मनात आणले तर हे व्यसन एका क्षणात सुटू शकते. व्यसन सुटण्यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव उपाय आहे. वाईट व्यसन सुटण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी. चांगल्या गोष्टीत मन रमवायला हवे. चांगल्या गोष्टींचे व्यसन लावून घ्यायला हवे. मनात वाईटाचा विचारच येणार नाही, असा बदल घडवायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान।
किंबहुना समाधान । तो मिळे तैं ।। १८८।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे ! त्याची जेव्हा आम्हांस भेट होते, तेव्हांच आम्हांला समाधान वाटते.
व्यसन हे वाईट गोष्टींचेच असते असे नाही. काही चांगल्या गोष्टींचेही व्यसन असू शकते. कोणाला कलेचे व्यसन असते, कोणाला सतत गाणी ऐकण्याचे, टीव्ही पाहण्याचे व्यसन असते. कोणाला तंबाखू, मद्य, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन आदींचे व्यसन असू शकते. व्यसनी मनुष्यास आवश्यक गोष्ट मिळाली नाही, तर त्यांचे मन अस्थिर होते. जीव कासावीस होतो. तो पदार्थच त्याची तहान-भूक होते. त्या पदार्थाच्या सेवनाशिवाय त्याला चैन पडत नाही. कोणत्याही कामात त्याला रस वाटत नाही. अशावेळी त्याच्याजवळ अमृत जरी आणून ठेवले तरी त्याने त्याची तृप्ती होत नाही. मनाला केवळ आणि केवळ तोच पदार्थच तृप्त करू शकतो. अशी अवस्था त्याची असते.
व्यसन हे लवकर सुटतही नाही. वाईट गोष्टींच्या व्यसनाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तंबाखू खाणे आरोग्यास धोकादायक आहे. त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. या गोष्टी माहीत असूनही तंबाखू खाणे काही सुटत नाही. मद्याचेही असेच आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उध्वस्थ झाले. अनेक घराणी नष्ट झाली. वाईट व्यसनाने शरीराची चिरफाड होऊनही ही व्यसने सोडण्यास त्या व्यक्ती तयार नसतात. मरण समोर दिसत असले, तरी व्यसन काही सुटत नाही. इतकी घातक व्यसने सोडण्यासाठी मनाची तयारीच करावी लागते.
मनात आणले तर हे व्यसन एका क्षणात सुटू शकते. व्यसन सुटण्यासाठी मनपरिवर्तन हाच एकमेव उपाय आहे. वाईट व्यसन सुटण्यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला हवी. चांगल्या गोष्टीत मन रमवायला हवे. चांगल्या गोष्टींचे व्यसन लावून घ्यायला हवे. मनात वाईटाचा विचारच येणार नाही, असा बदल घडवायला हवा. चांगल्या गोष्टींचे व्यसन लागण्यासाठी मनावर तसे संस्कार करावे लागतात. मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावावी लागते. वाईट गोष्टींची सवय केव्हा लागली याची कल्पनाही येत नाही. पण चांगल्या गोष्टी लागण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसे वातावरण निर्माण करावे लागते.
सर्वसंपन्नता असणाऱ्यांनाही अनेक वाईट व्यसने असतात. चांगल्या संस्कारित वातावरणात वाढलेलेही अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी मनाला चांगल्या गोष्टींची सवय हा एकमेव त्यावरील उपाय आहे. चांगल्या गोष्टीत मन गुंतवूण ठेवणे गरजेचे आहे. आत्मज्ञानप्राप्तीचे व्यसन भक्ताला असायला हवे. त्याच्या प्राप्तीसाठी जीव कासावीस व्हायला हवा. त्यासाठी मन सद्गुरूंच्या अनुभूतीत रमायला हवे. म्हणजे वाईट व्यसने आपोआप दूर होतात.
गुरुंना सुद्धा व्यसन असते. गुरुंना भक्त भेटीचे व्यसन असते. आपण भगवंताच्या भेटीला जातो पण येथे गुरु भक्ताला भेटायला येतात. भक्ताला भेटल्याशिवाय त्याच्याशी हितगुज केल्याशिवाय गुरूंना सुद्धा चैन पडत नाही. ज्ञानदान हा गुरुंचा धर्म आहे. पण ज्ञान घेणाराच नसेल तर गुरुंना सुद्धा चैन कसे पडेल. गुरु अशा भक्ताच्या शोधात सदैव असतात. ज्ञानदानाची परंपरा पुढे नेणारा शिष्य त्यांना प्रिय असतो. त्याची भेट होणे व त्याला ज्ञान देणे हे गुरूंचे व्यसन असते. त्याच्या भेटीशिवाय आणि त्याला ज्ञान दिल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. म्हणूनच भक्ताच्या भेटीला पांडुरंग येतात. कारण भक्ताची भेट घेणे हे पांडुरंगाचे व्यसन आहे. त्याशिवाय त्याला समाधान वाटत नाही.
साधनेमध्ये सुद्धा तो स्वर भेटावा याचे व्यसन असायला हवे. सोहमच्या स्वरात मन गुंतवण्याचे व्यसन लागल्यास ज्ञानाची द्वारे निश्चितच उघडतील. त्याशिवाय शिष्याला सुद्धा समाधान भेटत नाही. यासाठी साधनेच्या व्यसनातून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्व वाईट व्यसने सोडून देण्यासाठी साधनेच्या व्यसनात स्वतःला गुंतवायला हवे. तरच आपणास समाधान भेटेल. वाईट व्यसनातून क्षणिक समाधान होईल पण साधनेच्या व्यसनातून अगणित समाधान भेटते हे लक्षात घ्यायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.