शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या नावाने केला आहे. डॉ. जयसिंगराव पवार संपादक असून वसंत आपटे अनुवादक आहेत. याचा प्रकाशन समारंभ आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुस्तकाबद्दल सांगितलेली माहिती….
हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान हे छत्रपतींचे व्यक्तिमत्व डॉ. बाळकृष्ण यांनी उलघडले
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू ससंदर्भ सामोरे आणले आहेत. मराठा आरमाराचे जनक, हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा अशी महाराजांविषयीची वर्णने डच कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकामध्येच करण्यात आली आहेत. ती बाळकृष्ण येथे सविस्तर मांडतात. इंग्लीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा सर्व प्रकारच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाराजांचे मोठेपण अधोरेखित केले आहे. सर्व बाजूंनी बलाढ्य शत्रूंनी घेरले गेले असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेणे हे विस्मयजनक असल्याचे निरीक्षण डच अभ्यासकांनी नोंदविल्याचे येथे दिसते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचे योगदान कसे आहे याबद्दल डॉ. बाळकृष्ण यांनी विस्तृत मांडणी केली आहे. त्याग, सदाचार, कर्तव्यकठोरता, आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजविली. मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराज यांच्यासाठी २५ हजार पागोडे बाजूला काढून ठेवल्याची नोंदही आढळते.
डॉ. जयसिंगराव पवार
यावेळी डॉ. पवार यांनी डॉ. बाळकृष्ण व छत्रपती राजाराम महाराज यांचे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमधील योगदानही अधोरेखित केले.