शैक्षणिक अभ्यासात गुरू असतातच ना? त्यांच्याकडून ज्ञान घेणे ही लाचारी होत नाही. मग आध्यात्मिक गुरूकडून ज्ञान घेणे, म्हणजे लाचारी पत्करणे हे कसे? व्यक्तिगत जीवनात अनेक अडचणी असतात. अशा प्रसंगात अनेकांची मदत होत असते. आध्यात्मिक गुरू हेसुद्धा मित्रासारखेच असतात. त्यांची मदत घेणे यात कमीपणा कसला.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जैसा शरत्कालू रिगे । आणि सरिता वोहटूं लागे।
तैसें चित्त काढेल वेगें। प्रपंचौनी।। 107 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे शरद ऋृतुचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरुपात जसजसा प्रवेश होईल, तसतसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल.
प्रपंचात एकदा अडकले की त्यातून बाहेर निघणे कठीण असते. हळूहळू त्यात मनुष्य अधिकच गुरफटत जातो. लग्न झाले की, मुलांच्यात गुरफटतो. प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढत जातात. आई वडिलांची जबाबदारी असते. मुलांची, पत्नीची जबाबदारी असते. यातून परमार्थ करण्यासाठी वेळच मिळत नाही. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर साठीमध्ये मग परमार्थाकडे ओढ लागते. काही उद्योग नाही म्हणून, मग आध्यात्मिक ग्रंथांचे पारायण सुरू होते. मनाला शांत ठेवण्यासाठी तो एक उत्तम मार्ग आहेच आणि उतारवयात आरोग्याच्या तक्रारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तर हा मार्ग स्वीकारणे कधीही चांगलेच आहे.
ऐन तारुण्यात एखादा तरूण परमार्थाच्या मार्गावर दिसला तर मात्र त्याला नावे ठेवण्यात येतात. लाचार व्यक्ती म्हणून हिणवलेही जाते. परमार्थ हा लाचारीचा मार्ग नाही. गुरूंना प्रश्न विचारायचे नाहीत, तर मग कोणाला विचारायचे. त्यांना प्रश्न विचारले तर, लाचारी पत्करली असे कसे. गुरू हे तज्ज्ञ असतात. शैक्षणिक अभ्यासात गुरू असतातच ना? त्यांच्याकडून ज्ञान घेणे ही लाचारी होत नाही. मग आध्यात्मिक गुरूकडून ज्ञान घेणे, म्हणजे लाचारी पत्करणे हे कसे? व्यक्तिगत जीवनात अनेक अडचणी असतात. अशा प्रसंगात अनेकांची मदत होत असते. आध्यात्मिक गुरू हेसुद्धा मित्रासारखेच असतात. त्यांची मदत घेणे यात कमीपणा कसला.
प्रपंच हा होत असतो. अध्यात्माच्या वाटेवर गेल्यावर प्रपंचातील अडीअडचणी कमी होत जातात. पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात नदीचा प्रवाह हळूहळू कमी होऊ लागतो. शरद ऋृतुच्या प्रारंभापासून उष्म्यात वाढ होते व हळूहळू नदी आटते. तिचा प्रवाह खंड पावतो. तसे आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली की प्रपंचातील अडीअडचणी हळूहळू कमी होतात. भेडसावणारे प्रश्न सुटतात. मनाची शांती साधण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी शिष्याचे प्रापंचिक प्रश्न सुटणे, अडीअडचणी दूर होणे गरजेचेच असते. गुरूंचा हा प्रयत्न असतो. गुरूंना हेच हवे असते. शिष्याचे प्रश्न सुटले तरच तो आध्यात्मिक शांतीकडे वळेल.
जीवनातील सगळे प्रश्न एकदम संपत नाहीत. हळूहळू हे प्रश्न मार्गी लागतात. उन्हाळ्यात झाडाची पाने गळतात. तसे जीवनातून हे प्रश्न गळतात. कडक उन्हातही झाडाला फुलोरा येतो. पाने झडून गेल्यावर तेथे नवी पालवी फुटते. तसे अध्यात्माच्या जीवनातही बहर येतो. हळूहळू मन प्रपंचातून दूर जाऊन अध्यात्माच्या मार्गी लागते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.