December 18, 2024
Deva Zhinzhad talks on Menduchi Mashagat
Home » मेंदूची मशागत बद्दल बोलले देवा झिंजाड
मुक्त संवाद

मेंदूची मशागत बद्दल बोलले देवा झिंजाड

‘मेंदूची मशागत’ हे २०२२ पासून लिखाण सुरु असलेलं तिसरं पुस्तक. ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ च्या चार आवृत्त्या आणि ‘एक भाकर तीन चुली’ च्या सात आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या त्या केवळ आपल्या प्रेमामुळेच. आजवर आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.

देवा अनुसया गोपीनाथ झिंजाड

माझ्या लिखाणावरील आपला विश्वास पाहून पुढचं लिखाणही चांगलंच केलं पाहिजे असं ठरवून ‘मेंदूची मशागत’ ची मी खूप मन लावून मांडणी केली आहे.

खरं तर मी कधीही लेखन पुर्ण होण्याआधी कुठल्याही पुस्तकाचं शीर्षक ठरवत नाही पण ह्या पुस्तकाचं शीर्षक मात्र खूप वर्षे डोक्यात घोळत होतं. ह्या पुस्तकाचा उद्देश हा फक्त अवघड अन विशेषतः परदेशी आदर्श डोळ्यासमोर ठेवत अवास्तव सल्ले देऊन किंवा परदेशी लेखकांचे लेखन अनुवादित करून माणसांच्या मेंदूला बोजड करण्याचा विचार माझ्या मनात अजिबात नव्हता, तर मी जे काही अनुभवलं, ज्या गोष्टींनी मला झपाटून टाकलं, जे काही आजूबाजूला हेलावून टाकणारं पाहिलं, जे जे काही बोचलं त्या सगळ्यातून निघणाऱ्या निष्कर्षातून माणसाला काहीतरी शिकायला मिळू शकेल असं मला ठामपणे वाटत होतं.

म्हणूनच नेमक्या त्याच गोष्टींचं ‘कसदार बियाणं पुस्तकाच्या पाभारीतून आपल्यासमोर पेरायचं मी ठरवलं.’ असे काही महत्वाचे अनुभव जर आपण एकाच पुस्तकात एकत्र केले तर त्या वेगवेगळ्या अनुभवांतून माणसांच्या ‘मेंदूची मशागत’ नक्कीच होईल ह्यावर माझा विश्वास होता. अन् ह्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी वाचल्यामुळे जर एक चोवीस वर्षाची मुलगी आत्महत्तेच्या टोकावरून मागं फिरून ‘रडायचं नाही लढायचं’ असा निर्णय घेऊन नव्या दमानं पुन्हा जगायला सुरुवात करत असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत.

एकूणच आपल्या लिखाणामुळे मेंदूची मशागत होऊन अनेकांना शाश्वत प्रेरणा मिळत असेल तर मग अशाच प्रकारच्या घटनांवरचं एखादं पुस्तक लिहावं अन् खचलेल्या, मरगळलेल्या मनांना उभारी देता आली तर जरूर द्यावी असं मला वाटलं. त्यातूनच मेंदूची मशागत हे पुस्तक आकाराला आलं.

मेंदूची मशागत हे पुस्तक केवळ एकदा वाचून बाजूला न ठेवता स्वतःला शोधण्याचं साधन व्हावं हा माझा हेतू आहे. हे वाचून आपण स्वतःचं मूल्यमापन नक्कीच करू शकता. आपली ताकद कुठली आहे, आपल्यात नेमक्या कुठल्या उणीवा आहेत ह्याची जाणीव होऊन त्यासाठी काय करता येईल ह्याची चाचपणीही आपल्याला ह्यामुळे करता येणार आहे. आता हे पुस्तक आपल्या जीवनाच्या प्रवासात पावलोपावली उपयोगी ठरावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे.

प्रत्येकाचं जगणं समृद्ध होऊन माणसासहित प्रत्येक सजीव सुखी व्हावा हेच ह्या पुस्तकाचं ध्येय आहे.

वाचन, चिंतन, कृती, अनुकरण अन त्यातून मेंदूची मशागत हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक वाचून तुम्ही सध्या जे काही करत आहात ते काम तर सातत्यानं सुरू ठेवणारच आहात परंतु हातपाय गाळून निराश झालेली व्यक्तीही खडबडून जागी होऊन नव्या दमानं कामाला लागेल अशी मला आशा आहे.

मी काही फार मोठा लेखक नाही त्यामुळे ह्या पुस्तकात माझ्या हातून काही चुकलं असेल तर मला माफ करा. लहान मोठा भाऊ मानून, मुलगा समजून फोन करून मला जरूर कळवा. प्रत्यक्षात भेटलात तर माझा कानही धरा.

वाचक म्हणून तो तुमचा अधिकार आहे कारण लेखकापेक्षा वाचक हा मोठाच असतो. आता हे पुस्तक तुमचं झालं आहे. ह्यातील जिवंत अनुभवांनी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून मेंदूची मशागत झाली तर माझ्या लेखनाचं प्रयोजन सार्थकी लागल्यासारखं होईल. इथूनपुढं तुमच्या जगण्यात सुखाची अन आनंदाची भलरी सतत निनादत राहो.

चांगलं वाचू. चिंतन करू. जमेल तेव्हढ लिहू. प्रेमानं बोलू. आवडलेलं इतरांना सांगू. चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करू. वाईटाला झुगारून देऊ. शिव शाहू फुले आंबेडकर ह्यांचे विचार समाजात रुजवू. मेंदूची मशागत करत राहू.

पुस्तकाचे नाव – मेंदूची मशागत (ललित, कथासंग्रह )
लेखक – देवा अनुसया गोपीनाथ झिंजाड
प्रकाशक – न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
मुखपृष्ठ – दीपक कुंभार, कोल्हापूर
सुलेखन – अनिल गोवळकर
संपादन – डॉ. प्रज्ञा भोसले
प्रस्तावना – शरद तांदळे
मांडणी – रत्नेश चोरगे
पृष्ठ – २१२ मूल्य – ३०० रुपये
घरपोच पुस्तकासाठी संपर्क – 9890697098, 8208467391


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading