July 16, 2024
Marathi Novels in 21 Century Vishwas Patil article
Home » एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कादंबरी – विश्वास पाटील.
विशेष संपादकीय

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कादंबरी – विश्वास पाटील.

डॉ. दादा गोरे यांनी आपल्या ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी या उत्तम ग्रंथाच्या संपादनाची ऐतिहासिक व मौल्यवान कामगिरी पार पाडली आहे. अक्षरवाड.मय प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा ग्रंथराज नव्या लेखकांसाठी आदर्शभूत, वाड.मयीन अभ्यासकांसाठी उपयुक्त व ग्रंथप्रेमींसाठी संग्राह्या ठरणार आहे. या शतकातील पहिल्या दोन दशकात प्रगटलेल्या सदतीस मराठी कादंबऱ्यांचा डॉ. गोरे यांनी धांडोळा घेतला आहे. त्या निमित्ताने अनेक अभ्यासकांना व समीक्षकांना लिहिते केले आहे.

विश्वास पाटील

या संग्रहात विचारार्थ घेतलेल्या कादंबऱ्यांचा आशय, विषय यांचे वैविध्य आणि वैचित्र्य विस्मयकारक आहे. आज मराठीत चांद्यापासून बांद्यापर्यंत कादंबरी वाङ्मया एवढा गांभीर्याने आजची पिढी विचार करते आहे हे अन्यथा कदाचित कोणाच्या ध्यानातही आले नसते. सर्वात गोड व धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील ‘पिपिलिका मुक्तीधाम’, ‘फिंद्री’, ‘नदीष्ट’, ‘चाळेगत’, ‘भिनवाडा’ अशा निम्म्याहून अधिक कादंबऱ्या या त्या त्या लेखकांची प्रथम निर्मिती आहेत.

या ग्रंथाच्या वाचनानंतर यातील अनेक मूळ कादंबऱ्या खास मिळवून त्या वाचण्याचा मोह मला आवरला नाही. नवे कादंबरीकार स्त्रियांच्या व्यामिश्र दुनयेचा तळ शोधताना दिसतात. मग ती सातपुडयाच्या परिसरात काबाडकष्ट करणारी भिल्ल स्त्री असो किंवा महानगरातील दलित बाईपासून ते आपल्या काबाडकष्टात मासिकपाळीची कटकट नको म्हणून गर्भाशयाची पिसवी छाटून ऊसतोडीला सामोरी जाणारी मजूर स्त्री असो.

‘फिंद्री’ या कादंबरीत नरवडे नावाचा कल्पिताहून कडु बेताल, मद्यपी बाप अन मिरूबाई नावाची सापाचं जहर उतरविणाऱ्या रानवनस्पती सारखी भाबडी, कष्टाळू दक्ष व समंजस आई. डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन अडचणींच्या विस्तवाचं रान तुडवत जिददीनं पुढे जाणारी संगीता नावाची एक दलित पोर, हा पीळदार त्रिकोणी गोफ आपल्या पहिल्याच कादंबरीत समर्थपणे रेखाटण्यामध्ये लेखिका सुनीता बोर्डे कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत.

बारावीची परिक्षा देणाऱ्या आपल्या पोरीला पेपरासाठी बापाकडून शुभेच्छा मिळणं दूरच राहिलं. पण पोर कॉलेजात जाणार ती ‘चाळा करायला’च अशा बुरसट तालीबानी मनोवृत्तीचा बाप. जो परिक्षेच्या आधल्या दिवशी पोटच्या पोरीच्या साऱ्या वहया-पुस्तकं रागाने भरलेल्या विहिरीत फेकून देतो. अंगावर डोंगर कोसळल्याच्या त्याही स्थितीत गरीब अज्ञानी आई लेकीच्या मदतीला धावते. तिला सनातन्यांनी तुकोबांच्या वहया इंद्रायणीच्या डोहात बुडविल्याची आठवण करून देते. कळकळीने सांगते, “एकानं इस्तु ( विस्तव ) झालं तं दुसऱ्यानं पाणी व्हावं लागतंय.”

‘फिंद्री’ कादंबरीमध्ये तरारून आलेल्या भाषावैभवाची नोंद घेण्यासाठी एखादा स्वतंत्र लेखच लिहायला हवा. भारतीय साहित्यात एखादया भाषेत ‘फिंद्री सारखी अशी अभिजात कलाकृती एखादया दशकातून क्वचित जन्माला येते, हे मी पुरेशा जबाबदारीनं लिहितो आहे. महाबळेश्वर जवळच्या तापोळयाच्या आसपास कोयनेच्या विस्तीर्ण जलाशयाकाठी अडकून राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांची ‘भिनवाडा’ ही विदारक गोष्ट. त्या दुर्दैवी, डोंगरी, दुर्गम पट्टयातील कष्टकऱ्यांचं भेदक चित्रण बाळासाहेब कांबळे करतात. निवडणुकीच्या मोसमापुरती गोड भाषणे ठोकून गंडवणारी राजकारणी बांडगुळे, तसेच कांदाट खोऱ्यातील नाडल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न घेऊन त्या वंचितांच्या दुःखाला ते आपल्या शब्दसामर्थ्याने वाट मोकळी करून देतात.

‘मासोली’ या कादंबरीमधे सुनील गायकवाड कुंदा नावाच्या भिल्ल सशक्त आदिवासी नायिकेचे जगणे उभे करतात. कोणाची बटीक होण्यापेक्षा अब्रुला हात घालणाऱ्या गब्रुचे हात छाटले पाहिजेत अशा बाण्याची ही नायिका. ‘आरंबळ’ या कादंबरीत सुध्दा शहानूर नदीकाठच्या यशोदी नावाच्या जिददी कष्टकरी स्त्रीची कहाणी रा. गो. चवरे सादर करतात. सर्पदंश, मधमाशांचा हल्ला अशा संकटांसह कडुगोड मानवी प्रवृत्तीच्या हल्ल्यांनाही दाद न देणारी ताकदवान स्त्री इथे आढळते.

मग्रूर तलाठयाला वठणीवर आणणारी शोभा ही व्यक्तिरेखा विजय जावळे यांच्या ‘लेकमात’ मध्ये भेटते. उसतोड कामगारांचं कष्टदायी जीणं शब्दबध्द करणारी ही कांदबरी. या आधी बा. ग. केसकर यांनी ‘कुणाच्या खांदयावर’ (सुरवंता) ही याच विषयावर लिहिलेली सलामीची अभिजात अशी कलाकृती. त्यानंतर मोहन पाटील (साखरपेरा) शिवाय ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांची ‘कूस’ हया साऱ्या लक्षणीय कलाकृती आहेत.

‘अग्निकाष्ठ’ आणि ‘अंतःपुरूष’ सारख्या अव्वल कादंबऱ्या लिहिणाऱ्या बाबु बिरादार यांची ‘आदिवास’ ही नवी कलाकृती. तीन राज्यांच्या सीमारेषेवर जीवन कंठणाऱ्या सुंद्राबाईच्या निमित्ताने त्यानी खऱ्या अर्थी स्त्रीसूक्तच प्रगट केले आहे. नायिकेच्या भूतभविष्याचा विचार फायदयातोटयाच्या व्यवहारी तराजुतून तिचा चुलताच घेतो. बाईचे जीणे हे पुरूषी लहरी, मग्रुरी आणि अभिमानाच्या चौकटीतच कसे बंदिस्त असते याची बिरादार नेटकी मांडणी करतात. एकुणच फडके युगात सायकलीवर बसण्यासाठी बुजणाऱ्या मराठी कादंबरी नायिकेचा प्रवास आता थॉमस हार्डीच्या ‘टेस ऑफ डर्बरव्हीलच्या बांधाला जाऊन भिडेल अशी प्रसादचिन्हे ही स्त्रीवादी नवी मराठी कादंबरी दाखवते आहे.

या युगातील मराठी कादंबरी प्रयोगशीलही आहे. ‘पिपिलिका मुक्तिधाम’ हया बाळासाहेब लबडे यांच्या मनोविश्लेषणात्मक कादंबरीचे समीक्षकांनी या आधी कौतुक केले आहेच. त्यांची ही मेटाफिक्शन समकालाच्या अवकाशात सामान्यांच्या प्रश्नाना सुध्दा भिडते. प्रभावी रूपकाचा समर्थपणे वापर करते. ’96 मेट्रो मॉल’ ही श्री. प्रणव सचदेव यांची कादंबरी अद्भुतिकेच्या अंगाने जाणारी प्रयोगशील कादंबरी. मयंक या नायकाच्या निमित्ताने आज बोकाळलेली मॉल संस्कृती, वर्तमानकालीन माणसाचा अतिरेकी हव्यास, चंगळवाद आणि गगनचुंबी भांडवलशाहीच्या अजेंड्यावरच घाव घालते.

‘नदीष्ट’ ही मनोज बोरगावकर यांची आणखी एक लक्षवेधी कांदबरी. नदिचा डोह लेखकाला गर्भाशयासारखा वाटतो. नदिच्या तळाकडे नव्हे तर तिच्या खोलीच्या आणि आसपासच्या मानवी जीवनाच्या मूल शोधासाठी बोरगांवकरांची लेखणी धडपडते. एखादया वास्तु, घटना अगर भौगोलिक वास्तवाच्या बिंदुभोवती जागतिक कादंबरीकार कशी चक्री घेतात. याचे उत्तम उदाहरण नोबेल पारितोषक विजेत्या इवो आंद्रिच यांनी आपल्या ‘द ‘ब्रिज ऑन रिव्हर द्रीना’ या हंगेरियन कादंबरीमध्ये काही वर्षापूर्वी समर्थपणे दाखवून दिले होते.

मनुष्यजातीवर ओढवणारी नैसर्गिक संकटे आणि निसर्गावरच अंधआघात करून तिथल्या संपत्तीचा -हास करणारी दुष्ट मनुष्यप्रवृत्ती, या दोन बिंदुभोवती आजचे अनेक कादंबरीकार फिरताना दिसतात. ‘विजेने चोरलेले दिवस’ मध्ये रात्रीची लाईट म्हणजे विंचु, साप, इलेक्ट्रिसिटीचा जीवघेणा करंट. एकुणच कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनाची होणारी रोजची आबदा वीज ही मुलभूत समस्या केंद्रस्थानी ठेवून संतोष जगताप यांनी लिहिलेली ही कादंबरी एक महत्वाची कलाकृती ठरते.

‘पाऊसकाळ’ या विजय जाधवांच्या कादंबरीमध्ये गावपरिसराला तारणारं पाणीच एखादया मारक्या खविसासारखं पुराचं भयानक रूप घेतं. नदीकाठच्या गावांच्या मूळावरच उठतं. एकीकडे तुटणारा परंपरागत गावगाडा आणि पुराच्या तांबूसऱ्याड तवंगाखाली जगणाऱ्या नानारंगी व भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांचं जग सुध्दा कादंबरीकार जाधव इथे उलघडून दाखवतात.

कादंबरीकार म्हणून मराठी साहित्यात प्रतिष्ठा पावलेल्या अनेक जेष्ठ लेखकांच्याही काही कसदार कादंबऱ्यांचा सुध्दा समावेश ह्या संग्रहामध्ये आहे. ‘ब बळीचा’ ही राजन गवस यांनी कृषिसंस्कृती केंद्रस्थानी ठेवून तिच्यावर जागतिकीकरणाचा होणारा विविधांगी घाला शब्दबध्द केला आहे. कादंबरीच्या मांडणीचा प्रचलित धोपटमार्ग न पकडता त्यांनी बहुस्तरीय कथातून केली आहे. ‘चाळेगत’नेच प्रवीण बांदेकर यांचे कादंबरीकार म्हणून स्थान पक्के केले. कोकणपट्टयातील जागतिकीकरणाच्या जोरकस वाऱ्याचा परंपरागत मासेमारी, धर्मकारण आणि सडलेल्या राजकारणाच्या चौकटीवर होणारा परिणाम ही कादंबरी रेखाटते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची घुसखोरी आणि आचके देणारी जुनी ग्रामसंस्कृती याचे उत्तम दर्शन ही कादंबरी घडविते.

यंग इंडियाचा ग्रुप सेल्फी’ या कादंबरीत एका बड्या धनवान मित्राच्या शाही लग्न सोहळ्यानिमित्त बालपणीचे मित्र दीर्घकाळाने एकत्र जमतात. त्या निमित्ताने जागतिकीकरणाच्या गाजावाजात इथल्या भूमिपुत्रांच्या होणाऱ्या शोकांतिकेचा स्वर इथे लक्ष्मीकांत देशमुख अचूक पकडतात. ‘तसनस’मध्ये मातीशी झटया घेणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचं कुठल्या भुईतल्या धाग्यांना चिवटपणानं नांगराच्या फाळाला बिलगून बसावं असं जगणं आसाराम लोमटे मांडतात. त्यांनी या कादंबरीसाठी दस्ताऐवजी निवेदन शैलीचा आधार घेतला आहे. त्यात शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी, त्यांच्यावरचा पोलीसी गोळीबार आणि श्रीमंतांच्या दंडेलशाहीचंही दर्शन घडतं. तर माझ्या ‘नागकेशर’ मधील बडया सहकार सम्राटांच्या घरातील नातेसबंधांचा आणि त्यांच्या षड्रिपुंचा धांडोळा डॉ. रविंद्र तांबोळी आपल्या लेखात घेतात.

या आधी स्पर्शही न केलेल्या अनेक विषयांच्या पोटात नवी कादंबरी घुसताना दिसते. ‘टिश्यु पेपर’ ही रमेश रावळकरांची कादंबरी उच्चभ्रु आणि नवश्रीमंत वर्गाच्या तनामनाचे चोचले पुरविण्याऱ्या बाजारू संस्कृतीचे विदारक दर्शन घडविते. रावळकर बारमधले वेटर, उस्ताद, बारबाला, मोरीवाली अशा स्वानुभवावर बेतलेल्या त्या अनोख्या दुनयेचे दर्शन आपल्या साहित्यकृतीमध्ये समर्थपणे घडवितात. बंगाली साहित्यात काही दशकांमागे अशीच शंकर यांची ‘चौरंगी’ नावाची हॉटेल संस्कृतीवरील कांदबरी गाजली होती.

तर सत्ताकारणाची आणि अर्थकारणाची गावोगाव केंद्रे बनणाऱ्या पतसंस्थांचा ठाव महेंद्र कदम आपल्या ‘तणस’मध्ये टिपतात. सामान्यांच्या कल्याणाची तुतारी वाजवत स्थापन होणाऱ्या या संस्थाच गोरगरीबांच्या आर्थिक नाशाचे कारण ठरतात. सहकाराच्या फायदयाच्या गंगेतून नामशेष होणारा सामान्य माणूस आणि राजकिय मुल्यांची घसरण यावर श्रीकांत देशमुख यांची ‘पिढीजात’ बोट ठेवते. ‘रहबर’ मध्ये सलीम नावाच्या एका हंगामी प्राध्यापकाच्या शोषणाची व्यथा मांडताना रफिक सूरज संवादलेखनात दख्खनी भाषेची पखरण करतात. त्यामुळे कथाप्रवाहाची गोडी वाढते.

ल. म. कडु यांची ‘खारीचा वाटा’ ही किशोरवयीन मुलांवर गारूड घालणारी उत्तम कलाकृती ठरते. समृध्द, सुंदर भाषाशैली आणि नेटक्या निसर्ग वर्णनांच्या वाटेने पुढे सरकणारी ही कादंबरी. ओल्या गवतातून वाहणाऱ्या झऱ्यासारखा आपला कथाप्रवाह पुढे रेटत राहते.

यंत्र आणि कॉम्पुटर युगात ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या आबाळीवर व पोटच्या लेकरांच्या कृतघ्नपणावर ‘पिंडीवरचे विंचु’ चांगलेच ओरखडे ओढते. भीमराव वाघचौरेनी लोककलावंत शंभुवाघ्या आणि त्यांची अस्तुरी अंजाई यांच्या परवडीची ही दुःखद कहाणी चितारली आहे. आपल्या जन्मदात्यांचे मुडदे लपवून आपल्या भावंडाकडे ती जबाबदारी ढकलण्यापर्यंत आजची मुले किती हीन पातळीवर उतरतात याचे दर्शन कादंबरीकार घडवितो. ‘काळवाटा’ मध्ये उत्तम बावस्कर मुलाच्या शिक्षणसाठी उसणेपासणे मागत दारोदार फिरणाऱ्या गरीब बापाला डोळयांसमोर उभा करतात.

सचिन कंडुलकर ‘कोबाल्ट ब्ल्यू’ मधे आजच्या धावत्या जगातील समलिंगी जाणीवा आणि स्त्रीपुरूष आकर्षणातून निर्माण झालेल्या गुंतावळयाचा शोध घेतात. विदर्भातील बिघडलेल्या शैक्षणिक व्यवस्थेच्या लक्तरांवर आणि राजकीय मुल्यांच्या घसरगुंडीवर रवींद्र शोभणे यांची ‘होळी’ प्रहार करते. परिक्षा, कॉपी, व शैक्षणिक जगातील बजबजपूरी चितारताना रमेश इंगळे यांची ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ ही कादंबरी त्यांच्या आवडत्या शिक्षण विभागाची नवसफर घडविते.

सुशील धसकटे यांच्या ‘जोहार’ कादंबरीमध्ये विदयापीठातील जातीय राजकारणाच्या संबंधांवर हल्ला चढविला जातो. तर कुचकामी शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करणारी प्रसाद कुमठेकरांची ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या’ ही आणखी एक वेधक कादंबरी. ‘मी सावित्री ज्योतीराव’ ही कविता मरूमकर यांची वेगळया वाटेवरची चरित्र्यात्मक कादंबरी आहे. पौगंडा अवस्थेतील मुलांच्या मनोव्यापारावर शर्वरी पेठकर यांची ‘तूर्तास खाजगी एवढंच’ प्रकाश टाकते.

‘निळ्या डोळयांची मुलगी’ ही शिल्पा कांबळे यांची कादंबरी. मुंबई महानगरातील दलित तरुणीच्या जीवनाचे ताणेबाणे विषद करते. ढासळत्या गिरणगावाचा व कामगार वस्त्यांचा जी. के. ऐनापुरे आपल्या ‘रिबोल्ट’ कादंबरीत धांडोळा घेतात. किरण गुरवांची ‘जुगाड़’ कोल्हापूर, पुणे आणि भोसरी परिसरातील औदयोगिक पट्टयात बोकाळलेल्या अव्यवस्थेची दमदार मांडणी करते. शिवाय मिलिंद बोकील यांची ‘सरोवर’ व रविंद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांची ‘खेळघर’ या सुध्दा अशाच वेगळ्या वाटेवरच्या उत्तम कादंबऱ्या आहेत.

या संग्राहात ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ (आनंद विंगकर), ‘इन्शाल्लाह’ (अभिराम भडकमकर), ‘ईश्वर डॉट कॉम’ (विश्राम गुप्ते), ‘एक होता कार्यकर्ता’ (तानाजी चोरगे), उपहासाची अनवट वाट चोखाळणारी श्रीकांत बोजेवार यांची ‘पावणेदोन पायाचा माणूस’, आटपाडी परिसरातील ग्रामीण नातेसबंधांचा उत्तम शोध घेणाऱ्या मेघा पाटील यांच्या कादंबऱ्या, तसेच छावणी (नामदेव माळी), ‘गावई’ (बबन मिंडे), ‘बुर्गाट’ (महेश खरात) अशा काही महत्वपूर्ण मराठी कादंबऱ्यांची नोंद राहून गेलेली आहे.

नव्या मराठी कादंबऱ्यांच्या प्रवाहाचा हा डॉ. गोरे यांचा शोध खूपच लक्षणीय, व्यापक बहुमुखी आणि बहुस्तरीय ठरतो. अन्यथा मराठी साहित्यात विदयापीठीय गणगोतावळा, लट्ठ परदेशी फंडीय पारितोषक वाटपाची कबजेदारी छुपे मित्रमैत्रिणी रक्षण संवर्धन व पाठराखण वाड.मयीन बाबागिरी या शिवाय अलिकडे काही घडताना दिसत नाही असे आरोप केले जातात. त्या पार्श्वभूमीवर डॉ. गोरे यांचा हा संपादीत संग्रह खूप बोलका आणि शेलका आहे. उदयाच्या कादंबरीकारांसाठी मार्गदर्शक व आदर्शभूत ठरणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

उन्नीस बीस मधला फरक

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

पावसाच्या भाकीतासाठी निसर्गाची साधनें…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading