प्रश्नांची मुळे शोधता आल्यानंतर त्या मुळांची वाढ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा नवी पालवी ही फुटतच राहणार. नवे प्रश्न निर्माण होत राहणार. प्रश्नाचे मुळ नष्ट केल्यास आपोआपच नव्या प्रश्नांची पालवी वाळून जाईल. यासाठी मुळावर घाल घालायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।।305।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातलें तर त्या झाडाचा नाश कसा होणार ?
एखादी गोष्ट नष्ट करायची झाल्यास त्याच्या मुळावर घाव घालावा लागतो. वरवर नुसती पाने तोडून काहीच साधत नाही. मुळ जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्या झाडाची वाढ होतच राहणार. पालवी येतच राहणार. मुळ मरत नाही, तोपर्यंत त्यात जिवंतपणा राहणारच. तसेच दोषांचे आहे. दोष नष्ट करायचे असतील तर त्याच्या मुळाशी जायला हवे. तो दोष कसा उत्पन्न झाला, याचा विचार करायला हवा. याचे उत्तर मिळाले तरच तो दोष नष्ट करता येईल.
काहींना सिगारेट, तंबाखूचे व्यसन असते. ते सोडायचे आहे. पण सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय काही जातच नाही. पण सोडण्याची तीव्र इच्छा मात्र असते. असे का होते ? या व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी काय करायला हवे. तर या व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव त्याला व्हायला हवी. एकदा का त्याची जाणीव झाली की हळूहळू व्यसनापासून दूर जाण्याची मानसिकता तयार होऊ लागते. यातच या व्यसनाचा आर्थिक फटका कसा बसतो. याचा विचारही पटवून द्यायला हवा. अरेरे या व्यसनावर आपण दिवसाला इतके खर्च करतो. महिन्याभरात इतका खर्च यावर होतो. हे व्यसन सुटले तर आपले इतके पैसे वाचतील असे विचार याच कालावधीत त्या व्यक्तीच्या मनावर बिंबवायला हवेत.
पण असे करूनही व्यसन सुटतेच असे नाही. कारण या व्यसनाचे मुळ अद्यापही जिवंत आहे. मुळात हे व्यसन कशामुळे लागले त्याचा शोध घेण्याची गरज आहे. धनसंपन्न असूनही अशी व्यसने असतात. मग पैसा हे कारण नाही. तर मानसिक शांती, समाधान हे त्यामागचे कारण आहे. मन शांत व नियंत्रणात ठेवता यायला हवे. मनातच व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी. यासाठी तणावातून सुरू झालेले हे व्यसन सुटू शकेल. तणावमुक्ती हे व्यसनावरील उत्तम औषध आहे.
तणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची कास धरायला हवी. मनावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय अध्यात्मात सांगितले आहेत. पण हे पुस्तकी ज्ञान आत्मसात करून मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी ज्ञानेश्वरीच्या पारायणासोबत साधना ही आवश्यक आहे. ज्ञानेश्वरी साधनाच करायला सांगते. मनावर विजयी होण्याचा तो उत्तम मार्ग आहे.
प्रश्नांची मुळे शोधता आल्यानंतर त्या मुळांची वाढ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा नवी पालवी ही फुटतच राहणार. नवे प्रश्न निर्माण होत राहणार. प्रश्नाचे मुळ नष्ट केल्यास आपोआपच नव्या प्रश्नांची पालवी वाळून जाईल. यासाठी मुळावर घाल घालायला हवा. तेव्हाच सर्व प्रश्न संपतील. साधनेत व्यत्यय देणारे प्रश्न सोडवण्यासाठी साधनेस व्यत्यय करणाऱ्या प्रश्नांचे मुळ शोधायला हवे व ते उपडून टाकायला हवे. तेव्हाच साधना व्यवस्थित होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.