गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कलामंचचा महामृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. सुनील पवार यांच्या सिझर न झालेल्या कविता या पुस्तकास जाहीर झाला आहे. या निमित्ताने या पुस्तकाची परिचय…
प्रा. मीनल येवले,
४२,विज्ञान नगर, मानेवाडा
नागपूर
मो.७७७४००३८७७
कवीला आलेल्या अनुभवातील वेगळेपण, मांडत असलेल्या भावकल्पनांमागील शाश्वत सत्यता, त्यातील सार्वत्रिकता, अभिव्यक्तीसाठीची शब्दसंपन्नता यातून जी निर्मिती प्रक्रिया घडते ती रसिकांच्या मनतळापर्यंत पोहोचत असते. शब्दकल्पनांचा प्रवास वास्तवानुभवाच्या वाटा-वळणातून अर्थसत्वाचा शोध घेत विवक्षित स्थळी पोहोचण्याचा क्षण असतो कविता ! ती कवीला जगण्याला पुरून उरेल इतकी स्वतंत्र ओळख देते. याची अनुभूती सुनील पवार यांचा ‘सिझर न झालेल्या कविता’ संग्रह वाचल्यावर आला. ते कवितेविषयी लिहीतात की,
तुझ्यामुळे मन भरते
पोट कधी भरत नाही
तू येते सिझर न होता
तेव्हा प्रतिभेला भरतं येतं
वेदनेच गाठोड
तुझ्यापुढे सोडता येतं
अशी डॉ. पवार यांची सिझर न झालेली कविता कवीच्या मनातलं बहरलेलं रान असतं, अलगुजाच्या सुरातलं कोकिळेचं गाण असतं. ती प्रेमाची, विरहाची, नात्याची, अश्रूंची, दुःखव्यथांची, कष्टाची, उपेक्षांची कशाचीही असू शकते. ती झऱ्यासारखी कवीच्या अंतःकरणातून पाझरत असते. ती रानवाऱ्यासारखी कवीच्या कानात घुमत असते म्हणून कवीला लौकिक प्रसिद्धीसाठी साहित्याच्या वाऱ्या करण्याची गरज वाटत नाही. जगलेल्या दुःख- वेदनांची उतरंड त्यांना कवितेतून मांडता आली. माणसासाठी कविता लिहिता आली. या कवितेनेच तर कवीचे उन्हातले घरटे सावलीत बांधले. ‘कविता असते’ या कवितेतील प्रत्त्येकच कडवे समृद्ध आहे. जसे की,
वृंदावनातल्या तुळशीपुढचा दिवा असते कविता
सुवासिनीच्या भाळावरचा ठेवा असते कविता
कळीच्या जीवाचा साज असते कविता
रात्रीच्या स्वप्नांचा अंदाज असते कविता
कवीच्या घडण्याची, जगण्याची, त्याच्या आचारविचारांची, त्याच्या सुखदुःखाची, त्याच्या समाजभर पसरत जाण्याची कहाणी कविता असते.
हृदयाला पीळ बसल्यावरच कविता जन्म घेते. एरव्ही कागदाचे अंग काळे करण्यात कवीला अर्थ वाटत नाही. म्हणून ते म्हणतात की,
पंख फुटले जखमांना तरी
वेदनेच्या उसण्या कळा सोसून
प्रतिभेच्या कळा देऊ नये कवीने
अन् घालू नये जन्माला
एखादी लुळीपांगळी कविता
जबरदस्तीने सिझर करून
आई आपल्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस बाळाला जपते, वाढवते. गर्भात त्याची पूर्ण वाढ झाल्यावरच निकोप बाळ जन्माला येते. आईला त्यासाठी जीवघेण्या कळा सोसाव्या लागतात, तसेच कवितेचे असते. गरगरत्या पंख्याखाली बसून घामाच्या धारांवर लिहिलेल्या कवितेत कुठून येईल अस्सल पण? ते आपल्या ‘सिझर’ या कवितेत लिहतात-
आयुष्य दुःखात विरघळताना
कवितेसाठी देह अंथरावा
प्रत्येकाचा काव्यप्रवास
सिद्धार्थापासून सुरू होऊन
तथागताजवळ थांबावा
या कवितेत निसर्गप्रेरित काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवताना विविध प्रतिमांचे कवीने केलेले उपयोजन वैशिष्ट्यपूर्ण वाटते.
सुनील पवारांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असलेली ‘माय’ चूल, मिरगाचा पाऊस, मायची कहाणी, कुंकू अशा अनेक कवितांमधून तिच्या झिजण्या- कष्टण्या- सोसण्यासह पुढे येणारे हृदयस्पर्शी चित्र काळीज हेलावून सोडते.
दिवस उजाडला की, विवंचना उजाडायची
अन् रात्र झाली की,
दुर्भाग्याच्या अंधारात आम्हा
अभागी जिवांना झोप लागायची
म्हणजे माथ्यावर कोरलेली दारिद्र्याची ललाटरेषाच जगणे झाली, चंद्रमोळी घराची भगदाडं लिपता लिपता मेताकुटीस आलेल्या मायचा चुलीशीच संवाद चालायचा. तिच्याजवळ आतला आकांत मांडून, माय वेदना झिरपू द्यायची. चुलीतल्या पेटत्या लाकडाबरोबर रोज तिचे स्वप्न पेट घ्यायचे. हाडाची लाकडं झाली पण सुखाचा दिवस कधी तिच्या वाट्याला आलाच नाही. दारिद्र्यातला तिचा सजलेला चंद्रमौळी संसार, निसर्गदत्त संकटांशी झगडूनही तिच्या डोळ्यात दिसत असलेलं हिरवं स्वप्न, तिच्यातली जिद्द-आशा, उद्याच्या चांगल्या दिवसासाठी ती बापाला देत असलेला धीर या साऱ्यातून चलचित्रासारखी माय वाचकांच्या डोळ्यापुढे उभी करण्यात कवी यशस्वी झाले आहेत. कारण उन्हातान्हात राबूनही तिच्या लुगड्याची ठिगळं बुजली नाहीत. वर्षानुवर्षे कष्ट करूनही लेकरांना पोटभर घास देता येत नाही अशी खंत तिच्या डोळ्यातून कायम पाझरत राहिली.खचलेल्या बापाला तरीही तीच धीर देते.
होईल आबादानी सारी जाईल रातही अंधारी
आपण दोघं होऊ वारकरी आणि वावर पंढरी
राबणाऱ्या बापाच्या सोबतीने कितीही कष्ट झेलायला माय हसत तयार असायची. तिच्या डोळ्यात श्रावण होता. बाप मात्र दुःखाचे अश्रू पिऊन बायको लेकरांपुढे कधीच हतबलता दिसू द्यायचा नाही. कष्ट करत,दुःख पचवत पचवत एक दिवस बायको लेकरांना पोरकं करून बाप काळाच्या पडद्याआड गेला. मायेच्या कपाळावरची शोभा हरवली, तिचं कुंकू पुसलं गेलं. तेव्हा ‘तुझ्या कपायात मले दिसे पांढरं अभाय’ असे कवी म्हणतात. परंतु तिच्या आतल्या पीळवटीसह खचलेल्या मायला तिच्या जाणत्या लेकराने समजून घेतले. आयुष्यभर बापाने दारिद्र्याचा भार डोक्यावर वाहिला मात्र चिमुटभरही सुख कधीच त्याच्या वाट्याला आले नाही. गावखेड्यात पोटासाठी शेतीवाडीत राबणाऱ्या, बाबासाहेबांनी सांगितलेल्या वाटेवरून चालण्यासाठी लेकरांना घडवताना कष्ट करत जगणाऱ्या माणसांचे जगणेच या कवितांमधून प्रतिध्वनीत होते. बालपणापासून मायबापासह कवीने दारिद्र्याचे चटके सोसले, ऊनपावसातलं त्याचं राबणं अनुभवलं, भाकरीसाठीचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिला. त्या दाहक जीवनानुभावांना या कवितेने वाट करून दिली आहे. फाटक्या संसारात सुख मानणाऱ्या ‘मायची कहाणी’ हृदयस्पर्शी आहे. कष्टाने दमून बाभळीच्या सावलीत आपल्या फाटक्या पदराने घाम आणि अश्रू पुसणा-या कवितेतल्या मायसाठी सह्रदयी वाचकांचे काळीज हेलावल्यावाचून रहात नाही.
डॉ. पवार यांच्या ‘सिझर न झालेल्या कविता’ दुःखव्यथांच्या आसाभोवती फिरता फिरता त्यावर मात करत त्या प्रकाशाची वाट शोधू पाहतात. अभ्यास आणि शिक्षणाने ज्ञानाचा तिसरा डोळा कवीला लाभला. रमाईच्या त्यागापुढे कवी नतमस्तक होतात. बाबासाहेबांनी उडण्यासाठी पंखात बळ दिले, प्रज्ञा-शील- करुणेची शिकवण दिली. बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाच्या हिरवळीवर परिवर्तनाची चळवळ उभी झाली.समाजात जागृती झाली. सर्वसामान्यांना आपल्या हक्क-कर्तव्याची जाणिव होऊ लागली.यातून काहींना ताठपणे उभे होता आले. काहींनी इतरांना पुढे येण्यासाठी हात दिला तर काहींनी स्वतःचेच डोलारे अधिक भक्कम केले. अंधारावर मात करून आपल्या स्वप्नातले मूठभर आभाळ कवीलाही निर्माण करता आले.
माणूस शिकून शहाणा झाला खरा पण गटातटाच्या राजकारणात सामील होऊन बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळवू लागल्याचे दृश्य कवीला बघवत नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्त्वाची अवहेलना होते आहे, सत्यासाठी आता कुणाचे रक्त खवळून निघत नाही. जयंती पुरते बाबासाहेबांचे स्मरण केले जाते ही वास्तवता कवीला अस्वस्थ करून सोडते. आंबेडकरी विचारधारेवर कवीचे पोषण झाले आहे. सर्वत्र अंगुलीमाल दिसत असला, वैचारिक विरोधाभास असला तरी कवीची भूमिका सामंजस्याची आहे. शांती- अहिंसा- करूणा यांच्या मार्गाने जगाचे कल्याण होणार यावर कवीची ठाम श्रद्धा आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी कवीने कधी पंढरीची वाट धरली नाही. आईच्या रूपातली रखुमाई कवीच्या काळजात वसलेली आहे. शांतीच्या मार्गावर माथा टेकवत, शुद्ध अंत:करणाने तथागतांचे स्मरण करताना, डोळ्यापुढे बुद्धाची प्रतिमा साकारते तर विठ्ठलाच्या प्रतिमेत कवीला गौतमाचे रुप दिसते. ‘विठ्ठल तथागत एकच’ असल्याचा कवी मनात निर्माण झालेला अद्वैतभाव दोन संस्कृती प्रवाहांना एकत्र आणणारा आहे. निरीश्वरवाद व ईश्वरवाद हे गौण असून माणूस आणि त्याचे कल्याण हेच कवीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. या संग्रहातील काही कविता गेयस्वरूपाच्या तर काही मुक्तछंदातील आहेत.
मुले नाचू लागली हर्ष अक्षरांच्या गाली
माझी पोरकी शाळा आज लेकुरवाळी झाली
किंवा
बळ दिलेस तू पंखात निळाई सजून गेली
वांझ कशी निघाली
त्यांची प्रत्येक थीम बाबा
अशा काही गझलसदृश्य रचना या संग्रहात आहेत. जिंदगी निवडुंग झाली, आसवांची होळी, वावर पंढरी, दुःखाचं कोडं, ज्ञानाची हिरवळ, मूठभर आभाळ असे अनेक कवितांमधील प्रतिमा सौंदर्य लक्षणीय आहेत.
संग्रहातील पहिलीच नितांत सुंदर असलेली ‘प्रार्थना’ ही कविता अमरावती विद्यापीठात बी.ए.तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात आहे. ती अशी-
दमलेल्या मुसाफिराला एक वेळची रोटी दे
लाख मोलाचा आनंद प्रत्येकाच्या ओठी दे
तसेच या तान्हुल्या हातामध्ये रोज दुधाची वाटी दे ,भेगा पडल्या पावलांना तू आधाराची काठी दे, अक्षर शून्य हातामध्ये लेखणी आणि पाटी दे
अशी सर्वसमावेशक, मानव कल्याणाची कवीने भाकलेली करुणा संत ज्ञानेशांनी विश्वात्मक देवाजवळ मानव कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाची आठवण करून देते.
सृजनप्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या काव्यविषयक कविता, मायबापाच्या कष्टत्यागाच्या, प्रेमाच्या छत्रछायेत घडताना उत्कटून आलेल्या जीवन जाणिवांच्या कविता, बौद्ध विचारप्रवाहाच्या घडणीत घडत असतानाच्या कविता, सामाजिक जाणिवेच्या परिवर्तनवादी कविता, हृदयाला पीळ पाडणाऱ्या, जगण्याचा आत्मकथनात्मक आलेख मांडणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. विविध भूमिकातून स्त्रीची विविध रूपे कवीने कवितांमधून साकारली आहेत. तसेच शेतीमाती, पाऊस अशी निसर्गरुपंही या कवितांमधून डोकावलेली आहेत. या कवितांमध्ये प्रेमभाव आहे, मैत्रभाव आहे, राजकारण, शाळा चळवळ, नाती अशा विविध विषयांना या संग्रहातील कवितांनी स्पर्श केलेला आहे. जे वाटले, भावले, उलगडले तसे उत्स्फूर्तपणे, सिझर न करता मांडण्याचा कवीने केलेला प्रयत्न निश्चितच रसिकमान्य, दखलपात्र झालेला आहे. या कवितासंग्रहाला अनेक साहित्य संस्थांनी म्हणूनच सन्मानित केले आहे. एकंदरीतच जगण्याचा आत्मकथनात्मक आलेख म्हणजे सुनील पवार यांचा सिझर न झालेल्या कविता संग्रह आहे.
कवितासंग्रह: सिझर न झालेल्या कविता
कवी – डॉ. सुनील श्रीराम पवार, मो. ९८८१८५१४१३
प्रकाशन – परिस पब्लिकेशन, पुणे
मूल्य : १७०₹ , पृष्ठे: १२८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित