July 21, 2025
स्थापत्य अभियंता महादेव पंडित यांचा विशेष लेख – बारदानासारखं निःस्वार्थ, समर्पित आणि शांत कार्य म्हणजेच समाजोन्नतीचा मूलमंत्र.
Home » बारदान…
मुक्त संवाद

बारदान…

जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल.

महादेव पंडित,
स्थापत्य अभियंता

बारदान म्हणजे गोणपाट, पिशवी किंवा जाडसर कापडाची पोती. प्रामुख्याने बारदान धान्य, पीक, साखर, मीठ, बियाणं आणि खतं अशा वस्तू साठवण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी वापरले जाते. पण या बारदानाचा उपयोग केवळ शेतीपुरताच मर्यादित नसून बांधकाम व्यवसायातही त्याचा सिमेंट काँक्रीटच्या क्युरिंगसाठी उपयोग केला जातो.

काँक्रीट क्युरिंग (Concrete Curing) म्हणजे काँक्रीटमध्ये सिमेंटचे हायड्रेशन सुनिश्चित करण्यासाठी योग्य तापमान आणि आर्द्रता टिकवून ठेवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत पाणी टिकवून ठेवले जाते, ज्यामुळे सिमेंट आणि पाणी यांच्यातील रासायनिक क्रिया योग्य प्रकारे होते आणि काँक्रीट सेट होऊन कडक होते. त्यामुळे त्याला अपेक्षित ताकद आणि टिकाऊपणा मिळतो. काँक्रीट क्युरिंगसाठी बारदान अतिशय उपयुक्त ठरतं – कारण ते पाणी आपल्या अंगात साठवून ठेवतं आणि हळूहळू ते पाणी सोडतं. त्यामुळे रासायनिक प्रक्रियेदरम्यान वाढलेलं तापमान कमी होतं, आणि काँक्रीट मजबुतीने सेट होऊन त्याला टिकाऊपणा मिळतो.

बारदान वजनाने खूप हलकं असतं, पण पाणी मुरवून घेण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची त्याची क्षमता अत्यंत प्रभावी असते. जेथे थेट पाण्याचा मारा शक्य नसतो, तिथे भिजवलेलं बारदान क्युरिंगसाठी वापरलं जातं.

शेतकरीही हेच बारदान सुगीच्या काळात कच्चं धान्य वाळवण्यासाठी वापरतात. गावाकडच्या जेवणाच्या पंक्त्यांमध्ये स्वच्छ बारदान अंथरून आदरयुक्त आणि आपुलकीचा भाव व्यक्त होतो.

मित्रहो, पाहा ना – बारदान किती अप्रतिम काम करतं ! स्वतःच्या अंगात पाणी साठवतं, निपचित झोपून राहतं, आणि काँक्रीटची उष्णता कमी करतं आणि त्यामुळे ते काँक्रीट अधिक मजबूत, कडक आणि दीर्घकाळ टिकाऊ राहते. चंदन स्वतः झिजतं आणि दुसऱ्यांना सुगंध देतं, अगदी त्याचप्रमाणे बारदानही स्वतः ओलेचिंब भीजून काँक्रीटला दीर्घायुष्य देतं.“मूर्ती हलकी पण काँक्रीटला देते मजबुती” – ही म्हण बारदानाला सार्थपणे लागू होते.

जर मनुष्यानेही बारदानासारखं थंड डोक्याने, शांतपणे, दुसऱ्याच्या उपयोगासाठी झिजण्याचं कार्य केलं तर समाज खूप सुंदर व सुखी बनेल. बारदानाचं आयुष्य फारसं मोठं नसतं. १५० मीटर लांबीचं एक बारदान सुमारे १५० चौ.मी. क्षेत्रफळाच्या काँक्रीटसाठी अंदाजे दोन महिने वापरलं जाऊ शकतं. त्यानंतर ते झिजतं, फाटतं. पण त्यातून घडलेली रचना उदा. पूल, रस्ते, इमारती आणि साकव पुढील २५ ते १०० वर्षं समाजाची सेवा करतात.

क्युरिंगमध्ये बारदानाचा वापर विविध प्रकारे होतो. स्लॅबवर ते अंथरले जाते; कॉलमभोवती साडीप्रमाणे गुंडाळले जाते आणि त्यावर पाणी टाकून ते ओलेचिंब केल्यावर कॉलमचे क्युरिंग चांगले होते. या प्रक्रियेत पाणी टिकवून ठेवण्याच्या क्षमतेमुळे काँक्रीट अधिक ताकदवान होते. परिणामी, इमारती व रस्त्यांचे आयुष्यमान वाढते.

आजकाल एखादं शौचालय बांधलं तरी नेतेमंडळी तिथे स्वतःचा फलक लावतात. पण हे साधं, हलकं बारदान मात्र कोणताही आवाज न करता समाजासाठी झिजतं. त्याच्या योगदानाची कुठेही नोंद राहत नाही पण त्याचा ठसा बांधकाम क्षेत्रात कायम राहतो.

“झिजावे परी कीर्ती रूपे उरावे” ही उक्ती बारदानाला तंतोतंत लागू होते. फक्त ३० ते ५० दिवसाचं आयुष्य, पण त्यातून निर्माण झालेली रचना अनेक दशकं जगते आणि समाजाला निरंतर सेवा देते. विकासाच्या विविध प्रकल्पांमध्ये जिथे पाणी उपलब्ध नाही तिथे भिजवलेलं बारदान उपयोगी पडतं. विशेषतः काँक्रीट रस्त्यांवर जेथे थेट पाणी साठवता नाही तेथे , बारदान भिजवून त्यावर अंथरणं ही पद्धत किफायतशीर ठरते आणि हे मजबूत व खड्डेविरहित रस्ते देशाच्या प्रगतीचं मुख्य साधन आहेत.

बारदान पाणी वाचवतं, काँक्रीटला थंड करतं, शेतकऱ्यांना मदत करतं आणि विकासाची पायाभरणी करतं. हलकं बारदान, पण कार्य महान. मानवी जीवनात याचं स्थान फार मोठं आहे. स्वतः हलकं-फुलकं राहून इतरांचं जीवन सुंदर बनवण्याचं, दुसऱ्याच्या भल्यासाठी झिजण्याचं हे कार्य खरंच अनुकरणीय आहे.

जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading