडिलांसोबत लहानपणापासूनच त्यांनी ट्रेडिंग केले. १५० पेक्षा अधिक किल्ले व घाटवाटा पाहिलेल्या लेलेंनी २०२२च्या गिरीमित्र संमेलनात देवीच्या डोंगराबद्दल सादरीकरण देखील केले आहे. किल्ल्यांच्या आवडीतूनच त्यांनी आर्किओलॉजीचेही शिक्षण घेतले आहे. तुंगी या अपरिचित किल्ल्याची माहिती त्यांनी आपल्यासमोर ठेवली आहे.
महाराष्ट्राची दुर्गपंढरीचे परीक्षण
चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रकाश अकोलकरांची जय महाराष्ट्र मुंबई ऑन सेल, मित्रमयजगत ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी ३० वर्षे विविध पदांवर काम करताना राजकीय, साहित्यिक व सांस्कृतिक घडामोडींच्या वृत्तांकनाबरोबरच विविध सदरांचे नियमित लेखन केले आहे. काही पुस्तकांचे त्यांनी अनुवादही केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर यांच्या ‘महाराष्ट्राची दुर्गपंढरीः नाशिक जिल्ह्यातील किल्ले या पुस्तकाच्या परीक्षणपर लेखातून हे पुस्तक वाचण्याची जिज्ञासा निश्चितच निर्माण होईल.
राजगड ते तोरणा भटकंतीचा किस्सा
एम.कॉम., एम.पी.ए. केलेले पंकज माने हे सध्या शिरूर नगर परिषदेत लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ३७४ किल्ल्यांची भटकंती करताना त्यांनी १०००पेक्षा जास्त ट्रेक केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंदरपासून वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गडभटकंतीला सुरुवात केली. देश आणि कोकण जोडणाऱ्या विविध घाटवाटाही त्यांनी पाहिल्या आहेत. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांतील किल्ल्यांसोबतच अभयारण्येही त्यांनी पाहिली आहेत. सिक्कीममधून बीएमसी प्रशिक्षण, तर माऊंट अबू येथून बीआरसी प्रशिक्षण ए ग्रेडने त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यांना ब्लॉग लेखनाच्या पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मित्रांसोबत केलेल्या राजगड ते तोरणा या भटकंतीचा किस्सा त्यांनी आपल्यासमोर उलगडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ६० गुणवैशिष्ट्य पुस्तकाची जडणघडण
कादंबरीकार, चित्रपट कथाकार, पटकथा संवाद लेखक, कथाकार, नाटककार, कवी, ललित लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण नासिककरांनी ५०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणून राज्य शासनाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक, रहस्य, ऐतिहासिक, विनोदी, पर्यटनविषयक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व प्रकारच्या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. नुकतेच त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची ६० गुणवैशिष्ट्य हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या जडणघडणीचा प्रवास त्यांनी आपल्या लेखातून वाचवला आहे.
तीन किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य
अर्बन डिझाईनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या किरण कलमदानी यांनी ३५ वर्षे ‘किमया’ या संस्थेच्या माध्यमातून पत्नी अंजलीसोमत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड येथे ५०० प्रकल्पांत काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील किन्हई येथील यमाईदेवीचे मंदिर व गणेश खिंडीतून पार्वतीनंदन गणपती या कामासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग राम मंदिर, कौन्सिल हॉल, सावित्रीबाई फुले स्मारक, नीरा नरसिंहपुर, भीमाशंकर, खिद्रापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केले आहे. इन्स्टिटयूट ऑफ अर्बन डिझायनर्स इंडिया व कम्युनिटी ऑफ कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट्स इंडिया या संस्थांचे ते संस्थापक आहेत. त्यांनी केलेल्या तीन किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य लेखातून मांडले आहे. त्यामुळे सामान्य भटक्यांना संवर्धन ही किती किचकट गोष्ट असते, याची मूलभूत माहिती होईल.
किल्ला दिवाळी अंकाचा प्रवास
यमुनानगर येथील शिवभूमी कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असणाऱ्या मानकू बोंबले यांनी मावळात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यांनी मित्रांच्या साहाय्याने अग्निपंख वाचनालय सुरु केले. १०० पेक्षा अधिक किल्ले पाहिलेल्या बोंबले यांनी लेणी, प्राचीन मंदिरे वाडे, समाध्या, तोफा, घाटवाटा यांचीही डोळस भटकंती केली आहे. त्यांना फोटोग्राफी व अक्षर लेखनाची विशेष आवड आहे. वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर असणाऱ्या बोंबले यांनी इतिहास व अर्थशास्त्रामधून एम. ए. केले आहे. विद्यार्थ्यामध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते कायम प्रयत्नरत असतात. किल्ला या दिवाळी अंकाचे ते नियमित वाचक आहेत. या अंकाचा प्रवास त्यांनी आपल्या लेखातून उलगडला आहे.
‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ या संस्थेच्या रेस्क्यू मोहिमांचा आढावा
महाविद्यालयीन शिक्षण येताना हॉटेलमध्ये अकाऊंटचे काम करणारे महाबळेश्वरचे अनिल केळगणे आजही भाड्याने हॉटेल घेऊन चालवतात. या ना त्या कारणाने गेली २७ वर्षे ते या व्यवसायाशी संबंधित आहेत. २०००मध्ये त्यांनी पहिली ट्रेकिंग संस्था सुरु केली. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी पंधरा ते वीस लाख लोक येतात. या प्रसिद्ध पर्यटनस्थळी अनेक अपघात होतात. त्यामुळे केळगणेंनी आपल्या मित्रपरिवाराच्या साहाय्याने सर्च आणि रेस्क्यू यांवर भर दिला. प्रत्येक पर्यटकाला निःस्वार्थपणे मदत करणारी ही संस्था ट्रेकिंग विश्वात खूप प्रसिद्ध आहे. त्यांना अभिजितदादा मानवता पुरस्काराबरोबरच असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. अनेकांचा जीव वाचवण्यात ते आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. कोळी महासंघाच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय कोळी समाज या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून ते समाजकार्य करतात. असेंट इंटरनेशनल स्कूलमध्ये ते संचालक असून, शालेय जीवनात कब्बडीमध्ये त्यांनी तालुकास्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. हॉटेल व्यवसायाबरोबरच उपजीविकेसाठी टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या केळगणेंनी आपल्या ‘महाबळेश्वर ट्रेकर्स’ या संस्थेच्या रेस्क्यू मोहिमांचा आढावा आपल्या लेखातून घेतला आहे.
श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचा आढावा
विद्युत अभियंता असलेले अजित काळे इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या पुणे विभागाचे संचालक, भाजप सहकार आघाडी, पुणे शहराचे चिटणीस, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणेचे सचिव असून, त्यांनी २५० हून अधिक किल्ले पाहिले आहेत. १४ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. २००५-६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील किल्ल्यांवर झालेल्या मोहिमेचे त्यांनी नेतृत्त्व करताना प्रत्येक किल्ल्याचे व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफी, जीपीएस मॅपिंग केले. या मोहिमेच्या ४०,१५० फोटोंचे प्रदर्शन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेले आहे. २००६पासून श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचा कार्यकर्ता ते आता सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या काळेंनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्यासमोर मांडला आहे.
भद्रकाली ताराराणी प्रतिष्ठानची ओळख
मुख्याध्यापक वडिलांबरोबर किल्ले पाहण्याचा योग आला नसला, तरी लग्नानंतर मुलगा व पतीसोबत गडकिल्ल्यांची भटकंती करणाऱ्या संजीवनी देसाई यांनी ‘भद्रकाली ताराराणी संघटनेची स्थापना केली. यामध्ये पहिल्या ट्रेकला १०० मुली व २० महिला होत्या. मात्र, अनेक किल्ल्यांची भटकंती झाल्यानंतर यामध्ये प्रचंड वाढ झाली. या संस्थेने केवळ किल्ले पाहिले नाहीत तर विशाळगडावर स्वच्छतेबरोबरच दिशादर्शक बोर्ड बसवणे, गडदेवता वाघजाईच्या मंदिराला छत उभारणे तसेच इतर अनेक मंदिरांची डागडुजी करणे, अशी कामे केली. म्हणून या प्रतिष्ठानला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या या प्रतिष्ठानची ओळख त्यांनी लेखातून करून दिली आहे.
दिपावली अंक – दुर्गांच्या देशातून…
संपादक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक ः दुर्गभान प्रकाशन, पुणे
मूल्य : ४००/- रुपये
संपर्क : ९८५०१७९४२१/९९२१९४८५४१
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
चांगली माहिती आहे.