November 14, 2024
traditional post harvesting techniqe Mahadev Pandit article
Home » ‘खळे’ आणि ‘मळणी’ चे विश्व
मुक्त संवाद

‘खळे’ आणि ‘मळणी’ चे विश्व

मानवी जीवन अनेक क्षेत्रांत कार्यरत असते. प्राचीन काळापासून चालत आलेली कृषी संस्कृती हा त्याच संस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यातही भारतासारख्या कृषीप्रधान देशात, कृषीवलांचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण असते. भूमीचा पुत्र असणारा कृषीवल, मातीतून सोने पिकवतो आणि हरित क्रांतीचे स्वप्न साकारते, हे आपण जाणतोच. याच शेतकरीराजाच्या दैनंदिन कामाचा भाग असणाऱ्या काही कृती आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खास संज्ञा, यांनी मराठी ग्रामीण बोली समृद्ध केली आहे. काळाच्या ओघात हरवत चाललेल्या अशा काही संज्ञा आणि त्याभोवती गुंफलेल्या आठवणींचा हा एक कोलाज.

महादेव पंडित, स्थापत्य अभियंता

पूर्वीच्या काळापासून ‘खळे’ आणि ‘मळणी’ या दोन अनमोल संज्ञा शेतकरीराजाचे जीवन कसे समृद्ध आणि संस्कारी होते, याची ग्वाही देतात. काळाच्या ओघात शेतावरील ‘खळे’ ही संज्ञा जवळपास नामशेष होत आली आहे पण चंद्राचे खळे आजही आपल्याला पहाता येते. खळ्याच्या केंद्रबिंदूत दोन इंच जाडीच्या व सहा फूट उंचीच्या पाच बांबू किंवा ऐनाच्या झाडाच्या सरळसोट काठ्या जमिनीवर नऊ इंचाच्या परिघावर समान अंतरावर जमिनीत दीड फूट खोल रोवतात. सर्व काठ्यांचे वरचे टोक एकत्र बांधलेले असते. असा पाच काठ्यांचा समूह म्हणजे ‘तिवडा’. शेतकरी बांधव या काठ्यांना ‘मेटी’ असे संबोधतात. काही भागात एकच ७ फुट उंच आणि ६ इंच जाडीचे सरळ ऐनाचे किंवा इतर जंगली झाडाचे सरळसोट खोड खळ्याच्या केंद्रबिंदूत रोवतात. त्याचाच मळणीच्या वेळी तिवडा म्हणून वापर करतात. शेताचा १४ हात व्यासाचा गोलाकार भाग (एक हात म्हणजे दीड फूट) फावड्याने व्यवस्थित तासून व बडवण्याने चोपून सपाट केला जातो. तो शेणाने व्यवस्थित सारवतात. हा वर्तुळाकार परिसर म्हणजे शेतकरी बांधवांचे खळे.

तिवडा, खळे व मेटी अशा संज्ञांचे उल्लेख आले, की आपल्यापैकी ज्यांचे बालपण खेडेगावात, शेती असणाऱ्या घरात गेले आहे, अशांना खळ्याची व शेताची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तिवडा, मेटी, खळे, दावण, सूप आणि बैल यांचा संगम म्हणजे एका अर्थाने शेतकर्‍याचे पारंपरिक मळणी यंत्रच. पाच बांबूंच्या मध्यभागी जमिनीवर एक लांबट आकाराचा पण अर्धवर्तुळाकार दगड पूजा करून जमिनीवर दोन इंच दिसेल व खाली जमिनीत नऊ दहा इंच जाईल अश्या पद्धतीने स्थापना करायचा, याला म्हणायचे शेत-देवाची प्रतिकृती. तिवडा म्हणजे शेत – देवाचे सुरक्षित मंदिरच. आपल्याला दुकानात तांदूळ, नाचणी, ज्वारी किंवा गहू मिळतो. पण दुकानात वस्तू रूपात हे धान्य येण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना रात्रंदिवस काबाड कष्ट करावे लागतात, याची आपल्यापैकी किती जणांना कल्पना असते? लहानपणीचे दिवस आठवताना, शेतात घडणाऱ्या अनेक गोष्टी नजरेसमोर फेर धरतात. साधारणतः दिवाळीच्या सुमारास सुगीचा हंगाम सुरू व्हायचा. खळ्याच्या बाजूला त्रिकोणी आकाराची पिंजराने शाकारलेली ‘खोप’ उभी केली जायची. त्या खोपीत जगाचा पोशिंदा खळ्यावर मळणी झाल्यानंतर भाताची रास करताना दुपारच्या वेळी शेताच्या मालकिणीच्या हाताने रांधलेल्या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन पहाटेपासून शेतात राबणारा आपला शेतकरीराजा थोडीशी वामकुक्षी करत असे. या शेतकरीराजाची मुले दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास या खोपीतच बसून पूर्ण करायची. शिवाय शेतकरीबाबांना खळ्यावरच्या कामात बरीच मदत करायची. त्यामध्ये मुलांना पण अभ्यासासोबत मळणीचा मनसोक्त आनंद मिळायचा.

शेतातील भात कापणीला आले की, त्याचा रंग पिवळसर होतो. साधारणतः पिकाची ही स्थिती दसरा दिवाळीच्या दरम्यान येते. शेतातील उभे धान्य बायकांनी दिवसभर कापायचे आणि पुरुषांनी ते धान्य नीट भारे बांधून खळ्यावर आणायचे, अशी कामाची विभागणी असायची. भारे बांधण्यासाठी दोराचा वापर केला जायचा. शेतातील उभ्या धान्याची कणसासहित रोपे कापून एक दिवस अगोदर त्याची लोंब किंवा कणसे आतल्या बाजूस ठेवून एक गोलाकार होळी खळ्याच्या बाजूला रचली जायची. गवत व कणसासहित कापलेल्या धान्याची होळी रचताना पाहणे, हा एक अनुभव असायचा. हे सारे शेतकरीराजा इतक्या सुंदर पद्धतीने रचायचा, की त्याचे रचनाकौशल्य नजर खिळवून ठेवायचे. कोणतेही मोजमापाचे साधन न वापरता फक्त निसर्गदत्त बुद्धी, अनुभव, निरीक्षण आणि वर्षानुवर्षांच्या सरावाने आलेली सफाई व कला कौशल्याच्या आधारावर शेतकरी बांधव नेमकी गोलाकार होळी (शेतकी भाषेत व्हळी) रचायचे. याच दिवसात वळवाच्या पावसाने हजेरी लावली तरी होळीमध्ये पाणी उतरू नये म्हणून त्या होळीला शिरोबिंदू काढून त्यावर पिंजर टाकले जायचे. पण सध्या यांत्रिक युगात धान्याची रोपे यंत्रामार्फत कापली जातात आणि त्वरित मळणी यंत्राच्या जबड्यात ढकलतात. लगोलग धान्य पोत्यात भरले जाते. या यांत्रिक क्रियेत पूर्वीचा मळणीचा आनंद कायमचा हरवून गेला आहे.

पूर्वी मळणीचे काटेकोर नियोजन केले जात असे. त्यानुसार मळणी संध्याकाळी घालायची असेल तर दुपारी पूर्ण खळे गाई – बैलांच्या शेणाने सारवले जायचे. त्यामुळे धान्यात माती मिसळत नाही. तिवड्याला ६ बैलाची दावी असलेली दावण अडकवून सर्व सहा बैल त्या दावणीला जुंपले जायचे. सर्वात बाहेरचा बैल जलद चालायचा आणि तिवड्याजवळच्या बैलाला अगदी सावकाश चालावे लागायचे. बैल दावणीला बांधण्यापूर्वी खळ्यावर तिवड्याच्या सभोवती होळीवर एक दिवस अगोदर रचलेल्या धान्याच्या रोपांच्या कवळ्या मळणकराकडून खळ्यावर पसरल्या जातात. नंतर लगेचच तीन मळणकरांचे ३ बैल जोड दावणीला दाव्याने बांधले जायचे. लगेचच ‘अरे चल, गुलाब, चेंडू ..’ अशी बैलांची नावे सुरात उच्चारून मळणी सुरू केली जायची. थोड्या थोड्या अंतराने व्हळी (होळी) वरील कणसासहित धान्यांच्या कवळ्या तिवड्याभोवती बैलाच्या पायांत टाकल्या जायच्या. मळणी सुरू झाली, की बैलांच्या मागे शेण धरणाऱ्याची कसरत बघण्यासारखी असायची. बैलांच्या एकसाथ चालीमुळे लोंबाचं तसेच कणसांचे धान्य गवताच्या खाली खळ्यावर साठायचे. बैलांच्या मालकांना मुख्य मळणीकर संबोधले जायचे. एक २० मणाची म्हणजेच एक खंडीची मळणी काढायची असेल तर, बैलांच्या मालकाव्यतिरिक्त ३ चांगले मजबूत गडी मदतीला लागायचे. एका खंडीच्या मळणीला साधारणतः ३ ते ४ तास लागायचे.

मळणीपाठोपाठ आठवण येते, ती दरवर्षी बेंदूराला बैलांची पूजा करतात व त्यांची गावातून वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढतात, त्याची. बैलपोळा हा सण शेतकरी बांधव अतिशय उत्साहाने साजरा करतात. बैलपोळा सण श्रावण किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला साजरा करतात. शेतात अनेक कामांसाठी राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैल हे शेतकरी बांधवांचे दैवत आहे आणि दैवताच्या पायाने धान्याची मळणी केली जाते. आपला शेतकरी बांधव शेतातल्या धान्याची पूर्वसंमत रिवाजानुसार मळणी काढत होता, हे यावरून लक्षात येते.

कधी कधी संध्याकाळी मळणी सुरू केली जायची. त्यामुळे मळणी पूर्ण होण्यास रात्र होत असे. मग त्यावेळी दिवाबत्तीची सोय करावी लागायची. त्यावेळी कंदील किंवा गॅसबत्ती वापरत असत. रात्री मळणी काढताना मळणकर ठेका धरून लोकगीत गात असत, त्यामुळे त्यांचा कामाचा शीण जाणवत नसे. पौर्णिमेच्या दिवशी खळ्यावर मळणी असेल तर त्या दिवशी आकाशात चंद्राचे खळेदेखील पहायची पर्वणी मिळायची. मळणी पूर्ण झाल्यानंतर दावणीचे बैल सोडले जायचे आणि फक्त गवत हलवून खळ्याच्या बाहेर शेतात छोट्या आकाराच्या गोलाकार गठ्ठ्यात ठेवले जायचे. ह्या गठ्ठ्यांना ‘घुप्पी’ म्हटले जात असे. ओल्या गवताचे गठ्ठे नंतर शेतात आकडीच्या मदतीने खळ्या लगतच्या शेतात पसरून सुकविले, की त्यांचे मस्त पिंजर तयार होत असे. मग शेतकरीराजा त्या पिंजराची एक शंकूच्या आकाराची गवताची झकास गंजी तयार करायचे. असे पिंजर गाईबैलांसाठी सुकामेवा म्हणून सांभाळून ठेवले जायचे. मळणीनंतर खळ्यावर सर्वसाधारण चार इंच जाडीचा धान्याचा बारीक बारीक गवताचा भुसा व कोंडामिश्रित थर जमलेला असायचा.

मळणी संपल्यानंतर सर्व मळणकर मळणीमालकाच्या घरी जाऊन जेवायचे. पूर्वी गावातील शेतकरी समविचारी बांधवंचा एक गट करून आळीपाळीने सर्वांच्या मळण्या काढायचे. या सर्व मळण्या फक्त जेवणाच्या मोबदल्यात काढल्या जात, यावरून पूर्वी शेतकरी मंडळी दिलदार आणि एकमेकांना हातभार देणारी होती, हे लक्षात येते.

दिवाळीच्या दरम्यान वारे पूर्व – पश्चिम वाहायचे. वाऱ्याच्या वाहण्याचा या नैसर्गिक वेगाचा वापर करून, शेतकरीराजा सुपाच्या मदतीने धान्यातील भुसा व कोंडा वेगळा करून, ते कच्चे पण ओले धान्य दिवसभर खळ्यावर वाळवायचे. कच्चे धान्य सुकविण्यासाठी पुन्हा खळ्यावर पसरवायचे आणि तिवड्याचा सभोवती खळ्याच्या परिघाला समांतर पाय ओढून गोलाकार खळ्यावर नैसर्गिक धान्याची संस्कारभारतीच्या रांगोळीसारखी गोलाकार प्रतिकृती तयार करायचे. मग आलटून पालटून धान्यात गोलाकार पाय ओढून धान्य सुकवत असत.

दुपार टळली, सूर्य उताराला गेल्यानंतर पुन्हा सुकलेले धान्य सुपामार्फत नैसर्गिक वारे देऊन त्यातील पोचकं धान्य व थोडा बारीक कोंडा काढून टाकला जातो, याला भातवारे देणे, असे संबोधतात. धान्याला वारे देत असताना एक त्रिकोणी आकाराचा लांबलचक बांध तयार होत असे, त्याला धान्याची रास म्हणतात. सर्व धान्याला वारे देऊन झाल्यानंतर ती रास सुपाच्या आणि हाताच्या मदतीने समभुज त्रिकोणी आकारात बांधली जाते. नंतर त्या राशीच्या परीघावर सुपाच्या कोनाड्याने एक लहानशी गोलाकार रेषा मारून त्या रेषेवर शेतातल्या धुमीचा राखेच्या चूर्णाचा पट्टा मारला जायचा – त्याला शेतकी भाषेत राशीला ‘इबूद घालणे’, असे म्हणायचे. जसे लहान गोंडस बाळाला नजर लागू नये म्हणून काळी टीक लावतात ना, त्याचप्रकारे धान्याच्या राशीला राखेचा इबूद घालून त्या राशीवर लांबट आकाराचे काळे घोंगडे टाकले जाते. धान्याच्या राशीवर काळे कांबळे टाकले, की धान्याला नजर लागत नाही, अशी पूर्वापार समजूत आहे. धान्याच्या राशीच्या दुसर्‍या टोकाला दावण ठेवली जाते. तसेच लक्ष्मीच्या अधिष्ठानासाठी एक नारळ धान्याच्या राशीमध्ये ठेवला जातो आणि लक्ष्मीच्या संरक्षणासाठी बाजूला एक विळा ठेवला जातो. धान्याच्या राशीची व्यवस्थित पूजा करून धान्य घुडब्याच्या (चार पायलीचे अंदाजे माप) साह्याने पोत्यात भरून घरी आणायचे. सोळा पायली धान्य म्हणजे एक मण, हे शेतकरी बांधवांचे मोजमाप. घुडब्याच्या मापामुळे आपल्या शेतात किती मण धान्य मिळाले, याचा अंदाज बांधणे सोपे व्हायचे.

धान्याची रास म्हणजे शेतकरीराजाची वार्षिक धनदौलत. अन्न हे पूर्णब्रह्म, ह्या पारंपरिक संस्कारामुळे धान्याची हिंदू धर्माप्रमाणे खळ्यावर विधिवत पूजा केली जाते. धान्याची रास खळ्यावर बांधताना ज्यांच्या श्रमामुळे ते मिळते त्यामध्ये विळा, दावण व दोरी या साधनांचीही प्रतिमात्मक पूजा केली जाते. शेताची राखण करणाऱ्या देवाला नारळ, दही-भाताचा नैवेद्य दाखवून, ‘असंच माझं घर धनधान्याने भरु दे, पोरा-बाळांना, गुराढोरांना चांगलं बळीचं राज्य येऊ दे’, असं म्हणून हात जोडून नमस्कार करायचे. राशीतील धान्य पोत्यात भरताना मालक ‘लाभ’ हा उतारादर्शक शब्द म्हणत धान्य पोत्यात भरत असे. दिवाळीच्या वर्षसणाच्या धनत्रयोदशीला पहिल्यांदा घरी आलेल्या नव्या धान्याची पूजा केली जाते आणि नव्या व जुन्या धान्याचा नैवेद्य पळसाच्या पानावर कुलदैवताला अर्पण केला जात असे, अशी आपली मराठमोळी संस्कृती किती संस्कारी व आदर्श होती याची कल्पना या सर्व विवेचनातून आल्याशिवाय राहात नाही.

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू-विनिमय पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते धान्याच्या मोबदल्यात शेतकर्‍याला व इतरांना सेवा पुरवित असत. यामध्ये जे शेतकर्‍याच्या नैमित्तिक स्वरुपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवित त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यानुपिढ्या तेच ठराविक काम करीत. साहजिकच त्यांना शेतकरी धान्याच्या स्वरुपात सुगीला खळ्यावर वर्षभराचा मोबदला एकदाच देत असे. पूर्वी कोणतीही लिखापढी नव्हती तरीही सर्वांचे व्यवहार अगदी सुरळीत चालायचे. खेडेगावांत पूर्वी किती औदार्यपूर्ण आणि प्रामाणिक वातावरण होते, याची कल्पना यावरून सहज करता येते. सामान्यपणे पाटील, देसाई, कुळकर्णी हे सोडून गुरव, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, चौगुला, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बलुतेदार’ म्हणून प्रसिद्ध होते. धान्य कापणी व मळणी या शेती प्रकाराला सुगी म्हणतात आणि खर्‍या अर्थाने शेतकरी बांधव गावातील बलुतेदारांना दिवाळीला धनाची भेट देऊन दिवाळी साजरी करत होते. सुगीचे दिवस हे शेतकरी कुटुंबांचे मौजमजेचे आणि आनंदाचे दिवस.

धान्य पेरणीपासून ते धान्य घरी आणेपर्यंत अनेक प्रकारचे काबाडकष्ट शेतकरीराजा आणि त्याचे पशुधन असणारे बैल पार पाडायचे, पण आता प्रगतिशील यांत्रिकी शेतीमुळे मेटी, तिवडा, खळे, दावण व खोप हे खेडेगावाचे संस्कारी शब्द व मळणीचे रीतीरिवाज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तरीही आजच्या प्रौढ पिढीतील अनेकांचे बालपण ह्या सर्व शेती संस्कारांसोबत बहरलेले आहे. त्यामुळे आजसुध्दा ह्या शब्दांच्या उच्चारासोबतही अनेकांचे अतूट नाते जुळलेले आहे. थोडक्यात, कणसांपासून दाण्यांपर्यंत धान्याचा प्रवास हा शेतकर्‍याच्या राबणाऱ्या व रापलेल्या हातांद्वारेच व्हायचा. म्हणूनच शेतकरी बांधव हेच खरे आपले पोशिंदे आहेत. याची सार्थ जाणीव ठेवूनच ‘जय जवान जय किसान: हा नारा भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी १९६५ साली अलाहाबाद जिल्ह्यातील उरुवा गावातील एका सार्वजनिक सभेत देऊन, शेतकरी बांधवाचा गुणगौरव केला होता.

आज सोनार जसे दागिने मढवतो अगदी त्याच प्रकारे पूर्वी शेतकरीराजा पारंपरिक खळ्यावरील मळणीद्वारे धान्य मढवत होता, असे म्हणणे योग्य ठरेल. पारंपारिक पद्धतीने बैलांकडून म्हणजेच दैवतांच्या पायामार्फत खळ्यावरील मळणी आणि त्या मळणीतून हाताने कमावलेले संस्कारी धान्य आणि आजच्या नवीन तंत्रज्ञान प्रचलित मळणी यंत्रातून बाहेर आलेले धान्य यामध्ये संस्काराचा बराच फरक दिसून येत आहे आणि एव्हाना तितकाच फरक आजच्या दैनंदिन जीवनात दिसून येतो. आजच्या पिढीने यांत्रिकी संस्काराचे धान्य खाल्यामुळे त्यांच्या चालण्या बोलण्यात तसेच वर्तनात आज समाजाप्रति, कुटुंबाप्रति आणि पै-पाहुण्याविषयी आवड व आदर कमी होत आहे. नातेसंबंधातही यांत्रिकपणा निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही आणि त्याची प्रात्यक्षिके पावलोपावली पहायला मिळतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading