नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील एक विद्या लागते आणि ती विद्या ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला ब्रह्मविद्येच्या बरोबरीला बसवणाऱ्या चक्रधरांच्या मनात कृषीकर्म करणाऱ्यांविषयी काय भाव होता, हे सहज लक्षात येतं.
इंद्रजीत भालेराव
॥ शेताच्या लीळा : यादववकालीन शेती ॥
दक्षिण भारतातून आता आपण पुन्हा मध्यभारतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येऊयात. पैठणच्या साडेचारशे वर्षाच्या शालिवाहन राजवटीनंतर महाराष्ट्रात पुष्कळ उलथापालथी झाल्या. राजेराजवाड्यांनी एकमेकांवर केलेल्या चढाईमुळे अस्थिरता आली. पण पुढं हळूहळू देवगिरीच्या यादवांची राजवट स्थिर होत गेली. याच काळात दक्षिण भारतातल्या तमिळ, कन्नडसारखी आपलीही एक स्थानिक प्रादेशिक भाषा विकसित होत गेली. हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीपासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली होती. पुढं आठनवूशे वर्षात ही भाषा म्हणजे आपली मराठी पूर्णपणे विकसित झाली, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ आपल्या भाषेत निर्माण झाले. नाथ, महानुभाव, वारकरी संप्रदायांनी ही आपली धर्मभाषा म्हणून स्वीकारली. आपल्या या भाषेत त्या काळात निर्माण झालेल्या काही निवडक ग्रंथांमधून आता आपण इथली सात-आठशे वर्षांपूर्वीची शेतीसंस्कृती समजून घेणार आहोत. त्याची सुरुवात महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रापासून करणार आहोत. कारण हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही बारा वर्ष आधी लिहिला गेलेला आहे.
चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर उदास झालेला शिष्यपरिवार चक्रधरांच्या आठवणीवरच जगत होता. त्या सगळ्या आठवणी संकलित करून त्यांचा एक ग्रंथ तयार करावा म्हणजे नंतरच्या अनेक पिढ्यांना तो उपयोगी होईल, असा विचार पुढं आला. त्या सगळ्या आठवणी संकलित करण्याचं काम म्हाईमभट्टांवर सोपविण्यात आलं. हा सगळा शिष्यपरिवार चक्रधरांना ईश्वरी अवतार, पाचवा श्रीकृष्णच समजत असल्यामुळे या त्यांच्या सगळ्या आठवणी म्हणजे ईश्वरी लीळाच. म्हणून या ग्रंथाला नाव देण्यात आलं लीळाचरित्र.
माहीम भट्टानी महाराष्ट्रभर फिरून, चक्रधरांशी संबंधित सर्व स्थळांना भेटी देऊन, लोकांच्या आठवणी जाग्या करून, या सगळ्या लीळा संकलित केल्या. त्यातूनच हा मराठीतला अजोड आणि अद्वितीय ग्रंथ तयार झाला. चक्रधर महाराष्ट्रभर भ्रमण करत होते. प्रवासाच्या सोयी सुविधा नसलेला तो काळ अशा कामासाठी मोठा कठीण होता. शिवाय ज्यांच्याकडं आठवणी आहेत त्यांना त्यांचे महत्त्व असेलच असे नाही. या अनास्थेला सामोरं जात, अत्यंत कष्ट घेऊन, मेहनत करून आणि संयमानं हे काम करावं लागणार होतं. तसं ते म्हाईमभट्ट यांनी केलं.
चक्रधरांनी केलेला संचार हा अत्यंत लहान गावातून, शेतीमातीतून केलेला होता. त्यामुळे या ग्रंथाची निर्मितीच मुळात नांगरामागे झालेली आहे. म्हाईमभट्ट चक्रधरांच्या आठवणी विचारायला जात तेव्हा त्या सांगणारा माणूस रिकामा थोडाच होता. त्याचं शेतातलं काम पडलेलं असायचं. चक्रधरांच्या आठवणी सांगण्यापेक्षा त्याला ते काम जास्त महत्त्वाचं वाटायचं. तो म्हणायचा, ‘मला वेळ नाही. माझा सोन्याचा देहाडा वाया चाललाय’ म्हाईमभट्ट म्हणायचे, ‘ठीक आहे. तू तुझं काम कर. ते करताना तुला जे आठवेल ते सांग. मी ते लिहून ठेवीन.’ अशा अवघड परिस्थितीत म्हाईमभट्टांनी हे वाङ्मयीन काम करून ठेवलेलं आहे. मराठी भाषेवर त्यांचं हे मोठं ऋण आहे.
मी जेव्हा लीळाचरित्रातले शेतीचे संदर्भ शोधू लागलो, तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली की, या ग्रंथाचं लेखन जरी म्हाईमभट्टांनी केलेलं असलं तरी मुळात त्या आठवणी आहेत शेती मातीतल्या माणसांच्या. त्यामुळे तिथं शेतीचे संदर्भ सतत येतात. एक लीळा तर अशी आहे की, ती वाचताना कृषी कर्माचा अभिमान असणाऱ्या माणसाच्या अंगावर मुठभर मास चढतं. आपल्या शिष्य परिवारासह प्रवास करताना एकदा चक्रधर एका शेताजवळ थांबले. तिथला शेतकरी रानात नांगर उभा करून शेजारच्या झाडाखाली जाऊन पाणी पीत बसला होता. आपल्या एका शिष्याला चक्रधर स्वामींनी विचारलं, पांडेजी तुम्हाला नांगर हकता येतो काय ? पांडेजी म्हणाले, ‘नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते ? त्यात न येण्यासारखं काय आहे ?’
चक्रधर म्हणाले, मग दाखवा बरं आम्हाला नांगर हाकून. पांडेजींनी ठीक आहे म्हणून आसूड हातात घेतला. बैलांचा कासरा आखडला. रुमणं हातात धरलं आणि बैलांना चुचकारलं. एक बैल इकडं ओढतोय तर एक तिकडं. नांगर एकदा इकडं पडतोय तर एकदा तिकडं. पितळ उघडं पडू लागलं तेव्हा पांडेजींनी तो नाद सोडून दिला.
मग चक्रधरांनी नागदेबाचार्यांना विचारलं, हे तुम्हाला जमेल ? नागदेवाचार्य म्हणाले, ‘सहज जमेल. कारण तुमच्याकडं येण्यापूर्वी मी हेच काम करायचो.’ चक्रधर स्वामी म्हणाले, मग मला एकदा हा नांगर चालवून दाखवा. नागदेवाचार्यांनी दोन-चार मुरडनं सहज घेऊन दाखवली. चक्रधर स्वामी म्हणाले, तुम्ही नांगर ठीक चालवला, तरीही तुमचं एक चुकलंच. नागदेवाचार्याने विचारलं, काय चुकलं ? स्वामी म्हणाले, तुम्हाला वरंबा फोडता आला नाही.
मग चक्रधर स्वामींनी डोक्याला उपरणं गुंडाळलं. धोतर कमरेला खोचलं. आंगड्यायाच्या बाह्या सारल्या, आसूड हातात घेतला, रुमण्याजवळ कासरा आखडून धरला आणि बैल हाकारले. वरंबा फोडत त्यांनी एका दोरीत तास काढून दाखवलं. चक्रधरांचं हे नेटकं नांगर हाकणं पाहून तिकडं झाडाखाली पाणी पीत बसलेला तो शेतकरी उठून आला आणि आश्चर्याने म्हणाला, ‘तू तर आमचाही बाप निघालास की. या नांगराशी झोंबत आमचा जन्म गेला. पण आम्हाला कधी असा नांगर हकता आला नाही. धन्य आहे तुझी. आश्चर्यचकित झालेल्या आपल्या शिष्यांना चक्रधरांनी एक दृष्टांत सांगितला. तो असा,
एक जण तलवारीच्या पात्यावरून चालण्याचा खेळ खेळत असे. अंग चोरून आणि बुद्धीचं कौशल्य वापरून तो हा जीवघेणा खेळ खेळत असे. ज्याच्याजवळ ही अंग चोरण्याची कला नाही आणि बुद्धीचे कौशल्य नाही, तो नक्कीच चिरला जाईल. नांगर चालवनं ही अशी तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखी कला आहे, असं चक्रधरांनी त्या तलवारीच्या दृष्टांतातून सांगितलं. बरेच जण शेती करणे हे अगडबगड काम समजतात. त्यासाठी कौशल्याची गरज नाही, असं त्यांना वाटतं. पांडेजींच्या माध्यमातून चक्रधरांनी त्यांच्यासमोर एक धडाच निर्माण करून ठेवलेला आहे. नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील एक विद्या लागते आणि ती विद्या ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला ब्रह्मविद्येच्या बरोबरीला बसवणाऱ्या चक्रधरांच्या मनात कृषीकर्म करणाऱ्यांविषयी काय भाव होता, हे सहज लक्षात येतं.
या कामासाठी चक्रधरांनी दिलेला तलवारीच्या धारेवरून चालण्याचा दृष्टांत आजही किती समर्पक वाटतो ते आजच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की आपल्या लक्षात येतं. शेती करणं हे देखील एक असिधाराव्रतच आहे हे इथं चक्रधरांना आवर्जून सांगायचं आहे. शेती हे संयमाची अपेक्षा करणारं, खूप कौशल्याचं आणि अत्यंत महत्त्वाचं काम आहे, हे इथं चक्रधरांनी आपल्या मनावर विम्बवलं आहे. शेतीविषयी इतकी आत्मीयता अध्यात्मिक पुरुषांमध्ये क्वचितच पाहायला मिळते.
लीळाचरित्रातल्या अनेक लीळांमधून चक्रधर कृषीकर्माशी एकरूप झाल्याचे आपणाला दिसून येते. अगदी सुरुवातीच्या काळात नांदेड परिसरात घडलेल्या काही लीळातून चक्रधर गुराख्यांशी एकरूप होऊन खेळण्याच्या आठवणी आहेत. लिंबगाव येथील गोपाळ चावडीतल्या या आठवणी मोठ्या रम्य आहेत. ते गुराख्यांशी खेळलेले आहेत, त्यांच्यासोबत जेवलेले आहेत आणि त्यांना पोहण्यातून त्यांनी योगविद्याही शिकवलेली आहे. नांदेडला तर त्यांनी अनेक महिने एका ब्राह्मणाकडं गुरं राखण्याचं कामही केलेलं आहे.
नांदेडमध्ये एकदा चक्रधर भिक्षा मागायला गेले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की, ‘इतका धट्टाकट्टा आहेस तरी भीक का मागतोस ? त्याऐवजी माझी गुरं राख. मी तुला कायमचं जेवू घालील.’ चक्रधरांनी लगेच त्याची गुरं राखायला सुरुवात केली. अनेक दिवस गुरं राखल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की, हा भिकारी नसून हा तर एक दैवी पुरुष आहे. आता हा आज घरी आला की याचे आपण पाय धरू. हे चक्रधरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आणखी काही लचांड पाठीमागं लागू नये म्हणून तिथून गुपचूप निघून गेले.
एकदा तर ते उकिरड्यातच झोपले आणि सकाळी बायांनी अंधारात राख आणून त्यांच्या अंगावर टाकली. तेव्हा त्या गरम राखेने आणखीच उबदार वाटून ते गाढ झोपले आणि घोरु लागले. बाया म्हणाल्या, उकिरडा घोरतो आहे. नंतर चक्रधर उठून चालायला लागले. तर बाया म्हणाल्या, उकिरडा व्याला.
चक्रधरांची भ्रमंती प्रामुख्याने रानावनातूनच होत असल्यामुळे त्यांचा सतत गुराख्याशी संबंध येत असे. एकदा त्यांना रोज भेटणारा आणि त्यांचा खूप लळा लागलेला गुराखी आजारी पडतो. त्याला खूप ताप येतो. त्याला आई आणि आईला तो, एकुलते एक असतात. त्यामुळे त्याची आई घाबरून जाते. त्याच्यासाठी काहीतरी करण्याची चक्रधरांना विनंती करते. चक्रधर त्याच्या पांघरूणात जातात. त्याचा ताप आपल्या अंगावर घेतात. त्याला पूर्ण बरा करतात. त्याच्या आईची चिंता दूर करतात. ज्याला आपला लळा लागलेला आहे, त्याचं दुःखही चक्रधर पूर्णपणे आपलंसं करतात. गुराख्यांविषयी त्यांना वाटणारी आत्मीयता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करतात.
एकदा ते गुराख्यांशी कापड विक्रीचा खेळ खेळतात. गुराखी म्हणतात, आमच्याजवळ पैसे नाहीत. तेव्हा आम्ही तुमचे ग्राहक कसे व्हावे ? चक्रधर म्हणतात, तुम्ही धामोके आणि चिंचुक्याचे पैसे करा. चक्रधर त्यांच्याजवळच्या कापडाच्या चिंध्या करून त्याच्या घड्या करतात आणि तो खेळ खेळतात. पुन्हा धामोके, चिंचोके परत करून त्यांच्याकडून चिंध्या घेतात. एकेका चिंधीत गोफणीसारखं ढेकूळ घालून फिरवतात आणि ‘झा बोरड्या’ म्हणून पाखरं हाकतात. आणखी एकदा चांदण्या रात्री चक्रधरांनी ‘झा भोरड्या’चा खेळ खेळल्याचा उल्लेख एका लीळेत येतो.
एका लीळेत चक्रधर बाईसांना गुराख्याच्या जेवणाची म्हणजे गोपाळभोजनाची नक्कल करून दाखवतात. तो कसा चौड्यावर बसून, हातात भाकरी घेऊन, अवतीभोवतीच्या आपल्या गुराख्यांकडे पहात जेवतो, ते सोंग हुबेहूब करून दाखवतात. एकेकाळी त्यांनी स्वतः गुरं राखली होती म्हणून आणि त्यांनी फार जवळून आत्मीयतेनं गुराख्यांचं निरीक्षण केलं होतं म्हणून, त्यांना ही गोष्ट सहज जमून गेली. त्यांच्या मनावर गुराख्याचे प्रतिबिंब पक्के ठसलेले होते, असाही त्याचा अर्थ आपणाला घेता येईल.
एकदा बाईसाला गुराख्याचं महत्त्व सांगताना चक्रधर म्हणतात, ‘गुराखी बिचारा सकाळीच उठून गुरांसोबत शेतात जातो. दिवसभर त्यांच्या मागे धावाधाव करतो. थकतो, श्रमतो. संध्याकाळी घरी आला की जेवण करतो आणि गाढ झोपी जातो. पुन्हा सकाळी उठून पहाटंच शेतात जातो. सतत निरागस निसर्गाच्या सानिध्यात राहतो. त्यामुळे तो निरागस निष्पाप राहतो. गावातल्या बारा भानगडीशी त्याचा संबंध येत नाही.’ म्हणून चक्रधरांना गुराखी फार आवडतात.
चक्रधरांनी शांतीबाईसांना बोरीबाभळीला पाणी घालायला लावून त्यांच्या पापाचे परिमार्जन केले. ते म्हणाले, ‘बाई, तुम्ही हे बोरीबाभळी शिंपा : मा तुमचेया साता जन्माचेया कर्माचे येथौनी हस्तउदक घेईजैल’
एका लीळेत चक्रधरांनी धांदूलमोक्षाची कथा मोठी रंजक करून सांगितलेली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक जनावर चरून जात असे. त्यामुळे त्याचं अतोनात नुकसान होऊ लागलं. पण ते जनावर सापडत नव्हतं. म्हणून त्या शेतकऱ्याने रात्री पाळत ठेवून त्याला पकडलं. तो शेपटीला धरून त्याला काठीनं मारू लागला. तेवढ्याच ते जनावर विमानासारखं उडालं आणि स्वर्गात गेलं. तो इंद्राचा ऐरावत होता. पण शेतकऱ्याला त्याच्याशी काय देणंघेणं ? त्याने इंद्राला जाब विचारला की, ‘हे तुझं मसरू. कित्येक दिवसापासून माझं पिक खातंय. ते नुकसान कोण भरून देणार ?’ इंद्र त्याला अमाप संपत्ती देतो. तो खाली आल्यावर त्याची श्रीमंती पाहून लोक त्याला त्याविषयी विचारतात. तर तो त्या मसराची गोष्ट सांगतो. लोक त्याच्या मागं लागून भसराचं शेपूट धरून वर जाण्यासाठी रांगच लावतात. सगळे एकमेकांना धरून वर वर जाताना उत्सुकतेनं लोक विचारतात, किती सोनं मिळेल आम्हाला ? तो धांदुल नावाचा शेतकरी शेपटीचा हात सोडून सोन्याचा आकार सांगतो आणि सगळीच्या सगळी रांग जमिनीवर येते. ही कथा अर्थातच कल्पित आहे. दृष्टांत म्हणून ती सांगितलेली आहे. पण श्रीमंतांचं असलं तरीही ते जनावरच आहे आणि माझं नुकसान करतय, ही शेतकऱ्याची भावना वास्तव आहे.
एका लीळेत चक्रधरांनी असंही निरीक्षण नोंदवलं आहे की, शेतकरी सुखी झाला, श्रीमंत झाला तर तो आळशी होतो. अशा एका माणसाविषयी चक्रधर म्हणतात, ‘तो तुपे भाते जेवू लागला : तांबोळे घेऊ लागला : शेताकडे जाईना’ शेतातल्या भाऊबंदकीच्या भांडणाला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याची साधी इच्छा आहे की, म्हातारपणी मी गोठ्याच्या कोपऱ्यात पडून राहील. माझ्या सुनांनी मला घोटभर आंबील द्यावी.
एका मुलीला सासरी नेऊन सोडण्याच्या वेळी तिचे नातेवाईक म्हणतात, ‘जाल कैसी : आमची वापसा येईल : गहुवाची पेरणी आम्ही आराओ ना’ पेरणीचे दिवस निघून गेले आणि पीक नाही आलं तर पुढे जगावं कसं ? हा प्रश्नच असतो. त्यामुळे पेरणीला शेतकरी घातवेळ म्हणतो. ती टळली तर सोन्याचा देहाडा वाया जाणार, म्हणून अशावेळी शेतकरी कठोर होत असतो. हे आपणा सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी देखील ‘ऐसी कुणबीयाची स्थिती, मढे झाकीती पेरणीशी’ असं लिहून ठेवलेलं आहे. लीळेतील वरील शेतकऱ्याच्या उद्गारातही हाच अर्थ दडलेला आहे. शेतीच्या संदर्भात आलेले लीळाचरित्रातले अनेक शब्द मराठवाड्यात त्याच रूपात अजूनही पाहायला मिळतात. वरील उद्गारात आलेला वापसा हा शब्द आजही इकडं जशाला तसा पाहायला मिळतो.
महानुभावांचा आचारधर्म तसा फार कडक अहिंसावादी आहे. अगदी जैन धर्मासारखा. त्यांच्या आचारधर्मात शेती करणे बसत नाही. कारण चक्रधर स्वामी म्हणतात, ‘तुमचेनी मुंगीही रांड न होआवी’ चालताना तुमच्या पायाखाली नर मेला तर त्यामुळे मादी मुंगी विधवा होईल, तेव्हा प्रत्येक पाऊल जपून टाका. गवताचं पातंही पायाखाली चिरडू देऊ नका. कोणतंही झाड उपडू नका. त्यामुळेही जीवहत्या होत असते. अशा परिस्थितीत शेती करणे कसे शक्य आहे ? परंतु हा सगळा आचारधर्म संन्याशाश्रमासाठी आहे. गृहस्थाश्रमासाठी नाही. म्हणून तर चक्रधरांनी कृषीकर्म तुच्छ मानलेलं नाही. त्याचा गौरव केला आहे. कृषीविद्या ही ब्रह्मविद्येइतकीच महत्त्वाची मानली आहे.
एका लिळेत द्राक्षाच्या शेताचा उल्लेख आलेला आहे. कन्नडला एका ब्राह्मणाच्या शेतात द्राक्षाचे घोस पाहून चक्रधर त्याला हात लावून पाहतात. तेव्हा तो ब्राह्मण त्यांना द्राक्ष काढून, त्यात साखर टाकून खायला देतो. यावरून तेव्हाही द्राक्षे होते आणि ते साखर टाकून खात असत, म्हणजे ते आंबट असावेत, असे आपल्या लक्षात येते. एका लीळेत उंबराच्या फळांचा उल्लेख सापडतो. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना उंबराच्या झाडाखाली फळांचा सडा पडलेला असतो. सर्वांना भुकाही लागलेल्या असतात. तेव्हा ती उंबराची गोड फळं सर्वजण मिळून पोटभर खातात.
चक्रधरांचा भाईदेव नावाचा लहानगा भक्त एकदा शबरीसारखी उष्टी केलेली, गोड आहेत की नाही ते पाहण्यासाठी खाऊन पाहिलेली, बोरं घेऊन येतो आणि चक्रधरांना अर्पण करतो. तेव्हा बाईसा त्याला रागावतात. परंतु हे सगळं कळण्याचं त्याचं वय नाही असं सांगून त्यानं आणलेल्या उष्ट्या बोरांची चक्रधर बाईसाला भाजी करायला सांगतात. तेव्हा बोराचीही भाजी करीत असावेत, अशी नवीच माहिती या लीळेतून आपल्याला कळते. बाभूळशेंगा जेवल्याचा देखील एक नवखाच उल्लेख एका लीळेत येतो. कारण अलीकडे आपण बाभूळशेंगा खात नाही. कदाचित ते एखाद्या पदार्थाचंही नाव असावं.
आंब्याचे उल्लेखही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. एकदा चक्रधर एका आंब्याच्या झाडाखाली झोपले असताना त्यांच्या तोंडापर्यंत आंबे लोंबलेले होते. चक्रधरांनी त्यांचे तसेच सेवनही केलेले आहे. आंबा हे सर्वश्रेष्ठ फळ आहे, याचे निरूपणही चक्रधर एका लीळेत करतात. चक्रधरांना आंबा खूप आवडत असावा. कारण त्यांनी आनंदाने आंबे खाल्ल्याचा उल्लेख अनेक लीळांमधून येतो.
संसार मोचक नावाच्या एका विचित्र आंब्याची माहिती देखील एका लीळेत येते. आपल्याकडे शेतातल्या प्रत्येक आंब्याची चव, आकार, रंग वेगळाले असतात. त्यावरून त्याला आपण वेगळाली नावंही देतो. पण हा संसारमोचक आंबा मात्र वेगळाच आहे. सगळ्या झाडांचे आंबे उतरूनही मालक त्या झाडाला हात लावत नाही. पाखरंही त्या झाडाकडं फिरकत नाहीत. म्हणून बाईसा शेतमालकाला विचारतात, तेव्हा चक्रधरच त्यांना माहिती सांगतात की, हा आंबा खाल्ला की आपली आपोआपच संसारातून मुक्ती होते. बाईसांना आश्चर्य वाटतं. तेव्हा चक्रधर सांगतात, हा आंबा खाल्ला की माणूस मरतो, म्हणून तर पाखरही त्याला तोंड लावत नाहीत. बाईसा विचारतात मग या आंब्याचं काय करतात ? हे झाड तोडून का टाकत नाहीत ? त्याला वर्षभर खारा मिठात ठेवलं तर त्याचं छान लोणचं होतं, अशी माहिती देखील चक्रधर स्वतःच पुरवतात.
हरभऱ्याच्या भाजीचे आणि भाताचे अनेक प्रकार लीळाचरित्रात पाहायला मिळतात. पाणीभात, साखरभात, दहीभात, बोनेभात आणि अगदी गोंड आदिवासींनी पोकळ बांबूत वाफाळलेला भातही इथं पाहायला मिळतो. हरभऱ्याची भाजी तर किती तरी प्रकारे करता येते ते निळाचरित्रात सांगितलेले आह. हरभऱ्याच्या भाजीचे हे सर्व प्रकार अगदी त्याच नावानं मराठवाड्यात अजूनही पहावयास मिळतात. आंब आलेल्या कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची भाजी चक्रधरांना फार आवडत असावी. कारण तीन लीळात तिचे तीन प्रकार पाहायला मिळतात. एका लीळेत कच्ची भाजी आद्रक, मिरी, मीठ, मिरची एकत्र करून तयार केलेला घोळाना येतो. एका लीळेत याच भाजीचं पिठलं केल्याचा उल्लेख येतो. तर तिसऱ्या लीळेत हीच भाजी फोडणी देऊन खाल्ल्याचा उल्लेख येतो. तीनही ठिकाणी चक्रधरांनी मिटक्या मारत जेवण केल्याचं लीळाचरित्रकार लिहितात.
पक्व झालेल्या हरभऱ्याचा हिरवा टहाळही चक्रधर आवडीने खात. वाळलेल्या हरभऱ्याचा कडप भाजून हुळा खाल्ल्याचा उल्लेखही एका ठिकाणी येतो. शिवाय चण्याची भाजी, हरभऱ्याचे वरण आणि पुरण असे कितीतरी पदार्थ एका हरभऱ्याचे लीळाचरित्रात पहायला मिळतात. जमा केलेल्या हरभऱ्याचा हुळा भाजण्यासाठी भटोबास एकदा बाईसांना विस्तव मागतात. त्या नाही म्हणतात म्हणून दूरच्या मंदिरातल्या पणतिचा विस्तव आणून हुळा भाजला जातो. सर्वजण खातात पण नागदेव बाईसाला देत नाहीत. बाईसा त्यांना मागतात तेव्हा नागदेव म्हणतात, थोडी माती खा ! बाईसा चक्रधरांकडे नागदेवाचार्यांची तक्रार करतात. तेव्हा चक्रधर म्हणतात, तो तुम्हाला थोडीच माती खायला सांगतोय का ? बाईसा म्हणतात, मग काय तुम्ही मला जास्त माती खायला सांगणार आहात काय ?
हुळा खाताना सगळेजण एकेक हरभरा तोंडात टाकतात. नागदेव मात्र ओंजळीत हुळा चोळून मुठभर दाणे एकदाच तोंडात टाकतात. तेव्हा चक्रधर विनोदाने म्हणतात, भटोबासांचं जातं मोठं आणि बाकीच्यांचं लहान आहे काय ? सर्व लीळातून चक्रधर यांचा हा विनोदी स्वभाव सतत डोकवत राहतो. रात्रीच्या वेळी ओंब्या भाजून खाल्ल्याचाही उल्लेख एका लीळेत आलेला आहे. एकदा काही लोक चक्रधरांना धरून वेठबिगार म्हणून शेतातल्या कामाला घेऊन जातात. नंतर सोडून देतात. एकदा चक्रधर त्रंबकेश्वरला असताना गौतमऋषींची शेती आपल्या भक्तांना दाखवतात. एकूणच लीळाचरित्रातल्या चक्रधरांना शेताशिवाराचा फार फार लळा आहे हेच खरं.
संदर्भ :
१. लीळाचरित्र – सं. पुरुषोत्तम नागपुरे, ओंकार प्रकाशन, अमरावती (२०१२)
२. आम्ही – बाळकृष्णदादा चिरडे, कोकणाई प्रकाशन, निफाड जि. नाशिक (२०१०)
३. लीळाचरित्रातील समाजदर्शन – सुमन बेलवलकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
४. मराठी विनोद : विविध अविष्काररूपे – गो. मा. पवार, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई – २६ (२०१५)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.