September 7, 2024
Environmental Conservation Rule in Chhatrapati Shivaji Maharaj Empire
Home » छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार

मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.

धीरज वाटेकर

सदस्य, वणवा मुक्त कोंकण


‘…गवताच्या लहळ्यास कोणाकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एकेएक जळो जातील…’ कोकणातल्या चिपळूणजवळच्या दळवटणे येथे छावणी करून राहिलेल्या आपल्या लष्करास काटकसरीने व दक्षतेने कसे वागले पाहिजे ? याविषयीच्या सूचना देणाऱ्या ९ मे १६७४ च्या प्रजाहितदक्ष आणि राजधर्म सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापात्रातील ही ओळ आहे. पर्यावरण रक्षणासाठी स्वर्गभूमी कोकणसह देशभर ‘अपवाद’ वगळता जाणीवपूर्वक डोंगरांना लावल्या जाणाऱ्या वैशाख वणव्यांचा विचार आणि छत्रपतींना अभिप्रेत कृती आपण सर्वांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नक्की केला पाहिजे.

राई म्हणजे वनराई तिला सोन्यासारखं मोल होतं म्हणूनच कदाचित महाराजांनी आपल्या चलनी नाण्यांना ‘शिवराई’ संबोधलं असावं. पुण्याजवळच्या ‘शिवापूर’ गावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. आजही त्यातली १०/२० झाडे असायला हवीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले तसे भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले होते. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.

मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.

युद्धनितीत वृक्ष संपदाचे महत्त्व

आदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे. महाराजांच्या मृत्युनंतर १६८२ ते १७०७ पर्यंत मराठी मुलुख जिंकण्याकरिता औरंगजेब धडपडला होता. मराठी माणूस आणि इथल्या वृक्ष संपदेने त्याला हरवलं हे ऐतिहासिक वास्तव आहे.

शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ

शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.

शिवरायांचे दुर्गविज्ञान

कोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे. ‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.

पाणी बचतीचा संदेश

आजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात. शिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळून येते.

आदर्श राज्य कसं असावं ? याचं उत्तम उदाहरण

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेने नोव्हेंबर २०१९ मध्ये चिपळूणला आपले ४ थे पर्यावरण संमेलन भरवले होते. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ या विषयावर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आणि नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांचे व्याख्यान झाले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ यांची आवश्यकता मांडली होती. आजच्या शिवजयंतीदिनी याचा विचार करायला हवा आहे. भारतीय संस्कृतीने कायम पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. चिपळूण जवळच्या दळवटणे येथील सैन्यदलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले पत्र जगभरात भाषांतरित करून दर्शनी लावलं जायला हवं. आदर्श राज्य कसं असावं ? याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र आहे. पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणाचा विचार करणारी शिवकालीन नीती अवलंबायला हवी आहे, असे देशपांडे म्हणाले होते.

चिपळूणात भगवान परशुरामांच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज चिपळूणला आलेले होते. राज्याभिषेकापूर्वी एक महिना त्यांचा इथे मुक्काम होता. चिपळूणच्या रामेश्वराजवळ अंघोळ करून गांधारेश्वरचे दर्शन घेऊन ते परशुरामला गेले होते. भारतीय परंपरेने आपल्याला पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. हे आजचं नाही, आपल्या बहुसंख्य प्राथर्ना निसर्गाशी निगडित आहेत. काले वर्षतु पर्जन्य, पृथ्वी सस्यशालिनी । देशोयं क्षोभ रहितः सज्जना सन्तु निर्भया ।। अर्थात पृथ्वीवर वेळेवर पाऊस होऊ देत. पृथ्वी हिरवीगार राहू देत. आपला देश संकटांपासून दूर राहू देत. सगळे सुखाने नंदू देत. आपले सण निसर्गाशी संबंधित आहेत. सावित्री-यम संवाद हा पर्यावरणाशी संबंधित आहे. त्यात ‘अकारण वृक्ष तोडू नका. नदीमध्ये घाण करू नका’ असं म्हटलं आहे. आपल्या भारतीय नौसेनेचे बोधचिन्ह ‘शन्नो वरुण’ असे आहे. ‘ती पर्जन्य देवता आमचं रक्षण करो’, असं म्हटलेलं आहे. आपल्या जीवनाचे ४ भाग ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, सन्यास. यातला वानप्रस्थ हा खरा वनप्रस्थच असायचा. याचा अर्थ जंगलात राहायचे. महाभारतात युद्ध संपल्यानंतर सगळे जंगलात राहिले होते. ईस्लामचा धर्म ध्वज हिरवा आहे. तिथे प्रचंड वाळवंट आहे. म्हणून हिरवळीचे प्रचंड आकर्षण. माणसाला जगण्यासाठी निसर्गाची गरज आहे. वन वाघाचं आणि वाघ वनाचं रक्षण करतो. असं वचन पूर्वी होतं. शिवकालीन समर्थ रामदासांनीही ‘गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे | धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे’ असे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर यांनीही, विद्युल्लतांचे कडकडाट गगनगर्जना गडगडाट गंगा सरितांचे संघात महापूर मातले ! असे वर्षाकालाचे सुंदर वर्णन केले आहे. पृथ्वी ही शिवपिंडीका, पर्वत शंख त्या शाळुंखा इंद्रे मांडिले अभिषेखा पूर्णपात्रे बहुधारा ! १७ व्या शतकात होऊन गेलेल्या वामन पंडित यांनी सुद्धा, वनी खेळती बाळ ते बल्लवांचे। तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असं म्हटलेलं आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षिणी सुस्वरे आळविती’ असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. मानवाचं निसर्गाशी आतुट नातं आहे. आपण मान्सूनची वाट बघत असतो. दुष्काळाची भीषण वर्णनं आपल्याला इतिहासात भेटतात. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा बारकाईने विचार केलेला होता. याचे शिवचरित्रात उल्लेख आहेत.

शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा राजा

छत्रपतींचा जन्म १६३० सालचा ! १६३० साली प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना ! कैसे होईल होईल, होईल कळेना ! अशी स्थिती होती. एका होनाला (सोन्याचे नाणे) सहा पायली धान्य मिळत होतं. माणसं माणसाला खातील अशी अवस्था आलेली होती. लोकं गावं सोडून गेलेली होती. दुष्काळी स्थिती सावरल्यावर ती परत येत. महाराजांकडे पुन्हा त्या भूभागाची, सहकार्याची मागणी करत. नुसतं दाट जंगल असेल नी माणसं नसतील तर चालणार नाही हाही विचार जुन्या काळात होता. शेतकरीवर्गाचे ‘मृगसाल’ प्रमाणित धरून शिवरायांनी आपला ‘शिवशक’ सुरू केला. त्या समयास ५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावळीच्या सुभेदार रामाजी अनंत यास पाठविलेल्या पत्रामध्ये शिवराय सांगतात, ‘….त्या उपरी रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोस्टीस इलाज साहेबी (शिवरायानी) तुज येसा फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेती जे गोला करावे त्यात ज्याला ते सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्या पासी बैलदाणें संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे. माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही. त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे.’ शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा ऐसा राजा होणे नाही, अशा या प्रसिद्ध पत्राचा संदर्भ दिला. पर्यावरण संदर्भात काही जुन्या शिवकालिन संदर्भांचा आधार मिळतो. शिवछत्रपतींच्या काळात लिहिल्या गेलेल्या लेखनात ‘ झाडांचे महत्व थोर आहे’.

दुर्गम राजधानी रायगड करण्यामागे पर्यावरणीय विचार आहे. रयतेचे भाजी देठास हातही लावू न द्यावा हा विचार करणारे राजा शिवछत्रपती होते. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे महाराजांची १० हजारावर फौज होती. आजही शहरात तत्कालिन हत्तीमाळ, पागा हे शब्द वापरात आहेत. यावेळी दिलेल्या पत्रात राजांनी, ‘…कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल.’ असे म्हटल्याचे त्यांनी नमूद केले. नंतरच्या काळातही कान्होजी आंग्रे यांनी बाणकोट ला सागवानाची लागवड केलेली होती. समुद्रातील जहाजे बनविण्याकरिता ते लाकूड लागायचे. दुर्दैवाने पुढे इंग्रजांनी ते साग ते तोडले. आजही बाणकोटला यातील काही दिसतात. देशपांडे यांनी मांडलेले ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ आजच्या निसर्गह्रासाच्या आणि अनियंत्रित वणव्यांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासताना, उघड्या डोळ्यांनी पाहाताना आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

संस्कार कथांचा संग्रह – बाबांची सायकल

गगनगडाचं विलोभनीय दर्शन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading