December 14, 2024
Dnyneshwari creates Awareness in Community article by rajendra ghorpade
Home » अज्ञान लक्षणातून ज्ञानेश्वरांकडून प्रबोधन
विश्वाचे आर्त

अज्ञान लक्षणातून ज्ञानेश्वरांकडून प्रबोधन

ज्ञानेश्वरीतील अज्ञान लक्षणे समजून घेऊन ज्ञानी होण्याची गरज आहे. अज्ञानावर ज्ञानाने मात करणे गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होईल. अन्यथा अज्ञानात आपण चाचपडत राहू. आपला सर्वांगिण विकास कधीच होणार नाही. हे विचारात घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406


अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला ।
तैसा गर्वे फुगला । देखसी जो ।। 724 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – अंत्यजाला जसे राज्यावर बसवले म्हणजे तो गर्वाने फुगतो, अथवा अजगराने खांबाचे लाकुड गिळले असतां तो जसा फुगतो, त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल.

एखाद्या नीच व्यक्तीच्या हातात राज्य कारभार दिल्यानंतर त्या व्यक्तीकडून चांगले काम होण्याची अपेक्षा ठेवणे हे मुर्खपणाचेच आहे. त्याच्या हातून चांगले काहीच घडणार नाही. जरी काही छोटीशी चांगली गोष्ट घडली तर तो गर्वाने सर्वत्र सांगत फिरतो.

पूर्वीच्या काळी राजे संन्यास घेत असत. राजाने संन्यास घेतल्यानंतर राज्यकारभार कोणाकडे द्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. त्याची काही नियमावलीही ठरलेली असे. नियमानुसार राजाच्या प्रथम वारशास सन्यस्थ आश्रमाचे नियम लागू होत असत व द्वितीय वारस गादीवर बसवला जायचा. पण द्वितीय वारस नसेल तेव्हा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. अशावेळी निवड करताना कसोटी लागत असे. योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता गेली नाही तर पुन्हा मोठा प्रश्न उभा राहातो.

अयोग्य व्यक्तीच्या हाती सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे. काही व्यक्ती कामापेक्षा फुशारकी मारण्यातच जास्त पटाईत असतात. काम कमी अन् गर्व फार. अभिमानाने ते फुगलेले असत. फुगलेल्या फुग्यास टाचणी लागली तर तो फुटतो. राज्य कारभारात फुगवलेले आकडे असेच फुटतात. अशा या कारभाराचा फुगा फुटला तर तो संपतो पण त्याबरोबर जनताही भरडली जाते हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच कारभार योग्य व्यक्तीच्या हाती देणे पदावर योग्य व्यक्ती बसवणे गरजेचे आहे.

सन्यस्थ राजाच्या गादीवर हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. अशावेळी राज्यकारभारात चांगले अन् महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राजाच्या कुटुंबातील व्यक्तींचा व त्यांच्या वारसांची नोंद घेणे गरजेचे असते. विशेषत्वाने त्यांना कारभाराचे हक्कदार म्हणून पूर्वीच्या काळी नेमले जात असे. कारण ते राजाप्रती निष्ठा, आदर व्यक्त करणारे असतात. राजाच्या नियमांशी ते प्रामाणिक राहणारे असतात. अशा व्यक्तीचे राजाच्या राज्यभिषेकामध्ये महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे त्यांची निष्ठा जनतेसही मान्य होते. अशी राजाच्या कुटुंबातील म्हणजेच नात्यातील व्यक्ती शोधून राज्यकारभार त्यांच्या हाती दिला जात असे.

म्हणजेच सांगण्याचा हेतू हाच की योग्य व्यक्तीची निवड हा महत्त्वाचा भाग आहे. हे नियम सध्याच्या राजकारणातही उपयोगी ठरू शकतात. तसे सध्याच्या राजकारणातही पाहायला मिळतात. मतदान करताना यासाठीच विचार करून मतदान करा. चुकीच्या व्यक्तीची निवड विकासाला बाधा ठरू शकते. हे विचारात घेऊनच मतदान करावे. चांगल्या व्यक्ती निवडल्या जातात. फक्त आपण जागरूक असायला हवे. एखाद्या चांगल्या राजकिय व्यक्तीचे सत्तेवर असताना निधन झाले तर त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना त्यांच्याजागी संधी दिली जाते. काही वेळेला ही निवड बिनविरोधीही करण्याचा प्रयत्न होतो.

हा राजकारणाचा भाग आहे. पण अज्ञान लक्षण समजून घेऊन ज्ञानी होणे हे महत्त्वाचे आहे. अन्यथा आपण अज्ञानीच राहू. आंधळेच राहू. ज्ञानेश्वरीतील अज्ञान लक्षणे समजून घेऊन ज्ञानी होण्याची गरज आहे. अज्ञानावर ज्ञानाने मात करणे गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होईल. अन्यथा अज्ञानात आपण चाचपडत राहू. आपला सर्वांगिण विकास कधीच होणार नाही. हे विचारात घ्यायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading