साहित्य आणि समाज वेगळा नसतो. साहित्याची बांधिलकी हीच मुळात समाजाची बांधिलकी असते. याच पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ ‘आधी समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून कार्यरत आहे.
अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत
समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन डिसेंबर मध्ये मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन म्हणजे विचाराच्या बांधीलकिशी पक्क नात. अर्थात अंतिमता: विचाराच्या बांधिलकीचं समाजाच्या बांधिलकीशीच नातं असतं. मग ते साहित्य असो किंवा कोणतीही कला. मात्र अपवाद वगळता दुर्दैवाने साहित्यासह विविध ललित कला क्षेत्रामध्ये विचाराच्या बांधिलकीला आजवर फार महत्त्व दिले गेले नाही.
अर्थात विविध कलेची ही विचारशीलता माणसाच्या अस्तित्वाशी, त्याच्या जडणघडणीशी आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्व विकासाशी महत्त्वाची असते.मराठी साहित्य मात्र यापासून कोसो दूर राहिले आणि याच्या केंद्रस्थानी अभिजन आणि बहुजन असा वाद कायम राहिला. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न कोणत्याही पिढीतील लेखक कवीला पडला नाही तो लेखक – कवी मात्र आपली साहित्याची बांधिलकी अभिजन वर्गाशीच ठेवून लिहीत राहिला आणि अशा प्रकारचे साहित्य मनोरंजनवादी / कलावादी राहिले.
अर्थात हे साहित्य नसतं का ? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर जरूर ते साहित्य असतंच असे असेल परंतु अंतिमत: ते माणसाच्या असण्यालाच महत्व देईल याची शाश्वती देता येत नाही. मग असा प्रश्न पडतो की तुमच्या साहित्यातून माणसाचं जगणं वगळलं गेलं तर साहित्य लिहिण्याचं आणि त्यासाठी राबविल्या जाणाऱ्या साहित्य चळवळीचं प्रयोजन काय ?
या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठानची निर्मिती झालेली आहे. लेखकाकडे भूमिका नसेल तर त्याच्या लिहिण्याला आणि जगण्यालाही बाजारू स्वरूप प्राप्त होते. आता तर सोशल मीडियाच्या काळात कोणत्याही क्षेत्रातील माणूसच बाजारी झाला आहे. अशावेळी कलावादी भूमिका घेऊन जगणारी अनेक माणसं या बाजाराला शरण गेली आणि मिळेल तिथे प्रसिद्धी मिळू लागली. एवढंच काय तर भूमिका घेऊन लिहितो असं म्हणणाऱ्या भल्याभल्यानीही प्रसिद्धीच्या बाजारात शरणागती पत्करली.
साहित्य क्षेत्रात एखाद्या लेखक कवीला सगळं मिळूनही माणसाची हाव सुटत नाही. असे नमुनेदार अनुभव वारंवार येत असतात. ज्या भेदाच्या विरोधात जे लेखक उभे राहिले तेच लेखक आता इकडून तिकडून नाचणाऱ्या लोकांना/ जात धर्म परंपरा समर्थननीय मानणाऱ्या कोंडावळ्याला जवळ करताना दिसतात. अशावेळी त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करावासा वाटत नाही तर त्यांच्याबद्दल दया येत राहते. आणि असा प्रश्न पडतो की हे असं का झालं असेल? तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर मिळतं. ते असे की काही काही लेखक कवी ना गंभीरपणे लिहिण्यापेक्षा गंभीरपणे लिहितो याचा आव आणून सांस्कृतिक साहित्यिक राजकारण करण्यात जास्त रस असतो. म्हणूनच अशा सगळ्या प्रदूषित वातावरणापासून चांगलं लिहू पाहणाऱ्याने दूर राहायला हवे आणि अशाच साहित्यिकांसाठी समाज साहित्य प्रतिष्ठान कार्यरत आहे.
विचाराची बांधिलकी स्वीकारून समाज साहित्य प्रतिष्ठानमध्ये अनेक साहित्यिक कार्यकर्ते महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्यामुळेच साहित्य प्रतिष्ठानचे साहित्य विषयक काम उभे आहे. यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाह सुरेश बिले इतर पदाधिकारी विलास कोळपे, नीलम यादव, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, प्रा.संजीवनी पाटील, प्रियदर्शनी पारकर, डॉ दर्शना कोलते, ॲड मेघना सावंत, ॲड प्राजक्ता शिंदे, विजय सावंत. डॉ योगिता राजकर, मनीषा शिरटावले, संतोष जोईल, तुषार नेवरेकर आदींचा समावेश आहे.
आता सगळ्याच क्षेत्राचे नको तेवढे सपाटीकरण झाले आहे. आत्मस्तुती आणि आत्मप्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जात आहे. यातून विचार कृतिशीलता न स्वीकारता छोटे छोटे गट कार्यरत आहेत. त्यामुळे सकस लिहिणारा लेखक – कवी दुर्लक्षित राहतो. अशी परिस्थिती सर्वत्र आहे. त्यामुळे या काळात अपवादाने सकस लिहिणारा दुर्लक्षित राहू नये, म्हणून समाज साहित्य प्रतिष्ठान काम करत आहे. गेली अनेक वर्ष अपवादाने चांगलं काम करणाऱ्या लेखक – कलावंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
घटनातज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णाराव अर्जुन केळुसकर ( सिंधुदुर्ग –केळुस – वेंगुर्ले ) यांनीच बाबासाहेबांच्या हाती पहिले बुद्ध चरित्र दिले आणि पुढे बाबासाहेब बुद्ध विचाराकडे वळले. गुरुवर्य केळुसकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातील एका महनीय व्यक्तीला दरवर्षी समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे गौरविण्यात येते. यापूर्वी या पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुबोध मोरे आणि ज्येष्ठ अभ्यासक / संपादक चंद्रकांत वानखडे यांना गौरविण्यात आले.
यावर्षीच्या या पुरस्कारासाठी विचारशील नाटककार अतुल पेठे यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर यावर्षीपासून कथाकार नाटककार समीक्षक जयंत पवार यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू करण्यात आला असून कादंबरीकार संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन ‘या कादंबरीची जयंत पवार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर सर्वधर्मसमभाव जपत, जाती धर्म वर्ग लिंग या पलीकडे निरपेक्ष विचारांची कास धरत प्रामाणिकपणे व सेवावृत्तीने आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या प्रकाश रामचंद्र रसाळ (सातारा) यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या भूमी काव्यपुरस्कारसाठी वैभववाडी – तिथवली येथील दिव्यांग कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात जातीचा आणि धर्माचा उन्माद वाढला आहे. धर्माचे ध्रुवीकरण करून अल्पसंख्यांक गटाला कोंडीत पकडले जात आहे. या पार्श्वभूमीवर अल्प गटाची मुसटदाबी आणि धर्माधर्मामधील संवाद, सलोख्याची आस बाळगत बंधूभावाची परंपरा व्यक्त करणाऱ्या ‘मनसमझावन ‘ आणि ‘अल्लाह ईश्वर ‘ या दोन ग्रंथांची समाज साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली ही साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची घटना आहे. याबद्दल पुरस्कार निवड समितीचे ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक रणधीर शिंदे यांचे मनापासून आभार.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण ही संस्था सेवाभावी वृत्तीने गेली अनेक वर्ष काम करते. सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या संकल्पनेतून या संस्थेला जोडून समाज साहित्य प्रतिष्ठान गेली दोन वर्ष काम करत आहे. समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन नाथ पै सेवांगणच्या संयुक्त विद्यमाने मालवण सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी समाज साहित्य प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही तळमळीने कार्यरत आहेत. साहित्य रसिकांनीही या संमेलनाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.