October 22, 2024
Book review of Mahadev Mane Vasap by Devidas Soudagar
Home » Privacy Policy » मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं वसप हे बोलकं उदाहरण
मुक्त संवाद

मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं वसप हे बोलकं उदाहरण

अस्वस्थ वर्तमानातील नातेसंबध आणि पर्यावरणीय बदलाच्या साक्षेपी नोंदी – वसप कथासंग्रह ….☘️

मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं हे बोलकं उदाहरण म्हणावे लागेल. बोलीभाषेवरच प्रेम आणि त्यातूनच आकाराला आलेला हा आपल्या माणसांचा आपल्या माणसांची कथा सांगणारा….कथासंग्रह

देविदास सौदागर, तुळजापूर

महादेव माने यांचा वसप कथासंग्रह वाचला म्हण्यापेक्षा मनचक्षूने अनुभवला. हा त्यांचा पहिला कथासंग्रह असावा असे वाटत नाही. चिंतनातून त्यांनी मुरवलेला हा त्यांचा कथासंग्रह कमालीचा वाचनीय झाला आहे. मराठी साहित्यात वर्तमानातील आसाराम लोमटे, किरण गुरव अशा अत्यंत महत्त्वाच्या कथाकारांच्या समृध्द लेखनजाणिवांच्या समीप जाणारा आणि नेमकेपणाने ग्रामीण जाणिवांना स्पर्श करणाऱ्या कथांचा हा संग्रह आहे. यादृष्टीने महादेव माने यांच्या कथा अत्यंत महत्त्वाच्या वाटतात.

या सर्वच कथाकडे बघताना वेगळेपणा जाणवतो. मूलतः कथेत येणारे प्रसंग, भाषा, विशेषतः बोलीभाषा, यावर खुप सचोटीने काम झालेले आहे. या कथालेखनामागे त्यांचे कष्ट तर सहजपणे जाणवतात पण त्यामागची त्यांची चिंतनशीलता ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. त्या सगळ्या चिंतनातूनच हे ग्रामीणजीवनाचे अस्सल लिखाण झालेले आहे.

कृष्णाकाठच्या भवतालातून भेटणारा हा कथासंग्रह तिथल्या अनेक गोष्टी उजागर करत राहतो. यापूर्वी भेटलेला कृष्णाकाठ अन् आताचा कृष्णाकाठ अशी गाठ तो घालतो. पारंपारिक गोष्टी मागे पडून वेगाने यांत्रिकीकरण होण्याचा काळ तो टिपत राहतो. ते टिपत असताना त्यातील एक सल. एक सलग जाणवत राहते. मातीतल्या माणसांची हि कथा नव्या वेदनांचे हुंकारे टाकत राहते तेव्हा तिला अनेक अर्थ प्राप्त होत राहतात. मलपृष्ठावरील पाठराखण करत असताना डॉ. रणधीर शिंदे म्हणतात तसे महादेव माने यांची कृष्णाकाठची कथा मराठी साहित्यात नवीनतम आणि महत्त्वाची ठरते.

या कथासंग्रहात उमटलेला बाप हा एक महत्त्वाचा भाग आहे. पहिल्याच वडाप कथेत एक संवेदनशील बाप भेटतो. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा चालू असणारा खटाटोप वाचून वाचकाचाही जीव तीळ तीळ तुटतो..खरं म्हणजे त्याच्या बाप असण्याचीच ही गोष्ट आहे. मानवी जीवनमूल्याचा वेगाने नाश होत असताना मनात एक अविनाशी संवेदनशीलता त्यांच्या कथेमध्ये तेवताना दिसते तेव्हा अंधाराची भीती वाटत नाही. कथासंग्रहाच्या मध्यंतरात पंख छाटलेला गरुड या कथेत भेटणारा बाप आपल्या मतिमंद लेकीच्या भविष्याची काळजी करणारा आणि त्यावर मनाला प्रचंड वेदनादायी उपाय करणारा हा बाप आहे. आपल्या लेकीचे गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय तो घेतो त्यामागची पार्श्वभूमी अन् एकुण परिस्थिती गंभीरपणे मांडलेली आहे.

कथासंग्रहातील शेवटची कथा भगदाड ही बापलेकीच्या नात्यांचं हृदयस्पर्शी अन् वेदनादायी दर्शन घडवणारी कथा आहे. जिवंत अनुभवातून साकारलेल्या प्रसंगाची धग इथं ठळकपणे जाणवत राहते. तेव्हा वाचकांचे डोळे भरून कधी आले कळत नाही.

या कथासंग्रहात आलेली मुकी जनावरे लक्षात राहणारी आहेत. त्यांच्या जगण्यात ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत याचं यात चलतचित्रण आहे. सुरंग कथेतील म्हैस सुरूंगाच्या आवाजाने घाबरून पळताना रोडवर अपघात होऊन पडते तेव्हा ते चित्र भयाण उभे राहिले आहे. तसेच पाण कथेत नागाची येणारी वर्णन अफाट उमटलेली आहेत. या कथेत सगळीकडे नागाचे भास अन् नागाची भीती दाटून राहिलेली जाणवत राहते. मेडकं या कथेतील पोटुशी म्हैस आणि कृष्णानदीच्या पुरात तिची झालेली वाताहत हे सगळं ठळकपणे उमटलेले आहे. मुक्या जनावराची भावना किती बोलकी असू शकते हे इथं कळून येतं.

मेंढीकिडा या कथेत येणारे शेरडं, मेंढरं आणि त्याच्याशी एकरूप झालेली माणसं इथं उमटलेली आहेत. मेंढराच्या डोक्यात जशी आळी वळवळते. तशी आळी ती राखणाराच्या डोक्यात वळवळली पाहिजे. मग जनावराची भाषा सहजपणे कळायला लागते असं अस्सल गावरान तत्त्वज्ञान इथं वाचायला भेटतं. मेंढरामागच्या जगण्याची गोष्ट सांगत असताना, त्यामध्ये येत गेलेली चिंतनशीलता हा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आलेला आहे. मानवी भाषेला काय पर्याय असू शकतो तर तो म्हणजे संवेदनशील नजर.

भगदाड या कथेतील कुत्री आणि तिची लहान लहान पिल्ले या पूर्ण कथेचा अवकाश व्यापून राहतात. यामध्ये त्यांच्या जीवाचे हाल अन् तगमग मांडलेली आहे. मानवी दुःखाच्या समपातळीत या मुक्या जनावराचे दुःख मांडले आहे. ही तुलना महत्वाची आहे. किंबहुना ती कमीपणा देणारी तुलना नाही. खरं म्हणजे सर्व जीव समान अशी भूमिका घेणारी हि तुलना आहे. यामध्ये त्या जीवाची तगमग बघताना बैचेन व्हायला होतं. मानवी नातेसंबंध अन् प्राण्याचे नातेसंबंध एक आई आणि तिचं बाळ अशा दृष्टिकोनातून हि कथा फिरत राहते.

आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेऊन काही नवीन घडवता येईल अशा दोन कथा या कथासंग्रहात आलेल्या आहेत. विशेषतः अडकित्ता या कथेत आलेलं हळद पिकाचे वर्णन अप्रतिम असे झालेले आहे. त्या कथेतही एक मोडून पडल्यावरही उठून उभं राहण्याची सचोटी, चिकाटी अन् जिद्द दिसते ती वाखाणण्याजोगी आहे. हळदीचं पिवळधम्मक सोनं इथं लवंडलेलं दिसतं तेव्हा ते चित्र देखणं झाले आहे. आवशीद ही पपई उत्पादक शेतकऱ्याची सकारात्मक दृष्टीने पाहणारी ही दुसरी कथा. तितकीच ताकतीची आणि अल्पभूधारक, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाची शेतकऱ्याच्या दृष्टीने प्रतिनिधित्व करणारी मराठी साहित्यातील किंबहुना पहिलीच कथा असावी.

शेतीमधून केवळ झाडे तोडूनच पैसे मिळवायचे असा आशय घेऊन आलेल्या वसप कथेत झाडं तोडण्यासाठी बेभान झालेला कथानायक नंतर नंतर भीतीदायक वाटत राहतो. झाड तोडूनच पैसे कमावण्याची इच्छा विचित्र वाटत राहते. एक वेगळाच दृष्टीकोन इथं उमटलेला दिसतो. झाडं म्हणजे खरंतर माणसाला जपणारी व्यवस्था पण हि झाडं कापता कापता स्वतःच जगणं कधी धोक्यात आलं हे कळू नये इतकं बेभाणपण इथं उमटलेले आहे. एकुण कथेत हि कथा अगदी वेगळीच वाटते त्याची कारणे अनेक निघू शकतील पण मूळ संदर्भ मातीचा आहे.

वाचनसंस्कृतीच्या दृष्टीकोनातून बघत असताना या कथासंग्रहात आलेली एक कथा सहजपणे लक्षात राहणारी अशी आहे. वाचनाची आवड असणारा सदू ड्रायव्हर हा वाचनसंस्कृती जपण्याच्या काळातील एक दुर्मिळ उदाहरण वाटावा असा आहे. तो साधा वडाप ड्रायव्हर आहे पण त्याच्याकडे वाचनामुळे आलेली चिंतनशीलता आहे, संवेदनशीलता आहे. या संवेदनशीलतेमुळे तो एक चांगला माणूस म्हणून उभा राहिला आहे. त्याच्या गाडीत वाचायला काही चार दोन पुस्तके सोबत असतात हि एक भारीच गोष्ट आहे. वाचनाची आवड अन् सवड याची सांगड तो घालताना दिसतो. आपल्या आयुष्यातील दुःखाच्या प्रश्नाची उत्तरे तो पुस्तकातल्या पानावर शोधू बघतो असं हे चित्र इथं लेखकाने रेखाटलेले आहे.

या कथासंग्रहाची महत्वाची ताकद म्हणजे यामध्ये आलेली बोलीभाषा. बोलीभाषेवर लेखकाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. ते वाचकाला सतत जाणवत राहतं. बोलीभाषेच्या लयबद्ध सौंदर्यामुळे या कथेला मातीतल्या माणसांचे अस्सल संदर्भ प्राप्त झाले आहेत. तिच्यात मूळवरचा अगदी खोलपणा आलेला आहे. कुठल्याही बाजूने म्हणूनच हि कथा परकी न वाटता आपली वाटत राहते. अनेक शब्द अन् बोलण्याची शैली जिभेवर कधी रूळून जाते कळत नाही. मायमराठी कृष्णाकाठी कशी नांदते याचं हे बोलकं उदाहरण म्हणावे लागेल. बोलीभाषेवरच प्रेम आणि त्यातूनच आकाराला आलेला हा आपल्या माणसांचा आपल्या माणसांची कथा सांगणारा….कथासंग्रह

पुस्तकाचे नाव – वसप ( कथासंग्रह )
लेखक – महादेव माने
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
किंमत – ₹250


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading